Skip to main content

अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 01/09/2016 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील. म्हणजे ते आले एप्रिलमध्ये आणि जाणार होते जुलै मध्ये, पण डिसेंबर पर्यंत पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. बरं महिन्याचा हप्ता जवळपास $४०० होत होता. मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं. किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधं भारतातून येताना बरोबर आणायला सांगितली. ते प्रथमच न्यू यॉर्कमध्ये आले असल्याने भरपूर भटकंती सुरु होती. अश्यातच वेस्ट कोस्टची ट्रिप ठरली. ग्रँड कॅन्यनला माझी ४ वर्षांची मुलगी माझ्याच बरोबर आलेल्या एका व्यक्तीमुळे जवळपास ४ फूट उंचीच्या दगडावरून पडली (त्यातले खास भारतीय व्यक्तींचे वागणे व तो अनुभव दुसऱ्या लेखात सांगीन). मुलीचा पाय दुखावला पण फ्रॅक्चर आहे का नाही ते कळेना. गाडीत बसल्यावर ती शांत झाली आणि मग आम्ही ४-५ तासांचा प्रवास करून वेगासमध्ये परत आलो. पायाला नक्की फ्रॅक्चर आहे का नुसताच मुरगळलाय ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) चर्चा करत होतो की काय करावं. अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या आणि खर्चाच्या भयानक कथा ऐकल्या होत्याच. त्यात इन्शुरन्स नसल्यामुळे कसं आणि काय होणार याची पण चिंता होती. वेगासला येईपर्यंत तसा उशीर झाला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला एका हॉस्पिटल मध्ये नेलं. तातडीच्या सेवेमध्ये (ER) हॉस्पिटलने दाखल करून घेतलं व आमची रवानगी एका खोलीत झाली. थोड्या वेळाने एक नर्स येऊन वय, वजन, उंची ई घेऊन गेली. मग अर्धा तास झाला, एक तास झाला आम्ही आपले वाट बघतोय. मध्ये २ वेळा विचारून आलो तर नुसतंच डॉक्टर येताहेत (Doctor is on his way) असं सांगत होते. डॉक्टर पण ग्रँड कॅन्यनहून येत होता की काय कोण जाणे. साधारण दीड तासाने एक माणूस डुलतडुलत आला म्हणलं चला आता उपचार चालू होतील, तर तो निघाला X-Ray काढणारा. पाय वेडावाकडा करून करून त्याने ५-६ X-Ray काढले व परत आमची रवानगी एका खोलीत झाली. आधीच्या अनुभवावरून फार लवकर काही होईल अशी आशा नव्हती पण यावेळेला फक्त ३ तासांनी डॉक्टर आले. तोपर्यंत आम्हाला फ्रॅक्चर आहे वा नाही हे पण कोणी सांगत नव्हतं. अमेरिकन प्रथेप्रमाणे छान छान बोलून डॉक्टरांनी सुरुवात केली. इथे माझ्या मनात मी म्हणतोय बाकी सगळं राहूद्या हो, आधी सांगा काय झालंय ते. पण नाही... आधी आमच्याशी, मग मुलीशी छान छान बोलून डॉक्टरांनी ५-७ मिनटं घालवलीच, मग मुद्द्यावर आले. घोट्याच्या २-३ इंच वर नडगीला अगदी बारीक (Hairline) फ्रॅक्चर होतं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आत्ताच्या फ्रॅक्चरच्या थोडं वर एक जुनं फ्रॅक्चर पण होतं जे भरून आलं होतं. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की ती या आधी कधी अशी पडली नाही किंवा पाय दुखतोय अशी तक्रार पण केली नाही, मग असं जुनं फ्रॅक्चर असणे कसं शक्य आहे? पण तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच येताय त्यामुळे आधीचं आम्हाला काही माहित नाही आणि जे दिसतंय ते आम्ही सांगतोय असं उत्तर देऊन प्रश्नच फेटाळून लावला. आता प्लॅस्टर घालायचं का विचारल्यावर नर्स येऊन घालेल म्हणाले. नशिबाने या वेळेला नर्स लवकर आली पण हातातलं सामान प्लॅस्टरचं वाटत नव्हतं. तिने पायाची पाहणी केली आणि मग एक पट्टीसारखं काहीतरी काढलं. जवळपास २ इंच रुंद आणि ३ फूट लांब असेल. ते पाण्यात भिजवलं आणि पोटरीच्या खालून अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत लावून त्याला पायाचा आकार दिला आणि ते वाळल्यावर स्ट्रेच बँडेज गुंडाळून टाकलं. एवढ्यात झालं का अश्या मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले तर म्हणाले झालं सगळं. तेवढ्यात परत डॉक्टर आले आणि म्हणाले तिला जर वाटलं तर २ आठवड्याने ते बॅंडेज बदलून टाका. मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे राहत नाही व २ दिवसात परत जर्सीला जाणार आहे, तर म्हणाले घरीच बदलून टाका. आम्ही विचारलं की तिचे X-Rays आणि रिपोर्ट्स मिळतील का? कारण जर जर्सीमध्ये डॉक्टरांना दाखवायचं असेल तर उपयोगी पडेल. तर CD वर कॉपी करून देतो म्हणाले. मी परत जुन्या फ्रॅक्चरचा विषय काढला, तर म्हणे तिची हाडं ठिसूळ आहेत. त्यावर लवकरात लवकर टेस्ट्स आणि ट्रीटमेंट करून घ्या. प्रकरण वाढलं तर ती नुसतं चालता चालता पडली तरी फ्रॅक्चर होईल. हे ऐकून आम्ही दोघे एकदम टेंशनमध्ये आलो. तेवढ्यात ते धडकी भरवणारे वाक्य आलं - बिल भरून या. जड पायांनी आणि धडधडत्या छातीने मी गेलो. बिलिंग डेस्कवरची स्त्री आणि माझा संवाद खालील प्रमाणे - ती: इन्शुरन्स कोणता आहे? मी: नाहीये. मी थोडक्यात तिला परिस्थिती समजवायचा प्रयत्न केला. परत मीच: घाबरत तिला बिल विचारलं ती: ३,५०० डॉलर्स माझ्या पोटात गोळा आला. जे भारतात ३,५०० रुपयात (तेव्हा) झालं असतं त्याला जवळपास २,००,००० रुपये द्यायचे? तिला बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं. ती: तुम्ही भरू शकता का? मी: हे बरेच पैसे आहेत. ती: तुम्ही यातले २०% भरू शकता का? $६०० वगैरे. माझ्या मनात एकदम बऱ्याच भावना आणि प्रश्न आले. त्यामुळे चेहऱ्यावर बावळट भाव आले असावेत. तिने पटकन माझ्याकडे एक फॉर्म दिला आणि म्हणाली हा भर, ६०० डॉलर दे की तुझं काम झालं. मी: (अविश्वासाने) बाकीचे पैसे मी नाही भरायचे? ती: नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. मी फॉर्म भरून दिला. ती: हे ६०० डॉलर्स तुला एकदम भरता येणार नसतील तर आपण महिन्याला ठराविक रक्कम ठरवू तेवढे भर. मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे. मी: ६०० डॉलर्स भरतो. पुढे एका विभागात जाऊन मी रिपोर्ट्सची CD घेतली व सकाळी ८ ला ER मध्ये गेलेलो आम्ही साधारण संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडलो. यात खरं काम किती वेळाचं तर फार तर १ तास, बाकी वेळ नुसतच बसून. उर्वरित ट्रिप तशीच लेकीचा "प्लॅस्टर" मधला पाय घेऊन पार पाडली. समारोप जर्सीला परत गेल्यावर ते रिपोर्ट्सचं पाकीट उघडलं. याआधी ते वाचायला वेळ झाला नव्हता. ३ पानी रिपोर्ट वाचता वाचता दुसऱ्या पानावर एका परिच्छेदात काय लिहिलं होतं त्याचा संदर्भच लागेना. लिहिलं होतं - किडनीच्या आजाराचे डिटेल्स, किडनीमधून स्टेंट टाकल्याचे आणि अजून कसलेकसले मार्क्स आहेत. आम्हाला दोघांनाही काय करावे ते कळेना. भारतात आमच्या डॉक्टरना फोन झाले. अमेरिकेतल्या डॉक्टर असलेल्या माझ्या चुलत बहिणीला विचारून झालं पण कोणाला काही कळेना. मग दुसऱ्या दिवशी वेगासमधल्या हॉस्पिटलला फोन केला. त्यांनी शांतपणे सांगितलं की टाईप करताना चुकलं असेल. म्हणलं प्रत्येक पानावर रुग्णाचं नाव लिहिलंय आणि पानावरचा एकच परिच्छेद कसा चुकू शकतो? तर ते म्हणे झालं असेल चुकून, तुम्ही दुर्लक्ष करा. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला बायकोमुलींची सुट्टी वाढवायला लागली. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे बायकोमुलीं सुट्टीनंतर परत जाणार होते व मी एकटा अमेरिकेत राहणार होतो. परंतु, मुलीच्या हाडांच्या ठिसूळपणाचं पुढे योग्य निदान आणि उपचार करावे म्हणून आम्ही सगळ्यांनीच अमेरिकेतला गाशा गुंडाळून परत जायचं ठरवलं. दरम्यान पुढील १-२ महिन्यांमध्ये त्या हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून $५०-$६० ची २-३ बिलं आली, जी मी भरली. भारतात परत आल्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ् आहेत त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Dexa Scan केलं. त्याचे रिपोर्ट्स व अमेरिकेतले रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो. Dexa Scan रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणले ती व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. मी अमेरिकेतले रिपोर्ट्स दाखवले. ते बघून ते म्हणाले कि अमेरिकन स्टॅंडर्डप्रमाणे सगळ्याच भारतीयांची बोन डेन्सिटी कमी असते. त्यामुळे ते लोक म्हणतात की तुमची हाडं ठिसूळ आहेत. पण तसं काही नसतं आणि तुमच्या मुलीलाही काही झालेलं नाहीये. अशी ही अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्सची गम्मत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 58865
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by अभिजीत अवलिया

खरंच गरीब असेल किंवा अत्यावश्यक कारण असेल तर राज्य सरकार पैसे भरते. एक केस बघितली आहे. खूप बिल आले असेल तर आणि भरायचेच असेल तर शून्य व्याज दरावर दर महिन्या चा हप्ता दवाखान्यामध्ये भरू शकतो. चॅरिटी संस्था कडे पण मदत मागु शकतो

In reply to by अभिजीत अवलिया

तुम्ही जर का जाहीर केलं की तुम्ही पैसे भरू शकत नाही तर फारसं काही होत नाही. माझ्या केस मध्ये पण मी सांगितलंच ना की हे पैसे जास्त आहेत आणि तेवढ्याच एका वाक्यावर त्यांनी ८०% सूट दिली. इथे एक चांगलं आहे ते म्हणजे रुग्णाकडे पैसे नाहीत म्हणून डॉक्टर उपचार करणं नाकारू शकत नाहीत. नियमाप्रमाणे उपचार करणे बंधनकारक आहे, पैश्याचा विषय नंतर येतो. अजून एक केस म्हणजे माझ्या टीममधल्या एकाचे सासरे इथे आल्यावर दुसऱ्याच आठवड्यात माउंटन्समध्ये फिरायला गेले तर तिथे वर त्यांना हार्ट अटॅक आला. एअर ऍम्ब्युलन्सने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे फारसे उपचार करण्याची सोय नव्हती म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे तपासण्या केल्या तर ४ ब्लॉक्स आहेत असं आढळलं. त्यांची शल्यक्रिया आणि ७ दिवस हॉस्पिटलमध्ये (त्यातले ३ दिवस तरी ICU मध्ये याचा खर्च $१ लाखांच्या वर झाला. परंतु त्याला पैसे भरायला लागले नाही. पण त्याच्याच सासूला डायबेटीसमुळे पायाला काहीतरी झालं आणि त्याची शल्यक्रिया करायला लागली त्याचा खर्च $३५-४०००० झाला त्याचे पैसे मात्र भरायला सांगितले. एकरकमी जमणार नाहीत म्हणून दरमहा हप्ता लावून दिला. हे बहुतेक उपचारासाठी तुम्ही कुठे जाता, तुमची काय माहिती सांगता, आधी काय उपचार झालेत व त्याचं बिल भरलंय/ नाही भरलंय वगैरे गोष्टींवर अवलंबून असावं.

काही दिवसांसाठी जेव्हा जेष्ट नागरिक अमेरिकेत येतात तेव्हा त्यांचा इंश्युरंस कुठला घ्यावा. विशेषत: जेव्हा ते चांगले हिंडते फिरते असतात आणि कुठलाहि आधीचा आजार किंवा तशी लक्षणं नसतात तेव्हा. जाणकारांनी यावर पण प्रकाश टाकावा.

In reply to by सही रे सई

इन्शुबाय वर तुलना करून विमा घेता येतो. विमा लवकर घ्या, कारण काही काही स्टेट्स मध्ये काही विमा घेता येत नाहीत. उदा. एचसीसी विमा वॉशिंग्टन राज्यातल्या लोकांना घेता येत नाही. त्यामुळे विमा घेताना ती व्यक्ती (जिच्यानावे विमा घेतलाय) वॉशिंग्टन मध्ये नसावी. एचसीसी विमा असेल तर 'इन नेटवर्क' डॉक्टर कंपनीला बिल करू शकतात. बहुतेक इतर विमा कंपन्या विमाधारकाला आधी बिल द्यायला लावून नंतर पैसे परत करतात. मी एचसीसी बद्दल बोललो कारण मी तो विमा घेतला होता. देवाच्या दयेने वापरावा लागला नाही. त्यामुळे त्याबद्दल अनुभव नाही. तुमचे पण विम्याचे पैसे फुकट जावोत :)

In reply to by सही रे सई

जर का तब्येत ठणठणीत असेल तर विम्याचे पैसे खरंच वाया जातात. पण कळीचा मुद्दा हा आहे की जर गरज पडली तर काय? विमा कंपनी पैसे देते का? माझ्या थोड्याफार आणि ऐकीव अनुभवावरून सांगतो की विमा कंपन्या बहुतांशी जबाबदारी नाकारतात. आधीपासून असलेला आजार आहे किंवा या आजाराला विमा संरक्षण नाही असं सांगून वाटेला लावतात. किरकोळ आजार म्हणजे सर्दी/ ताप वगैरे पासून ते थोडं फार वैद्यकीय सल्ला व उपचार पाहिजे असेल तर विम्याची गरजही नाही. तुमच्या भागात महाराष्ट्र मंडळ/ मंदिर/ ट्रस्ट/ संस्था असेल तर त्यांच्याकडून एखाद्या भारतीय डॉक्टरकडे उपचार होऊन जातात. पण जर मोठा आजार उद्भवला तर काय? उदा. म्हणून आपण हृदयविकार घेऊ. आता यात – १. विमा आहे - हा साधारणपणे $५०,००० ते $१००,००० पर्यंत असतो. पण आधीपासून असलेले आजार यात कव्हर नाही ही मुख्य अट असते. आता ह्रदयविकार असा १-२ महिन्यात एवढा बळावत नाही, त्यामुळे ही आधीपासूनची परिस्थिती (Pre-exsting condition) आहे असं विमा कंपनी सहज म्हणू शकते. हॉस्पिटल विमा कंपनीला बिल पाठवते आणि विमा कंपनी ते नाकारते. हॉस्पिटलमध्ये आपण फॉर्म सही करून दिलेला असतो. त्यात विमा आहे असं आपण सांगतो, आणि त्याखाली एक डिक्लरेशन असतं, "विमा कंपनी जे पैसे देणार नाही ते पैसे द्यायला मी बांधील आहे.". हॉस्पिटल सरळ तुमच्यावर टाकून मोकळं होतं कारण तुमच्याकडे विमा आहे. पण विमा कंपनी सहकार्य करत नाहीये. शेवटी बिल भरायची जबाबदारी तुमचीच आहे. २. विमा नाही - यात तुम्ही विमा नाही हे आधीच सांगितलेलं असतं. अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे विमा नाही किंवा पैसे नाही म्हणून वैद्यकीय सेवा नाकारता येत नाही. हॉस्पिटलसुध्दा किंमत लावताना विमा नाही हे लक्षात घेते. जर बिल तुमच्या आवाक्याबाहेरचं असेल तर अश्या पेशंटला मदत करणाऱ्या संस्था हॉस्पिटलला माहित असतात. त्यामुळे तुम्हाला कमी पैसे भरायला लागतात, जे माझ्या केसमध्ये झालं. या लेखातल्या एका प्रतिक्रियेत माझ्या मित्राचा अनुभव सांगितला आहे. त्याने त्याच्या आईसाठी विमा घेतला होता. दुर्दैवाने त्यांना हार्ट ऍटॅक आला, ४ दिवस ICU मध्ये राहून त्यांचा मृत्यू झाला, बिल $१३०,००० झालं. विमा कंपनीने हार्ट कंडिशन्स या अचानक उद्भवत नसून आधीपासूनच आजार या सबबीखाली पैसे द्यायचे नाकारले. पैसे न भरल्याने कलेक्शनला गेलं, जवळपास ८-१० वर्ष झाली माझा मित्र अजूनही ती केस लढवतोय. माझ्या मते - तब्येत ठणठणीत असली तरी - येण्याआधी भारतातच ECG सकट संपूर्ण शरीराची तपासणी, रक्त, लघवी तपासणी करून घ्यावी. - रोज घ्यायला लागणारी औषधं, त्यांच्या पूर्ण वास्तव्याचा कालावधीत पुरतील, एवढी आणावी. थोडी जास्तच आणली तरी चालतील. - सर्दी, खोकला, ताप यासाठी त्यांना चालतात अशी औषधं आणावी. - ऍलर्जीच्या थोड्या गोळ्या आणाव्यात. - बाकी नेहमीचं म्हणजे हवामान बघून त्याप्रमाणे त्यांना कपडे घालायला सांगणं, खाण्यापिण्याची पथ्य हे तर आपण करतोच अजून एक महत्वाचं म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्यावा असं मला वाटतं. हा फक्त विमान प्रवासापुरताच असतो. यात विमान चुकणे, सामान हरवणे याबरोबरच मेडिकल कव्हरेज पण पाहिजे. कारण विमानात तब्येतीचा त्रास झाला तर महागात पडतं. ही माझी वैयक्तिक मतं आहेत. इन्शुरन्स अजिबातच कामाचा नाही असं माझं म्हणणं नाही. इन्शुरन्स घ्यावा का नाही हे ज्याचं त्याने ठरवावं.

In reply to by ट्रेड मार्क

योग्य वेळेला योग्य चर्चा! सध्या मी हेच शोधत आहे. आई येत आहे. पण तिला काहीही आजार किंवा गोळी नाही. अनेकांनी सांगितले म्हणुन विमा घ्यावा ह्या विचारात होते. पण हा प्रतिसाद वाचुन आता मी जरा गडबडलेय. (तरी पाच पन्नास डॉलरचा तरी इन्शुरन्स घ्यावा का ह्या विचारात आहे.) मी इन्शुबाय वर पाहिले, ४५$ मध्येही एक विमा सापडला. घ्यावा का? आणि हो.. ह्यात ट्रॅव्हल आणि मेडिकल दोन्ही एकत्र असतं ना?

In reply to by पिलीयन रायडर

थोडंफार कव्हरेज आणि जास्त मनाचे समाधान म्हणून घ्यायला हरकत नाही. विमा घेताना खालील गोष्टी बघायला पाहिजेत - १. कव्हरेज - किती डॉलर्सचं कव्हरेज आहे. २. कुठले आजार कव्हर करतात - आधी म्हणल्याप्रमाणे जुने आजार बहुतेक विमा प्लॅन्स कव्हर करत नाहीत, अर्थात जास्त प्रीमियम देऊन असे प्लॅन्स घेता येतात. त्यामुळे स्वस्तातला प्लॅन हा तत्कालीन आजार अथवा दुखापत यासाठी उपयोगी होऊ शकेल. ३. कोपे (Copay) - डॉक्टरच्या प्रत्येक भेटीला तुम्हाला किती हिस्सा भरायला लागतो. स्वस्तातल्या विम्यांमधे कोपे जास्त असतो. एक डॉक्टरच्या भेटीला साधारणपणे $२००-$२५० घेतात. आता यात जर कोपे $१००-$१५० असेल तर फारसा फायदा नाही. अर्जंट केअर (ER नव्हे) मध्ये गेलं तर साधारणतः तेवढाच खर्च येतो. ४. Deductible - हा सगळ्यात फसवा प्रकार असतो. यात अशी अट असते की एक ठराविक रक्कम तुम्ही भरल्याशिवाय इन्शुरन्स काही देणं लागत नाही. उदा. तुमचा विमा अगदी $५०,००० चा असेल पण $४,५०० Deductible असेल तर हा Deductible पूर्ण होईपर्यंत तुम्ही पैसे भरायचे. जेव्हा तुमचे $४,५०० पूर्ण भरून होतील त्यानंतर मग विमा कंपनी पैसे भरेल. ५. कुठले उपचार कव्हर नाहीत - सर्वसाधारपणे एक्स-रे कव्हर करत नाहीत किंवा अगदी थोडी रक्कम देतात. साधा पाय मुरगळला तर ४-५ एक्स-रे सहज काढतात आणि त्याचे $४००-५०० लावतात. मग हे एकतर सगळे पैसे तुम्हाला भरायला लागतात किंवा विमा कंपनी फक्त $१०० – १२५ देते व बाकी तुम्ही भरायचे. काही प्रकारच्या टेस्ट्स कव्हर नसतात, फिजिओथेरपी कव्हर नसते ईई. पिराताई, तुम्ही तर जर्सी सिटीत राहताय. जर प्रसंग आलाच तर ढिगानी भारतीय डॉक्टर मिळतील. महाराष्ट्र मंडळ/ गुजराथी मंडळ यांच्याशी थोडा संपर्क साधून ठेवा, त्यांच्याकडे अश्या काही काळासाठी येणाऱ्या ज्येष्ठांवर कमी पैश्यात उपचार करणारे डॉक्टर असतात. पण वर म्हणल्याप्रमाणे, विमा घ्यायचा का नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घ्या. ट्रॅव्हल आणि मेडिकल दोन्ही या इन्शुरन्स मध्ये नसेल. ट्रॅव्हल इन्शुरन्स वेगळा घ्यावा लागतो जो फक्त प्रवासात येणाऱ्या अडचणींपासून ते वैद्यकीय सेवा या पर्यंत कव्हर करू शकतो. पण तो फक्त प्रवासापुरताच असतो. व्हिजिटर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागतो. कोणी यात जाणकार असेल तर अधिक सांगू शकेल. एक सूचना: विमा घेणार असाल तर भारतीय कंपन्या (ICICI वगैरे) देतात त्याला इथे कोणी विचारत नाही. insubuy किंवा visitorscoverage यावरून घ्यावा.

In reply to by ट्रेड मार्क

भारतीय विम्याचा विचार करत होते खरं तर. पण इथे उपयोगाचा नसेल तर.... बाकी मलाही विम्याची आवश्यकता आहे का असेच वाटत आहे. कारण विम्याचा माझाही आजवरच अनुभव असाच आहे की खिशातुन पुष्कळ पैसे द्यावे लागतात (डिडक्टिबल मुळे). त्यापेक्षा विमाच नसेल तर बिल कमी लावतात हे ही पाहण्यात आहे. आणि इथे पुष्कळ भारतीय डॉक्टर आहेत हे ही बरोबर आहे. त्याचा बराच फायदा होतो.

In reply to by ट्रेड मार्क

सहज एक शंका... - रोज घ्यायला लागणारी औषधं, त्यांच्या पूर्ण वास्तव्याचा कालावधीत पुरतील, एवढी आणावी. थोडी जास्तच आणली तरी चालतील. आपल्या सोबत औषधे ठेवण्याबद्दल कांही बंधन नसते का..? समजा मी ६ महिन्यांसाठी येणार आहे आणि बीपीच्या रोजच्या एक / दोन गोळ्या + बफर अशा ४०० गोळ्या सोबत ठेवल्या तर CBP वाले तसेच सोडतील का..? आणि या एकाच आजाराच्या गोळ्या झाल्या. सिनीयर सिटीझनना असे वेगवेगळे आजार असू शकतात.

In reply to by मोदक

माझे वडील येतात तेव्हा त्यांची ६ महिन्यांची औषधं घेऊन येतात. ज्यात ३-४ प्रकारच्या तरी गोळ्या असतात, वर बाकी जनरल औषधं (गोळ्या/ बाटल्या) असतातच. एका प्रकारच्या औषधाच्या जवळपास २० स्ट्रिप्स अश्या टोटल ८० ते १०० स्ट्रिप्स असतात. काही लिक्विडच्या बाटल्या असतात. थोडक्यात अर्धी ब्याग औषधांनीच भरलेली असते. या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात. आत्तापर्यंतच्या ३-४ फेऱ्यांमध्ये एकदाही त्रास झाला नाही (लाकूड स्पर्श). सध्या नवीन हामेरिकेत नवीन म्यानेजमेंट आल्यापासून काय परिस्थिती आहे माहित नाही. कशामुळेही त्रास होऊ शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात. हे महत्वाचे आहे. योग्य संबंधीत कागदपत्रे बरोबर असल्यास, स्वतःसाठी प्रवासाच्या कालावधीसाठी लागणारी औषधे बरोबर नेण्यास सहसा कोठेच आडकाठी नसते.

In reply to by ट्रेड मार्क

या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात. हे महत्वाचे आहे. योग्य संबंधीत कागदपत्रे बरोबर असल्यास, स्वतःसाठी प्रवासाच्या कालावधीसाठी लागणारी औषधे बरोबर नेण्यास सहसा कोठेच आडकाठी नसते.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेमा सरः आकडेवारी बघायला आवडेल. ईन्शोरन्स ओम्बुड्समन वगैरे गोष्टी असतांना असं होणं एकंदर अवघड वाटतं आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

वर म्हणल्याप्रमाणे स्वानुभव व इतरांकडून ऐकलेले त्यांचे अनुभव यावरून सांगतोय. मुळात इन्शुरन्स कंपनी ही त्यांचा फायदा बघत असते. अश्या परदेशात भेटीला येणाऱ्यांची सोय हा भाग कदाचित त्यांच्यासाठी दुय्यम असावा. कारण येणाऱ्या लोकांमध्ये जास्तकरून ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे त्यांच्यात रक्तदाब, रक्तातील साखर हे सर्वसामान्य रोग आहेत. प्रत्येकाला ते उपचाराचा खर्च देत बसले तर लवकरच गाशा गुंडाळायला लागेल. त्यामुळे कशाचं कव्हरेज नाहीये हे नीट तपासून बघणं गरजेचं आहे. ईन्शोरन्स ओम्बुड्समन वगैरे असतात, पण एवढं भांडत बसणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. इन्शुरन्स घेताना pre-existing साठी नाही असं सांगितलं असेल. तर एखाद्याला कोलेस्टेरॉलचा त्रास आधीपासून आहे, त्यामुळे त्याबरोबर रक्तदाब पण आहे. अश्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर इन्शुरन्स कंपनी म्हणू शकते की मूळ कारण कोलेस्टेरॉल आहे, जे आधीपासूनच आहे, म्हणून काहीही देय नाही. यात कोणी जाणकार, या क्षेत्रात काम करणारे अधिक सांगू शकतील. इन्शुरन्स ही संकल्पना ज्याच्या डोक्यातून निघालीये त्याला मानलं पाहिजे. लुटण्याचे अधिकृत मार्ग तयार करून दिलेत.

In reply to by सही रे सई

इतरांनी म्हटल्याप्रमाणे इंश्युबाय वैगेरे साइट्सवरून कोट्स घेऊन तुम्हाला सहज इंश्युरन्स घेता येईल. जुने आजार जरी कव्हर होत नसतील तरी लहान सहान दुखणी (बग बाइट्स सारखे) आणि लहान-मोठ्या अपघातासारख्या परिस्थितीत हा इंश्युरन्स कामी येतो. ९९.९९% वेळा जरी काहीच झाले नाही तरी अश्या गोष्टी सांगून होत नाहीत. त्यामुळे इंश्युरन्स घ्यावा असे वैयक्तिक मत आहे.

आत्ताच पंधरा दिवसांपुर्वी आई आलीये तेव्हा आजुबाजुला मित्रमंडळात चौकशी करुन इंन्सुबायवरुन अ‍ॅटलास अमेरिका हा प्लान घेतला. साधारण $२६० वगैरे खर्च आला. वर ट्रेमा यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातुन विमा घेउ नये, कारण इथल्या डॉक्टर्सना आणी त्यांच्या बिलिंग ऑफिस्ना भारतीय विमा कंपनीशी क्लेम सेटलमेंटसाठी कराव्या लागणार्या उस्तर्वार्या करण्याची ना इच्छा असते ना तेवढा पेशन्स. आणि जरी इन्शुरन्स आधीचा आजार कवर करीत नसेल तरीही साध्या ताप/सर्दी/खोकला/पडणे झडणे अशा गोष्टींसाठी विमा असलेला बरा. मी स्वतः एका मित्राच्या आईचा जवळ्जवळ $१०,००० चा क्लेम पास झालेला पाहिला आहे.