वजनाचा काटा --भाग ९
लेखनप्रकार
वजनाचा काटा --भाग ९
हृदयविकार-- एक वेगळा विचार
साधारण पणे हृदयाच्या रक्तवाहिनीत कोलेस्टिरॉल/ चरबीचे अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे हृदयविकार होतो.
पण लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही? याचा विचार आता आपण करू.
रक्तात चरबी/ कोलेस्टिरॉलचे प्रमाण वाढले कि या चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमा होऊ लागतात. अर्थात हे थर काही फक्त हृदयाच्या रक्तवाहिनीतच होतात असे नाही तर शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्यांत होतात. उदा मेंदूच्या रक्तवाहिनीत असा थर जमा झाला तर आपल्याला पक्षाघात(लकवा) हा विकार होतो. पायाच्या रक्तवाहिनीत असे झाले तर गँगरीन होतो( हा बहुधा मधुमेही/ सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला होतो.) आणि शिश्नाच्या रक्तवाहिनीत झाले कि लिंगशैथिल्य (erectile dysfunction) येते
आपली रक्तवाहिनी हि अतिशय लवचिक आणि एका निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यासारखी असते. एखादा माणूस जेंव्हा व्यायाम करतो तेंव्हा शरीराच्या स्नायूंना अतिरिक्त रक्तपुरवठा आवश्यक असतो त्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. जसे जसे वय वाढते तसे तसे रक्तवाहिन्या कठीण होत जातात (arterioscelrosis) म्हणजेच त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते.
आपल्या रक्तात जेंव्हा अतिरिक्त चरबी असते तेंव्हा त्याचा आपल्या रक्तवाहिन्यांच्या (यात हृदयाची रक्तवाहिनी --कॉरोनरी पण येते) आतील बाजूस थर जमा होऊ लागतो. हा थर जेंव्हा जास्त जाड होऊ लागतो तेंव्हा अवयवाचा रक्त पुरवठा कायम ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तपुरवठा सुरळीत ठेवतात . . शेवटी स्थिती अशी होते कि आता रक्तवाहिन्या प्रसारण पावू शकत नाहीत. जेंव्हा हाच माणूस व्यायाम करायला लागल्यावर जो रक्त पुरवठा आवश्यक असतो तो आता कमी पडू लागतो तेंव्हा पूर्वीसारख्या त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतात.
पण वयानुसार हि प्रसरण पावण्याची प्रक्रिया कमी झालेली असते यामुळेच जसे वय वाढत जाते तसतसे हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.
तसेच चरबीचा थर जितका जास्त तितका रक्तपुरवठा कमी होत जातो. म्हणूनच रक्तातील चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त तितकि हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.
मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांत चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त होते यामुळेच मधुमेही व्यक्तींना हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते.
सिगारेट/ गुटखा किंवा इतर कोणत्याही तर्हेने तंबाखू सेवन केल्यास तुम्हाला जी "किक" मिळते ती रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मिळते पण हि प्रक्रिया वर आवश्यक असलेल्या प्रक्रियेच्या नेमकी उलट आहे. त्याशिवाय रक्तवाहिन्या कठीण होण्याचे प्रमाणहि निकोटिनने जास्त होते. याशिवाय तंबाखूमुळे रक्तात चरबीची पातळी वाढत जाते या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तंबाखू सेवन करणाऱ्या माणसाला हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा कितीतरी जास्त होत जाते.
याशिवाय ज्यावेळेस माणसाची तणाव जास्त असतो तेंव्हा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा जास्त लागतो हा पुरवण्यासाठी हृदय जास्त जोरात धडकू लागते. दुर्दैवाने याच वेळेस माणसाला सिगारेट प्यायची तल्लफ येते. म्हणूनच जेंव्हा मेंदूला आणि हृदयाला रक्तपुरवठा जास्त हवा असतो नेमके तेंव्हाच या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या माणसाला पक्षाघाताचा किंवा हृदयविकाराचा झटका येतो.
स्त्रियांची जोवर रजोनिवृत्ती झालेली नाही तोवर रक्तवाहिन्या जास्त लवचिक राहतात त्यांच्या शरीरात एकंदर चरबी जास्त असूनही रक्तवाहिन्यांत जमा होत नाही.त्यामुळे स्त्रियांना सहसा पन्नाशीपर्यंत हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धक्का बसत नाही. आतापर्यंत असलेली हि कवच कुंडले रजोनिवृत्ती बरोबर काढून घेतली जातात त्यामुळे पन्नाशीनंतर स्त्रियांना हृदयविकार होण्याचे प्रमाण जवळ जवळ पुरुषांइतकेच होते.
आता वरील प्रश्नाकडे वळू.
लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही?
एक उदाहरण म्हणून देतो आहे.
आपल्या घरात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन अर्ध्या इंचाची आहे. जसा जसा काळ जातो तशी हि पाईपलाईन गंजत जाते आणि आतील व्यास कमी होत जातो. मग शेवटी शेवटी आपल्या घरातील धार फारच कमी होते. मग आपल्याला हि पाईपलाईन बदलावी लागते.
जर आपल्या घराची पाईपलाईन एक इंचाची असेल तर गंजल्यामुळे आतील व्यास कमी होण्यास काळ जास्त लागेल
आणि जर हि पाईपलाईन दीड इंचाची असेल तर आपल्या आयुष्यभरात आपल्या घराचा पाणीपुरवठा कमी होणार नाही.
हीच स्थिती मानवी शरिराची आहे. दुर्दैवाने भारतीय वंशाच्या लोकांच्या मेंदूच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या पाश्चात्य(कॉकेशियन वंशाच्या) लोकांपेक्षा जास्तच बारीक आहेत. यामुळे पाश्चात्य लोक आपल्या मानाने जास्त वजनदार असुनही त्यांचे हृदय विकाराचे प्रमाण त्याच वजनाच्या भारतीय माणसापेक्षा बरेच कमी आहे.
या कारणामुळे काही लोक जे सडपातळ सक्रिय तम्बाखू न घेणारे मधुमेह नसणारे असूनही त्यांना हृदयविकार होतो आणि दुसऱ्या टोकाला "विन्स्टन चर्चिल" सारखे लोक लठ्ठ असून चिरूट ओढूनहि ९० वर्षापर्यंत जगतात.
दुर्दैवाने आपल्या घराची पाईपलाईन अर्ध्या इंचाची आहे कि एक इंचाची कि दीड इंचाची आहे आहे हे प्रत्यक्ष अँजियोग्राफी केल्याशिवाय सांगणे अशक्य आहे. शिवाय वयानुसार आपल्या रक्त वाहिन्या किती कठीण होतील हे सांगणे आजमितीला शक्य नाही.
त्यामुळे आपली पाईपलाईन दीड इंचाची असली तरी आपल्याला हृदयविकार येणारच नाही हे छातीठोकपणे सांगणे आजमितीला शक्य नाही.
माझ्याकडे येणाऱ्या सुदृढ व्यक्तींना माझे ससंदर्भ स्पष्टीकरण असे असते.
एक पन्नास वर्षाच्या ५'१०" उंचीच्या पुरुषाचे आपले आदर्श वजन जर ६८ किलो असावे. यात जर जाड बांध्याच्या माणसासाठी १० % सूट धरली तरी ७५ किलो असावे. जर आले वजन १०१ किलो असेल तर हे वजन ३५ % जास्त आहे.
आपला ट्रक १० टन क्षमतेचा असेल आणि आपण त्यात नियमितपणे साडेतीन टन वजन जास्त भरत गेलात तर काय होईल?
आपल्या इंजिनवर ३५ % अतिरिक्त भार येईल, आपले सस्पेन्शन आणि टायरचे आयुष्य ३५ टक्क्याने कमी होईल (सस्पेन्शन लवकर खराब होईल आणि आपले टायर लवकर झिजतील) हीच स्थिती आपल्या शरीराची असेल.
आपण झोपले असताना हि हृदयाला ३५ % अतिरिक्त वजनासाठी ३५ % अधिक काम करावे लागेल. आपला पाठीचा कणा लवकर झिजेल(स्पॉंडायलॉसिस) आपले गुडघे लवकर खराब होतील.
एक वेगळा विचार -- १९७० सालच्या अगोदर भारत देशात अन्नधान्य मुबलक प्रमाणावर कधीच नव्हते त्यामुळे आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांना सुग्रास भोजन कसे देता येईल; हा विचार करत आहोत परंतु गेल्या ५० वर्षात स्थितीमध्ये जमीन अस्मानाचा बदल झाला आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे भुकबळी पेक्षा अतिरिक्त वजनाच्या दुष्परिणामांनि होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या शतकानुशतके असणाऱ्या अपुऱ्या अन्नपुरवठ्याचा आपल्या संस्कृती आणि परंपरेवर इतका परिणाम झाला आहे कि आपण पंचेंद्रियांपैकी केवळ "जिभेचे चोचले" पुरवण्याकडे लक्ष देतो.
आपल्याकडे पाहुणे आले तर केवळ त्यांना सुग्रास अन्न देणे हा एकच पाहुणचाराचा मार्ग आहे असे नव्हे तर
त्यांच्या आवडीचे संगीत लावणे,
त्यांच्या आवडीचे सुगंध हवेत पसरणे,
वातानुकूलित हवेत पाहुण्यांना आवडेल अशा तर्हेची प्रकाश व्यवस्था करून बसणे,
ऐसपैस गप्पा मारणे अशा अनेक मार्गानी त्यांच्या जीभ सोडून इतर चारही इंद्रियांचा (नाक, कान, डोळे आणि त्वचा) पाहुणचार करता येईल.
पहा विचार करून.
वाचन
10884
प्रतिक्रिया
0