Skip to main content

अहंकार कमी कसा करावा?

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 27/04/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो. या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो. आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे.. कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते. सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते. फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले. इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्‍याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला, फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच. अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच, मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. (वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.) माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..? हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्‍या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ? आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी... आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी... अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?

वाचने 26731
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
अहंकार नष्ट कसा करावा...हे ठीक आहे... पण...त्यावर विजय कसा मिळवावा ? कशाला..??? विजय मिळाला कि डोक्यात हवा जाणार..म्हणजे परत अहंभाव आलाच कि..! त्यापेक्षा तो नियंत्रणात कसा आणावा..हे महत्वाचे. आणि शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.

In reply to by पाटीलभाऊ

शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.
अगदी अगदी त्याची जाणीव असणे हेच तर महत्वाच. तरच पुढचा प्रवास सुरू होण्याची शक्यता. थेट मुद्याच बोलतात बघा.

अहम च्या भावनेवर प्रचलित आध्यात्मिक वा प्रचलित विचारसरणी संदर्भात काही मांडता येणार नाही. मात्र व्यक्तीगत अनुभव व जेव्हा जेव्हा अहमचा विचार करतो तेव्हा खालील बाबी जाणवतात अहम सहसा नातेसंबंधात अधिक जिवंत सक्रीय होतो फुलतो. म्हणजे जर नातेसंबंधापासुन जेव्हा जेव्हा मी दुर गेलोय एकांतात तेव्हा अहम निष्क्रीय झालेला जाणवतो अर्थात सुप्तावस्थेत असेलही पण त्याची हालचाल मंदावलीय असे जरुर जाणवते. म्हणजे कसे की अहम जेव्हा असतो तेव्हा त्याचे एक "ओझे" मनावर असते. कारण आपण एक "भुमिका" घेत असतो एक "अविर्भाव" घेऊन वावरत असतो. जेव्हा आपण एकांतात जातो ( अर्थात हे सर्वांच्या बाबतीत वेगवेगळा अनुभव असेल मी माझ्या मर्यादीत अनुभवात मांडतोय) जेव्हा नातेसंबंध तात्पुरते का होइना ( नातेसंबंध एक विस्तृत पट गृहीत आहे) जेव्हा दुर होतात वा प्रभावहीन होतात. तेव्हा अहम ची भावना मंदावते. हा एक सुखद अनुभव असतो यात मन निर्भार होऊन जाते. यात मन सर्व प्रकारच्या भुमिका अविर्भाव इ. तुन मुक्त झाल्याने हलके होते. असे निर्भार मन फार सुंदर्र असते त्याची संवेदनशीलता कनेक्ट होण्याची विशेषतः निस्रर्गाशी फार वाढते. असे निर्भार मन जेव्हा नव्याने संवाद साधते तो ही अधिक प्रांमाणिक होत जातो. अहम स्वतःचा अहम लक्षात येणे ही देखील मोठी बाब आहे. म्हणजे केवळ तटस्थ निरीक्षणाने सहसा स्वतःचा अहम व त्याचे आवर्त्ने कंपने जाणवतात पण यात एक गंमत आहे. समजा "स्व" ची सात वर्तुळे आहेत. सर्वात बाहेरच्या सातव्या वर्तुळातील "स्व" ला जर आपण तटस्थतेने न्याहाळु लागलो त्याच्या क्रिया प्रतिक्रीयांना "बघु" लागलो तर अहम ची आवर्तने कंपने त्यामागे फरफटत जाणारं मनं हे जाणवु लागतं चुका ही दिसतात त्यातील व्यर्थताही जाणवते. पण होत काय की अहम संपत असा नाहीच. आता काय होतं तो आता केवळ अधिक सुक्ष्म होऊन नविन रुपात आपल्या आतल्या समजा क्रं ६ च्या "स्व" ला चिकटुन बसतो. उदाहरण वेडसर वाटेल पण अजुन दुसरा मार्ग मला हे माझ म्हणण मांडायला सापडत नाही. म्हणजे कसे की आता जो अहंकार मी बघितला तो अधिक सुक्ष्म पातळीवर जाऊन "स्व" म्हणतो " बघ कीती परखड आत्मपरीक्षण चालु आहे माझे, किती पारदर्शक आहे मी, किती ब्रुटली ऑनेस्ट माणुस मी" आता जो एखाद्या व्यक्तीशी बोलतांना दाखवलेला अहंकार होता बाहेरच्या पातळीवरचा जो लक्षात आला जाणवला तो न संपता आता तो अधिक सुक्ष्म होउन बघ मी किती परखड आत्मपरीक्षण करणारा माणुस असा होऊन बसला. आता हा ही पकडीत यावा तर अधिक अधिक तटस्थता असायला हवी अधिक आतुन "स्व" चा धांडोळा घ्यायला हवा. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे स्तर. संभवतात. अजुन एक अहम विषयी जाणवते की अहम एका अ‍ॅक्सल सारख सायकलच्या अ‍ॅक्सल सारख काम करतं म्हणजे जर मनाचे विविध विचार भावना उर्मी या सर्व मिळुन जर विविध स्पोक्स समजले तर इगो चा अहम चा अ‍ॅक्सल त्या सर्वांना धरुन ठेवणारा सिंग्ल सेंट्रल फोर्स सारख काम करतो. आता तो पुर्ण संपवायचा तर विविध उर्मी भावना विचार आयडेंटीटी हे कसं मेंटेन होणार हा ही एक प्रश्न वाटतो. अर्थात हे अनाध्यात्मिक अर्थाने विचार करतोय. अध्यात्माच्या सेट थेअरीजचा तिटकारा आहे. अजुन अनेक विचार येतात पण लांबतय फार