शाळेत असतानाची गोष्ट ! म्हणजे कोऱ्या पाटीवर अज्ञानाचे धडे नुकतेच गिरवायला सुरवात केली होती तेंव्हाची! बाईंनी वर्गात प्रश्न विचारला,
"जगातील सर्वात थंड पदार्थ कुठला?"
माझ्यासहित वर्गातले नव्वद टक्के हात वरती झाले. एरवी माझा हात दिसला नसता, पण आज दिसला.
"तू सांग"
"बाई....बर्फ !!"
"वाटलंच मला..मूर्ख आहेस तू! बर्फ कितीही थंड असला तरी तो आतून उष्ण असतो"
माझ्या नजरेसमोर हिमालयातले पर्वत धडाधड कोसळू लागले. माझ्याच काय सर्वांच्याच ! कारण मी एक प्रातिनिधिक मूर्ख होतो.वरती झालेल्या शंभर टक्के हातांच उत्तर तेच होतं. बर्फ आतून उष्ण असतो??? आणि आतून म्हणजे कुठून?? बर्फाच्या अंतरंगातले उष्ण पाण्याचे झरे आमच्या गुरुमातेला कधी दिसले? पण हे बर्फाचं कोड नंतर कितीतरी वर्षांनी उलगडलं.स्वदेस सिनेमातल्या एका प्रसंगात खेड्यातली एक म्हातारी म्हणते,
"अपने ही पानीमें पिघल जाना ये बरफ का मुकद्दर होता हैं!"
आणि मला एकदम 'युरेका युरेका' वालं फीलिंग आलं. म्हणजे कितीही थंड असला तरी बर्फ शेवटी वितळतोच ना!! म्हणजेच तो उष्ण!!
स्वदेसमधला शाहरुख नासामध्ये काम करताना दाखवला आहे. मी नासात का जाऊ शकलो नाही ह्यामागे अगणित कारणं आहेत. पण त्याची पाळेमुळे कुठेतरी बालपणीच्या या अज्ञानविश्वात आहेत.
वरील बर्फाचं उदाहरण म्हणजे आमच्या अज्ञानाच्या हिमनगाचं फक्त एक टोक आहे. आता त्यावर हे बर्फाचे थरावर थर साचण्यास यच्चयावत गुरुजन,मित्रमंडळी,नातलग आणि आमची सर्वसमावेशक अल्पबुद्धी या सगळ्यांचाच हातभार लागला आहे. इथं सर्वसमावेशकचा अर्थ एक ना धड भाराभर चिंध्या असा घ्यावा. हळूहळू या अज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. नववीत असताना बीजगणिताशी ओळख झाली.पुढे आयुष्यभर ती ओळखस्वरुपातच राहिली. कारण त्या गणिताचं बीज दुबार,तिबार पेरणी करूनही आमच्या सुपीक डोक्यात कधी रुजलंच नाही. नंतर त्या गणितानेच "आम्ही नाही जा" म्हणून नाद सोडला पण पिच्छा नाही सोडला. शेवटी युती होत नाही हे लक्षात आल्यावर गणिताचा बाहेरून पाठिंबा घेऊन मी शिक्षण पूर्ण केलं. बाहेरून पाठिंबा म्हणजे पस्तीस मार्कांच्या आतही नाही आणि फार बाहेरही नाही ! (असे केल्याने,"पंचवीस वर्षे आम्ही युतीत सडलो" वगैरे म्हणण्याची वेळ येत नाही हा एक फायदा!!)
गणितातल्या अज्ञानाचा कळसाध्याय ट्रिग्नॉमेट्रीने पूर्ण केला. साइन थिटा बाय कॉस थिटा (Sinθ/Cosθ) ह्यातला थिटा थिटा कॅन्सल करून विषय का संपवत नाही असा 'थेट' प्रश्न वर्गात विचारण्याचं धाडस मी दाखवलं आहे. तत्कालीन गुरुदेवांनी योग्य शब्दात समज दिल्यामुळे भविष्यात हाच प्रश्न डेरीव्हेटिव्हजच्या dy/dx साठी विचारायला मी धजावलो नाही हे नशीब! ट्रिग्नॉमेट्री ही साडेसातीसारखी असते. ती एकदा आयुष्यात आली की किमान साडेसात वर्ष जात नाही. साइन-कोसेक,कॉस-सेक,टॅन-कॉट ह्या जोडगोळ्या सरकार आणि विरोधक असल्यासारखे वागतात हे जाणवण्यापुरतंच ट्रिग्नॉमेट्रीचं ज्ञान मी मिळवू शकलो. ट्रिग्नॉमेट्रीचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी याहून जास्त संबंध आहे असे मलातरी वाटत नाही. अन्यथा तुरडाळीचा भाव का वाढला हे सांगायला ट्रिग्नॉमेट्रीचा एकतरी नियम उपयोगी पडला असता. असो.हे आमच्या अज्ञानाचं समर्थन नव्हे. कारण समर्थन तरी कुठे कुठे करणार हो? आईशप्पथ सांगतो,केमेस्ट्रीमध्ये ग्लुकोजचा इतका लांबलचक फ़ॉर्म्युला बघून मला काही दिवस साखरही गोड़ लागत नव्हती. त्यानंतर परीक्षेत ग्लुकोजचा मी लिहिलेला फॉर्मुला बघून परीक्षकाला साखरेचं पाणी नक्कीच द्यावं लागलं असेल. आता एवढं घोकुनही आठवलं नाही त्याला मी तरी काय करणार!! 'व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज फोर' या एका वाक्यावर अख्खी ऑरगॅनिक केमेस्ट्री घडते.इथं माझ्या फॉर्मुल्यात ठिकठिकाणी कार्बनची 'व्हॅकन्सी' दिसत होती.
ही अशीच गत माझी इतर अनेक विषयात होती. इलेक्ट्रिकल ह्या विषयात ओहम्स लॉच्या पलीकडे मला काहीही समजलं नाही. तसंही विजेशी आमचा जास्त संबंध हा लोड शेडींगमार्फतच आला. आपल्या भागात रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे वीज कमी असते असा स्वतः पुरता समज मी करून घेतला होता.किर्रचॉफ नामक एका सदगृहस्थाच्या मते,The algebraic sum of currents in a network of conductors meeting at a point is zero.आमच्या गल्लीतल्या खांबांभोवती असलेला वायरचा गुंतावळा बघून हा नियम मला पटला होता. त्या गुंत्याच्या एका टोकाहून दुसरीकडे वीज पोहोचणं केवळ अशक्य होतं. म्हणूनच आपल्या भागात वारंवार वीज जाते असंही एक लॉजिक मी लावायचो.कॅपॅसिटन्स,इन्डक्टन्स,इम्पेडन्स ह्यांनाही माझ्या डोक्यात घुसायला प्रचंड रेझिस्टन्स सहन करावा लागला. शेवटी आल्यापावली ते परत गेलेत.सीरिज कनेक्शनमधून थोडीफार वीज बाहेर काढायला शिकलोच होतो तेवढ्यात पॅरालल कनेक्शनने फ्युज उडवला.म्हणजे शेवट ठरलेला...अंधेरा कायम रहे! स्वदेस सिनेमातल्याच अन्य एका म्हातारीच्या चेहऱयावर बल्बचा उजेड पडल्यावर ती आनंदाने 'बिजली' असे उद्गारते. सीरिज-पॅराललच्या भांडणातून एखाद मिलीअँपीयर करंट मी मिळवू शकलो तर माझ्याही भावना म्हातारीसारख्याच असायच्या!
पुढे कॉम्प्युटरशी तोंडओळख झाल्यावर अज्ञानाच्या महाप्रलयाला सुरवात झाली.कॉम्प्युटर या क्षेत्राविषयी अज्ञान बाळगणं ही फार सामान्य बाब असली तरी ते अज्ञान दाखवणं हा अक्षम्य गुन्हा आहे.किंबहुना या क्षेत्रातल्या ज्ञानाचे मापदंड हे इतरांच्या अज्ञानावरच जास्त अवलंबून आहे. हे वाक्य कदाचित कोणाला सहजासहजी पटणार नाही. आता वर्ड फाईलला पीडीएफ कसं करायचं हा अत्यंत साधा प्रश्न आहे. पण कधी विचारून बघा एखाद्याला.जणू १९९२ साली एमएस ऑफिस त्याच्या आजोबानेच लाँच केले होते अन आता २०१६ ला त्याने लाँच केले अश्या थाटात तो उत्तर देईल. पण आमच्यासारख्यांचा नाईलाज असतो हो! वर्डमध्ये एक पान लिहून झाल्यावर पुढचं पान कसं आणायचं हे सुद्धा विचारावं लागतं! बरं त्यात ह्यांचे ते जगावेगळे शब्द. डाटाला डेटा म्हटलं की झाला कॉम्प्युटर शिकून असं काही नसतं. तरी बरं ते प्रोग्रामिंग वगैरे शिकण्याच्या भानगडीत मी पडलोच नाही. इथं साधं इंग्लिश समजेना तर ती सांकेतिक भाषा कुठून समजणार? सख्खे-चुलत मिळून माझे सातही भावंडं आयटीत आहे हे ऐटीत सांगणं मी कधीच बंद केलंय.(आयटी आणि ऐट ह्यांचं काय नातं आहे कळत नाही पण एक आला की दुसरा येतोच!) किंबहुना त्यांनीही या बाबतीत 'आम्हाला आठवा भाऊ आहे' हे सांगणं एव्हाना बंद केलं असेलच.
ओळखीतली,नात्यातली यच्चयावत ज्ञानी माणसं बघितली की मला कुतूहल वाटतं. अश्यावेळी पुलंचं 'तुझं आहे तुजपाशी' आठवून मी स्वतःची समजूत काढतो.स्वतःच्या अज्ञानाचं मूळ शोधताना बऱ्याच वेळा मी आपल्या शिक्षणपद्धतीपर्यंत येऊन पोहोचतो. पण समकालीन माणसं शिकायला तक्षशिला अन नालंदाला गेली नव्हती हे त्याचवेळी मला आठवतं. उलट आपल्या शिक्षणपद्धतीने आणि नोकरीने आमच्या अज्ञानाला अनुक्रमे डिग्रीचं आणि अनुभवाचं कोंदण लावून दिले आहे हे ही नसे थोडके! शेवटी कोणीतरी म्हटलंय तेच खरं,
"सीमा ही माणसाच्या ज्ञानाला असते,अज्ञानाला नव्हे!!"
-- कोणीतरी चिनार
वाचने
5239
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
हे हे..मस्त...निव्वळ धमाल! :
धन्यवाद...प्रयत्न करतो.
In reply to हे हे..मस्त...निव्वळ धमाल! : by खेडूत
=)) मस्तच.
चिनार, असं काही तरी लिहीत राहा !
एक से बढकर एक पंचेस.. धमाल
++१
In reply to एक से बढकर एक पंचेस.. धमाल by पुंबा
ट्रिग्नॉमेट्री , डेरीवेटीव्हज् , इंटेग्रेशन
मस्त.
भारी!
धन्यवाद !!
भारी
लेख आवडला.
=))
मस्त चिनार भाउ. एकदम "बिगरी
मस्त रे लई भारी लिहिलंस,
गणितातल्या अज्ञानाचा
कॅापीराइट आहे का?
Mast ahe..
धन्यवाद !!
=))
देवा...
जबरदस्त --/\--
नेहमीप्रमाणेच उत्तम!!
=)) जबरी फटकेबाजी!!!
मस्त! मस्त!!
नेहमीप्रमाणेच भारी.
खूप छान! मजा आली वाचायला!