✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'शेतकरी व कॅशलेस व्यवहार'

स
संदीप डांगे यांनी
Fri, 12/09/2016 - 04:24  ·  लेख
लेख
आप्पासाहेब जोगळेकर यांच्या कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण ह्या धाग्यावर म्हात्रेसर व मार्मिक गोडसे यांच्यातल्या 'शेतकरी व कॅशलेस व्यवहार' चर्चेनुसार दिलेला हा प्रतिसाद. अर्धवटराव व सही रे सई यांनी सुचवल्यानुसार वेगळा धागा काढत आहे. थोडं लिखाण अजून जोडलं आहे. काही उडवलं आहे. मूळ प्रतिसादः http://www.misalpav.com/comment/907299#comment-907299 ------------------------------------------------------------------ मे २०१६ ते ऑक्टोबर २०१६ ह्या सहा महिन्यातला सर्व काळ (२४ बाय ७) मी अनेक शेतकर्‍यांसोबत काम केले. तेही एका गावातल्या नव्हे तर नाशिक, नगर, पुणे ह्या तीन्ही जिल्ह्यातल्या सुमारे १६ तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या. यात अनेक कोट्याधिश ते कफल्लक असे सर्व प्रकारचे शेतकरी बघितले. शेतकर्‍यांपासून मागे जाणारी व पुढे जाणारी सर्व सप्लाय चेन बघितली. बीयाणे, औषधे, अवजारे, मोटारगाड्या, पंप, वीजपुरवठा, मोबाईल-रेंज, बॅन्कांची उपलब्धता, होणारे व्यवहार हे सर्व ८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते. आपल्या नागरी व्यवस्थेमधे अनेक स्तर आहेत. प्रत्येक स्तर हा दुसर्‍यापेक्षा भयंकर वेगळा, मध्यम वेगळा, किंचित वेगळा ह्या प्रकारात दिसतो. ह्यातल्या कोणत्याही स्तरातल्या व्यक्तिला दुसर्‍याच्या स्थितीकडे 'दुरुन डोंगर साजरे' ह्या उक्तीनुसार बघावे लागते. मजा आणि त्रास हे प्रत्येक स्तरातल्या त्या त्या स्थितीप्रमाणे त्या त्या व्यक्तिला मिळतातच. त्याची तुलना होऊ शकत नसते. त्यामुळे दुसर्‍याची स्थिती प्रत्यक्ष भोगल्याशिवाय, बघितल्याशिवाय समजत नाही हे मागच्या सहा महिन्यात कळलेलं आहे. दोन जिल्ह्यातली, दोन शहरातली, दोन गावातली, दोन वस्तीतली, इतकंच काय तर अगदी आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकर्‍यांचीही परिस्थिती जमीन-आसमान असते. जजमेंटल होण्यात अर्थ नाही. म्हात्रे सर व मार्मिक गोडसे, दोघांच्याही मुद्द्यात अर्धसत्य आहे. ते पूर्ण चुकीचे किंवा पूर्ण बरोबर नाही. आता कोण कोणत्या अ‍ॅन्गलने बघतो इतकंच तिथे बाकी राहतंय. तसेच कोण्या एकाचा अ‍ॅन्गल हा पूर्ण सकारात्मक किंवा पूर्ण नकारात्मक आहे असेही म्हणू शकत नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था (म्हणजे व्यवहाराची पद्धत) शहरी भागापेक्षा कैक बाबतीत वेगळी पडते. तिथे अनेक समस्या आहेत. (त्या समस्या आहेत म्हटले की ७० वर्षांची घाण इत्यादी मुद्दे पुढे केले जातात, पण नवीन धक्काव्यवस्था आणतांना सत्य लक्षातच घ्यायचे नाही का?, हा प्रश्न मला सतत पडत आहे.) पण अनेक सुविधाही आहेत हे सत्यही नाकारले जाऊ शकत नाही. (म्हणजे सत्तर वर्ष झाले तरी सर्वत्र बैलगाड्याच चालू आहेत असे दिसत नाही). पण ढोबळमानाने कोणतंही एक चित्र हे ग्रामीण व्यवस्थेचं मूर्तिमंत उदाहरण आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. उदा. नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किमीवर असलेल्या, वीस वर्षांपासून टोमॅटोचीच शेती करत असलेल्या एका साठ वर्षीय शेतकर्‍याला करप्या रोगामुळे आपला दोन एकर टोमॅटो अर्धा जळेपर्यंत काय अ‍ॅक्शन घ्यावी हे कळु नये हे माझ्या आकलनाबाहेर जाते. त्याच नाशिकपासून दुसर्‍या बाजूला असलेल्या वीस किमी वर एखादा बावळट दिसणारा अर्धशिक्षित शेतकरी कोणतं किटकनाशक नेमकं कसं काम करतं ह्याच्या केमिकल अ‍ॅनॅलिसिसवर अचूक शास्त्रीय चर्चा करुन पीएचडी झालेल्या शेतीतज्ञाला घाम फोडू शकतो हेही बघितलंय. त्यामुळे प्रगत-आधुनिक शेतकरी व आत्महत्या करणारे शेतकरी हे एकाच गावात असू शकतात. एकमेकांचे मित्रही असू शकतात. समस्या व सुविधा हातात हात गुंफून अशा काही फेर धरुन नाचतात की स्तब्ध व्हायला होतं. बी बीयाणे औषधे घ्यायला शेतकरी जवळच्या दुकानात जातात. हे जवळचे दुकान १ किमी पासून २०-२५ किमी इतके असू शकते. (ह्यापेक्षाही जास्त दूर असू शकते, पण ती थोडीशी दुर्मिळ बाब आहे, असत्य नव्हे). सामान आणायला सायकल, बाइक, बस, बैलगाडी, टेम्पो, पिकअप पासून फॉर्चुनर घेऊन जाणारे शेतकरी आहेत. मोठ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक व्यवस्था असलेली दुकाने आहेत तशीच अगदी टपरीवजा चालणारी दुकानेही छोट्या-मोठ्या गावांमधे, रस्तोरस्ती आहेत. आधुनिक दुकानात संगणकिकृत बील मिळते, हे संगणक थेट इन्टरनेटशी जोडलेले असतात, दुकानदार थेट नेटबॅन्किंगही करतात, किंवा बॅन्केत जाऊन आरटीजीएस सुविधांचा वापर करुन कंपन्यांना पेमेंट करतात. काही दुकानदार कच्च्या चिठ्ठ्या लिहून पावती देतात, पण असे प्रमाण खूपच कमी आहे कारण नुकसान भरपाई क्लेम करण्यासाठी पक्की बिलं लागतात. पण दुकान कसेही असो, शेतकर्‍यांकडून बीलाचे पैसे घेतांना ९९% केसेस मधे 'रोखच' घेतली जाते हे. अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे. देणेकर्‍यांने उधार बुडवू नये म्हणून आजकाल दुकानदार संघटना उधारखाते सुरु करण्याआधी अनामत किंवा ब्लॅन्क चेक ठेवून घेते. (ह्यात दुकानदार काळा-पांढरा पैसा कसा निर्माण करतात हा स्वतंत्र विषय आहे. येणारी-जाणारी सर्व बिले अधिकृत असूनही दुकानदार करचुकवेगीरी करु शकत असतील असे मला वाटते, प्रत्यक्ष कसे होते ते बघितले नाही त्यामुळे सांगु शकत नाही.) नक्की प्रमाण सांगता येणार नाही पण उधार व रोख हे दोन्ही प्रकार दुकानात मजबूत चालतात. बियाणे व खते ह्यासाठी आगावू रोख मोजावी लागते तर वेळोवेळी लागणारी औषधे, दुय्यम खते ह्यासाठी साधारणपणे उधारी दिली जाते. हंगाम सुरु होण्याआधी बियाणे व खते ह्यांच्यासाठी दुकानदाराने कंपन्यांना आगावू रक्कम भरून बुकींग केलं तरच माल दुकानात पोचतो. साधारण सर्वांना मार्चाखेर उधारखाती चुकवावी लागतात. शेतकरी पिक विकले जाईल तसे उधारी चुकवत जातो. जिथे पिके अल्प काळाची व नगदी, चटकन पैसा देणारी (भाजीपाला, फळे इत्यादी) जास्त प्रमाणात होतात तिथे रोख वर जास्त भर आहे, तर जिथे जास्त काळ चालणारी व घुमून फिरुन पैसा देणारी पिके (ऊस, कापूस इत्यादी) आहेत तिथे उधारी जास्त होते. तर ह्या व्यवस्थेत मुद्दा आहे की शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का? ह्याचे उत्तर 'नरो वा कुंजरोवा' असेच देता येईल. कॅशलेस व्यवहार शक्य आहेतही आणि नाही सुद्धा. सर्वात महत्त्वाची ती सुविधा व क्षमता. काही गोष्टी समर्थक व विरोधक दोन्ही पक्षांनी डोळे उघडे ठेवून पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतल्याच पाहिजेत. ही आताची चालू परिस्थिती आहे, भविष्यात काय होईल याबद्दल अटकळी बांधणे तूर्तास दोन्ही पक्षांनी सोडले पाहिजे. बॅन्कांचे जाळे पुरेसे नाही, रेंज नाही, साक्षरता नाही, वीज नाही, ह्या गोष्टी आहेतही आणि नाहीपण. मिश्रसत्य. मुख्य गावापासून सुमारे २५-५० किमी दूर असलेल्या गावांमधे लाखोची उलाढाल होत नाही हे सत्य नव्हे. फक्त ती रोज रोज होत नाही हेही सत्य आहे. अशा दुरच्या गावातल्या लोकांना महत्त्वाचे सामान, औषधे, बीयाणे, खते आणायला मुख्य जवळच्या गावात जावे लागते जिथे बॅन्का, रेंज, वीज, सगळं असतं. तिथे ते व्यवहार मोबाईल, कार्डने करु शकतात. स्वतःच्याच गावातले व्यवहार छोट्या रकमेचे मोबाईल रेंज, वीज वगैरे असेल तरच शक्य आहे किंवा नाही. हे बायनरी आहे. तिथे कॅशच लागेल व लोक कॅशच वापरतील. रोख व्यवहारांवर बंदी तर आणलेली नाही तेव्हा तिथे कॅशलेसचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही असे समर्थक लोक म्हणत आहेत. पण ही भविष्यातली नाही, तर आत्ता करंट सिचुएशन बघून म्हणणे योग्य आहे काय हे तपासावे लागेल. बॅन्क कर्मचारी व इतर व्यवस्था खूप वेगाने, पूर्ण जोर लावून काम करत आहे. कोणीही हातावर हात धरुन बसलेलं नाही हेही सत्य आहे. पण बॅन्का तयार नसतांना अचानक हजार स्वाईप मशिनची गरज त्या एखाद्या गावात कशी 'ताबडतोब' पुरवू शकतील? त्यासोबत 'अचानक' लाखभर खातेधारकांना कार्ड-मोबाईल बॅन्किंग शिकवणे कसे शक्य होईल? असे अनेक प्रश्न एका रात्रीतून अचानक सुटतील असे मानणारे इथे कुणी असतील असे वाटत तर नाही. असतील तर गांजाचा अंमल पुरेपुर चढलाय असं समजूया. ठिक आहे, थोडा वेळ लागेल, मग तोवर काय करायचं? उधारी करायची, अमुक तमुक करायचं. किती काळ? महिना, दोन महिने, तीन महिने? सतत नकारात्मक का बोलता असं अनेक जणं इथं विचारतील. 'नुसतं' सकारात्मक 'बोलून'ही उपयोग नाही किंवा 'जग बघा कुठे चाललंय' असं कुत्सितपणे बोलुन अमेझॉन-गो च्या कल्पनेचा (प्रोटोटाईप-कन्सेप्ट) विडियो टाकून उपयोग नाही. ते 'कुठे तरी जाणारं जग' प्रत्यक्षात असेल आणि मग कुणी तक्रार करत असेल तर खरंच त्याला जोड्याने मारण्यालायकच समजले पाहिजे. सरकार आता पूर्ण १४ लाख कोटीची करन्सी आणणार नाहीच असे दिसते आहे, म्हणजे 'लेसकॅश' हे वास्तव असणार. लेसकॅश व सुविधांची कमतरता ह्या दोन्ही अवस्था सद्यस्थितीत वास्तव आहेत. तुम्ही विरोधक असा किंवा समर्थक, हे वास्तव नाकारु शकत नाही. आता मी गेला महिनाभर नाशकातच आहे, बाहेर कुठेही गेलो नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी नक्की काय स्थिती आहे ह्यावर मत देणं उचित नाही. पण एवढं इमॅजिन करु शकतो की बॅन्क-चेक-कार्ड-मोबाइल-रेंजही नाही आणि रोख पैसाही नाही, (ग्रामीण भागातील बॅन्केत पुरेसा रोख-पुरवठा होत नाहीये. देशभरातले ३५% एटीएम चालू आहेत - जे अल्पावधीत कॅशलेस होतात) अशा अवस्थेत काय सकारात्मक विचार करता येईल-बोलता येईल. परंतु अशा अवस्थेतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्या-बोलल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे ह्याबद्दल सकारात्मक-वा-नकारात्मक बोलणे योग्य ठरणार नाही. (फोनवर संभाषणं झालेली आहेत पण ती ग्राह्य धरता येत नाहीत, त्या बोलण्यात दोन्ही प्रकारचे पूर्वग्रह डोकावतांना दिसले. संभाषणकर्त्याचे वैयक्तिक मत व त्याचीच प्रत्यक्ष परिस्थिती यात विसंगती दिसत होती. काही लोक सावध राहून बोलत होते हे विशेष.) चेकद्वारे मोठ्या आकड्यांचे व्यवहार. मोठ्या आकड्यांचे व्यवहार चेकद्वारे होत असतात. पण दोन-तीन लाख पर्यंत रकमा साधारण रोख हाताळल्या जातात. दुसरं असे की व्यापार्‍याने चेक देऊन फसवण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून चेक-आधारित व्यवस्थेवर विश्वास कमी आहे. (त्याचेही अनुभव ह्या सहा महिन्यात दिसलेच आहेत) चेक बाउन्स झाला तर कोर्टकज्जेगिरि करत बसणे परवडत नाही (ह्यात सरकार काय मदत करु शकणार ते माहित नाही). काही चेक क्लिअर व्हायला १५ दिवस लागलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घोडेगावात एका लोकल बॅन्केचा इशु केलेला चेक चाळीस किमी दूर नारायणगावात आणून भरावा लागतो कारण ती दुसरी प्रायवेट बॅन्क घोडेगावात नाही. तिथून ती प्रा. बॅन्क पुण्याला (लो. बॅन्क सोबत टाय-अप असलेल्या प्रा. बॅन्केला) चेक कुरियर करते. ती प्रा. बॅन्क सर्व तपासून तो चेक घोडेगावला कुरियर करते. असे बरेच उपद्व्याप 'इकडून तिकडे' होतात. १२-१५ दिवसांनी चेक पास होतो व अकाउंटला पैसे दिसतात. (कुणाला विश्वास नसेल तर व्य नि करा. बॅन्केचे नाव व नंबर देतो स्वतः चौकशी करुन खात्री करु शकता.) शेतकरी इतके दिवस नाही थांबू शकत, शेतातलं पीक नाही थांबू शकत, मजूर नाही थांबू शकत, गाडीभाड्यावाला आणि असे अनेक देणेकरी नाही थांबू शकत. गावाखेड्यांमधले व्यवहार असे रेंगाळले तर जीडीपी नक्कीच गटांगळ्या खाईल. दोन चार दिवसांची म्हणून ही अडचण रेटत रेटत लोकांनी महिनाभर काढली. आता पुढे अजून किती शक्य आहे ते कळेलच व त्याचा परिणामही येत्या सहा महिन्यात कळेलच. चेकव्यवहाराची व्यापार्‍यांचीही बाजू आहे पण इमानदारी-हातचलाखीच्या अध्यातमध्यात असल्याने ती मांडत नाही. असे लॉन्ग-रुट-चेक-क्लिअरिंग सारखे अनेक प्रश्न असतात, आहेत जे आपण इथे लॅपटॉप समोर बसून टिकटिक करत नाही इमॅजिन करु शकत. कुणी मांडले तर त्यावर शहाजोगी ओवरस्मार्टगीरी दाखवणे इतकेच सद्यस्थितीत आपल्या हातात असते. समस्यांवर उपाय आपल्याला दिसतात, की अरे हा उपाय आहे, तो उपाय आहे, अमकं करु शकतात, तमकं करु शकतात. हे बोलणे सोपे आहे, पण अचानक पायावर न चालता हातावर चालायला लावण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. कॅशलेस व्यवहारांना माझा विरोध नाही, कधीच नव्हता फक्त अपुरी व्यवस्था असतांना व जनमानसाला काहीच पूर्वसूचना न देता धाडकन तीव्र नोटाटंचाई लादली जाणे व त्याला कॅशलेसचे गोंडस नाव देणे पटलेले नाही. जिल्हा बॅन्का ह्यांच्यात खाते असलेल्या 'ग्राहकां'चे पैसे अडकलेले आहेत असे दिसते. इथे जिल्हा बॅन्केचा मुद्दा जेव्हाही आलाय तेव्हा त्या कशा भ्रष्ट झाल्यात व त्याद्वारे पैसे काळ्याचे पांढरे होतील म्हणून बंदी योग्यच आहे असाच विचार दिसला. परंतु जिल्हा बॅन्केत ज्यांचे खाते ते सर्व सदस्य भ्रष्टाचारीच आहेत, बाकी कोण्या सामान्य माणसाचे तिथे जणू खातेच नाही असे नव्हे. पाच पन्नास संचालक म्हणजे जिल्हा बॅन्क नव्हेत. शेकडो खातेदार आहेत ज्यांचे केवळ ह्याच बॅन्केत खाते आहे व त्यातच त्यांचे सर्व पैसे आहेत. ते पैसे त्यांना मिळत नाही आहेत अशा बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. ह्यातले खरेखोटे कोणाला माहित असल्यास स्पष्ट करावे. पण जिल्हा बॅन्क बंद म्हणजे घोटाळेबहाद्दरांना चाप एवढाच मर्यादित विचार करु नये. असो. ह्या सर्व चर्चांमधे एक प्रकारचा प्रचंड मोठा गॅप आला आहे. खूप खोल व लांब दरी आहे. एकाचे बोलणे दुसर्‍याला ऐकु जात नाहीये. त्यामुळे काही काळ गप्प राहिलेलेच बरे असे मला वाटत आहे. कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. इथे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप-अपमान-धुरळा उडवून प्रत्यक्षप्राप्त समस्यांवर कोणतीही उपाययोजना होणार नाही. शहरी भागातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळाल्याचा उपयोग सोडता सर्व चर्चांचे फलित मला तरी शून्य दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसतांना एकमेकांना मूर्ख सिद्ध करुन दाखवण्याच्या नादात वेळ घालवणे हाच कुठल्याही चर्चेचा केवल उद्देश होत असेल तर थांबावेच. कोणासाठी ते मनोरंजनाचे साधन असेल तर चालुद्या! एन्जॉय! :) तुर्तास, ह्या विषयावरचे हे माझे शेवटचे प्रकटन. आता ह्या विषयावर थोडा काळ जाऊ देऊन, आढावा घेऊन लेखन करणे योग्य राहिल असे वाटल्याने विश्रांती घेत आहे. इतर सदस्यांना चर्चा करावयाची असल्यास करावी. मी भाग घेऊ शकणार नाही, क्षमस्व! (तशीच गरज असल्यास व्यनि व खरडवहीत उपलब्ध असेन) धन्यवाद!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29862 वाचन

💬 प्रतिसाद (148)

प्रतिक्रिया

ते नोटाबंदी वगैरे बाजूला राहू

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/10/2016 - 18:35 नवीन
ते नोटाबंदी वगैरे बाजूला राहू द्या, त्याबद्दल खूप चर्चा झाली. परदेशप्रवासात पैसे बरोबर नेण्याची गोष्ट आली म्हणुन थोडी उपयोगी माहिती... परदेशात जाताना अडीअडचणीसाठी फक्त थोडीशी नकद न्यावी. बाकी सर्व पैसे ट्रॅव्हल कार्डने न्यावे. एका कार्डावर तुमच्या गरजेप्रमाणे १ ते १५ पर्यंत वेगवेगळी चलने (प्रत्येक चलन तुमच्या गरजेएवढ्या रकमेचे) भरता येतात. त्यांची किंमत तुम्ही कार्ड घेताना भारतात भरलेली असल्याने त्यानंतर चलनबदलीचा खर्च शून्य. सर्व प्रकारच्या पॉइंट ऑफ सेलला शुन्य चार्जेस असा अमेरिकेत तरी हा माझा अनुभव होता. हे कार्ड अमेरिकेत सगळीकडे $१०च्या आणि काही ठिकाणी तर $५च्या खरेदीला विनाचार्ज चालते. एटीएममधून कॅश काढताना (जे फिरताना क्वचितच करावे लागेत) एक ठराविक (फिक्स्ड) चार्ज असतो, तो कार्ड देणार्‍या बँकेप्रमाणे वेगळा असतप, तो नक्की माहित करून घ्यावा. दर खर्चाचा भारताप्रमाणेच परदेशातही त्वरीत एसएमएस येतो. भारतात परतल्यावर, उरलेले पैसे तात्कालीक दराने परत रुपयात परावर्तित करता येतात किंवा परतीच्या दिवसापासून १८० दिवसांच्या आत परत परदेशात जाणार असल्यास कार्ड चालू ठेवता येते. कार्ड हरवले तर एक फोन करून ब्लॉक करता येते व कुरीयरने २४ तासांत दुसरे मिळते अथवा काही बँका सुरुवातीलाच एक अतिरिक्त कार्ड देतात जे अ‍ॅक्टीवेट केले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

प्रतिसादासाठी धन्यवाद..

चिगो
Sat, 12/10/2016 - 18:45 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद, डॉक्टरसाहेब.. कदाचित दोनेक महीन्यांत परदेशप्रवास घडू शकतो, तेव्हा हे लक्षात ठेवेन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सुखद व यशस्वी प्रवासासाठी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/10/2016 - 20:20 नवीन
सुखद व यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

शेर

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 12/11/2016 - 20:00 नवीन
लाजवाब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

देशभक्तांच्या भावना दुखावतील

वरुण मोहिते
Fri, 12/09/2016 - 16:22 नवीन
असं काही पण बोलू नका सध्या . त्रास झाला हे जे लोक मान्य करतच नाहीत त्यावर काय बोलणार . कार्ड कॅशलेस सगळं करा पण मोदींना काही बोलू नका . विरोध नाही करायचा . आम्ही बोलो का कि मोदी चुकीचे आहेत पण निर्णय चुकला अंमलबजावणी चुकली इतकं बोलं कोणी कि सगळ्या उपाय योजना सांगणार . असो . काँग्रेस असो भाजप असो.कुठलेपण निर्णय असो . पण ह्या वेळी निर्णय चुकला वेळ चुकली. पण भाजपच्या काळात अरेरावी जास्त पाहायला मिळाली . सो मजा येतेय . रविवारी मस्त वाईन पिऊन आराम करिन म्हणतो .
  • Log in or register to post comments

वाईन कॅश मध्ये आणता का

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 12/09/2016 - 16:55 नवीन
वाईन कॅश मध्ये आणता का कार्डबिर्ड स्वाईप करता म्हणे सरजी ! देशद्रोही कुठचे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

ओ बापू

मास्टरमाईन्ड
Mon, 12/12/2016 - 20:09 नवीन
परवाच कार्ड स्वाईप करून बीअर, व्हिस्की इ. जीवनावश्यक पदार्थ आणलेत पार्टीसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

उसतोडवाल्यांना

कपिलमुनी
Fri, 12/09/2016 - 17:50 नवीन
उसतोडवाल्यांना नोटबंदीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला . नोटबंदीचा मुद्दा किंवा निर्णय चांगला आहे . त्यासाठी थोडा त्रास सहन करायची तयारीसुद्धा आहे पण जगण्यामरण्याचा किंवा रोजच्या खाण्याचा प्रश्न आला की याचे समर्थन करणे अवघड आहे. मी पाहिलेला प्रॉब्लेमचा सारांश : उसतोडवाले हे दुसर्‍या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येतात . सोबत गरजेपुरतेच सामान आणतात . कागदपत्र किंवा इतर महत्वाच्या वस्तू आणत नाहीत कारण हरवणे किंवा चोरीस जाण्याची शक्यता असते . अर्धे पैसे अ‍ॅडवान्स घेउन अर्धे पैसे इथल्या दैनंदिन कामांसाठी वापरतात. नोटबंदी झाल्यावर यांना बरेच जण ५०० / १००० च्या नोटा देउ लागले . आणि १०० व खालील नोटांचा तुटवडा जाणवू लागला. मिळालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जवळ नव्हती . ( बँकमध्ये पॅनकार्ड आणि आधारकार्डची कॉपी मागतात . माझा केवायसी अपडेट असून मागितली होती ) गाडी नसल्याने पेट्रोल पंप ,गॅस अशा ठिकाणी वापरण्याचा मार्ग नव्हता. साखर कारखाने सहकारी बॅक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सोसायटीमध्येच पैसे जमा करत असल्याने आणि या बँकावर मर्यादा घातल्याने कॅशचा प्रॉब्लेम झाला. शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळेना पर्यायाने उसतोडवाल्यांना पैसे मिळेना. बेअरर चेकने पैसे द्यावे म्हणले तरी बॅक देत नव्हती प्रत्येक घरामधे महिन्याचा किराणा असतो . धान्याची साठवणून असते . पण आठवडा ,१५ दिवसाला गाव बदलल्यामुळे या लोकांनी साठवणूक केलेली नसते. रोजचा व्यवहार नसल्याने आणी स्थिर ठिकाण नसल्याने दुकानदार उधार देत नाहीत त्यांमुळे रोजची भ्रांत पडू लागली . लहान मुलांच्या दुधापासून ते औषधापर्यंत हाल झाले . कित्येक कुटुंबे उपाशी कम करत व झोपत होति. कॅशलेस जग , पेटीएम , यूपीआय अ‍ॅप, नेटबँकींग यां पासून ही माणसे कोसों दूर आहेत , आणि बहुतांशी असंघटीत असल्याने यांचा आवाज टीव्ही , मीडीया, नेता आणि जनता यांपर्यंत पोचत नाही. सरकारने समाजमधल्या असंघटीत , गरीब लोकांचा विचार करायला हवा होता . (चर्मकार , रस्त्यकडेला रफू अल्टर करणारे , गजरे विकणारे , लोकल मधे वाळे , कडे विकणारे , नाक्यवर शेंगदाणे , चणे फुटाणे विकणारे यांसारख्या लोकांना चेहरे नसतात , त्यांचा विचार करायला हवा , ५००-१००० च्या नोटा बंद झाल्यामुळे १०-२० -५० रुपयांच्या नोटा गठ्ठ्यामध्ये वापरल्या जात आहेत त्यामुळे या नोटांचा तुटवडा झालाय आणि हा लोकांच्या मुळावर आला आहे. ) नोटबंदीचा निर्णय चांगला की वाईट हे कळायला काही काळ जावा लागेल पण त्याच्या अंमलबजावणीमधे , पर्यायी व्यवस्था उभारण्यामधे सरकार , आरबीआय कमी पडला हे मान्य करण्यात माझी देशभक्ती कोठेही आड आली नाही.
  • Log in or register to post comments

अगदी सेम निरीक्षण माझे ही आहे

विशुमित
Fri, 12/09/2016 - 18:01 नवीन
अगदी सेम निरीक्षण माझे ही आहे ऊस तोडी वाल्यांबद्दलचे. अवांतर: आज आमचे आजोबा बँकेत गेले होते. पैसे नाही मिळाले. बँक मॅनेजर ला २ शिव्या हासडल्या. ओळखीचा होता म्हणून प्रकरण आटोपतं घेतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शिव्या दिल्यावर पैसे मिळाले

असंका
Tue, 12/13/2016 - 13:48 नवीन
शिव्या दिल्यावर पैसे मिळाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

पैसे नाही मिळाले म्हणून तर

विशुमित
Tue, 12/13/2016 - 14:27 नवीन
पैसे नाही मिळाले म्हणून तर शिव्या दिल्या ना..( शिव्या कशा असभ्यपणाचे वर्तन आहे कृपया एवढे ज्ञान फक्त देऊ नका) आजोबांचा शिरस्ता आहे कोपरीच्या खिश्यात कमीत कमी १० हजार असलेच पाहिजे. (एवढे पैसे खिश्यात कशाला पाहिजे ह्याचे पण ज्ञान कृपया देऊ नका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

नोटबंदीचा निर्णय चांगला की

मोदक
Fri, 12/09/2016 - 19:05 नवीन
नोटबंदीचा निर्णय चांगला की वाईट हे कळायला काही काळ जावा लागेल पण त्याच्या अंमलबजावणीमधे , पर्यायी व्यवस्था उभारण्यामधे सरकार , आरबीआय कमी पडला हे मान्य करण्यात माझी देशभक्ती कोठेही आड आली नाही. तुला खरी झळ बसली असूनही (आक्रस्ताळेपणा न करता) संतुलीत प्रतिसाद दिला आहेस याबद्दल कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ऊस तोडायला अख्खी गावंच्या

आनंदी गोपाळ
Fri, 12/09/2016 - 21:52 नवीन
ऊस तोडायला अख्खी गावंच्या गावं उठून जात असतात, हे ज्यांना ठाऊक असेल त्यांना या प्रकाराचे गांभीर्य समजेल. संपूर्ण गावातील सक्षम वर्कफोर्स, बैलगाड्यांत संसार लादून, पोराबाळांच्या लटांबरासकट खानदेशातून गुजरातेत जातो. ४-५-६-७ महिने. एक ठेकेदार असतो, अन बाकी ऑल्मोस्ट वेठबिगारी. गावात मागे राहतात फक्त म्हातारी कोतारी. उन्हाळ्याच्या तोंडावर हे सगळं लटांबर परत येतं. आपल्या घरच्या कोरड शेतीची मशागत करतं. तिकडे हमाली करून आणलेल्या पैशातून सावकारी फेडून, नवी बियाणं अन खतं आणून जोंधळे बाजरी पेरतं. पुन्हा हेच चक्र पुढच्या वर्षी. जौद्या. नव्या युगाच्या कॅशलेस इकॉनॉमिस्ट्सना हे सांगायची, समजायची गरज नाहीये. कठीण काळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+११

अमितदादा
Sat, 12/10/2016 - 00:20 नवीन
योग्य आणि संतुलित निरीक्षण. खालील वाक्ये महत्वाची.
कॅशलेस जग , पेटीएम , यूपीआय अ‍ॅप, नेटबँकींग यां पासून ही माणसे कोसों दूर आहेत , आणि बहुतांशी असंघटीत असल्याने यांचा आवाज टीव्ही , मीडीया, नेता आणि जनता यांपर्यंत पोचत नाही.
नोटबंदीचा निर्णय चांगला की वाईट हे कळायला काही काळ जावा लागेल पण त्याच्या अंमलबजावणीमधे , पर्यायी व्यवस्था उभारण्यामधे सरकार , आरबीआय कमी पडला हे मान्य करण्यात माझी देशभक्ती कोठेही आड आली नाही.
भरपूर लोक फक्त निर्णय चांगला असल्याने ढिसाळ अंमलबजावणी मुळे होणारा त्रास सहन करतायत, मोदींचा करिष्मा आणि वैयक्तिक प्रामाणिकपणा (त्यांच्या corporate मित्रांचा किंवा साथीदारांचा नवे) यामुळे सुधा लोक सहन करतायत. हाच निर्णय मोदी सोडून इतर कोणत्या सरकार ने घेतला असता तर लोकांनी त्या सरकारची आतापर्यंत पत्रावळी केली असती. हे सरकार सरते शेवटी shining india मूड मध्ये जावू नये म्हणजे मिळवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

उस तोडनी कामगार रोजचा खर्च

ईन्टरफेल
Sun, 12/11/2016 - 21:16 नवीन
उस तोडनी कामगार रोजचा खर्च त्याने रोज केलेल्या कामातुन करतो असा अनुभव आहे मोठा खर्च करायचा असेल तर त्याला त्याच्या खात्यात पैसे जमा करावे लागतिल ते त्याने त्याच्या मुकादमाला सान्गुन जमा करु शकतो ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वास्तवदर्शी चित्रण आणि एक दुरुस्ती

ट्रेड मार्क
Fri, 12/09/2016 - 21:31 नवीन
सर्वप्रथम - कुठलाही पक्ष व राजकारण बाजूला ठेऊन प्रतिसाद लिहीत आहे. तुम्ही ह्या सगळ्याचा फर्स्टह्यांड अनुभव घेतलेला असल्याने एकदम वास्तवदर्शी आहे. लेखातून तुम्ही म्हणले आहे की हे सर्व तुम्ही ८ नोव्हे. च्या आधी बघितले आहे. नोटा रद्द झाल्यावर तेथील व्यवहार कसे चालत आहेत याबद्दल काही माहिती आहे का? लोकांनी काही पर्यायी व्यवस्था शोधली आहे का सगळं पूर्णपणे ठप्प झालंय या बद्दल काही माहिती मिळाली आमच्यासारख्या वास्तवाची जाणीव नसणाऱ्यांना पूर्ण परिस्थिती कळायला मदत होईल. एवढी २ लाख ते १० लाख रोख घरात ठेवतात त्या लोकांनी त्या पैश्यांचे काय केले? त्या लोकांची बँकेत खाती नसतातच का? किंवा पतपेढी व जिल्हा बँका सोडून बाकी कुठे खाती नसतात का? वर कोणीतरी म्हणलंय की तुम्हाला उपाय विचारणं चुकीचं आहे म्हणून तिथल्या लोकांनी काही उपाय शोधलेले तुम्हाला माहित आहेत का? छोटीशी दुरुस्ती - अमॅझॉन गो चा व्हिडीओ हा संक्षी सरांनी एका प्रतिसादात ते जगाबरोबर चालतात असं म्हणल्यामुळे जग सध्या कुठे चाललंय हे दाखवण्यासाठी दिला होता. त्याचा उल्लेख अश्याप्रकारे इथे करणे हे अस्थानी आणि चुकीचे आहे. तो व्हिडीओ मीच टाकला होता आणि त्यात कुठेही असे म्हणालेले नाही की भारतातल्या अगदी अंतर्भागातल्या गावातल्या लोकांनी हे वापरावे.
  • Log in or register to post comments

अवांतर -

याॅर्कर
Fri, 12/09/2016 - 21:44 नवीन
अवांतर - चोर खाए "थाली" मे,जनता को दे "प्याली" मे . . वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नोटांमध्ये बक्कळ रक्कम सापडत आहे,भुरटे बँक मॅनेजर सेटींगला लागले आहेत,ब्लॅकचं व्हाईट करण्याचं काम जोरात चालू आहे. आत्ताच आज तक वर बातम्या बघितल्या, आणि आम्ही लाईनीत थांबायचं? प्रचंड राग येत आहे. कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकार चाचपडत आहे. [काले धन वालो के बुरे दिन कभी नही आते]
  • Log in or register to post comments

भाजपच्या काळात अरेरावी जास्त

आनंदी गोपाळ
Fri, 12/09/2016 - 21:55 नवीन
भाजपच्या काळात अरेरावी जास्त पाहायला मिळाली
हे मूर्ख भाजप्ये, जनतेने आपल्याला काम करायला "निवडून" दिलेले आहे हे समजायलाच तयार नाहीयेत. यांच्या दृष्टीकोणानुसार, यांनी जणू (अर्धी चड्डी घालून लाठ्या फिरवत केलेल्या) मोठ्या युद्धानंतर "हिंदुस्थान" जिंकून घेतलाय, अशा अरेरावी संकल्पनेने हे वागताहेत, हेच खरे! (संदर्भ : मला आवडलेली एक ट्वीट)
  • Log in or register to post comments

जे माजलेले असतील त्यांचा माज

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 12/09/2016 - 23:11 नवीन
जे माजलेले असतील त्यांचा माज उतरवायला जनता समर्थ आहे, काळजी करण्याचं कारण नाही. पण कसं आहे ना एकदा का एक चष्मा लावला कि मग ते "भाजप्ये" बाबत असो की "खांग्रेसी" बाबत असो, खरी परिस्थिती पोहोचू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

जनता म्हणजे मी नाही का?

आनंदी गोपाळ
Sat, 12/10/2016 - 00:09 नवीन
जनता म्हणजे मी नाही का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हो आहातच की आणि म्हणूनच काळजी

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/10/2016 - 09:32 नवीन
हो आहातच की आणि म्हणूनच काळजी करू नका! बरेच लोक "मी पण जनता आहे" आणि "(फक्त) मीच जनता आहे" यातला फरक ओळखत नाहीत म्हणून म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+१

श्रीगुरुजी
Sat, 12/10/2016 - 09:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

नोटाबंदी नंतर मुंबईपासून

मार्मिक गोडसे
Fri, 12/09/2016 - 22:22 नवीन
नोटाबंदी नंतर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले भिवंडी बनले भुतांचे शहर.
  • Log in or register to post comments

२७

बार्नी
Sun, 12/11/2016 - 09:04 नवीन
ज्या देशात केवळ २७ टक्के लोक इंटरनेट वापरतात (http://www.indiaspend.com/cover-story/5-hurdles-to-pms-push-for-cashless-economy-51079) त्या देशातील लोकांनां केवळ , एका महिन्यात कॅशलेस व्हा सांगणे किती हुशारीचे आहे ? आणि ८ तारखेपासून ब्लॅक मनी ओरडणार्यावर एकदम आता , कॅशलेस व्हा म्हणण्याची पाळी आली आहे , खुद्द मोदींच्या भाषणांत आता ब्लॅक मनी कमी आणि कॅशलेस हा शब्द जास्ती वापरल्या जातोय ( दुवा:http://www.indiaspend.com/cover-story/how-modi-changed-and-changed-the-demonetisation-narrative-54391) . कदाचित निर्णय चुकल्यानंतरची ही सारवासारव आहे.
  • Log in or register to post comments

त्यांना करप्शन बद्दल तसे काही

अभिजित - १
Sun, 12/11/2016 - 19:21 नवीन
त्यांना करप्शन बद्दल तसे काही फारसे करायचे नाहीए. त्यांना मुखत्वे टॅक्स बेस वाढवायचं. वडापाव वाले, केळीवाले, फुटकळ विक्रेते , भाजीवाले आणि हो किराणा सामान वाले याना टॅक्स नेट मध्ये आणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बार्नी

मग प्रॉब्लेम काय आहे असे झाले

टवाळ कार्टा
Sun, 12/11/2016 - 23:00 नवीन
मग प्रॉब्लेम काय आहे असे झाले तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

त्यांना करप्शन बद्दल तसे काही

अभिजित - १
Mon, 12/12/2016 - 20:03 नवीन
त्यांना करप्शन बद्दल तसे काही फारसे करायचे नाहीए - हा प्रॉब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांना करप्शन बद्दल तसे काही

अभिजित - १
Mon, 12/12/2016 - 20:03 नवीन
त्यांना करप्शन बद्दल तसे काही फारसे करायचे नाहीए - हा प्रॉब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

असे खरे प्रश्न विचारू नका.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 20:10 नवीन
असे खरे प्रश्न विचारू नका. विनोदी उत्तरे येतात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांना करप्शन बद्दल तसे काही

अभिजित - १
Sun, 12/11/2016 - 19:21 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बार्नी

आमच्या गावतले शेतकरी कांदे

श्री गावसेना प्रमुख
Sun, 12/11/2016 - 09:59 नवीन
आमच्या गावतले शेतकरी कांदे विकुन आलेला चेक बँकेत जमा करुन आराम करु र्‍हायले आणी पिंपळगावचे शेतकरी जे टोपी मधुन लाखो रुपये काढुन आरामदायी गाडी घेउ शकतात ते चिंता करुन र्‍हायले(पिंपळगावच्या शेतकर्याचा काळा पैसा नाही, फक्त त्यांचे उदाहरण दिले बाकीच्यांनी म्हणुन मी उल्लेख केला).फरक लक्षात येण्याजोगा आहे फक्त काळा पैसा धारकाची निंद उडालेली आहे आणी ज्याच्या कडे स्वःकष्टाचा आहे त्याला त्रास होतोय पण रात्री मस्त झोपतोय.http://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/crops-worth-rs-2500-crore-brought-through-e-kharid-in-haryana/articleshow/55897037.cms
  • Log in or register to post comments

सेनाप्रमुखजी, पार्टी बदल ?

पगला गजोधर
Sun, 12/11/2016 - 11:01 नवीन
सेनाप्रमुखजी, पार्टी बदल ? वाघ सोडून सिंहा बरोबर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

तसे काही नाही जे योग्य वाटले

श्री गावसेना प्रमुख
Mon, 12/12/2016 - 18:34 नवीन
तसे काही नाही जे योग्य वाटले त्याला पाठींबा द्यावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

+१,००,००० लाखाची गोष्ट !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 20:13 नवीन
+१,००,००० लाखाची गोष्ट ! सद्या वातावरण इतके गढूळ आहे (खरे तर मुद्दाम गढूळ केले गेले आहे), की असे काही असते यावर भल्या भल्या लोकांचा विश्वास बसत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

माझे वडील २०११ ते १३ ह्या

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 12/11/2016 - 19:57 नवीन
माझे वडील २०११ ते १३ ह्या दरम्यान चिचगड (जिल्हा गोंदिया) ह्या नक्षलग्रस्त भागात असलेल्या गावात बँकेत अधिकारी होते. त्या काळात, तेव्हा ५ वर्षे आधी व्यापारी अन शेतकरीदेखील आरटीजीएस किंवा एनईएफटी वापरण्यात अधिक प्राधान्य देत होते. मग इकडले का रोखीने व्यवहार करतात, ते कळले नाही. असो, पुण्यात बसुन, आयटीमध्ये काम करणार्‍याने (म्हणजे मी ;) ), शेतकी विषयावर मत प्रदर्शीत करणे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments

शेतिवर मतप्रदर्शन करायला

संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 20:30 नवीन
शेतिवर मतप्रदर्शन करायला कुनाला बन्दी नसावी, फक्त अंदाजपंचे दाहोदसे आणि पूर्वग्रहदूषित मत नसावे. भारतासारख्या ७० टक्के शेतीप्रधान देशात शेती किंवा शेतकर्‍याशी अजिबात संबंध न आलेले फारच कमी लोक असतील. आपल्या वडीलांच्या अनुभवाबद्दल अधिक वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

>>> फक्त अंदाजपंचे दाहोदसे

मोदक
Mon, 12/12/2016 - 07:46 नवीन
>>> फक्त अंदाजपंचे दाहोदसे आणि पूर्वग्रहदूषित मत नसावे. हसून हसून पुरेवाट झाली आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझी एक मामी ओझरच्या बँकेत

नितिन थत्ते
Sun, 12/11/2016 - 20:35 नवीन
माझी एक मामी ओझरच्या बँकेत आहे. ती सांगते की शेतकरी लाखो रुपये एनईएफटी करतात पण ते स्वतः करत नाहीत. कॅश घेऊन बँकेत येतात आणि बँकेकरवी एनईएफटीने पैसे पाठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

शेतकरी लाखो रुपये एनईएफटी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 13:01 नवीन
शेतकरी लाखो रुपये एनईएफटी करतात पण ते स्वतः करत नाहीत. कॅश घेऊन बँकेत येतात आणि बँकेकरवी एनईएफटीने पैसे पाठवतात. असे आहे तर मग शेतकर्‍याला बँकेचे व्यवहार जमत नहीत्/ज्मणार नाहीत असा गदारोळ चालला आहे तो का ? केवळ हितसंबधी राजकारणासाठी काय ? दुसर्‍या बाजूला, "शेतकरी केवळ/मुख्यतः नकद व्यवहार करतात म्हणून त्यांना बँकिंग व्यवहार करण्यास सांगणे अन्यायकारक आहे" असा गदारोळ करणारी मंडळी आहेत. जर असे असले तर त्यांच्याकडे बँकेत न टाकलेली नकद असायला हवी. मग (अ) शेतकर्‍यांच्या जवळपास बँका नाहीत आणि (आ) बँकेतून/एटीएममधून शेतकर्‍यांना पैसे मिळत नसल्याने त्यांची अडचण होतेय या दोन्ही दाव्यांना काय अर्थ राहीला ? केवळ गदारोळ करण्याच्य भरात त्या मंदळींना एकाच दमात विरुद्ध अर्थाची विधाने करतोय हे ध्यानात येत नाही का? मात्र, ते इतरांच्या ध्यानात येत आहे हे निश्चित ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शेतकरी केवळ/मुख्यतः नकद

मार्मिक गोडसे
Mon, 12/12/2016 - 13:14 नवीन
शेतकरी केवळ/मुख्यतः नकद व्यवहार करतात म्हणून त्यांना बँकिंग व्यवहार करण्यास सांगणे अन्यायकारक आहे" असा गदारोळ करणारी मंडळी आहेत.
असे म्हणणरे मुर्ख आहेत.
(अ) शेतकर्‍यांच्या जवळपास बँका नाहीत आणि (आ) बँकेतून/एटीएममधून शेतकर्‍यांना पैसे मिळत नसल्याने त्यांची अडचण होतेय या दोन्ही दाव्यांना काय अर्थ राहीला ?
ही वस्तुस्थीती आहे. प्रथम ही अडचण दूर करा व नंतर कॅशलेस व्यवहार अंमलात आणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

प्रथम ही अडचण दूर करा व नंतर

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 12/12/2016 - 13:27 नवीन
प्रथम ही अडचण दूर करा व नंतर कॅशलेस व्यवहार अंमलात आणा.
दोन्ही एकत्र करण्यास काय हरकत आहे? कॅशलेस म्हणजे सगळीकडे कॅश शिवाय चालेल (कॅश तर चालेलच) हे आता अंमलात आणण्यात काय अडचण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

शेतकरी लाखो रुपये एनईएफटी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 13:31 नवीन
शेतकरी लाखो रुपये एनईएफटी करतात पण ते स्वतः करत नाहीत. कॅश घेऊन बँकेत येतात आणि बँकेकरवी एनईएफटीने पैसे पाठवतात. त्याच प्रतिसादात उद्धृत केलेले हे वाक्य चष्याच्या रंगामुळे दिसलेले दिसत नाही ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

डांगेसाहेब

अमर विश्वास
Sun, 12/11/2016 - 22:16 नवीन
डांगेसाहेब शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का? आपलया या प्रश्नाचे उत्तर आत्ता या क्षणाला "नाही" हेच आहे . आपल्या या लेखात आपण पुरवठ्याचा (सप्लाय) विचार केला . पण शेती उद्योगाचा विचार करताना पूर्ण value chain चा विचार केला पाहिजे. आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्या संस्था व अडते या जमातीशी परिचित असलाच. शेतकरी जेंव्हा बियाणे, कीटक नाशके इत्यादी खरेदी करतो तेंव्हा हा पैसा मुख्यत्वे त्याला शेतमाल विकून किंवा पीककर्ज या रूपात लिळालेला असतो. आता हा पैसा जर त्याच्या बँकेत जमा होऊ लागला तर ? पीककर्ज मिळताना होणारी फसवणुक / अडवणुक काई होईल अडते / कृषी समितीच्या मनमानीस आळा बसेल आणि हा पैसे खर्च करताना ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळेल हे आज लगेच शक्य नाही पण योग्य प्रयत्न लेले तर दोन वर्षात हे साध्य होईल ...
  • Log in or register to post comments

मी पूर्ण value chain चाच

संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 22:39 नवीन
मी पूर्ण value chain चाच विचार केला आहे, शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोचणारी व शेतकाऱ्यांपासून सुरु होणारी दोन्ही सप्लाय चेन चा उल्लेख लेखात आहे. तुम्ही म्हणताय तशी व्यवस्था आणण्याचे प्रयत्न गेले अनेक वर्षे हळूहळू सुरु आहेतच, पिकांचे पैसे थेट खात्यात जमा होणे अनेक वर्षे सुरु आहेच, बँकेद्वारे व्यवहार झालेत तर अडते कृषिसमिती व्यापारी अडवणूक करू शकणार नाहीत हा गैरसमज ठरेल. मोड ऑफ transaction हे अडवणूक व फसवणुकीचे मूळ नाही, शेती हा धंदाच बेभरवशाचा आहे, अडवणूक फसवणुकीचे मूळ धंद्यात आहे. बँक व्यवहार आल्याने सबसिडी, कर्जवाटप, नुकसान भरपाई, सरकारी पैसे याच्या वाटपात होणारा सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार कमी झालाय, याचा अर्थ बँक व्यवहाराने बाजारावर परिणाम होईल असे नाही. विसंगत उद्दिष्ट बँकव्यवहाराना जोडले जाऊ नये असे वाटते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बँक व्यवहार करावे असे आपल्याला साधारणपणे वाटते पण पतपेढ्या, जिल्हा बँक, सोसायट्या ह्याही बँक व्यवहाराचेच रुप आहेत, आज आत्ता हातात रोख नाही, व्यापारी 500 1000 च्या नोटा हाती ठेवण्याचा प्रयत्न करतात, नव्या नोटा हव्या असतील तर भाव पाडून मागतात, ही परिस्थिती लगेच ताबडतोब बदलणार नाही, वेळ घेईल. पण नुकसान तर आज होतंच आहे. शेतीबाजारातले व्यवहार आणि सामान्य मध्यमवर्गीयांचे रोजचे व्यवहार यात फरक असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

डांगे साहेब

अमर विश्वास
Sun, 12/11/2016 - 23:10 नवीन
डांगे साहेब बँकेच्या मार्फत व्यवहार सुरु झाले कि सगळे प्रश्न सुटतील असे माझे अजिबात म्हणणे नाही काही वर्षांपूर्वी research consultant म्हणुन काम करताना अनेक सर्वेक्षणे केली आहेत तसेच अनेक सरकारी योजनांचे मूल्यमापन केले आहे त्यामुळे यासर्व व्यवहारांची पूर्ण माहिती व जाणीव आहे . शेतकऱ्यांची आर्थिक निरक्षरता हे एक प्रमुख कारण आहे आणि बँकिंग / ऑनलाईन व्यवहार हे आर्थिक साक्षरता व आर्थिक समावेशकता या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल आहे आणि त्यादृष्टीने पुढे जाणे आवश्यक आहे
  • Log in or register to post comments

शेतकऱ्यांची आर्थिक निरक्षरता

संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 23:16 नवीन
शेतकऱ्यांची आर्थिक निरक्षरता हे एक प्रमुख कारण आहे आणि बँकिंग / ऑनलाईन व्यवहार हे आर्थिक साक्षरता व आर्थिक समावेशकता या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल आहे ^^^ ह्याबद्दल विस्तारित विश्लेषण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

अडते-दलालांना कर नसतो का?

पैसा
Mon, 12/12/2016 - 09:31 नवीन
शेतकर्‍यांचे सर्व व्यवहार रोखीने होतात असे समजू. मागणी-पुरवठा साखळ्या संपूर्ण रोखीचे व्यवहार करतात असे इथे समजते आहे. आजचे शेतकरी इतके अडाणी/निरक्षर असतात का? त्यांच्या घरात कोणी बायकामुले सुद्धा शिकलेली/साक्षर नसतात का? मग विमा किंवा इतर योजनांमधे बँकाना आणि सरकारला फसवणारे कोण असतात? शेतकर्‍यांना टॅक्स नसतो हे बहुशः योग्य आहे असे गृहीतक धरले समजा. ते ११४ कोटीचे शेती उत्पन्न वगैरे सध्या बाजूला ठेवू. मग शेतीमालाचे केवळ विपणन करणार्‍या अडते-दलालांनाही कर नसतो का? नसेल तर शेतीचे जे उत्पन्न (जीडीपी च्या सुमारे २०%) कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे, त्यात हे अडते आणि दलालांचेसुद्धा अंतर्भूत आहे का? की कर भरणारी एक व्यवस्था आणि कर न भरणारी केवळ रोखीचे व्यवहार करणारी दुसरी समांतर व्यवस्था अशा दोन अर्थव्यवस्था अस्तित्त्वात आहेत? समांतर व्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न व्हावेत का नकोत? जे उत्पन्न किती आहे हेच माहीत नाही त्याचा एकूण अर्थव्यवस्था आणि चलनफुगवटा यावर होणारा परिणाम काय असू शकेल? प्रश्न अगदीच प्राथमिक दर्जाचे वाटू शकतील. तरी "अक्षरास हसू नये." कोणी उत्तरे देइल काय?
  • Log in or register to post comments

पैसा ताईशेतीचे जे उत्पन्न

सुबोध खरे
Mon, 12/12/2016 - 10:22 नवीन
पैसा ताई शेतीचे जे उत्पन्न (जीडीपी च्या सुमारे २०%) कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे, त्यात हे अडते आणि दलालांचेसुद्धा अंतर्भूत आहे का? की कर भरणारी एक व्यवस्था आणि कर न भरणारी केवळ रोखीचे व्यवहार करणारी दुसरी समांतर व्यवस्था अशा दोन अर्थव्यवस्था अस्तित्त्वात आहेत? समांतर व्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न व्हावेत का नकोत? जे उत्पन्न किती आहे हेच माहीत नाही त्याचा एकूण अर्थव्यवस्था आणि चलनफुगवटा यावर होणारा परिणाम काय असू शकेल? तुमचे प्रश्न प्राथमिक दर्जाचे नसून पी एच डी पातळीचे आहेत आणि बऱ्याच अर्थ तज्ज्ञांना पण याची सविस्तर उत्तरे देता येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

थोडा गैरसमज होतोय, मागणी

संदीप डांगे
Mon, 12/12/2016 - 11:39 नवीन
थोडा गैरसमज होतोय, मागणी पुरवठा साखळ्या मध्ये रोखीत होणारा व्यवहार आणि पीकविमा कर्ज प्रकरण हे एकाच तराजूत धरू नये. लोक निरक्षर आहेत म्हणून रोखीत व्यवहार होतात हा मोठ्ठा गैरसमज. रोखीने झालेले व्यवहार सोयीचे, जलद व flexible असतात, चेक, कार्ड ऑनलाईन चे व्यवहार त्यापेक्षाही सोयीचे झाले तर प्रश्न येणार नाही. लोक कर चुकवन्यसाठीच रोखीत व्यवहार करतात असे समजणे जरा जास्तच होईल. रोखीने व्यवहार होतो म्हणजे हिशोब ठेवला जात नाही, कर भरला जात नाही असे समजणे चुकीचे. अडते, दलाल, व्यापारी आयटी रिटर्न, योग्य ते कर भरतात, शेतीउत्पन्न करमुक्त आहे ते फक्त शेतकऱ्याला, दलाल अडते व्यापाऱ्यांना नाही. शेतकऱ्यांकडून आलेली रोख व त्यांना दिली जाणारी रोख बँकेतूनच येते जाते, समांतर व्यवस्था कशाला म्हणावं हा एक प्रश्न आहेच. करचुकवेगिरी हि समांतर व्यवस्था असेल तर त्यातून कोणीही सुटत नाही, अगदी टॅक्सपेयर असल्याच्या गमजा मारणारे नोकरदारही, शेतकऱ्यांवरच नेहमी खार खाल्ला जातो तो का हे समजत नाही. शेतकरी कर चुकवतो, रोखीत व्यवहार करतो म्हणून फार मोठा गुन्हेगार आहे असे चित्र उभे केले जात आहे ते योग्य नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुमचा गैरसमज झालाय

पैसा
Mon, 12/12/2016 - 11:52 नवीन
मी शेतकर्‍यांबद्दल बोलत नाहीये. त्यांचे उत्पन्न सोडून देऊ असेच म्हटले आहे.
मागणी पुरवठा साखळ्या मध्ये रोखीत होणारा व्यवहार आणि पीकविमा कर्ज प्रकरण हे एकाच तराजूत धरू नये.
धरत नाहीच. पण या योजनांचा बहुतेकवेळा गैरफायदा घेतला जातो हे तर खरे आहे ना? या योजना जर माहित असतील तर जगात इतरत्र काय सुधारणा काम चालले आहे हेसुद्धा लोकांना माहित असावे.
अडते, दलाल, व्यापारी आयटी रिटर्न, योग्य ते कर भरतात,
याचीच माहिती पाहिजे आहे. १००% अडते दलाल प्रामाणिक आहेत तर शेतकर्‍यांची पिळवणूक नेमके कोण करतात? मध्यस्थांकडून होणारे आर्थिक व्यवहार १००% सरकारकडे नोंदले जातात का?
शेतकऱ्यांवरच नेहमी खार खाल्ला जातो तो का हे समजत नाही. शेतकरी कर चुकवतो, रोखीत व्यवहार करतो म्हणून फार मोठा गुन्हेगार आहे असे चित्र उभे केले जात आहे ते योग्य नाही असे वाटते.
माझ्या लिहिण्यात असे कुठेही नाही. मी न लिहिलेले अर्थ प्लीजच चिकटवू नका. दुअरे म्हणजे मी स्पष्टच लिहिले आहे.
की या माझ्या प्राथमिक शंका आहेत. आरोप नव्हे.
शेतकर्‍यांना पर्याय नसेल. पण मध्यस्थ सगळे व्यवहार रोखीने का करतात? त्यांनी जर शेतकर्‍यांना सक्तीने पेमेंट बँकेतूनच होईल असे सांगितले असते तर शेतकरी का स्वीकारणार नाहीत? साधारण शिकलेल्या माणासाला लाखो रुपये नकद सोबत ठेवण्यापेक्षा ऑनलाईन, चेक, कार्ड वापरणे सोयीचे हे नक्कीच समजत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा