Skip to main content

शेलू !!

लेखक शरभ
Published on रवीवार, 29/01/2012
कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता. अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ? मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ? तो म्हणाला - अरे सहजचं. आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला. खिडकीबाहेर नजर टाकली तर नदी दिसू लागली. झालं. च्यायला, घरी जाताना कधी नदी दिसत नाही. आज झोप अंगाशी आली होती. आपलं गाव कधीच मागे पडलं! चला, आता उतरून परत जाणं आलं. असं म्हणून येईल त्या पहिल्या स्टेशनवर पाऊल ठेवलं आणि समोर बोर्ड बघतो तर काय? - शेलू !! शपथ !... त्या स्टेशनवर मी एक आणि दूरवर २-३ भाजीवाल्या उतरल्या. २ फलाटं होतीं, मात्र पलीकडे जायला जिना वगैरे प्रकार नव्हता तेव्हा. आणि पलीकडे जाणं आवश्यक होतं कारण परत जायला तिथुनच लोकल मिळणार होती. तशीच लाइनमध्ये उडी मारुन पलीकडे गेलो. स्टेशनवर कुठेच इंडिकेटर नव्हते. मला वाटतं, स्टेशनमास्तरदेखील नसावा तिथे. बराच वेळ झाला तरी परतीची लोकल काही येईना, म्हणून सरळ कॉलेजचं जर्नल काढलं, भरायला सुरवात केली. आणि मला ते पूर्ण करायला पुरेसा वेळ देऊन मगच दुरून लोकलने हॉर्न दिला. खरचं सांगतो- च्यायला, त्या संध्याकाळी साडेचारच्या वेळेसदेखील तिथे चिट्पाखरु नव्हतं. आख्या शेलू स्टेशनवरुन अखिल भारतीय रेल्वे प्रवासी संघातर्फे, मी एकटाच त्या लोकलमध्ये चढलो आणि पुर्णवेळ हा विचार करत राहिलो ,की कुठुन मला मित्राने विचारलं की हे शेलू कुठे आहे आणि मी त्याला सांगितलं.... काय एक एक योगायोग....
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3746
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आख्या शेलू स्टेशनवरुन अखिल भारतीय रेल्वे प्रवासी संघातर्फे, मी एकटाच त्या लोकलमध्ये चढलो

पुर्णवेळ हा विचार करत राहिलो ,की कुठुन मला मित्राने विचारलं की हे शेलू कुठे आहे आणि मी त्याला सांगितलं.... आता परत कोणाच्याही भंपक प्रश्नावर , शंकांवर प्रतिक्रिया देउ नका ,तुमचे ग्रह तितकेसे चांगले नाहीत.....;)

छान! आठवण आवडली. असं होतं खरं बरेच वेळेस... आपण कधीही न ऐकलेलं काही एकाच दिवसात दोन तीन वेळा, वेगवेगळ्या लोकांकडून, वेगवेगळ्या संदर्भात ऐकायला मिळतं. :)

तुमच्या मित्राने शेलूच नाव काढताच तुमच्या अंतर्मनाने ती आज्ञा स्वीकारली.. आणि तेवढा वेळ तुम्हाला बरोबर झोप लागली आणि शेलू स्टेशन आल्यावर तुम्हाला जाग आली

छानच लिहिलय.

१९७८ ते १९८८ डोंबिवलीला रहात होतो. शेलुला राहणाऱ्या एका मित्राकडे ज्याचे नाव मामा मसणे होते, त्यच्या घरी जात असू. त्या वेळेस शेलू स्थानक नव्हते. तेव्हा कर्जत ट्रेनने शेलुला जाणार्या स्थानिकापैकी कुणी तरी सांखळी खेचून गाडी शेलुला थांबवत असे, आणि सर्व शेलूवासी अक्षरशः माकडाप्रमाणे उड्या मारून टपाटप उतरत असत. आम्ही देखील त्यांचेच अनुकरण करत असू....

१९७८ ते १९८८ डोंबिवलीला रहात होतो. शेलुला राहणाऱ्या एका मित्राकडे ज्याचे नाव मामा मसणे होते, त्यच्या घरी जात असू. त्या वेळेस शेलू स्थानक नव्हते. तेव्हा कर्जत ट्रेनने शेलुला जाणार्या स्थानिकापैकी कुणी तरी सांखळी खेचून गाडी शेलुला थांबवत असे, आणि सर्व शेलूवासी अक्षरशः माकडाप्रमाणे उड्या मारून टपाटप उतरत असत. आम्ही देखील त्यांचेच अनुकरण करत असू....