शाळेतला “खंड्या” धडा वाचायच्या आधीपासूनच मला कुत्रा प्राणी फार आवडतो. माझं हे प्रेम खेड्यात सुरु झाल्याने ते अस्सल देशीच राहिलं. पुलंनी “रावसाहेब” मध्ये सांगितलेली वेव्हलेन्थ प्राणि मात्रांच्या बाबतीतही लागू पडते असा माझा अनुभव आहे.
ज्याच्या डोक्यावरून मी सहज हात फिरवला त्याने माझ्यात काय पहिले कोणास ठाऊक, तो थेट शेतापर्यंत सोबतीस आला. मी त्याला भाकरी दिली नव्हती न बिस्किटाची चटक लावली होती. फक्त प्रेमापोटी साथ देणार हे रस्त्यावरच पिल्लू नंतर माझा जिगरी मित्र झाला. माफ करा मैत्रीण झाली कारण ती एक कुत्री होती. लवकरच आमचा रोज सकाळी शेतात जाण्याचा दिनक्रम पक्का झाला.दोन तीन तासाच्या या फेरी मध्ये पळापळी, लपाछपी आणि भरपूर गप्पा रंगायच्या. सकाळी झाडावरून पडणारे कौठ, चिंचा, कैरी,बोर, पेरू, जांभळ अशे अनेक ऋतूवार उपलब्ध असलेल्या मेवा गोळा करायच्या माझ्या मोहिमेवर ती सज्ज असायची.
सुट्ट्या संपल्या आणि मला शाळेसाठी बुलढाण्याला निघावं लागलं. शाळा शिक्षण आणि शिक्षक यातल्या कुणाचीच वेव्हलेन्थ माझी जुळत नसल्याने तसं माझं जाणं व्यर्थच होते खरे पण जनरीत. सुट्ट्या असो नसो आमच्या गावाकडे चकरा सुरूच राहायच्या पण ह्यावेळी अवघड वाटत होत. दहा बारा वर्षांचा असेल मी नक्की आठवत नाही पण ममैत्रिणीला सोडून जाण्याच्या कल्पनेने खूप रडू येत होते. बाबा मला आणि आईला सडकेवर सोडायला आले होते.गाडीची वाट पहात होतो आणि अचानक हाताला काही तरी ओले लागले. पाहतो त काय साक्षात मैत्रीण.सोडायला आली होती वेडी. कनडक्टर खेकसला नसता तर ती पण बस मध्ये बसली असती. गाडी निघाली आणि तिचा रडवेला चेहेरा पाहून त्यादिवशी जी शाळा डोक्यात शिरली ती आजपोवेतो निघाली नाही.
बस मधला पुढचा चार तासाचा प्रवास मला एकदम फ्ल्याशब्याक मध्ये घेऊन गेला.एक लहान कुत्र्याच पिलू आमच्या वाड्यात येऊन बसलं. दिवाळी का उन्हाळ्याच्या सुट्टी निम्मीत्त मी महिन्या दोन महिन्यासाठी पालोदला आलेलो होतो. आम्ही दहाबारा मित्र गल्लीत खेळत होतो. एक मित्र म्हणाला “ तुमच्या दारात बशेल बच्चू लई खतरनाके, हात लावला कि भुकत. तुमी पाळा त्याला वाड्यात कुणीबी शेण चोरायला घुसणार नई”. आमच्या वाड्यासमोर गाई बैल्लानी भरलेला मोठा गोठा होता. ते सगळं पटांगण आमचं खेळायचा अड्डा होता. आम्ही मित्रांनी मिळून त्या कुत्र्याचे नखं मोजले नर का मादी तपासले आणि याला पाळायचे असे ठरवले. आमच्या गावात पंडित पाटलाचे ‘लाल्या’ नावाच फारच भयंकर कुत्र होतं. त्यांच्या दारासमोरून जायची पण कुणाची हिम्मत होत नसे. तोच दरारा आपल्या वाड्यात असला त काय मजा येईल या कल्पनेनेच मी भन्नाट खुश झालो.कारण या द्वारे इतर गल्लीतल्या समवयस्क शत्रूंवर पण मला चाप बसवता येणार होता. आता फक्त घरातून कशी परवानगी मिळेल याचाच विचार सुरु झाला.
पण चिंता नव्हती कारण माझे सगळे विचित्र छंद माझी आज्जी आणि खासकरून काकू खपवून घ्यायच्या. घरी पिल्लू दाखवल्यावर पहिला शोध हा लागला हि कुत्री आहे. सगळा हिरमोड झाला कारण सहसा कुत्री राखनाला कुणी पाळत नाही. परंतु काकूने सांगितले “आपण पाळू तीला, आपल्या दारात आली न ती, आता ती आपलीच. तसाही कुत्रा आपल्याकडे टिकतच नाही”. झाल्ल !!! म्हणजे पिल्लू आपल्याकडे राहणार हे पक्क झालं. त्यानंतरच्या अनेक रात्री आमच्या गल्लीने जागून काढल्या. पिल्लू रात्रभर विव्हळत बसायचं, आईची आठवण येत असेल बिचाऱ्याला. मी सकाळी उठेपर्यंत त्या पिल्लाने केलेली घाण काकूने साफ करुन ठेवली आणि त्याला दुधपोळी पण खाऊ घातलेली होती. सकाळी सात साडेसातला दोस्त अंघोळ गंध पावडर आणि न्याहारी करून हजर होते. आम्ही मित्र शेतात जायला निघालो आणि माझ्या मागे ते पिल्लू देखील निघाले. इवलासा जीव होता. बदामी रंग इतर पिल्लांपेक्षा लांब केस, गुबुगुबू , डोक्यावर पांढरा टिपका ,करवंदा प्रमाणे काळेशार डोळे. वजनामुळे चालताना सारखं बद्कन खाली पडायचं. या रूपावर आम्ही सगळे मित्र तिचे दिवाने झालो होतो. तिच्यावर पंजा देणे , यु छु आणि हाड मधला फरक, उंच उडी कशी मारायची या विद्यांचे संस्कार आम्ही मित्र दररोज करायला लागलो.
माझ्या प्रत्येक मित्राशी वागतानाचा तिचा व्यवहार वेगळा असे. सगळ्या खेळात ती सामील असायची. आमच्या दोस्तांचे वातावरण एकदम कुत्रामय झाले होते. विटांच्या गाड्या, प्लास्टिकचे टेम्पो, गोट्या, बांगड, गजाचे गाडे, टायर सगळं हिच्या नादात बाजूला पडलं. ह्या धांदलीत तीच नामकरण आपोआपच “ रॉक्सी” असं पण झालं. नाव इंग्रजी असलं तरी काय झालं दीड दोन महिन्यात तिने गावातील वेगवेगळे उकिरडे हुंगायला सुरुवात केली. बहुदा घरातील आयती दुधपोळी खाण्यापेक्षा तिचा स्वतःच्या पायावर उभं राहण्याकडे कल असावा. त्यामुळे आम्हाला पण तिला कंपनी द्यायला तिकडे जावेच लागायचे. मोठे लोक रागवत पण काय झाले ती नाही का आमच्यासोबत शेतात यायची ?.
जेव्हा जेंव्हा मी पालोद ला यायचो तेंव्हा दारात स्वागत करायला ती हजर असायची. कमीतकमी अर्धा तास ओरडणं, चाटण, अंगावर पाय ठेवणे, पळत सुटण असा आनंद व्यक्त करायचा कार्यक्रम चालायचा बाईसाहेबांचा. उन्हाळ्यात मुसलमान गल्लीतील विस्तीर्ण नाल्यांमध्ये गावातील तमाम कुत्रे लोळायला जमायचे. (सगळे विदेशी लोकांचे अनुकरण). मी आल्यावर ती हा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून त्याच भरलेल्या अवस्तेत मला भेटायला यायची. चांगले खांद्यापर्यंत पाय यायचे तिचे.
नंतर नंतर मित्रांना शेतातले काम मागे लागायचे त्यामुळे शेतात जायला मी आणि तीच.मी माझ्या मनातले सगळे काही तिला सांगायचो आणि ती ऐकून घ्यायची. शाळेतल्या सततच्या सुमार कामगिरीमुळे मी चांगलाच खचलेलो असायचो.घरून असलेल्या किमान अपेक्षा पूर्ण करणे जमत नव्हते.त्यामुळे अपेक्षांचे ओझे मी तिच्यावर लादत होतो. मला चांगल आठवत आंब्याच्या झाडाखाली बसून मी तिला चांगल्या कुत्र्याने कसे वागावे हे सांगितलं आणि तिच्या बेजावाबदारपणामुळे आणि रोजच्या गैरहजरीमुळे किती शेण चोरीला जात हे देखील सुनावलं होत.
पुढच्या फेरीला ती सुधारली असेल अशी माझी अपेक्षा होती पण ती तर माझ्या साध्या स्वागताला पण आली नाही. प्रचंड संताप झाला. थोड्यावेळाने दादा म्हणाला “ काय मामा भाच्यांना भेटले कि नाही ? समोरच्या इरल्यात जनली ती”. मला काही उमजत नव्हत. मी भूशाच्या इरल्याजवळ गेलो. आमचे गडी म्हणाले "तिकडे जाऊ नका दादा कुत्री डसन बरका". तेवढ्यात रॉक्सीच बाहेर आली, नेहमी प्रमाणे भुंकली आणि माझी चड्डी ओढून तिच्या पिल्लांकडे ओढू लागली. मी आत गेलो आणि बघतो त काय मी खरंच मामा झालो होतो. पाच सहा डोळे हि न उघडलेले छोटे छोटे पिल्ल कुं... कुं... करत होते. रॉक्सी बसून पिल्लांना चाटत होती, आता ती मोठी झाली होती, माझ्यापेक्षाही मोठी.
ह्यानंतर न चुकता वर्षाकाठी मी मामा बनायला लागलो. रॉक्सीचा संसार आणि परिवाराचा वेल गावभर फुलत होता. माझ्यापण गावाकडे चकरा अभ्यासामुळे कमी होत होत्या. पाच सात वर्ष आमच्या गावात, नातेवाईकामध्ये आणि घरात रॉक्सी हा विषय खूप गाजला.माझ्याशी बोलायचा संदर्भ पण तोच असायचा. खिल्ली उडवायला पण हाच विषय सगळ्यात पसंतीचा.
रॉक्सीच वागण आता खूप बदललं होतं. ती जवाबदार आणि वयस्कर स्त्री सारखी वागायची. जाता येता शेपूट हलवायची पण सारख उठन बसन टाळायची. मात्र रॉक्सीच माझ्यावरच प्रेम काही कमी झालं नव्हत. पेरणीच्या दिवसात गावात खूप उत्साह असतो. घरची मंडळी पण शेतात यायचे, जेवायचे डबे बरोबर असायचे. त्यावेळी ती पण सोबत असायचीच. शेतात भन्नाट पळत सुटायची. काही विषारी औषध हुंगेल या भीतीने मी पण तिच्या मागे पळत सुटायचो. खूप गोंधळ घालायची रॉक्सी.
असाच एके दिवशी उन्हाळ्याच भर दुपारी पालोदला पोहोचलो आणि दारातच “रॉक्सी आता नाही” असं कळल. डोकं सुन्न झालं. काय झाले ते न घरात कुणाला माहित होतं न मित्रांना. फक्त गेल्याची बातमी कळाली. त्या रखरखत्या उन्हात मिळालेली जहरी बातमी माझ्या मनाला फार लागली.
वीस एक वर्ष झाले असतील अंदाजे. तशीच डोळ्यासमोर येते रॉक्सी. जास्त आठवायचा प्रयत्न केला त डोळ्यावाटे टपकते. आता मी मोठा झालोय, चांगला एका पोरीचा बाप आहे. पण रॉक्सीच्या आठवणीने गळा दाटून येतो. माझी पहिली मैत्रीण होती रॉक्सी. आजपर्यंत देवदूताचा अनुभव आला तो तिच्या मार्फतच. देवदूत असतात तरी कोण ? स्वतःचा स्वार्थ न बघता निर्मळ प्रेम करणारे अज्ञात.
एक गोष्ट मात्र नक्की, रॉक्सी गेली ती फक्त माझ्या आयुष्यातून. पण त्यानंतर अनेकदा एखाद्या इराल्यात जन्म घेतला असेल तिने. माझ्या सारख्या एखाद्या लाजर्या बुजर्या वेडपट पोरा बरोबर खेळतही असेलं. तो पोरगा पण बापडा मनातल्या सर्व गोष्टी सांगत असेल तिला. रॉक्सी सगळं ऐकत असेल आणि मनातल्या मनात खूप हसत असेल कारण तिच्या डोळ्यांसमोर मीच येत असेल.
(टंकलेखनाच्या चुकांबाबत माफी असावी)
वाचन संख्या
7674
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
सहमत.. शेवटी एकदम मनाला भिडलं
In reply to :( by पैसा
छान लिहिलंय..
मस्त लिहलयं, डोळ्यासमोर उभ
फारच अप्रतीम.. डोळ्यात पाणी
सुंदर लिहिलय. अशाच आठवणी
खुप छान लिहिलं आहे. लिहिताना
छानच लिहिलंय
हळुवार नैसर्गिक लिखाण. खूप
फार सुरेख लिहिलंय. शेवटचा
सुरेख!
काय लिहीलंय, वाह!!.. ऑफिस मधे
आवडलं
सुरेख!!! धन्यवाद! !
कुत्रं म्हटल्यावर बराच वेळ
सहमत
In reply to कुत्रं म्हटल्यावर बराच वेळ by खेडूत
काय छान लिखाण आहे
छान लिहीलय..
तुमची रॉक्सी खुप आवड्ली :)
सुंदर लेख, बालपण आठवले
भावला
मस्त लेखन
कुत्रा कधी पाळला
वाह कुत्रा हा प्राणी अजिबात
फार सुंदर लिहिलयत! ( साक्षात
सुंदर आणि मनापासून लिहीलं आहे
छान!
कुत्रा आवडतो पण पाळता नाही
पालोदकर साहेब , लडवलं न
छान लिहिलं आहे.लिहित रहा.
छान लिहिलं आहे. मनापासून
छान लिहिलं आहेत!
हृद्य लिखाण.
आपण सर्वांनी खूप छान आणि
वाहवा!!! अत्यंत सुंदर !!
सुंदर....
लै खास .......
सुंदर लेखन!
खूप सुंदर लिहिलंय!
सुरूवात वाचली अन शेवटाचा भाग
खुप सुंदर लेख !