✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता

प
पिशी अबोली यांनी
Fri, 12/02/2016 - 15:52  ·  लेख
लेख
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं. ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता, त्या काळात प्रचंड बदनामी पत्करून आपल्या नवऱ्याने प्रियकरावर चालवलेल्या खटल्यात संपूर्ण निकाल फिरवून दाखवून त्या बदनामीसहित ताठ मानेने जगणारी ही व्यक्ती खरंच होऊन गेली यावर विश्वासच बसत नाही. पण विचार केला, तर स्त्री आणि स्त्रीचा पायदळी तुडवला गेलेला सन्मान यांचे अविश्वसनीय संदर्भ द्यायला आपल्या जनमानसात रुजलेल्या कथा तरी कुठे कमी आहेत? कुंती, द्रौपदी, आणि सीता या आपल्या अग्निशिखांचे नशीब घेऊन त्याचा वणवा करणाऱ्या या मनस्विनीबद्दल लिहिणे म्हणूनच क्रमप्राप्तच होते. लेडी सीमोर फ्लेमिंग या प्रचंड श्रीमंत सौंदर्यवतीने तिच्या प्रतिष्ठेला साजेशा रिचर्ड वोर्सलीशी लग्न केले आणि तिचं माणूस असणं संपलं. ती आता नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असलेली एक वस्तू होती. आणि तिच्या नवऱ्याच्या इच्छांसाठी तिने जे केलं, ते आजच्या काळातपण अंगावर शहारे आणेल. रिचर्ड हा ‘voyeur’ होता. तिला अन्य पुरुषांशी प्रणय करताना दाराच्या छिद्रातून बघणे ही त्याची अपेक्षा होती. आणि त्याने तिला यासाठी अक्षरश: वापरले. नवऱ्याचा आदेश पाळणे हे तिचे कर्तव्य समजले जात असल्याने तिने ही गोष्ट सहन केली. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली. या कुंतीची द्रौपदी झाली, ती रिचर्डचा जिवलग मित्र, कॅप्टन बिसेट आल्यावर. आतापर्यंत ती कोणत्याही मित्राला वापरू देण्याची वस्तू होती. पण बिसेटच्या ती खरीखुरी प्रेमात पडली होती. त्यांच्या बहरलेल्या प्रणयाने रिचर्डला अजून विकृत आनंद मिळत असल्याने त्याची ना असायला हरकतच नव्हती. आता ती दोन जिवलग मित्रांची ‘पतिव्रता’ झाली. एक लग्नात तिला जिंकून घेणारा ‘मालक’ आणि दुसरा, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता. हे लोढणं गळ्यात घेण्याचं बिसेटने कुठच्या नशेच्या क्षणी ठरवलं काय माहीत, पण त्या दोघांनी पळून जाण्याचं धाडस केलं. कदाचित सीमोरला वाटलं असेल की रिचर्डची या सगळ्यालाच संमती असल्याने तो तिला सहज घटस्फोट देईल. पण इतक्या पुरुषांना ओळखूनही तिला पुरुषी अहंकार काय चीज असते त्याची ओळख व्हायची होती. ते दोघं पळून गेले आहेत हे कळल्यावर रिचर्डने थयथयाट केला. सीमोर आणि बिसेट यांच्या प्रेमाला तो मान्यता देत होता तो त्याच्या आनंदासाठी, तिच्या नव्हे हे ते दोघंही विसरून गेले होते. रिचर्ड हे राजकारणातील बडं धेंड होतं. त्याची नाचक्की त्याला कदापि सहन झाली नसती. त्याने बिसेटवर कोर्टात केस टाकली, आणि त्याच्या मालकीची बायको पळवल्याबद्दल त्याच्यावर तब्बल २०००० पाऊंडचा दावा ठोकला. आता बिसेट हबकला. हे असं काही त्याला अपेक्षितच नव्हतं. एवढी मोठी नुकसानभरपाई देऊन तो रस्त्यावर आला असता. लग्नबाह्य संबंधाबद्दलचे कायदे बघता तो सरळ सरळ दोषी होता. आणि इथे उभी राहिली ती अग्निदिव्याची तयारी असणारी सीमोरमधली सीता. तिला कोर्टात जाऊन साक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून तिने तिला ज्यांच्यासोबत शय्यासोबत करायला रिचर्डने भाग पाडलं होतं त्या लोकांना कोर्टात उभं केलं. बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. इतका रसभरीत विषय मिळाल्यावर त्याचं चर्वितचर्वण होणारच. या केसची अनेक वर्णनं, त्यावरची व्यंगचित्रं अतिशय प्रसिद्ध झाली. सीमोरच्या आयुष्यात एकूण २७ पुरुष होते अशी वर्णनं इंग्लंडमधे प्रसिद्ध झाली. इतका वणवा पेटवलेल्या सीमोरने शेवटी निर्णय फिरवला. गुन्ह्यात जर आरोपीला दावेदाराची साथ असेल, तर गुन्ह्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे केसचा निर्णय लागला तेव्हा कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून बिसेटने रिचर्डला १ शिलिंग एवढी रक्कम द्यावी असा निर्णय दिला. जिला जवळपास वेश्येसारखं वागवलं गेलं, तिने स्वतःचा उलटा लिलाव करून स्वतःची किंमत २०००० पाऊंडवरून १ शिलिंग करवून घेतली. प्रचंड नाचक्की सहन केली सीमोरने, तिच्या प्रियकरासाठी, एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी. पण जगात धोब्याच्या शब्दावरूनपण स्त्रीला टाकता येतं, इथे तर सगळ्या जगासमोर तिने चारित्र्याच्या कल्पनांचे बुरखे टराटरा फाडले होते. त्या बिसेटने तिला काही काळातच सोडून दिलं. त्यानंतर तिने वाईट परिस्थितीत दिवस काढले. अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली. सीमोरने आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन केला. पण तिच्या लग्नाच्या भयाण वास्तवातून बाहेर पडल्यावर तिने जगाला काही किंमतच दिली नाही असं दिसतं. हुंड्याची रक्कम मिळाल्यावर रॉयल लायसन्सने तिने आपलं लग्नापूर्वीचं आडनाव परत मिळवलं आणि स्वतःपेक्षा दोन दशकांनी लहान असणाऱ्या एका संगीतकाराशी लग्न केलं. तिच्या या नवऱ्याने लग्नानंतर तिचं आडनाव घेतलं होतं.. सीमोरची कथा हादरवून टाकते. ही घटना घडून दीड शतकपण लोटलं नाहीये, हे अजून हादरवून टाकतं. जे रामायण-महाभारतातले संदर्भ माझ्या भारतीय मनात पक्कं मूळ धरून होते, त्यांना गदागदा हलवते सीमोर. कुंती काय, द्रौपदी काय, सीता काय, समाजाने ठरवून दिलेल्या नियमांसाठी आपला आत्मसन्मान गिळाव्या लागलेल्या स्त्रिया. त्यांच्या, आणि असमानतेच्या इतिहासातील अनेक व्यथांना चव्हाट्यावर आणणारी सीमोर कधीच विसरली जाणार नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास

प्रतिक्रिया द्या
17632 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

__/\__

प्रीत-मोहर
Fri, 12/02/2016 - 16:24 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

+१११ असंच म्हणते __/\__

सानझरी
Fri, 12/02/2016 - 17:22 नवीन
+१११ असंच म्हणते __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मला वाटतं बीबीसीने यावर एक

विशाल कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 16:34 नवीन
मला वाटतं बीबीसीने यावर एक फिचर केलं होतं. एक टिव्ही प्ले (नाटक) होता तो बहुदा The Scandalous Lady W या नावाने केलेला.
  • Log in or register to post comments

तिने लिहिलय ते वर दादुस. ते

प्रीत-मोहर
Fri, 12/02/2016 - 16:35 नवीन
तिने लिहिलय ते वर दादुस. ते फिचर बघुनच लिहिलय पिशीने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

ओह सॉरी, मी जस्ट चाळला होता

विशाल कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 17:20 नवीन
ओह सॉरी, मी जस्ट चाळला होता लेख. त्यामुळे पाहीले नव्हते. धन्यवाद प्रिमो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

:(

पैसा
Fri, 12/02/2016 - 16:48 नवीन
काय भयानक प्रकार आहे! बरे त्या बिसेटनेही सहीसलामत सुटल्यावर तिला सोडून दिले. महाभारतातील माधवीची कथा आठवली.
  • Log in or register to post comments

एकूण स्त्रीला 'माणूस' म्हणून

एस
Fri, 12/02/2016 - 17:07 नवीन
एकूण स्त्रीला 'माणूस' म्हणून जगू देण्यास जगात सगळीकडेच मज्जाव होता/आहे!
  • Log in or register to post comments

वाइट वाटलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/02/2016 - 17:35 नवीन
लेडी सीमोर बद्दल तुम्ही लिहिलं नसतं तर कदाचित वाचनात आलंही नसतं. धन्स. बीसलेटनेही सोडुन द्यावं, हे वाचून त्रासच झाला. छ्या.!! तिच्या शारिरिक वेदनेइतकीच, मानसिक जी ससेहोलपट सोसली ते भयंकरच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

__/\__

स्मिता चौगुले
Fri, 12/02/2016 - 17:38 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

"माय वाइफ मस्ट बी अबोव्ह सस्पीशन"

मारवा
Fri, 12/02/2016 - 17:38 नवीन
सीझर चा डायलॉग आठवला. लेख विचार करण्यासारखा आहे. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली. कुंतीची तुलना जरा जमली नाही. प्रथमदर्शनी सीमोर आणि कुंती त दोघांच्या परीस्थीतीत व्यक्तीमत्वात फरक दिसतो. कुंतीने मर्जीविरुद्ध केले म्हणावे तर तसे वाटत नाही. कर्णाची कथा तपासुन बघायला लागेल नीट...
  • Log in or register to post comments

कर्णाची कथा तपासुन बघायला लागेल नीट...

तुषार काळभोर
Sat, 12/03/2016 - 02:26 नवीन
नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली.
कर्ण लग्नाआधीचा होता, पतीच्या इच्छेने झालेला नव्हे. कुंतीची लग्नानंतरची तीन मुले, युधिष्ठिर, अर्जुन व भीम, पतीच्या इच्छेने देवांपासून झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

छान लिहिलय.

सस्नेह
Fri, 12/02/2016 - 17:50 नवीन
छान लिहिलय. सीमोरच्या धैर्याबद्दल कौतुक आहे आणि दुर्दैवाबद्दल खेद ! तरीही, सीता, द्रौपदी आणि कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही. या तिघी पुरुषी वर्चस्वाच्या नव्हे तर सामाजिक रूढींच्या बळी होत. तसेच त्यांच्या पतींनी स्वत:च्या विकृत हव्यासाकरिता त्यांना तशी वागणूक दिलेली नव्हती, तर प्रचलित धर्माला अनुसरूनच ते वागले होते. आणि हे समजूनच या तिघींनी पतींकरिता समर्पित झाल्या. सीमोरची मानसिक स्थिती व भावना सीता इं.शी मिळत्या जुळत्या असल्या तरी जीवनमूल्यांत प्रचंड फरक आहे.
  • Log in or register to post comments

अरे देवा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/02/2016 - 17:57 नवीन
सीमोरची कथा हादरवून सोडते ना ? बाकी, पुरुषी वर्चस्व हे सामाजिक रुढीतुनच आलं आहे, असा माझा समज आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सीता, द्रौपदी आणि कुंती

प्रसाद गोडबोले
Fri, 12/02/2016 - 19:46 नवीन
सीता, द्रौपदी आणि कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही.
+१ मुळकथा हदरवुन टाकणारी आहे पण सीता द्रौपदी आणि कुंतीशी केलेली तुलना अस्थानी आहे. मुख्य म्हणजे ही सीतेविषयीची ही धोब्याची घटना रामायणातील कोणत्या कांडात आहे , तो भाग प्रक्षिप्त असण्याची किती शक्यता आहे ? कुंतीचा निर्णय तिने स्वतः घेतलेला आहे आणि नियोग ही त्याकाळी समाजमान्य आणि न्याय अशी प्रथा होती. राहता राहिला प्रश्न द्रौपदीचा . पण त्यावरही प्रचंड काथ्याकुट मिपावर नव्हे तर खुद्द महाभारतात झालेला आहे व्यवस्थित डॉक्युमेन्ट केला आहे. द्रौपदीविषयीचा निर्णय हा न्य्याय्य, धर्मसंमतच आहे ( तसा तो नसता तर युधिष्ठीराने मान्यच केला नसता. महाभारतात सगळेच ग्रे शेडस मध्ये आहेत पण एक युधिष्ठीर आणि दुसरा विदुर हे दोनच पुर्ण व्हाईट शेड्स #ffffff आहेत किमान त्यांच्यावर अविश्वास दाखवु नये) अर्थात तुम्हाला उपमाच हवी असेल तर स्वतःची राज्ये वाचवण्यासाठी राजपुतांनी मुघलांच्या जनानखान्यात पाठवल्या स्त्रियांची कित्येक उदाहरणे देता येतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+१ तुलना पटली नाही.

जव्हेरगंज
Fri, 12/02/2016 - 20:48 नवीन
+१ तुलना पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कुठून कुठून शोधतेस ग पिशे !!!

मितान
Fri, 12/02/2016 - 17:54 नवीन
कुठून कुठून शोधतेस ग पिशे !!! किती भयंकर जगावं लागलं लेडी सीमोर ला ! वाचताना काटा आला !!
  • Log in or register to post comments

प्रचंड त्रास झाला हे वाचताना.

यशोधरा
Fri, 12/02/2016 - 17:57 नवीन
प्रचंड त्रास झाला हे वाचताना.
  • Log in or register to post comments

हे वाचून त्रास झाला.

रेवती
Fri, 12/02/2016 - 18:33 नवीन
हे वाचून त्रास झाला.
  • Log in or register to post comments

भयंकर आहे हे.यातनामय आयुष्य.

इशा१२३
Fri, 12/02/2016 - 18:40 नवीन
भयंकर आहे हे.यातनामय आयुष्य.
  • Log in or register to post comments

सत्य हे कल्पितांहून भयाण :(

पगला गजोधर
Fri, 12/02/2016 - 18:46 नवीन
सत्य हे कल्पितांहून भयाण :(
  • Log in or register to post comments

भयानक!

प्राची अश्विनी
Fri, 12/02/2016 - 18:50 नवीन
भयानक!
  • Log in or register to post comments

स्वतःचा अपमान!

प्रियाजी
Fri, 12/02/2016 - 18:59 नवीन
माझ्या मते कुन्ती व इतरांना स्वतःचा अपमान होत आहे हे त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे जाणवले तरी नसावे अथवा त्यांचे मत रामायण/ महाभारत लिहिणार्यांनी लक्षात घेतले नसावे. सिमोर तुलना करता कलीयुगात वाढलेली असल्याने तिने बंड केले. मुख्य म्हणजे वाचून त्रास तर झालाच पण अशी अजून एक बंड्खोर स्त्री १०० वर्षांपूर्वी होउन गेल्याने तिचा अभिमान ही वाटला. स्त्री वा पुरूष कोणीही असो अन्यायाचा प्रतिकार हा नेहमी केलाच पाहिजे. विष्रयांतर असेल तरी आज उच्च जातीचे लोक अजूनही आम्हाला कमी दर्जाचे समज्तात अशी ओरड करणारे लोक त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रियांना स्वतःच्या बरोबरीची वागणूक देतात का?
  • Log in or register to post comments

सिमोरच आयुष्य खरच खूप यातनामय

ज्योति अळवणी
Fri, 12/02/2016 - 19:02 नवीन
सिमोरच आयुष्य खरच खूप यातनामय होत. केवळ एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी अगोदर तिला तिच्या अस्तित्वाची आहुती द्यावी लागली आणि तरीही मनातलं सामान्य आयुष्य ती कधी जगू शकली नाही हे वाचून खुप त्रास झाला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

राही
Fri, 12/02/2016 - 19:43 नवीन
छानच आहे लेख. एका निराळ्या बंडखोरी संदर्भात डॉ.रखमाबाई यांचे नाव आठवले. दहाव्या वर्षी त्यांच्या संमतीविना झालेले लग्न (१८७४) त्यांनी धुडकावले. नवर्‍याने रिस्टोअरेशन ऑव्ह कॉन्जुगल राइट्स् साठी केलेली फिर्याद त्या हायकोर्टात हरल्या, पण प्रचंड लोकनिंदा सोसूनही त्यांनी नवर्‍याबरोबर राहायला नकार दिला. वीस एकविसाव्या वर्षी स्कॉट्लंड येथून डॉक्टर होऊन त्या भारतात आल्या. त्यांना वाळीत टाकलेले असूनही नवर्‍याचे नाव न लावता स्वतंत्रपणे आपले यशस्वी आणि प्रदीर्घ आयुष्य जगल्या. माफ करा, थोडे अवांतर झाले. लेख आवडला हे पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments

किती अमानुष आहे हे. बाई ची

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 19:46 नवीन
किती अमानुष आहे हे. बाई ची शक्तीच तिला उभे रहायला शिकवते.सिमोरची अवस्था विचाराच्या पलिकडे आहे.किती सोसलं असेल तिने. वाचून काटा आला अंगावर.
  • Log in or register to post comments

बापरे... सत्य कल्पनेपेक्षा

पिलीयन रायडर
Fri, 12/02/2016 - 20:25 नवीन
बापरे... सत्य कल्पनेपेक्षा जास्त विलक्षण असतं.. त्या काळात, हे असं सगळं सहन करणं किती भयानक अवघड असेल. त्यात ते संपुर्ण जगासमोर मांडणं तर... आणि एवढं सगळं करुन तिच्या प्रियकराने तिला सोडुन दिलं??????? जितका विचार करु तितका त्रास होतोच आहे.. काय लिहीतेस पिशे तू.... कमाल!
  • Log in or register to post comments

:( खूप सुन्न आहे मी पण अजून.

पिशी अबोली
Fri, 12/02/2016 - 22:03 नवीन
:( खूप सुन्न आहे मी पण अजून.
  • Log in or register to post comments

सुन्न झालेय वाचून.

पद्मावति
Fri, 12/02/2016 - 23:07 नवीन
सुन्न झालेय वाचून. अप्रतिम लिहिलं आहेस पिशी.
  • Log in or register to post comments

?

संजय क्षीरसागर
Fri, 12/02/2016 - 23:14 नवीन
बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. पण तीनं पहिले छूटच रिचर्डला नकार दिला असता तर ही पाळीच आली नसती.
  • Log in or register to post comments

+1

प्रसाद गोडबोले
Sat, 12/03/2016 - 01:02 नवीन
येस, माझ्याही डोक्यात हाच विचार आला होता . बाकी वेळेचे माहीत नाही पण पहिल्या वेळेस मॅडम च्या दृष्टिकोणाविषयी , हेतुविषयी शंका घेण्यास वाव आहे , आहेच । कदाचित पहिली वेळ मॅडम ने एन्जॉयच केली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लॉजिक समजले नाही. दर रेप

पिलीयन रायडर
Sat, 12/03/2016 - 02:08 नवीन
लॉजिक समजले नाही. दर रेप मध्ये होतो तसा एक आरोप इथेही होऊ शकतो की स्त्री ने ते एन्जॉय केलं. पण एन्जॉय केलं म्हणुन रेप जस्टिफाईड असतो का? (तुम्हाला तसं म्हणायचंय असम मी म्हणत नाही. पण हा मुद्दाच कसा इथे येऊ शकतो?) बरं समजा नैतिक मुल्य वगैरे बाजुला ठेवु. लॉजिकली सुद्धा, पहिल्यावेळचय हेतु विषयी तरी शंका कशाच्या आधारावर नक्की घेतली जाऊ शकते? मला वाटतं की तिने नकार द्यायला हवा होता हा मुद्दाच तकलादु आहे कारण ती आजच्या काळात घडलेली घटना नाही. जिथे स्त्रीयांना मुलभुत हक्कच नव्हते तिथे तिच्या नकाराला कुणी गणलं असतं का? आणि मी काही ती फिल्म पाहिलेली नाही, पण तिच्यावर हे जबरदस्तीने लादलं गेलं असण्याचीच शक्यता दाट आहे. कोण बायको आनंदाने हे करायला तयार होईल? आणि ज्या मन्युष्याला ह्या अशा फॅण्टीसीज आहेत, तो काही बायकोशी चर्चा करुन, तिची परवानगी घेऊन ह्या गोष्टी करुन घेत असेल असं वाटत नाही. आयडीयली तिने स्वतःसाठी ठाम उभं रहायला हवं होतं वगैरे बरोबर आहे. पण अनेकदा (मला तर वाटतं बहुतांश वेळा) बायका सोशल कंडीशनिंगमुळे "आपण ह्याला विरोध करु शकतच नाही" पासुन ते "आपण विरोध केलाच नाही पाहिजे" सारख्या अनेक विचित्र मनस्थितींमध्ये अडकलेल्या असतात. मारझोड करणारा असला तरी कुंकवाचा धनी हवा म्हणुन हजारो विकृत गोष्टी सहन करतात.. आजही. शक्यता तर अनेक असु शकतात सीमोरच्या मनस्थितीबाबतही.. पण तरीही त्याकाळची बायकांची परिस्थिती पहाता, तिला हे करण्याची इच्छाच नव्हती, पण तिच्या इच्छेला आणि नकाराला काहीही किंमत नव्हती, असं मला मनापासुन वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ज्या काळात स्त्रीला तिच्या

पिलीयन रायडर
Sat, 12/03/2016 - 02:11 नवीन
ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता,
ह्यातुन स्त्रीच्या मताला काय किंमत असेल हे लक्षात यायला हवं ह्या घटनेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

तुषार काळभोर
Sat, 12/03/2016 - 02:41 नवीन
पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता.
सुरुवातीपासून केवळ ' नवरा करायला लावतो' या कारणासाठी (आवडो-न आवडो) तिने ते केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तिच्या नवर्‍याची कृती अजिबात

प्रसाद गोडबोले
Sat, 12/03/2016 - 13:36 नवीन
तिच्या नवर्‍याची कृती अजिबात समर्थनीय नाहीये.... नाहीयेच . मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की आयडीयली तिने स्वतःसाठी ठाम उभं रहायला हवं होतं . तेही पहिल्याच वेळेला , किमान दुसर्‍यावेळेलातरी जेव्हा तिच्या लक्षात आले होते की आपण हे एन्जॉय करत नाहीये . स्वतःच्य आत्मसन्मानासाठी उभे रहाणे ही प्रत्येक प्रौढ व्यक्तीची जबाबदारी आहे, मग ती स्त्री असो की पुरुष. आज असो की १०० वर्षांपुर्वी की १०० वर्षांनंतर. आत्मससंमान, स्वातंत्र्य, पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वगैरे माणुसपणाच्या संकल्पनांच्या बाबतील मला इतकेच म्हणावेसे वाटते की No one gives it to you, YOU HAVE TO TAKE IT ! अवांतर : बाकी इतर लोकं मुळ साहित्य न वाचताच सीता द्रौपदी कुंती विषयी ज्या कॉमेन्ट करत आहेत ते पाहुन फार मनोरंजन होत आहे . =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तेच मी म्हणतोयं

संजय क्षीरसागर
Sat, 12/03/2016 - 14:01 नवीन
मिस्टर रिचर्ड की होलमधून बघतायंत म्हटल्यावर तीनं `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच बोलायला हवा होता. सत्ताविस म्हणजे फारच रिटेक्स झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपण दोघंही "आयडीयली" हा शब्द

पिलीयन रायडर
Sat, 12/03/2016 - 20:44 नवीन
आपण दोघंही "आयडीयली" हा शब्द वापरत आहोत, फॉर अ रिझन. कारण असं खरंच घडत असतं तर जगात कधीच कुणावर कुठेही अन्याय झाला नसता. मी वर तेच सांगतेय तुम्हाला, बायका नवर्‍यांना अत्यंत विचित्र परिस्थीती मध्येही सोडत नाहीत. त्यांनी "आयडीयली" सोडायला हवं, पण त्या तसं करत नाहीत. कारण सरळ आहे.. आर्थिक, सामाजिक परावलंबित्व. मला समजत नाही, जिथे साधा स्वतःच्याच पैशावर हक्क नाही, तिथे ही नकार देणार कशी आणि हिचं एकणार कोण होतं? मला तर असंही वाटतं की हा जो २७व्या पुरुषानंतरही नकार दिला गेलाय, तो केवळ प्रेमातुन नाही तर आधाराला दुसरा पुरुष होता, जो तिच्या मागे उभा होता म्हणुनही असेल कदाचित. अन्यथा आर्थिक आणि सामाजिक पाठबळ नसलेली स्त्री, नवर्‍याला सोडुन काय करेल नक्की? बादवे, तिने नकार "दिलाच नाही" असं तरी कुठे माहिती आहे आपल्याला? दिल असेलच आणि अर्थातच तो उडवुन लावला गेला, नवर्‍याने आपला निर्णय तिच्यावर लादला हे घडलं असण्याची तेवढीच दाट शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बादवे, तिने नकार "दिलाच नाही"

प्रसाद गोडबोले
Sun, 12/04/2016 - 00:11 नवीन
बादवे, तिने नकार "दिलाच नाही" असं तरी कुठे माहिती आहे आपल्याला? दिल असेलच आणि अर्थातच तो उडवुन लावला गेला, नवर्‍याने आपला निर्णय तिच्यावर लादला हे घडलं असण्याची तेवढीच दाट शक्यता आहे.
ह्म्म्म , हा पॉईंट योग्य आहे, पहिल्या वेळेस मॅडम ने नकार दिला कि नाही नाही दिला हे आपल्याला ठाऊक नाही . दोन्ही समान शक्यता आहेत. ५०-५० ! आनि ह्या केस मध्ये मॅडम विक्टिम असल्याने त्यांना बेनीफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नाही ! इत्यलम .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कदाचित पहिली वेळ मॅडम ने एन्जॉयच केली असावी !

संजय क्षीरसागर
Sat, 12/03/2016 - 12:55 नवीन
व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत. भीती किंवा मोह. परिस्थिती दुय्यम आहे. धागा साहसाविषयी आहे. तर प्रश्न सरळ आहे : जे साहस सिमोरनं शेवटी केलं, ते पहिल्यांदाच का नाही केलं ? `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच आला असता, तर पिक्चर सत्तविस रिळं झालाच नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत. भीती किंवा मोह.

अर्धवटराव
Sat, 12/03/2016 - 14:00 नवीन
क्या बात है. +१००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची

यशोधरा
Sat, 12/03/2016 - 14:13 नवीन
व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत. भीती किंवा मोह.
अ‍ॅक्चुअली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/03/2016 - 19:39 नवीन
>>>>>> `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच आला असता, तर पिक्चर सत्तविस रिळं झालाच नसता. हं ! मुद्दा बिंदुगामी आहे आणि पटण्यासारखाही आहे. -दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काही तरीच काय सर.. इथे काय

पिलीयन रायडर
Sat, 12/03/2016 - 20:54 नवीन
काही तरीच काय सर.. इथे काय नवरा बायकोसोबत "अगं मी काय म्हणतो.." म्हणुन चर्चा करायला बसलाय का? की बायकोच्या परवानगीची वाट पहाणार होता? की तिच्या नकाराला मनावर घेणार होता? आजही हजारो घरात पुरुषांसमोर बायकांना ब्र काढता येत नाही. ह्या सामाजिक परिस्थितीला "दुय्यम" मानता येत नसतं सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नकार तीव्रतेचा नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/03/2016 - 22:17 नवीन
वर प्रतिसाद लिहितांना तुम्ही म्हटलं तसं सबंध प्रकरणात तिने नकार दिला असेल का ? आणि दिलाही असेल तरी तो पुरुषी वर्चस्वाखाली दबला असे समजू. पण, तरीही तिच्या नकाराने कदाचित झाला तितका त्रास सहन केल्यामुळे जे भोगावं लागलं त्या पेक्षा पहिल्या नकाराने त्या वेदनेची तीव्रता नक्कीच कमी असली असती असे वाटते. अर्थात, आता या वाटण्याला काही अर्थ नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब,

निओ१
Sat, 12/03/2016 - 22:26 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब, तुम्ही आजच्या क्षणालातीला पाहत आहात असे वाट आहे, जरा तीच्या जागी, त्या काळी, त्या क्षणी स्वतःला उभे करून पहा, अहो, १०० एक वर्षापुर्वी आपल्याकडे देखील सतीप्रथा होतीच ना ? त्यात काय स्त्रीची आधी विचारणा होत होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिबी,

संजय क्षीरसागर
Sun, 12/04/2016 - 00:17 नवीन
प्रश्न शंभर की हजार वर्षापूर्वी, तेंव्हाची आणि आत्ताची परिस्थिती, असा अजिबात नाही. स्वत्त्वाचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन `व्यक्तीसापेक्ष स्वत्त्वाचा' आहे. परपुरुषाशी संग म्हणजे स्वत्त्वाचा अपमान अशी सिमोरची निश्चयात्मकता असती, तर जुलमापेक्षा स्वत्त्व श्रेष्ठ, मग प्राण गेले तरी बेहत्तर, पण असा संग करणार नाही, हे पहिल्यांदाच झालं असतं. आणि त्याचा जयजयकार उचित होईल. मग ते हजार वर्षापूर्वी असो की आज. कारण स्वत्त्वासाठी बाजी लावली गेली. पण तसं झालं नाही. स्टोरीनं यू टर्न बिसेट आल्यावर घेतला. याचा अर्थ, बाजी बिसेटच्या ओढीमुळे लागली. स्वत्त्वाच्या (किंवा इथे, गैरसमजातून चालू असलेल्या `स्त्रीत्वा'च्या) अभिमानासाठी नाही. थोडक्यात, अनेक पुरुषांशी, स्वतःच्या पतीदेखत संग करतांना, सीमोरनं एकदाही बाजी लावली नाही. बिसेटमुळे तिला मुलगी झाली. हे त्या काळात मान्य असावं. (आज आपण याला डेरिंग म्हणतो!). त्यामुळे ती रिचर्डबरोबर जगण्याला (म्हणजे बोल्ड सीन्स करायला) कंटाळली, की तीचा स्वार्थ जागा झाला ? तीला जगण्याचा एक नवीन आयाम दिसला. सो, नाऊ शी स्टेक्ड हरसेल्फ. असा या स्टोरीचा एकूण अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यस्स सर... मुद्दा मान्यच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/04/2016 - 07:46 नवीन
मलाही तो मुद्दा पटलाच आहे, तुम्हाला मला पटलेला मुद्दा सर्वांनाच पटला पाहिजे असं काही नाही. असो. पुन्हा एकदा लेडी सिमोरची ओळख करून दिल्याबद्दल पिशी अबोलीचे आभार. ह्याव अ गुड्डे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मस्तच.. हा अर्थ म्हणजे

आनन्दा
Mon, 12/05/2016 - 15:20 नवीन
मस्तच.. हा अर्थ म्हणजे गोष्टीमधील अगदी सार काढल्यासारखाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

परिचय करून दिल्याबद्दल

वीणा३
Sat, 12/03/2016 - 02:16 नवीन
परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं कि प्रत्येक संस्कृतीने स्त्री मधली लढाऊ वृत्ती संस्कार -समाज - वंशवृद्धी ह्या गोष्टीमध्ये संपवायचा प्रयत्न केला. कदाचित पूर्वी संतती निरोधन शक्य नसल्यामुळे तिचं परावलंबित्व सुद्धा जास्त होतं. ज्या वयात काहीतरी "कमवायची" इच्छा असते तो पूर्ण उमेदीचा काळ फक्त मुलं जन्माला घालण्यात -वाढवण्यात गेल्यामुळे स्वतःचा कर्तृत्व दाखवायची संधी अतिशय कमी मिळाली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पड खाणं अनिवार्य बनलं असावं आणि स्त्री च घराबाहेरच अस्तित्व शून्य झालं असावं. अशा काळामध्ये स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची लढाई लढणारी प्रत्येक स्त्री किती खमकी आणि धीराची असेल ह्याची कल्पना सुद्द्धा करणं कठीण. ती बरोबर का चूकपेक्षा सुद्धा तिला जे हवं त्यासाठी त्या काळात, त्या वेळच्या नियमांविरुद्ध एवढी लढाई लढली, अपमान सहन केले त्यासाठी तिचं कौतुक. काही हजार वर्ष या पृथीवर राहिलेला, स्वतःच्या मते अतिशय हुशार असलेला माणूस, दुसऱ्याच्या खासगी आयुष्याचा, आवडीनिवडीचा, निर्णयाचा आदर करायला कधी शिकणार देव जाणे. सिमोर ला (आणि आसपासच्या असंख्य व्यक्तींना) आपल्या आवडीच्या माणसाबरोबर राहणं इतक अवघड करणाऱ्या प्रत्येक समाजाबद्दलच्या वैतागातून एवढं वरचं लिहिलं :(.
  • Log in or register to post comments

लेडी सीमूरचा संघर्ष

गामा पैलवान
Sat, 12/03/2016 - 03:04 नवीन
पिशी अबोली, रिचर्डने ज्याअर्थी २७ पुरुषांना लेडी सीमूरच्या आयुष्यात प्रवेश मिळवून दिला त्याअर्थी तो मैथुनप्रेक्षी (=व्हॉयुर) होता हे नक्की. मात्र तिची सीता, द्रौपदी, कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही. या चौघी आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत. चौघींना जबर संघर्ष करावा लागला. मात्र लेडी सीमूरची परिस्थिती वेगळी असल्याने थेट तुलना जुळंत नाही. बिसेटने तिला सोडण्याचं कारण म्हणजे त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण रिचर्डने तिला घटस्फोट दिला नव्हता तर केवळ विभक्त होण्यास परवानगी दिली होती. जाताजाता : धोब्याने सांगितल्यामुळे रामाने सीतेला सोडली वगैरे फालतू बाजारगप्पा आहेत. शक्यतो उल्लेख टाळलात तर बरं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

सीता, कुंती व द्रौपदीशी

नगरीनिरंजन
Sat, 12/03/2016 - 07:38 नवीन
सीता, कुंती व द्रौपदीशी केलेली तुलना बरोबरच आहे. नवर्‍याच्या आनंदासाठी असो की वंश टिकवण्यासाठी असो परपुरुषाशी संग करावा लागणे हे सीमोर व कुंतीच्या बाबतीत झाले. तेच द्रौपदीचं. निव्वळ कुंती अनवधानाने म्हणाली वाटून घ्या म्हणून लगेच पांडव कंपनीने ठरवून टाकलं वाटून घ्यायचं म्हणून. तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी जाणून घेतलेला दिसत नाही. सितेलाही निर्दोष असूनही सरळसरळ जंगलात सोडून देण्यात आलं. ह्या स्त्रिया सीमोरपेक्षा महान होत्या; त्यांचा संघर्ष वेगळा होता वगैरे उगाच पोकळ मुद्दे मांडून आपल्या संस्कृतीची लक्तरे झाकण्याची गरज नाही. अगदी फुले-कर्व्यांनी काही करेपर्यंत म्हणजे दीड-दोनशे वर्षांपुर्वीपर्यंत आपल्याकडे हीच परिस्थिती होती आणि मागास ग्रामीण भागात अजूनही असेल. शोषण करण्याची कारणे फक्त वेगळी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा