काटा वजनाचा --७
काटा वजनाचा --७
स्त्रियांच्या बाबतीत वजन फार पटकन वाढते असा अनुभव आहे. यात आयुष्याचे तीन कालखंड फार महत्त्वाचे आहेत.
१) पौगंडावस्था
२) गरोदरपण
३) रजोनिवृत्ती
पौगंडावस्थेत म्हणजेच वयात येण्याच्या आसपास आपल्या मुलीचे वजन फार पटकन वाढले असा बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे. याचे कारण काय?
एक तर इतर सर्वाना आहे तशीच सुग्रास अन्नाची मुबलक उपलब्धता हे कारण आहेच. शिवाय या काळात मुलींचा शारीरिक व्यायाम कमी होतो. सामाजिक रचना अशी आहे कि वयात येताना मुलींनी मैदानी खेळ खेळू नयेत असेच बरेच आई बाप सुचवतात.त्यातून शहरे आणि निमशहरी भागात मैदाने नष्ट होत चालली असल्याने आणिअसलेल्या मोकळ्या जगात वाहने पार्क केली असल्याने खेळ कुठे खेळायचे हा प्रश्नहि उग्र स्वरूप धारण करीत आहे.
"मुलांबरोबर खेळणे या वयात शोभत नाही" , "मुलीच्या जातीला हे बरं दिसत नाही" अशी वाक्ये सहज कानावर पडतात.त्यातून हा काळ(आठवी ते दहावी) करियर च्या दृष्टीने महत्त्वाचा असतो यामुळे शाळा, क्लास आणि त्याचा अभ्यास यात मुलींचा खूप वेळ जातो( मुलांची परिस्थिती या काळात फार वेगळी नाही). पण साधारण पाचवी ते सातवी याकाळात मुलींची उंची वाढून जाते पण मुलांची उंची त्यामानाने उशिरा वाढत असल्याने(आठवी ते बारावी) मुलांमध्ये वाढलेले वजन वाढणाऱ्या उंचीमध्ये सामावून घेतले जाते.
यात आजकाल भ्रमणध्वनीची भर पडली आहे. म्हणजे पूर्वी दोन मजले चढून मैत्रिणीला बोलवायच्या ऐवजी सरळ फोन करतात किंवा मिस्ड कॉल दिला जातो. अशा मुळे शारीरिक हालचाल कमी होत जाते.
त्यातून शरीरात होणाऱ्या संप्रेरकातील बदल यामुळे मुलींच्या मांड्यावर चरबी चढू लागते. हल्ली त्यातून संतृप्त असे खाणे हे कूल समजले जाते. यात पिझा, पास्ता, केक, पेस्ट्री, मॅगी नुडल्स असे अति प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. बाहेर खाणे हा शिष्टाचार झाला आहे. निम्न वर्गात सुद्धा मुली वडापाव भजीपाव सारखे पदार्थ खाऊन लठ्ठ होताना आढळतात.
आयांनी आरडाओरडा केला तर त्या जुनाट बुरसटलेल्या विचारांच्या आहेत असे समजून नाक मुरडले जाते. स्वतःचा निवड करण्याचा हक्क हा अशा खाण्यामधून प्रस्थापित करण्याचा अंतर्मनाचा खेळही चालू असतो. आई बापानी सांगितलेल्या गोष्टी नाकारणे हा म्हणजे बंडखोरी करणे आणि अशी बंडखोरी म्हणजे तारुण्यातील मूलभूत हक्क या विचाराने मुली चालत असल्याने भाजीभाकरी/ फळे खा, दूध प्या हे सांगणे त्यांच्या पचनी पडत नसते.
त्यातून जर आईबाप हडेलहप्पी करणारे असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध खाणे /वागणे म्हणजे जाचातून सुटका असा गंड करून घेतला जातो.
मुलींच्या शरीरात होणारे बदल, त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्याबद्दलची भीती अशा गोष्टींचा परिपाक त्यांच्या मनावर सारखा होत असतो. त्यातून दूरदर्शन सिनेमा सारख्या माध्यमातून होणारे पाश्चात्य संस्कार यातून आपण असे कपडे घातले, , असे खाणे खाल्ले तर आपण आधुनिक दिसू आणि असे नाही केले तर मागासलेल्या म्हणून शिक्का बसेल या न्यूनगंडातून वर्तणुकीत बदल होतो.
उदाहरणार्थ-- बाहेर गेले असताना फळाचा रस पिण्याऐवजी कोका कोला किंवा शीतपेये पिणे हे "इन" समजले जाते.
अशा स्थितीतून मुलींचे कुपोषण होत असते म्हणजे पालेभाज्यातील लोह मिळत नाही. काळ्या होऊ म्हणून उन्हात जाणे टाळले जाते शिवाय दूध फळे सारख्या पोषक आहाराऐवजी प्रक्रियायुक्त आहार घेतल्याने वजन फक्त वाढते पण अ , ड , इ सारख्या जीवनसत्त्वाची आणि लोह कॅल्शियम सारख्या द्रव्यांची कमतरता होते.
आई वडिलांनी आपल्या मुलीला वाढत्या वजनाचे दुष्परिणाम काय आहेत हे तिला समजेल अशा तर्हेने आणि तिच्या कलाने घेऊन समजावले पाहिजे म्हणजे पुढे होणाऱ्या अनेक शारीरिक व्याधी आजारापासून आणि न्यूनगंडातून मुक्तता मिळू शकेल. "मी जशी आहे तशी आहे". मग जग काय म्हणेल याची मला पर्वा नाही असे वारंवार अनेक मुली म्हणत असल्या किंवा असे म्हणणे म्हणजे आपण मुक्त झालो असे (गैर) समज करून घेत असल्या तरीही लठ्ठ मुलींमध्ये बहुतांशी न्यूनगंडाने पछाडलेल्या आढळतात. हा नियम केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही लागू होतो.
याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे स्त्रिया रजोनिवृत्ती कडे झुकतात तेंव्हा हि त्यांना आपले वजन फारच पटकन वाढते/ वाढले आहे असे जाणवते. साधारण चाळिशी पंचेचाळीशी नंतर स्त्रियांची मुले मोठी होतात त्यामुळे त्यांना आपल्या आईची गरज तेवढी भासेनाशी होते. त्यामुळे स्त्रियांना एक तर्हेचा शारीरिक आराम मिळू शकतो परंतु मुलांची काळजी तितकीच असल्यामुळे चिंता हि असतेच. वय वाढत असल्याने शरीर थोडे आळशी होते त्यातून इतकी वर्षे "केलं" हा विचार आरामाला प्रोत्साहन देत असतो. अशा परिस्थितीत असताना पाळी अनियमित होऊ लागते. मग याची चर्चा त्या आपल्या मैत्रिणींमध्ये करू लागतात. मैत्रिणी साधारण त्याच वयाच्या असल्यामुळे त्यांचे प्रश्न तेच असतात. पाळी जायची वेळ आली यामुळे स्त्रिया आतून खिन्न असतात. आपले तारुण्य आता राहणार नाही, आता आपण नवऱ्याला तेवढ्या आकर्षक दिसणार नाही हा विचार आतून पोखरत असतो. यावेळेस नवरा आपल्या करियरमध्ये चढ्या कमानीने वर जात असतो त्यामुळे बायकोची अशी परिस्थिती त्याच्या खिजगणतीत नसते. या सर्व परिस्थितीमुळे नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून स्त्रिया चिडचिड्याही होतात. हि चिडचिड मुलांवर काढली तर ती आपल्याच विश्वात मश्गुल असतात. अशा परिस्थितीत स्त्रिया सांत्वन म्हणून आधार शोधत असतात.आर्थिक परिस्थिती स्थिर असते मग सुग्रास अन्न समोर आले कि जरा "चार घास" जास्त खाल्ले जातात. आता मुलांचा मागे धावपळ करायची गरज नसल्याने थोडा आराम मिळू लागतो. म्हणजे मुलगी असेल तर बारीक सारीक घरातील कामे आणि मुलगा असेल तर येतायेता बाहेरची काही कामे सांगता येतात. हे सर्व छोटे छोटे घटक आपल्या वजनास हातभार लावीत असतात.
रजोनिवृत्ती झालेल्या बायका सांगतात कि डॉक्टर आम्ही काहीच जास्त खात नाही. हि वस्तुस्थिती असते मग असे का होते
जसे जसे दिवस जातात आणि पाळी अधिकच अनियमित होऊन शेवटी थांबते. पाळी थांबण्याचे कारण म्हणजे बीजांडकोशात स्त्रीबीज निर्मिती थांबते त्यामुळे तेथे तयार होणारी स्त्रियांची संप्रेरके पण बंद होतात. यामुळे शरीराला स्फुरण देणारी शक्ती कमी झाल्यासारखी होते. निरुत्साह वाटतो. सर्व गोष्टी संथ गतीने होतात. याबरोबरच आपली आतडी सुद्धा संथ होतात. यामुळे पूर्वी जर ४०० ग्रॅम अन्न खाल्ले असता त्यातील २०० ग्रॅम शरीरात शोषले जात असे आणि २०० ग्रॅम हे शौचाच्या वाटेने बाहेर टाकले जात असे. आता अन्न जास्त वेळ पोटात राहिल्यामुळे त्यातील जास्त अन्न शोषले जाते. हे जरी १० % अतिरिक्त गृहीत धरले तरीही रोज ४० ग्रॅम या दराने महिन्याला १ किलोने वजन वाढते. असे साधारण वर्षभरात ८-१० किलो वजन सहज वाढते. उरलेले १६० ग्रॅम अन्न पण पटकन "खाली" जात नसल्यामुळे जास्त वेळात आतड्यात राहून त्यावर जिवाणूंची प्रक्रिया होते आणि पोटात "वात" होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते. अन्न खाली जात नसल्यामुळे थोडे जास्त खाल्ले तरी आम्लपित्त(acidity) होते आणि जेवण वर येऊ लागते आणि छातीत जळजळ होते.
त्यातून जरा स्वास्थ्य आले असते आर्थिक परिस्थिती सुसह्य असते म्हणून लोक पर्यटन करतात. केसरी/ वीणा वर्ल्ड सारख्या संस्थाबरोबर पर्यटनाला गेलेल्या लोकांचे आठवड्या दहा दिवसात ३-४ किलोने सहज वजन वाढते. कारण सुग्रास अन्न चारी ठाव समोर असते. पैसे अगोदरच भरलेले असतात. मन घरच्या चिंतांपासून दूर असते बाहेरचे वातावरण उत्साही असते आणि बरोबर मित्र सवंगडी असतात त्यामुळे चार घास जास्तच खाल्ले जातात.
हे वाढणारे वजन/ चरबी स्त्रियांच्या नितंबावर कमरेवर आणि स्तनावर चढलेले दिसते.
याला उपाय काय? बाहेरून संप्रेरके देणे हा उपाय फार तर तात्पुरता आहे आणि तो सुद्धा शक्यतो केला जात नाही कारण अशा संप्रेरकांमुळे गर्भाशय आणि बीजांडकोषाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
मग आपल्या शरीराला आणि आतड्याना चेतवण्यासाठी स्त्रियांनी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वतःसाठी रोज कमीत कमी अर्धा तास वेळ काढून त्या वेळात "भरभर" चालणे आवश्यक आहे. हे भरभर चालणे जास्त आवश्यक आहे अन्यथा वर्षानुवर्षे बायका "चालत" असतात पण वजन काही कमी होत नाही.
स्त्रियांची जोवर पाळी चालू आहे तोवर स्त्री संप्रेरकांमुळे हृदय विकार आणि पक्षाघात हे आजार खूप कमी प्रमाणात होतात. त्यामुळे ४०-५० या वयात पुरुषांच्या मानाने स्त्रियांना हे आजार सहसा होत नाहीत. पण एकदा पाळी थांबली कि हे कवच काढून घेतले जाते आणि ५० नंतर या आजारांचे प्रमाण पुरुषांच्या इतकेच होऊ लागते. वर सांगितलेला व्यायाम हा केवळ आपले शरीरात चैतन्य वाढवतो असे नाही तर या आजाराना प्रतिबंध करण्यास मदत करतो.
"गरोदरपण आणि वजन" हे पुढच्या भागात.
Book traversal links for काटा वजनाचा --७
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचनीय आणि माहितीपूर्ण !
उपयुक्त माहिती. पुभाप्र.
"मी जशी आहे तशी आहे". मग जग
माहितीपुर्ण लेख
नेहमी प्रमाणेच उत्तम लेख.
पिरा ताई
म्हणजे मी जर कॅलरी हिशोब बसवत
थंडी!
वाचतेय. पुभाप्र.
छान आणी ऊपयुक्त माहिती
उत्तम माहिती
नमस्कार डॉक्टर साहेब
http://www.indiatimes.com
१ लिटर पाणी नाही हो जात डॉक.
हळू हळू सवय करा. जेवढे जमेल
पाणी पिणे या बद्दल मला काही
गरजेपेक्षा जास्त पाणी शरीरात
सविस्तर प्रतिसादाबद्दल
माझ्याही मनात अगदी हेच प्रश्न
एक लिटर कोमट पाणी त्यात एक
साहेब
उत्तम माहिती.
सोयाबीन, मूग, उडीद, चवळी,
खूप छान लेख.
पुरुष वयात पण हळू हळू येतात
छान माहीती
सोप्या शब्दांत सुंदर
माहिती आवडली.
खूप छान लेख! धन्यवाद डॉक्टर!
वाचतोय.
अत्यंत माहितीपूर्ण लेख,
लेख आणि प्रतिसाद फार
छान
गुडघे दुखतात व स्पीड ने
गुडघे दुखतात व स्पीड ने