गॅरेज युनिव्हर्सिटी...१
गॅरेज युनिव्हर्सिटी...१
(सर्व पात्रे व घटना काल्पनिक)
"विज्या कुठे आहे रे?"
"अरे तो काल रात्रीच गोव्याला गेलाय, येईल तीन चार दिवसांनी, पण तू कसा काय आज सकाळी सकाळी उगवलास?" बाबू शेठचा परिचित आवाज ऐकून फियाट च्या खालूनच कुठलेतरी नट बोल्ट टाईट करता करता अज्या दादा विचारता झाला.
"आयला पहाटे माझा सासरा गचकला, बायको आणि मेव्हण्याला अर्जंट पुण्याला सोडून यायच होतं. विज्या आला असता ना रे पटकन जाऊन."
आता मात्र पाठीवर सरपटत अज्या दादा गाडीच्या खालून बाहेर येत म्हणाला " काय झालं रे त्यांना अचानक? आणि तू नाही का जाणार?"
"हार्ट अटॅक आला होता रात्री... पहाटे खपला. माझ्या केस ची आज फायनल हिअरिंग आहे निर्दोष सुटलो तर मी कोर्टातून डायरेक्ट पुण्याला जाईन नाहीतर जेल मध्ये." बाबूशेठ हसत हसत म्हणाला.
"सुटशील लेका ह्या वेळी पण. आता तू काय पहिले सारखा गावगुंड राहिला नाहीयेस, नामचीन बिल्डर आणि राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहेस. बस दहा मिनिटं, रामजीला बोलवून घेतो, तो येईल त्यांना सोडून, तो पर्यंत चहा मागवू."
अज्या दादानी गणपतला रघुमामा च्या टपरीवर चहा सांगून येताना रामजी ला बोलवायला पाठवला. चहा घेऊन रघुमामा आणि त्याच्या पाठोपाठ रामजी पण आला. मग बाबूशेठनी ५५५ चं पाकीट काढून सगळ्यांना सिगरेट वाटल्या. चहा सिगरेट चा आस्वाद घेताना रामजी ला सगळी स्टोरी ऐकवली आणि त्याला पुण्याला जायची विनंती केली जी त्याने लगेच मान्य केली. ह्या बाबूशेठचं एक वैशिष्ठ्य होतं, तो आज कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या जुन्या मित्रांना विसरला नव्हता, हां आता पूर्वी सारखं त्याला रोज गॅरेजवर येऊन चकाट्या पिटायला वेळ नसायचा पण अधून मधून त्याची चक्कर हमखास असायची.
बाबूशेठची अँबॅसेडर घेऊन तो आणि रामजी निघून गेल्यावर अज्या दादा परत एकदा पाना घेऊन फियाट च्या खाली घुसला.
-----:-----:-----
माझं नाव श्याम, आटपाट नगरात मी राहत असलेल्या पांडुरंग निवास ह्या आमच्या बिल्डिंगला लागूनच असलेल्या चाळीत, माझ्या जन्माच्याही कैक वर्षे आधी १९७० च्या आसपास कृष्णा फोंडेकर यांनी सुरु केलेले, रेल्वे स्टेशन च्या अगदी जवळ, रेल्वे लाईनला समांतर रोड वर नेहरू बागेच्या समोरच असलेले हे 'अजय ऑटो गॅरेज' त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले अजय फोंडेकर आणि विजय फोंडेकर हे सांभाळत होते. मूळचे गोव्याचे असलेले कृष्णा फोंडेकर निष्णात मेकॅनिक होते आणि त्यांच्या हाताखाली दोन्ही मुलं पण छान तयार झाली होती त्यामुळे कामाची अजिबात कमतरता नव्हती. अगदी लुना पासून ते ट्रक पर्यंत कुठलीही गाडी इथे रिपेअरिंगला यायची. त्यात अज्यादादा आणि विज्यादादा हे जगमित्र त्यामुळे दिवसभर गिऱ्हाईकांचा आणि मित्र मंडळींचा राबता असायचा. पुढे १० x १० चा दुकानाचा गाळा आणि त्याला लागुनच असलेल्या ३ खोल्यांमध्ये आई, २ बहिणी आणि हे २ भाऊ असे पाच जणांचे फोंडेकर कुटुंब त्यांच्या दोन कुत्र्यांसह राहत होते. त्या छोट्याशा गाळ्यामध्ये फक्तं भलामोठ्ठा टूलबॉक्स, एक स्टील चे कपाट आणि एअर कॉम्प्रेसर एवढंच सामान आणि पुढच्या मोकळ्या जागेवर पत्र्याची भलीमोठी शेड असे त्या गॅरेज चे स्वरूप होते.
मी आणि शेजारच्या कर्णिकांच्या वाड्यात रहाणारा माझा बालमित्र सुनील शाळा सुटल्यावर घरी जाऊन जेवण झालं रे झालं कि लगेच गॅरेज वर हजर व्हायचो. वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरायला मिळणे, कुत्र्यांना घेऊन समोर बागेत फिरायला जाणे, शेडच्या एका कोपऱ्यात स्टँड वर ठेवलेल्या चॅम्पियन बोर्ड वर कॅरम खेळणे, तिथे जमणाऱ्या आमच्यापेक्षा वयाने बऱ्यापैकी मोठ्या मंडळींच्या धमाल गप्पा ऐकणे अशा अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी यायला आकर्षित करायच्या. मात्र संध्याकाळ नंतर तिथे जायला आम्हाला आमच्या घरच्यांची परवानगी नव्हती, कारण संध्याकाळ नंतरचे तिथले वातावरण वेगळे असायचे. संध्याकाळी सहा-साडेसहाला गॅरेज बंद झालं कि ताडपत्र्या लावून शेडचा दर्शनी भाग झाकला जायचा आणि मग आत दारूकाम सुरु व्हायचे. कधी पिता पिता पत्ते खेळायचे तर कधी बोनी एम च्या कॅसेट लागायच्या, कधी नुसत्याच गप्पा चालायच्या, कधी आपआपसात त्यांची भांडणे व्हायची तर काहीवेळा मारामाऱ्याही व्हायच्या. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात तशी एवढ्या वेगवेगळ्या स्वभावाची, पेशातली आणि सामाजिक स्तरातली मंडळी एकत्र आली कि अशा गोष्टी व्हायच्याच, पण कौतुकाची बाब अशी कि, दुसऱ्या दिवशी मात्र आदल्या संध्याकाळी किंवा रात्री घडलेल्या कटू प्रसंगाची कोणाला आठवण पण नसायची, रात गयी – बात गयी ह्या म्हणीप्रमाणे नव्या संध्याकाळी परत नव्या उत्साहात मैफिल जमायची. गॅरेजवर जमणाऱ्या मित्रमंडळीं मधली प्रत्येक व्यक्ती हि एकेक वल्लीच होती, त्यातल्याच एकाच्या म्हणजे पम्यादादा च्या भाषेत सांगायचे तर इथे येणारी सगळी माणसे ‘ओवाळून टाकलेली’ अशी होती. आणि त्याच्या म्हणण्यात काही अतिशयोक्ती पण नव्हती.
काय पण एकेक कॅरेक्टर्स होते, स्वतः गॅरेजचे मालक ‘अज्यादादा’ आणि त्याचा लहान भाऊ ‘विज्यादादा’, (हा त्यामानाने गॅरेजवर कमी असायचा कारण तो पट्टीचा ड्रायव्हर होता आणि त्याकाळी स्मगलिंग जोरात चालू असल्यामुळे मालाची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या स्मगलर लोकांचा फेवरीट होता त्यमुळे बऱ्याचदा तो बाहेरगावीच असायचा.)
तीन घरं सोडून पुढे रहाणारा, अँबॅसेडर भाड्यानी देणारा चालक-मालक ‘रामजी’, पूर्वाश्रमीचा गावगुंड, पण आताचा यशस्वी बिल्डर आणि एका राजकीय पक्षाचा शहरप्रमुख ‘बाबुशेठ’, सूट-बुट घालून फिरणारा आणि मोठ्या आवाजात बोलणारा सिमेन्सचा मॅनेजर हेमंत उर्फ ‘हेम्या’, श्री दत्त हेअर कटिंग सलून वाला प्रकाश चव्हाण उर्फ ‘पक्या’, सतत पान खाऊन कायम रंगलेले तोंड घेऊन फिरणारा रिक्षावाला ‘नानू’, न्यू जनता बॅग हाऊस वाला फकरुद्दीन शेख उर्फ ‘फकरु’, हेरंब गणेशमूर्ती कारखाना वाले महेश आणि मंगेश हे वेदक बंधू, स्टार ऑटो स्पेअरपार्टस वाला किरण उर्फ ‘बॉस’, सुवर्णा ज्वेलर्स वाला सुधीर धोत्रे, महाराष्ट्र बँकेत काम करणारा सतीश चित्रे उर्फ ‘सत्या’, फ्रांसिस टेलर, आर्कीटेक्ट प्रशांत कुलकर्णी, मटक्याचा अड्डेवाला ‘बाबाजी’, स्टोव्ह रिपेअरिंग वाला एकनाथ, समाधान उडपी हॉटेलवाला दिनकर उर्फ ‘दिन्या’, कानिफनाथ रसवंती गृह वाला गंगाधर उर्फ ‘गंग्या’, साईनाथ आर्ट्स वाला अशोक पेंटर, वडापाव आणि चहाची टपरीवाला राघुमामा, सतनाम टायर्स वाला करणबीर सिंग उर्फ ‘ग्यानी’ हा धिप्पाड सरदारजी, श्रीकृष्ण दुग्धालय वाला रामानुज तिवारी उर्फ ‘भय्या’, ए-वन पान सेंटर वाला कमल उर्फ ‘छोटू’ अशी हि बिनधास्त, जगाची पर्वा न करणारी नानाविध प्रकारची पात्रे आपापल्या सवडीनुसार हजेरी लावायची.
माझ्या आणि सुनील साठी हे गॅरेज म्हणजे एक विद्यापीठच होते. कॉलेज शिक्षण पूर्ण होउन कामधंद्याला लागेपर्यंत आम्ही ह्या विद्यापीठाचे नियमित विद्यार्थी होतो. ह्या युनिव्हर्सिटी मध्ये अशा अनेक गोष्टी ज्या कुठल्याही शाळा आणि कॉलेजात शिकवल्या जात नाहीत त्या आम्हाला शिकायला व बघायला मिळाल्या.
तर अशा ह्या आमच्या गॅरेज युनिव्हर्सिटीत घडलेल्या काही गमतीशीर घटना या लेख मालिकेतून आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
-----:-----:-----
टिप: माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे जर कुठे काही चुकलं असेल, काही त्रुटी असतील तर आपल्या प्रतिसादा द्वारे जरूर कळवा.
आपला,
टर्मीनेटर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
वाचतोय.
नक्की...
मस्त सुरुवात..
वाचतोय.
वाचते आहे...
वाचतोय....
धन्यवाद...
वाचतोय
येस बॉस.
पु भा प्र.
मस्त सुरुवात. पुभाप्र.
येऊ द्या...
छान सुरुवात. पुभाप्र.
आवडले! पुभाप्र!
नावावरूनच उत्सुकता वाटली आणि
धन्यवाद.
चांगली सुरुवात
धन्यवाद.
औत्सुक्य वाढवणारी सुरुवात.
धन्यवाद.
पुढचे भाग कुठे आहेत?
मस्त सुरुवात..आवडले.
मोठ्ठा कॅनव्हास
सव्वा पाच वर्षांपूर्वी लेखनाचा कुठलाही पूर्वानुभव नसताना