Skip to main content

पळवाट - भाग १

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून कशी आली नाही हो? जरा कोपऱ्यापर्यंत येता का जाऊन?" झोप लागल्याचं उगीच नाटक करणाऱ्या तात्यांना काकूंनी जरा घाबरतच विचारलं. "आता काय लहान आहे का ती? तीच तीला कळायला नको?" डोळे उघडून काकूंकडे पाहण्याचे कष्टही न घेता तात्या करवादले. "तरुण पोर आहे, माझ्या जीवाला घोर लागलाय फोन आल्यापासून.. कुठं काही बरंवाईट झालं तर कुणाला विचारता?" काकूंनी रडवेल्या सुरात विनवणी केली पण तात्यांवर काही परिणाम झाला नाही. दार उघडून काकू अंगणात चुळबुळ करीत उभ्या राहिल्या. शरुचा तापट स्वभाव त्यांच्या चांगलाच ओळखीचा, पण तरी मुलगी मागचं पुढचं काही न सांगता मी घर सोडून येतीये म्हणाली की कुठल्याही आईच्या जिवाला ते लागणारच. संध्याकाळपासून त्यांनी तात्यांच्यामागे एकच भुणभुण लावली होती. "अशी कशी यायला लागली घर सोडून? सगळं चांगलं चाललंय सांगत होती इतके दिवस." "तुम्ही एकदा फोन करून तिला जरा झापा हो" "तरी मी म्हणत होते, नको चुकवायला देवाची यात्रा. काहीतरी अनिष्ट होतंच आपल्या घरात." तात्यांनी एक दोन वेळा समजावून सांगितलं पण काकूंच्या अखंड बडबडीपुढे त्यांनी शेवटी हार मानली. तात्या आणि काकूंच शरयू हे एकमेव अपत्य. एकमेव असलं तरी तशी वागणूक कधीच न मिळालेलं. लग्न होऊनही अनेक वर्षं पाळणा हलला नाही मग तात्यांनी गावाहून आज एक पुतण्या, उद्या पुतणी, परवा मेव्हणा असा लहान मुलांचा भरणा शहरातल्या शाळेत टाकायच्या निमित्ताने सुरु केला. शरयू झाल्यावरही तात्या काकूंनी या मुलांना दूर केलं नाही. मोठं होताना तिला कधी तिचे आई बाबा दिसलेच नाहीत. इतर भावंडाप्रमाणेच तीसुद्धा यांना तात्या काकूच म्हणू लागली. बघता बघता मुलं घरट्यातून बाहेर पडली. सगळ्यांचे संसार सुरु झाले. शरू उशिरा झाल्यानं अजून कॉलेजमधेच होती तोवर तात्यांच्या कंपनीत संप झाला. पुढे कंपनी बंद पडली आणि शरूच्या शिक्षणाचा, लग्नाचा मोठा प्रश्न उभा राहिला. तरी तात्यांना आशा होती एवढी मुलं आपल्या हाताखाली मोठी झाली, कुणीतरी आपल्या वाईट वेळेला उभे राहिल. पण ज्यांच्यासाठी जिवाचं रान केलं त्या पुतण्यांनी तोंड फिरवलं. आता कुठे माझा व्यवसाय सुरु झालाय असं म्हणून मेव्हण्यान हात वर केले. कधी कुणाच्या अरे ला कारे न करणाऱ्या तात्यांनी गावाकडच्या भावांना जाब विचारला तर त्यांनीसुद्धा तुम्ही शिकवलं तरी आम्ही शेतातून पुरवत होतो ना धान्य, त्याची किंमत चुकती करा म्हणून मुलांचीच बाजू घेतली. कुटुंबातले वाद विकोपाला गेले आणि तात्यांच्या मनात एका वेगळ्याच कडवटपणानं घर केलं. नेहमी हसतमुख असणारे तात्या आता छोट्या छोट्या गोष्टींवरून काकूंवर डाफरु लागले. तात्यांच्या एका मित्रानं त्यांना एमआयडीसीत एका छोट्या कंपनीत काम मिळवून दिलं. जरा बाहेर कामात रमले की फरक पडेल असं काकूंना वाटलं तरी घरातले तात्या पुन्हा पहिल्यासारखे झालेच नाहीत. काकू आपल्या कसंबसं घर सावरू पहात होत्या पण काही चूक नसताना मधल्यामध्ये त्याच भरडल्या जात होत्या. त्यांच्या प्रयत्नांना ना तात्यांनी साथ दिली ना शरूनी. शेवटी नशिबात लिहलेले भोग काही चुकत नाहीत म्हणून काकूंनी घरात समेट करायचा नाद सोडून दिला. तरी दर सणाला न राहवून काकूंनी कुणाचीतरी आठवण काढायची आणि शरूनी त्यांच्यावर चिडचिड करायची हा क्रम ठरलेला होता. अगदी आपल्या म्हणवणाऱ्या माणसांनी संकटात पाठ फिरवली आणि शरूला आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकवला. कुणावरही विश्वास नाही ठेवायचा, कुणालाही जीव नाही लावायचा, आपल्याला त्रास होईल एवढं कुणाच्यात गुंतायच नाही! शरूच्या मुळच्याच काहीशा बंडखोर स्वभावाला परिस्थितीच खतपाणी मिळालं. सगळं व्यवस्थित होतंय असं वाटत होतं तोवर शरूनी ती सकाळ संध्याकाळ क्लास घेऊन तिच्या शिक्षणाचा भार स्वतःच उचलणार असं जाहीर केलं. तात्या, काकू दोघांनी तिला समजावलं तू फक्त अभ्यास कर, पैशाचं टेन्शन नको घेऊ. पण एकदा ठरवलेली गोष्ट न केली तर ती शरू कसली. खरं तर कुणालाही अभिमान वाटेल अशी गोष्ट पण तात्यांनी ती भलतीच मनाला लावून घेतली. आपल्या हातून इतक्या मुलांचं कल्याण झालं आणि पोटच्या पोरीला मात्र आपण वणवण करायला लावतोय हे काही त्यांच्या मनातून जाता जाईना. सगळ्यात जास्त त्यांना खात होता एकच विचार, आपली आता कुणाला गरज उरली नाही! दोन तितक्याच मानी व्यक्तींचा मग एक संघर्ष सुरू झाला. ती माझं ऐकत नाही हे तात्यांच म्हणणं आणि चूक करत असले तर दोन फटके द्या पण उगीच काहीही विचार करून मला अडवू नका हे शरूचं. काकूंच म्हणणं काय आहे हे विचारायची न कुणाला उसंत होती ना आठवण. घरासमोर रिक्षा थांबलेली बघून काकू तशाच गेटकडे धावल्या. "अरे ऐसा कैसे दोसौ हुवा? मीटर क्या शोकेलिये लगाया है क्या?" "क्या मॅडम, इतना रातको छोडा आपको. कोई मिळता क्या इस वक्त?" "क्यू नहीं मिलता? सबके सब लुटेरे इसी वक्तही रेहते है स्टेशनके बाहर" काकूनी शरूला हाताने मागे ओढलं. "जाऊ दे ना अगं..आता यावेळेस कुठं वाद घालते? माफ करा दादा.." "तुमच्या असल्याचं स्वभावाचा फायदा उठवतात सगळे..." बाहेरचा गोंधळ ऐकू येऊन अंगणात आलेल्या तात्यांनी नेमकं शरूचं तेवढंच वाक्य ऐकलं आणि ते आल्यापावली परत फिरले. आत आल्याआल्या शरून हातातल्या बिस्लेरीमधलं उरलेलं पाणी संपवून टाकलं. "शरू खाल्लंयस का ग काही?" "हो. बस थांबली होती एके ठिकाणी. झोप तू आता." शरूनी तिची बॅग आतल्या खोलीत नेत सांगितलं. न राहवून काकू तिच्या मागे गेल्या. "शरू अगं काय हे? असं कसं आलीस निघून? काय झालंय...?" "काकू प्लीज... आता नको. मी सांगेन नंतर." काकू पुढे काही बोलणार तोवर शरून खोलीचं दार लावूनही घेतलं. आज का कोण जाणे पोटच्या पोरीन त्यांना काकू म्हणलेलं त्यांना खूप टोचलं. तिला कुशीत घ्यावं, रडू आलं तर रडू द्यावं काही न बोलता असं काय काय त्यांच्या डोळ्यापुढे आलं होतं. पण शेवटी तो आईचा मायेचा हात तिच्यावरून आपण फिरवलाच नाही कधी तर आता आशा करून काय उपयोग असा विचार करून त्याही झोपायला गेल्या. बेडवर पडल्या पडल्या शरूनं इतका वेळ आणलेला खंबीरपणाचा उसना आव गळून पडला. झोपायला म्हणून गेलेलं कुणीही झोपलं नव्हतं. सगळेच भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालायचा प्रयत्न करत होते. पण असं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा मनमोकळं जगता येत असतं तर आणखी काय हवं जगायला? ***** क्रमश:
लेखनविषय:

वाचने 5788
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

तुम्ही अता मिपाच्या सिद्धहस्त लेखकांच्या लिश्टात पोचल्या गेल्या हाहात....लिखाणात व्हरायटी आहे....तुमच्या चाहत्यांमध्ये स्थाण द्या ना

मस्त !!!! पुढचा भाग लवकर लिहा.

बेडवर पडल्या पडल्या शरूनं इतका वेळ आणलेला खंबीरपणाचा उसना आव गळून पडला. झोपायला म्हणून गेलेलं कुणीही झोपलं नव्हतं. सगळेच भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालायचा प्रयत्न करत होते. पण असं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा मनमोकळं जगता येत असतं तर आणखी काय हवं जगायला?
हा परिचछेद तर जबरदस्त आहे. लेखणीत ताकद आहे