Skip to main content

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 20/01/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

वाचने 74908
प्रतिक्रिया 282

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी, तुम्ही दिलेल्या या फितीत https://www.youtube.com/watch?v=yyhhVJD0s-4 फारसं आक्षेपार्ह काही सापडलं नाही. एके ठिकाणी बैलाची शेपूट पिरगळलेली दिसते, पण तो बैल शर्यतीत उधळलेला होता. हाताबाहेर गेला असता तर अपघात होऊन तो स्वत:, त्याचा जोडीदार आणि सारथी तिघांचेही जीव धोक्यात पडले असते. दुसऱ्या फितीत ( https://www.youtube.com/watch?v=PMPXp5Rqc1A ) बैलाची शेपटी चावणे फक्त आक्षेपार्ह आहे. त्याविरुद्ध कायदा करता येईल. शर्यतींवर सरसकट बंदी घालायची गरज नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बैलाची फक्त शेपटी चावली जात नाही. शर्यतीत पळण्यास उत्सुक नसलेल्या बैलाला शेपटी पिरगाळून उठविले जाते. शेपटी पिरगळूनही बैल उठत नसल्याचे पाहून एक माणूस मोठ्याने "चाव", "चाव","चाव" असे सांगत असल्याचे स्पष्ट ऐकू येते. बैलाच्या पाठीवर जे लाकडी जू ठेवले जाते त्याच्या दोन्ही बाजूच्या उभ्या दांड्यांना अणकुचीदार खिळे ठोकलेले दिसतात. हे दांडे बैलांच्या कानाजवळ येत असल्यामुळे जोरात पळताना बैलांना हे खिळे टोचतात. बैलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली जात असल्याचेही दिसते. शर्यत सुरू असताना गाडीवान बैलाची शेपटी दातात धरून चावताना दिसतो. हे सर्व छळाचे प्रकार आहेत. कितीही कायदे केले तरी हे प्रकार थांबणे अशक्य आहे. हा क्रीडाप्रकार वगैरे नाही. क्रीडाप्रकारात नियम असतात, नियमांचे पालन होते का नाही हे काटेकोरपणे बघण्यासाठी पंच असतात व नियमभंग झाल्यास खेळाडूला शिक्षा मिळते. या प्रकारात कोणतेही अधिकृत नियम नाहीत, पंच नाहीत आणि नियमभंग केल्यास शिक्षाही नाही. या प्रकारावर कायद्याने संपूर्ण बंदी आल्यास हा छळ थांबेल.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, सोप्पंय बघा. दुर्लक्ष करा. जसं गोमाताभक्तांच्या माणसं मारणार्‍या कृतींकडे केले जात आहे तसं.....

In reply to by संदीप डांगे

आपला सौदा पक्का झाला. निम्मे पैसे पण मिळाले. त्यामुळे मी पण इग्नोर मारला. (अवांतर: माणसांच्या खेळांवर आणि शर्यतींवर पण बंदी आणली पाहिजे. मागच्या महिन्यात दंगल पाहिला. किती क्रूरपणा असतो. माणसांना पण उत्तेजित द्रवे दिली जातात. पण खेळ बंद करण्याबाबत कोणी चकार शब्द नाही काढत. असो..)

In reply to by विशुमित

विशुमीत, लॉजीक चुकतंय तुमचं.. १. कुस्ती, बॉक्सिंग इ. खेळ नियमाने बद्ध आहेत. खेळामध्ये भाग घेणार्‍या दोन्ही व्यक्तिंना हे नियम माहित आणी मान्य आहेत. २. खेळाच्या दरम्यान असणारे धोके सामान्यतः जीवावर न बेतणारे आहेत तसेच ते माहित(ढोबळ स्वरूपात) आणि मान्य आहेत. ३. आणि सर्वात महत्वाचे दोन्ही खेळाडू मनुष्यप्राणी असल्याने(विचार करू शकणारा, अन्य पशूंप्रमाणे निव्वळ आदीम प्रेरणांवर न जगणारा) त्यांच्यातील स्पर्धेला खेळ असे नाव देता येते. एक पशू व एक माणूस यांमधील चुरशीला खेळ म्हणणे चुकीचे आहे. मानवाच्या जीवाला असणारा हा धोका लक्षात घेता जालिकट्टू हा खेळ गैर ठरतो आणी कुस्ती, बॉक्सिंग वैध.

In reply to by पुंबा

अगदी बरोबर. कुस्ती, बॉक्सिंग इ. प्रकारात भाग घेणार्‍या मनुष्यांना त्यात भाग घ्यायचा का नाही याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना त्या प्रकारात भाग घ्यायचा नसेल तर भाग घेण्याची बळजबरी कोणीही करू शकत नाही. याऊलट जालिकट्टू किंवा बैलगाडी शर्यत यात भाग घ्यायचा का नाही या निर्णयाचे स्वातंत्र्य प्राण्यांना नाही. त्यात त्यांना बळजबरीने भाग घ्यावाच लागतो. शर्यतीसाठी अनुत्सुक असलेल्या बैलाचा छळ करून त्यात बळजबरीने गाड्याला जुंपले जाते. कुस्ती, बॉक्सिंग हे प्रकार नियमानुसार चालतात. नियमांचे पालन होत आहे का नाही यावर पंच, कॅमेरे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात व नियमभंग झाल्यास नियमभंग करणार्‍याला शिक्षा मिळते. जालिकट्टू, बैलगाडी इ. प्रकारात असे ठरलेले लिखित नियम नाहीत. बैलांचा छळ होतोय का हे बघायला पंच, रेफ्री इ. नसतात. त्यामुळेच या प्रकारात मुक्या जनावरांचा क्रूर पद्धतीने छळ केला जातो व आमची संस्कृती, परंपरा इ. मुलामा चढविणारे बैलांच्या छळाचा आनंद घेतात.

In reply to by विशुमित

आपला सौदा पक्का झाला. निम्मे पैसे पण मिळाले. त्यामुळे मी पण इग्नोर मारला. मुक्या जनावरांचा बैलगाडी शर्यत किंवा शेतीच्या कामासाठी यातना देऊन छळ केला जातो. आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो असे शेतकर्‍यांनी मोठ्या तोंडाने कितीही वेळा सांगितले तरी त्यातील दांभिकपणा लपून राहत नाही. आधी बैलाला यातना देऊन त्याच्या पायात खिळे ठोकून नाल बसवायचे, नंतर कोणत्याही प्रकारची भूल न देता बैलाचे वृषण दांडक्याने चेचून किंवा बैलाच्या वृषणाची रक्तवाहिनी चिमट्याने कापून त्याला कायमस्वरूपी नपुंसक बनवायचे व त्याला जीवघेण्या वेदना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घ्यायचा, नंतर आयुष्यभर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला उन्हात राब राब राबवायचे, त्याला गाडीला जुंपून त्याच्याकडून अवजड मालाची वाहतूक करून घ्यायची, तो थकला की त्याला कसायाला विकून टाकून पैसे कमवायचे . . . आणि आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो अशा दांभिक गफ्फा हाणायच्या. कुटंबातील कोणत्याही सदस्याला इतक्या यातना देऊन त्याचे हालहाल केले जातात का? मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे जर शेतकरी विपन्नावस्थेत असतील तर त्यांनी यातना दिलेल्या मुक्या प्राण्यांचे तळतळाट त्यांना भोवताहेत असेच माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्या जनावरांचा बैलगाडी शर्यत किंवा शेतीच्या कामासाठी यातना देऊन छळ केला जातो. आधी बैलाला यातना देऊन त्याच्या पायात खिळे ठोकून नाल बसवायचे, नंतर कोणत्याही प्रकारची भूल न देता बैलाचे वृषण दांडक्याने चेचून किंवा बैलाच्या वृषणाची रक्तवाहिनी चिमट्याने कापून त्याला कायमस्वरूपी नपुंसक बनवायचे व त्याला जीवघेण्या वेदना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घ्यायचा, नंतर आयुष्यभर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला उन्हात राब राब राबवायचे, त्याला गाडीला जुंपून त्याच्याकडून अवजड मालाची वाहतूक करून घ्यायची, तो थकला की त्याला कसायाला विकून टाकून पैसे कमवायचे>>> ==> बैलांचा छळ होतो चला मान्य. तुमच्या मते अशा बैलाचं आताच्या घडीला करायचं काय ? त्यांना मुक्त करून जंगलात सोडून द्यायचे की नागपूरला संघाच्या कार्यालयात पिटाळायची? वस्तुस्थिती नुसार उत्तर द्या. उगाच स्वतःची विचारसरणीच आदर्श आणि महान आहे असे उत्तर नकोय. आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो असे शेतकर्‍यांनी मोठ्या तोंडाने कितीही वेळा सांगितले तरी त्यातील दांभिकपणा लपून राहत नाही.>> ==>> बैल हा बैलच असतो. तो माणूस नाही बनू शकत. वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच म्हंटले आहे. हे शेतकऱ्याला ही चांगले माहित आहे. इथे कुटुंबातील सखे भाऊ-भाऊ एकमेकांचा काटा काढतात, शहरातली मुलं आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात तिथे बैलाचं काय घेऊन बसलात? दांभिकपणाच्या फुकाच्या गप्पा संघात चांगल्या शोभतात. मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे जर शेतकरी विपन्नावस्थेत असतील तर त्यांनी यातना दिलेल्या मुक्या प्राण्यांचे तळतळाट त्यांना भोवताहेत असेच माझे मत आहे.>>> ==> पाप पुण्याचे भांडवल करून अजून किती दिवस लोकांना गंडवणार आहात.

In reply to by विशुमित

बैलांचा छळ होतो चला मान्य. नशीब छळ होतो हे मान्य तरी करताय. नाहीतर बैलांना आम्ही प्रेमाने वागवतो, बैल आमच्या कुटंबातील सदस्य असल्याप्रमाणे आम्ही त्याला वागणूक देतो, बैलांचा अजिबात छळ होत नाही, बैलांचा छळ होतो हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे इ. ब्ला ब्ला आतापर्यंत कानावर पडत होते. तुमच्या मते अशा बैलाचं आताच्या घडीला करायचं काय ? त्यांना मुक्त करून जंगलात सोडून द्यायचे की नागपूरला संघाच्या कार्यालयात पिटाळायची? वस्तुस्थिती नुसार उत्तर द्या. उगाच स्वतःची विचारसरणीच आदर्श आणि महान आहे असे उत्तर नकोय. बैलांचा छळ करू नका, त्यांना यातना देऊ नका, छळ करून बळजबरी करून शर्यतीत पळवून त्यात आनंद मानू नका. बैल हा बैलच असतो. तो माणूस नाही बनू शकत. वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच म्हंटले आहे. हे शेतकऱ्याला ही चांगले माहित आहे. इथे कुटुंबातील सखे भाऊ-भाऊ एकमेकांचा काटा काढतात, शहरातली मुलं आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात तिथे बैलाचं काय घेऊन बसलात? दांभिकपणाच्या फुकाच्या गप्पा संघात चांगल्या शोभतात. बैल हा माणूस नसला तरी माणसाला जशा वेदना होतात तशाच त्या बैलालाही होतात. बैलालाही तहान, भूक, शारीरिक प्रेरणा आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांना यातना देऊ नका. आणि दांभिकपणाचं म्हणाल तर तुमच्या बारामतीच्या पद्मश्री पद्मविभूषण डबल डॉक्टर क्रिकेटतज्ज्ञ जाणता राजा साहेबांइतकं जास्त दांभिक जगात दुसरं कोणीही नाही. पाप पुण्याचे भांडवल करून अजून किती दिवस लोकांना गंडवणार आहात. यात काहीही गंडवणूक नाही. गंडवायला मी काही शेतकरी नाही किंवा साहेबांच्या पक्षातही नाही. मुक्या जनावरांना यातना देऊन त्यांचा छळ करू नका हेच मी सुरवातीपासून सांगत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बैलांचा छळ करू नका, त्यांना यातना देऊ नका, छळ करून बळजबरी करून शर्यतीत पळवून त्यात आनंद मानू नका.>>> ==>> तुम्ही सोयीस्करपणे प्रश्नाला बगल दिली आहे. बैलाला नाल तर ठोकलीच पाहिजे. नाहीतर त्याचे पाय घसरतील, खुरे खराब होतील. औताला जुंपायच नाही म्हंटलं तर त्या बैलाला दारात बांधून त्याचा बरोबर सेल्फी काढत चेपुवर पोस्ट करण्याने फायदा होणार नाही. चाप नाही दिला तर काय होईल ते मागे आपण चर्चिले आहेच. शर्यतीत नाही पळवली तर खिल्लारी जातीच्या बैलांची जपवणूक कशी होईल. बैले नको असतील तर लोक गाई कशाला पाळतील. गाई नसतील तर वासू बारसेला अकृषक लोक नैवद्य कोणाला खाऊ घालतील. गाई नसतील तर संघाच्या कथित महागुरुंची दुकाने कशी चालतील हे महा गुरु(?) नसतील तर भाबडे गोरक्षकांना काम उरेल काय? (कथित) गोरक्षक नसतील तर राष्ट्रीय समस्या कशी निर्माण होईल? राष्ट्रीय समस्या नसतील तर मिपावर लेख/प्रतिसाद कसे झडतील? मिपा ओस पडेल ओस. बैलाचं करायचं काय ते सांगा. जंगलात सोडायचे का संघाच्या गोशाळेत. (कथित गोरक्षक गोशाळेत गुरांना किती अदबीने सांभाळतात आम्हाला चांगले माहिती आहे. दांभि(स)क कुठचे..!!) आणि दांभिकपणाचं म्हणाल तर तुमच्या बारामतीच्या पद्मश्री पद्मविभूषण डबल डॉक्टर क्रिकेटतज्ज्ञ जाणता राजा साहेबांइतकं जास्त दांभिक जगात दुसरं कोणीही नाही.>> ==> ते फक्त संघ विचारसरणी, काही मराठे जे स्वतःला खूप उच्च कोटीचे समजतात, नादान तरुण पिढी आणि अप्पलपोटी नेत्यांना वाटतं. आम्हाला त्यांचे विचार पटतात, कोणाला पटो न पटो. मुक्या जनावरांना यातना देऊन त्यांचा छळ करू नका हेच मी सुरवातीपासून सांगत आहे.>>> ==> यातना देऊन छळ करणे मान्य पण वर जे काही तुम्हाला यातना वाटतात ते शेतकऱ्यांच्या लेखी बैलांसाठी गरजेचे आहे. आणि ते नकोच असे वाटत असेल तर त्यासाठी उपाय सुचवा. व्यावहारिक असेल तर नक्की स्वीकार करतील शेतकरी. (नाल ठोकणे, वेसण घालणे, चाप देणे, औताला जुंपणे. शर्यतीच्या बाबतीत थोडाफार मी तुमच्या बाजूने आहे, काही गोष्टी मला ही नाही पटत. पण संपूर्ण बंदीला असहमत)

In reply to by विशुमित

खालील लेख या विषयाशी थोडे सुसंगत वाटलं. बघा विचार पटले तर. (डिकलमेर: पेपर 'लोकसत्ता' आहे. स्व जवाबदारीवर विश्वास ठेवावा). यातील """" शहरी धर्म (प्राणी प्रेमी) मरतडांनी गोपूजनाच्या (प्राणी प्रेमाच्या) गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकऱ्यांवर अशी व्यवस्था टिकू शकणार नाही.''' हे वाक्य विशेष आवडलं. (कंसातील शब्द माझे आहेत) http://www.loksatta.com/vishesh-news/farmer-union-leader-sharad-joshi-a…

In reply to by विशुमित

बैलाला नाल तर ठोकलीच पाहिजे. नाहीतर त्याचे पाय घसरतील, खुरे खराब होतील. आपले खूर खराब होतील का चांगले राहतील ते बैल बघून घेईल ना. आपल्या प्रचंड वजनाने गच्च भरलेल्या गाड्या बैलाकडून फुकट ओढून घेताना अडथळे येऊ नयेत यासाठी 'पाय घसरतील', "खूर खराब होतील' अशी हास्यास्पद कारणे देणे हा खोटा कळवळा आहे. औताला जुंपायच नाही म्हंटलं तर त्या बैलाला दारात बांधून त्याचा बरोबर सेल्फी काढत चेपुवर पोस्ट करण्याने फायदा होणार नाही. बैलांविषयी खोटा कळवळा दाखवूनही फायदा होणार नाही. शेत नांगरायला ट्रॅक्टर वापरा. नाहीतर स्वतः औताला जुंपुन घ्या. त्यासाठी मुक्या जनावरांचा छळ करू नका. चाप नाही दिला तर काय होईल ते मागे आपण चर्चिले आहेच. तो प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद होता. बैलाला चाप देण्यामागे किंवा त्याचे वृषण दांडक्याने चेचून त्याला नपुसंक करण्यामागे (दोन्ही प्रकार भूल न देता) फक्त स्वतःचा स्वार्थ आहे. त्यामागे बैलाचे कोणतेही हित नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बैलाला प्राणांतिक यातना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदसुद्धा कायमस्वरूपी हिरावून घेऊन त्याचे समर्थन करणे हा पराकोटीचा ढोंगीपणा आहे. शर्यतीत नाही पळवली तर खिल्लारी जातीच्या बैलांची जपवणूक कशी होईल. ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . . बैले नको असतील तर लोक गाई कशाला पाळतील. दोन्ही पाळू नका गाई नसतील तर वासू बारसेला अकृषक लोक नैवद्य कोणाला खाऊ घालतील. गाई नसतील तर संघाच्या कथित महागुरुंची दुकाने कशी चालतील हे महा गुरु(?) नसतील तर भाबडे गोरक्षकांना काम उरेल काय? (कथित) गोरक्षक नसतील तर राष्ट्रीय समस्या कशी निर्माण होईल? राष्ट्रीय समस्या नसतील तर मिपावर लेख/प्रतिसाद कसे झडतील? मिपा ओस पडेल ओस. या प्रश्नांची उत्तरे थोरल्या साहेबांना विचारा. ते डबल डॉक्टर, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, क्रिकेटतज्ज्ञ वगैरे वगैरे आहेत. त्यांना शेतीची, महाराष्ट्रातील समस्यांची खडानखडा माहिती आहे. ते 'अपनी शर्तोंपर" काम करतात. जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. बैलाचं करायचं काय ते सांगा. जंगलात सोडायचे का संघाच्या गोशाळेत. (कथित गोरक्षक गोशाळेत गुरांना किती अदबीने सांभाळतात आम्हाला चांगले माहिती आहे. दांभि(स)क कुठचे..!!) कोठेही सोडा. त्यांना पाहिजे तिथे ते जातील. तुम्ही त्यांची खोटीखोटी काळजी करू नका. स्वतःजवळ ठेवायचे असतील तर त्यांचा जीवघेण्या यातना देऊ नका, त्यांचा छळ करू नका, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करू नका आणि कसायाकडे पाठवू नका. ==> ते फक्त संघ विचारसरणी, काही मराठे जे स्वतःला खूप उच्च कोटीचे समजतात, नादान तरुण पिढी आणि अप्पलपोटी नेत्यांना वाटतं. आम्हाला त्यांचे विचार पटतात, कोणाला पटो न पटो. फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . . ==> यातना देऊन छळ करणे मान्य पण वर जे काही तुम्हाला यातना वाटतात ते शेतकऱ्यांच्या लेखी बैलांसाठी गरजेचे आहे. आणि ते नकोच असे वाटत असेल तर त्यासाठी उपाय सुचवा. व्यावहारिक असेल तर नक्की स्वीकार करतील शेतकरी. (नाल ठोकणे, वेसण घालणे, चाप देणे, औताला जुंपणे. शर्यतीच्या बाबतीत थोडाफार मी तुमच्या बाजूने आहे, काही गोष्टी मला ही नाही पटत. पण संपूर्ण बंदीला असहमत) ती बैलांची गरज नसून तो निव्वळ तुमचा स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांच्यावर अत्याचार करू नका.

In reply to by श्रीगुरुजी

कारणे देणे हा खोटा कळवळा आहे. बैलांविषयी खोटा कळवळा दाखवूनही फायदा होणार नाही.>> ==>> आम्हाला कळवळा बीळवळा काही नाही ओ बैलांचा. तो तुम्हालाच आहे. पण तुमच्याकडे बैले नाहीत. त्यामुळे तुम्ही सेफर साईडला आहात. कायदा आहे म्हणून नाहीतर कसायाला देणे काहीच हरकत नाही. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. उपयुक्तता असेपर्यंत तिचा सांभाळ करणे शेतकर्‍याला शक्य असते. पण, उपयुक्तता संपुष्ठात आल्यानंतर ती शेतकर्‍याला ओझं होत असते, असे खुद्द आमचे साहेब आज म्हणाले. संघाचे आदरस्थान सावरकर पण असेच म्हणटलेत. पटलंय मला त्यांचं. तुम्हाला नाही पटणार कारण तुमच्या कडे गाई नाहीत. शेत नांगरायला ट्रॅक्टर वापरा.>>> ==> तो तर वापरतोच. पण कडा कोपरे ट्रॅक्टर काढू शकतात का? नाहीतर स्वतः औताला जुंपुन घ्या.>>> ==>> नांगराला जाणार नाही ना शेत. एवढं पण नाही कळत का तुम्हाला गुरुजी? कोठेही सोडा. त्यांना पाहिजे तिथे ते जातील.>> ==>> ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . . सोयीस्कर बगल. उचली जीभ लावली टाळ्याला. बोलायला काय जातंय ? उत्तर नसले की काही बाही फेकून द्यायचा. एका राष्ट्रीय पक्षाचा अजेन्डा च आहे तो. स्वतःजवळ ठेवायचे असतील तर त्यांचा जीवघेण्या यातना देऊ नका, त्यांचा छळ करू नका, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करू नका आणि कसायाकडे पाठवू नका.>>> ==>> फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . .

In reply to by श्रीगुरुजी

या बाबतीत तुमची मते अतिरेकी आहेत. करमणूकीसाठी प्राणी वापरुन नयेत इथवर ठीक आहे. खाण्यासाठी, आर्थिक उपयोगासाठी जनावरांचा वापर करावाच लागतो. नाहीतर अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत एक मोठीच पोकळी तयार होईल. बाकी ते बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो वगैरे बाता निरर्थक असतात हे खरेच आहे. शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

++११ गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी प्राण्यांचे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत केवळ दूध, मांस देण्याच्या मशीन्स असे रुपांतर झाले आहे. त्यांना स्वतंत्र कसलेच अस्तित्व राहिले नाही. आता, ह्या रस्त्यावरून माघारी जाणे अशक्य आहे. अन्न म्हणून त्यांचा वापर त्याज्य असणे म्हणजे या प्राण्यांचा अर्थव्यवस्थेत उपयोग करून घेण्यात कमी पडणे. केवळ शाकाहारावर अवलंबून राहणे तर मानवाला शक्यच नाही, ह्या प्राण्याच्या मांसावाचून लक्षावधी लोक कुपोषीत राहतील, भूकबळी जातील. तेव्हा निदान जितक्या वेदनारहित तर्हेने त्यांना मारता येईल तितके बरे. तसेच, त्यांच्या जीवनकाळात त्यांना कमीत कमी त्रास होईल एवढे बघणे आपल्या हातात आहे(तेसूद्धा करूणा या मानवी मुल्याची बूज म्हणून). करमणूकीसाठीदेखील मुळीच वापरू नये असे नाही, जर जालिकट्टूत व्हायचे तसे अत्याचार प्राण्यांवर होऊ नयेत, बैलगाडा शर्यत चालेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी ते बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो वगैरे बाता निरर्थक असतात हे खरेच आहे. शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच. हहपुवा

In reply to by श्रीगुरुजी

शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच. हहपुवा>>> ओके. घ्या हसून. तुमची प्राणी मात्र बद्दलची संवेदनशीलता नेमकी माणसांच्या बाबतीत कोठे जाते हे काही उमगले नाही. असो.

In reply to by विशुमित

मुक्या प्राण्यांवर स्वतःच्या स्वार्थासाठी अत्याचार करणार्‍यांची मला चीड येते.

In reply to by श्रीगुरुजी

आधी चर्चिलेलेच मुद्दे परत येत आहेत. पाळीव प्राणी हा माणसाच्या या ना त्या कारणासाठी (मग तो स्वार्थासाठी का असेना) वापरला जातो म्हणूनच तो पाळीव प्राणी आहे आणि हे माणसाला प्राण्यांचा असा उपयोग असतो हे माहित झाल्यापासून असेच आहे. ते मान्य नसेल तर मग बैल, शेळ्या, कुत्रे, मांजरं, कोंबड्या वगैरे प्राण्यांचं करायचं काय यावर थोडं मतप्रदर्शन करा! आज माणसाला मेंदू आणि विचार आहे म्हणून आणि ते विचार जरा जास्तच प्रगल्भ झाले आहेत म्हणून माणसाच्या अगदी उत्क्रांतीशी निगडित गोष्टींवरही प्रश्नचिन्ह उभे केले जातेय.

श्रीगुरुजी,
या प्रकारावर कायद्याने संपूर्ण बंदी आल्यास हा छळ थांबेल.
माझ्या मते शर्यतींवर सरसकट बंदी आणण्याची गरज नाही. त्यांचं यथोचित नियमन पुरेसं ठरावं. बंदी केवळ गैरप्रकारांवर असावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बैलगाडी शर्यत हा संपूर्ण गैरप्रकारच आहे. गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी खाज असेल तर त्यांनी मुक्या प्राण्यांना यातना देऊन बळजबरीने गाड्याला जुंपण्यापेक्षा स्वतःला गाड्याला जुंपून घ्यावे व शर्यत लावावी.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुमच्या मते शर्यती गैरप्रकार असतील तर त्याविरुद्ध प्रबोधन करणं उचित ठरेल. केवळ कायद्याने रीतीभाती बंद होत नसतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

होतात की. सतीची क्रूर पद्धत कायद्यामुळेच बंद झाली. बैलगाडी शर्यत व जालिकट्टू हा क्रूर प्रकार गेली २-३ वर्षे कायद्यामुळे बंद झाला होताच.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, हिंदूंमध्ये क्वचितच सती जात. ही वास्तुशांत किंवा सत्यनारायणासारखी सर्वमान्य प्रथा नव्हती. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

साफ चूक ! उठसूट सती पाठवायची प्रथा अस्तित्वात नव्हतीच मुळातून. कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे. बास तुम्हि सांगीतलत ना, आता स्वत: लॉर्ड बेंन्टिंक किंवा राजा राम मोहन रॉय सुध्दा आले तरी आम्हि मिपा कर त्यांना सति प्रथा बंदि कायदा आवश्यकता नसताना का केलात ? आमच्या धर्मात आवश्यकता नसताना लुडबुड का केलीत ह्याबद्दल जाब सुध्दा विचारु.

In reply to by सचु कुळकर्णी

सचु कुळकर्णी, अगदी बरोबर बोललात पहा. विचारूच मुळी जाब. १८२९ पूर्वी आणि नंतर बंगालमध्ये किती सती प्रकरणे घडली? नगण्य. मग कशाला पाहिजे कायदा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सर आय न्यू दँट आय वॉज राईट, अस आहे आ.न.गा.पै. की तो जो झाकिर नाईक आहे ना तो थोडीही तोशिस स्वत: ला न लागु देता जे विष काहि लोकांमध्ये पसरवायचा किंवा कदाचित अजुनहि पसरवत असेल त्याला त्या करीता सौदि रियाल मिलतात प्लस संरक्षण. तुम्हि सुध्दा सेम करताय पण फरक हा आहे कि तुम्हि शिक्षित आहात आणि कुठल्या पाश्चिमात्य देशात स्थाईक तरी आहात किंवा सध्यातरी तिथे आहात पण तुम्हि स्वखर्चावर स्वत: च हास करून घेता. मर्जि तुमचि बाप्पा. धर्म म्हणुन हिंदु लावत असलो तरी नशिब आम्हि मेंढर नाहि आहोत, आम्हि दाढि बघुन कोणा निष्पाप जिवाला मारत हि नाहि अन जान्हव बघुन कोणा नालायकला सोडत हि नाहि. आपल्या सारख्या आसारामांशि नित्य संग जडो हि प्रभु चरणि प्रार्थना, ताकी हम भि कुछ सिंखे भाई ;)

In reply to by सचु कुळकर्णी

सचु कुळकर्णी, १८२९ पूर्वी किती सती प्रकरणे बंगालमध्ये घडली? विदा देता का? काय तर म्हणे झाकीर नाईक आणि दाढीवरून मारणे आणि आसाराम बापू. कशाचा कशाला संबंध आहे का. तुम्ही मेंढरंच दिसता आहात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

https://en.wikipedia.org/wiki/Sati_(practice) Between 1815 and 1818, the number of Sati in Bengal province doubled from 378 to 839. Sati was observed within Sikh aristocracy. For example, when the founder of the Sikh Empire Ranjit Singh died in 1839, four of his proper wives and seven of his concubines committed themselves to sati.[7] Two wives committed sati when Sikh King Kharak Singh died, and five women joined the funeral pyre of Maharaja Basant Singh.[7][72] When Raja Suchet Singh[73] died in 1844, 310 women committed sati.[7] Sikh theology does not support the Sati practice, however, as is evidenced by the criticism of the practice by the 3rd Sikh Guru Guru Amar Das (1479–1554).[74] http://www.kashgar.com.au/articles/life-in-india-the-practice-of-sati-o… British East India Company recorded that the total figure of known occurrences for the period 1813 - 1828 was 8,135; another source gives the number of 7,941 from 1815 - 1828, an average of 618 documented incidents per year. However, these numbers are likely to grossly underestimate the real number of satis as in 1823, 575 women performed sati in the state of Bengal alone (Hardgrave 1998).

In reply to by गामा पैलवान

साफ चूक ! उठसूट सती पाठवायची प्रथा अस्तित्वात नव्हतीच मुळातून. कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे. धन्य आहे!

सगळीकडच्या बीफ, पोर्क,चिकन मटनाच्या दुकानांवर पण बंदी असायला पाहीजे. त्यामधेही हे मुके प्राणी असेच हाल हाल (हलाल) करून मारले जातात. गोहत्या बंदी तर न्यायालयाने आणली आहेच. शेती व्यवसायावरही बंदी आणावी कारण त्यात हजारो झाडांची रोजच्या रोज कत्तल केली जाते. माणसाने अन्य माणूस मारून खायलाच परवानगी असावी म्हणजे 'जीवो जीवस्य जीवनम' हे वाक्य राईटली जस्टीफाय होईल.

श्रीगुरुजी, तुम्ही दिलेला लेख वाचला. त्यातलं एक वाक्य महत्त्वाचं आहे : The common deciding factor was often ownership of wealth or property, since all possessions of the widow devolved to the husband's family upon her death. असे मृत्यू आजही होत असतात. त्यांना हुंडाबळी म्हणतात. च्यायला, पैशासाठी बाई जाळायची आणि पावती सतीच्या नावावर फाडायची. बाई जाळण्याचा सतीशी संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साफ चूक. सती व हुंडाबळी हे पूर्ण वेगळे आहेत. - हुंड्याची प्रथा भारतात सर्वत्र होती. जर सती हा हुंडाबळीचाच प्रकार असता तर सती प्रकरणे भारताच्या सर्व भागात घडली असती. परंतु सती प्रकरणे मुख्यत्वेकरून बंगाल व राजस्थानातच घडलेली आहेत. - सती हा हुंडाबळीचा प्रकार असता तर सर्व जातीजमातींमध्ये हे प्रकार घडले असते. परंतु सती प्रकरणे काही विशिष्ट सवर्ण जातीतच घडलेली आहेत. त्यामुळे सती व हुंडाबळीचा संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, सती व हुंडाबळी हे पूर्णपणे वेगळे आहेत हे मान्य. मात्र जशी हुंडाबळीत पैशासाठी बाई जाळली जाते तशाच धर्तीवर सतीच्या नावाखाली विधवा जाळली जातेय. विधवा जाळण्याचा सतीशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुन्हा एकदा चूक. मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण यामुळे सती प्रकरणे घडत होती. केवळ कायदेशीर बंदीमुळेच हा क्रूर प्रकार बंद झाला.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी,
मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण यामुळे सती प्रकरणे घडत होती.
आजीबात नाही. पैसे व मालमत्तेसाठी विधवा जाळण्यात येत असे. सती केवळ निमित्त होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै व श्रीगुरूजी, तुम्ही दोघांनीही सांगितलेले खरे आहे.
मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण + पैसे व मालमत्तेसाठी
हे दोन्हीही सतीच्या प्रथेसाठी कारणीभूत होते. विशेषतः रूपकुंवर प्रकरण हे सतीचे स्वतंत्र भारतातील सगळ्यात भयानक व चर्चीत प्रकरण. तिच्या मृत्यूनंतर जरी सती म्हणून तिचे गौरवीकरण केले गेले(अगदी विजयाराजे सिंधियांनीही या प्रकरणाचे समर्थन केले). तरी नंतरच्या तपासात तिच्या सासरच्या माणसांनी मालमत्तेच्या मोहापायी तिला जाळले असे आढळले. त्यामुळे पुर्वी(सतीवर बंदी घालण्याच्या आधी) 'धार्मिकतेची दिलेली जोड' हे मुख्य कारण होते मात्र नंतरच्या काळात झालेल्या सतीप्रकरणे अधिक गुंतागुंतीची आहेत असे वाटते.

In reply to by गामा पैलवान

सतीला धार्मिकतेची जोड देऊन उदात्तीकरण केले गेले होते. सती गेलेल्या जागेवर तुळशीवृंदावन बांधून सतीची स्मृती जिवंत ठेवण्यात येत असे किंवा त्याजागी मंदीर उभे केले जात असे. मूळ मुद्दा सती हा नाही. मुद्दा हा आहे की कायद्यामुळे अशा क्रूर प्रथा थांबविल्या जाऊ शकतात. समजा सती जाण्यामागे मालमत्ता हे कारण होते हे क्षणभर गृहित धरले तरी सतीविरोधात कायदा केल्यामुळेच ही प्रथा बंद झाली. असाच कायदा जालिकट्टू, बैलगाडी शर्यत इ. क्रूर प्रकारांविरूद्ध करणे आवश्यक आहे.

सोडा आता हा बंदीचा नाद. बैल माझा पांढरा, काळा शर्यतीचा नाद खुळा. यात्रा सुरु झाल्या , पुन्हा चैतन्य आले. या 19 तारखेला यात्रेला. आता पुन्हा होणार शर्यतीचा थरार. भिरर र र र र र , आरारा रा रा रा, आता जुंपला जाणारा खेळ, घिनाजी भागूजी थोरात, मु पो मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, आंबेगाव तालुक्यातील एक नामांकित बारी आहे ब्र का मंडळी, अरे झाली s s s s s s .......... गोंडा उडवत निघाली थोरातांची बारी, छान, .. छान, छान .. अरे उचल कि टाक. सेकंद 17 ह्याचा थरार तुमाला काय कळणार. द्या सोडून, घ्या मिटवून.

श्री गुरुजी, आजच काही बैलगाडा शौकिनाशी बोलताना समजले की, पुणे शहराच्या आसपास एकाची जमीन शर्यतीचे ठिकाण म्हणून वापरली जाते व गुंडगिरीच्या जोरावर त्याला ती जमीन दिली जात नाही, त्या व्यक्तीने याचिका दाखल करून शर्यतीवर बंदी आणली आहे. खरे, खोटे ती व्यक्तीच जाणे. पण हे खरे असेल तर हे कसले बेगडी प्राणी प्रेम, जरा माहाती घेऊन सांगाल का.

In reply to by श्रीगुरुजी

सरकार नियमावली सादर करत नाही तोपर्यंत मनाई आहे, बंदी नव्हे! बाकी कत्तलखान्यांवर का बरे अशीच मनाई आणत नसतील म्हणे?

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्याचा आनंद साजरा करू या. अश्या किरकोळ घटनांकडे पूर्ण दुर्लक्ष करणे उत्तम. आपली संस्कृती, परंपरा जपणे हेच खरे महत्त्वाचे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आपली संस्कृती, परंपरा जपणे हेच खरे महत्त्वाचे आहे.
आपली म्हणजे नक्की कोणाची? जैन, भागवत संप्रदायी ब्राह्मण, काही कडक शैव आणि उत्तर भारतातील नामधारी वगैरे मोजके संप्रदाय सोडले इथे कोणीही अहिंसक नाहीये. तुम्ही उगाचच आपली आपली म्हणून ब्राह्मणी नैतिकतेची व्याख्या ब्राह्मणेतर समाजावर लादू नका. तुम्ही तुमच्या वरणभात अन् तूप पोळी मध्ये खुष रव्हा अन् पळी पंचपात्रात खेळत बसा. हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच .

In reply to by प्रसाद गोडबोले

आपापसात पाहिजे तितकी हिंसा करा, मुक्या निष्पाप प्राणी पक्षांची हिंसा नको.

In reply to by प्रसाद गोडबोले

आपली म्हणजे नक्की कोणाची? जैन, भागवत संप्रदायी ब्राह्मण, काही कडक शैव आणि उत्तर भारतातील नामधारी वगैरे मोजके संप्रदाय सोडले इथे कोणीही अहिंसक नाहीये. तुम्ही उगाचच आपली आपली म्हणून ब्राह्मणी नैतिकतेची व्याख्या ब्राह्मणेतर समाजावर लादू नका. तुम्ही तुमच्या वरणभात अन् तूप पोळी मध्ये खुष रव्हा अन् पळी पंचपात्रात खेळत बसा. हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच.
कृपया स्पष्टीकरण द्यावे.

In reply to by Trump

तुम्हाला विचारुन सुध्द्दा तुमचे स्पष्टीकरण आले नाही, त्यामुळे अधिक स्पष्ट्च विचारतो आता. -
हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच.
हे क्षत्रिय कधी संपले? श्री शिवाजी महाराज क्षत्रिय होते का? त्यांचा राज्याभिषेक तुम्हाला मान्य आहे का?

श्री गुरुजी, बैल गाड्यांची शर्यत किंवा जलिकाठू हा शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा भाग आहे. श्रीमंत लोंकाच्य घोडा शर्यती ही होतात त्या वेळी आपण आक्षेप घेत नाही. मग सर्व सामान्य लोकांच्या खेळाला विरोध का?

In reply to by Ranapratap

कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती, टक्कर, झुंजी, नांगर किंवा गाड्याला जुंपून राबविणे, जिव्हारूचीसाठी हत्या या प्रकारांना मी सक्त विरोध केला आहे. स्वतःच्या मनोरंजनासाठी बैल किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे आणि त्यासाठी त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे अत्यंत निषेधार्ह आहे.

श्रीगुरुजींशी असहमती व्यक्त करत, मालकांना आपल्या बैलाची किती काळजी असते त्याचा हा पुरावाच देतो, हा घ्या https://youtu.be/EhmvOu_mtog पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

१) हे मालक आपल्या बैलांचे वृषण दांडक्याने किंवा दगडाने ठेचून आणि हा निर्दयी प्रकार करताना त्यांना मरणांंतिक वेदना देऊन त्यांना नपुंसक करतात का? २) हे मालक त्यांच्या तळपामात नाल ठोकून त्यांना अपार वेदना देतात का? ३) हे मालक बैलांना मरेपर्यंत नाकात वेसण घालून नांगराला जुंपून भर उन्हात राबवितात का? ४) हे मालक बैलांना गाड्यास जुंपून प्रचंड वजन ओढायला लावतात का? ५) हे मालक स्वतःच्या करमणुकीसाठी बैलांना शर्यतीत पळायला लावतात का? ६) शर्यतीत बैलांनी वेगाने पळावे यासाठी हे मालक बैलांची शेपूट पिरगाळणे, कानात लाल मुंग्या सोडणे, मद्य पाजणे, टोकेरी खिळे लावलेल्या चाबकाने मारणे, टाचणी टोचणे असे क्रूर प्रकार करतात का? ७) बैल वृद्ध झाल्यानंतर चाऱ्याचा खर्च टाळण्यासाठी आणि कमाईसाठी हे मालक बैल खाटकाला विकून टाकतात का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर मालकाची बेलांवर कणभरही माया नसून मालक स्वार्थासाठी बैलांवर फक्त अत्याचार करतात हे सिद्ध होते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी देणे, शिंगे रंगविणे, गोंडे बांथणे ही माया नसून केवळ देखावा आहे.

श्री गुरुजी, तुमच म्हणण योग्य असल तरीही ह्या काळात प्रॅक्टिकल वाटत नाही. फार फार तर ह्यात आपण जनावरांना कमीत कमी वेदना कशा होतील याबाबतचे नियम बनवले पाहिजे किंवा असतील तर त्याचे पालन केले पाहिजे. बैलगाडा शर्यत हा खेळ काही वर्षात नामशेष होईल कारण आत्ताच बैल बघायलाही मिळत नाहीत. सध्याला शेतीची बहुतांश कामे ही यंत्र वापरूनच केली जातात.

In reply to by रात्रीचे चांदणे

धन्यवाद! बऱ्याच गोष्टी आज प्रॅक्टिकल वाटत नाहीत असे वाटत असले तरी त्या प्रत्यक्षात आल्या आहेत. नियम पूर्वीपासूनच आहेत, परंतु ते पाळले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बैलगाडी शर्यत नामशेष होईल आणि शेतीची कामे फक्त यंत्रानेच होतील तो सुदिन.

In reply to by रात्रीचे चांदणे

पण बैलगाडा शर्यती नामशेष वगैरे होतील किंवा येत्या काही वर्षात नामशेष होतील हे म्हणायला बेसिस काय ते कळले तर बरे होईल. गावाकडे उत्तम सुरू आहेत शर्यती, वेगवेगळ्या पद्धतीने, विदर्भात शंकरपट सुद्धा होतात भरपूर अजूनही (बैलगाडा शर्यतीस तिथे स्थानिक नाव आहे ते)

. फोटोमध्ये असलेल्या देवतेस आम्ही हिंदू ब्रह्मांड चालक अन् नाशक बाप मानतो आमचा. ह्यांचा एक भाऊ तर गरुड पक्ष्यावर बसतो. बायकोचे एक स्वरूप सिंहावर बसते थोरल्या पोरग्याने मोर वाहन केले आहे तर बारक्या पोराने उंदीर (हे बारकं पोरगं महाराष्ट्राचे आराध्य अन् आमचे आवडते आहे ते एक असो) तर असे हे आमचे हिंदूंचे आराध्य असणारे सगळे देव तुमच्या लेखी निषेधार्ह असणार का ? अनुक्रमे नंदी, गरुड, सिंह, मोर आणि उंदरावर वाहन म्हणून वापरल्याचा ठपका ठेवून ? जीवदया असणे इष्ट आहेच पण ते कुठे अन् किती तानायचे अन् कुठं स्वतःचे हसे करून घेण्या अगोदर थांबायचे इतके सेन्स असायला हवे हे आमचे प्रांजल मत. बाकी इतर तर्क कर्कश्य प्रवादांशी घेणेदेणे नाही. ले.सी. - ई. ई.