ही कथा काल्पनिक आहे, याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा.
इंचू चावल्यासारखं ते जनावर पिसाळलं. झाडाखालनं मुसंडी मारत सरळ मचाणाच्या खांबाला त्यानं ढुसनी दिली. तसं मचाण कलंडी झालं. म्हाराज घसरतंच खाली गेले. पालथं पडूनंच त्यांनी बंदूक सावरली. बसल्या बसल्याच त्यांनी नेम धरुन अजून एक बार काढला. गोळी रानरेड्याच्या पोटात बसली. पण जनावर ढिम्म हललं नाही. पाय खुरडत म्हाराजांना चेंगारण्याच्या इराद्यानं पुढं झेपावलं. शिरपानं घोड्यावरनं खाली उडी मारत तलवार बाहेर काढली. प्रसंग बाका होता. रामोशी, भिल्लारं पत्र्याचं डबं वाजवून जनावर बिथरवण्याचा प्रयत्न करत होते. बंदुकीत दारु ठासून भरायला वेळ नव्हता. आखरी उपाय म्हणून म्हाराजांनी बंदूक फेकून दिली आणि त्या रानरेड्याची शिंग पकडून आपल्या अजस्त्र बाहूंचे बळ दाखवत कुस्ती सुरु केली. म्हाराज देखणे धिप्पाड. तालमीत कमावलेले कसरतीचे पिळदार शरीर ते. दोन हातांनी शिंग पकडून जोर लावत न्हाय म्हनलं तरी त्या जनावराला दोन हात मागे घसरवत नेलं. मग खाली वाकवून त्याचं मुंडकं जमीनीवर बराच वेळ दाबून धरलं. हिसडा मारुन जनावर मोकळं झालं तसं त्यांनी त्याच्या खांद्यावर महाकाय बुक्की घातली. तेव्हा कुठे ते अजस्र धूड जमीनीवर कोसळलं. रामोशी पळत आले. विजयी मुद्रेने म्हाराजांनी एकवार त्या रानगव्याकडे बघितले. म्हणाले, "शिरपा, याला गाडीत घालून मागून घीऊन या. आम्ही आहोत पुढे " भाले घेऊन उभारलेल्या सैनिकांकडे बघत ते घोडागाडीत चढले. आपली शिकार आणि आपण यात कोणी तिऱ्हाईत येता कामा नये हा म्हाराजांचा दंडक होता. तो आजही पाळला गेल्याने ते समाधानी होते. शिरेटोप डोक्यावर चढवला आणि घोडागाडी वेगाने दौडू लागली. 'म्हाराजांनी येका बुक्कीत गवा मारला' ही खबर वाऱ्याच्या वेगाने नगरीत पसरली. ढोल ताशे आरत्या नगारे मृदुंग. विजयी राजा नगरात शिरला. बाजारतळावर एककल्ली बसलेल्या रामोश्यांनी त्यांना अभिवादन केले. म्हाराज म्हणाले, "रामा, या रामुश्यांच्या आळीतपण मासकांड द्यायची येवस्था करा" आश्रमशाळेतल्या पोरांनी म्हाराजांकडे बघून हात हलवले. म्हाराजांनी खूण करुन एकाला जवळ बोलावले. म्हणाले, "मी ऊद्या तुमच्या साळेत येतो. जातीनं लक्ष घालून तुमचा प्रश्न सोडवतो. काळजी करु नगा " तसं ते पोरगं कमरेपासून हलत "व्हय जी" म्हणत म्हाराजांना पदस्पर्श करुन निघून गेलं. म्हाराजांची घोडागाडी संथपणे चालत होती. जागोजागचे अभिवादन त्यांनी मोठ्या मानाने स्विकारले. गिरणी चौकाच्या वळणावर लमाणांचा एक तांडाच त्यांच्या घोडागाडीवर झेपावला. त्यांचा मुखिया म्हणाला, " म्हाराज, आमी डुगरीवरनं आलूय. हाताला काम नाय. पोटाला आन नाय. आमाला काम द्या. आमी तुमच्या शेतातलं शेंगदाणं उपाटतू ". म्हाराज म्हणाले, "रामा, राज्यात आसली इद्रीस लोकंपण हायती. त्येंलाबी काम दिलं पायजे. लाव शेतावर" मग तांड्यावर नजर फिरवत म्हणाले, " घीऊन ये वाड्यावर" रामा कर्तव्यबाज गडी होता. तो आसल्या कामात कधी चुकला नाही. स्वाराने घोडे फुरफुरवले तसे घोडागाडी चालू लागली. म्हाराज राजवाड्यात जेव्हा पोहोचले तेव्हा राधाबाईंनी त्यांचे औक्षण केले. म्हणाल्या, "आज स्वारींनी शिकार साधली म्हणायची. " म्हाराज श्रीमुखात हसले. म्हणाले, "अहो, येवढ्या शिकारी साधल्या पण तुमच्यासारखी वाघीण अजून कुठं भेटली नाही " तशा राधाबाई लाजून आत वळल्या. चारचौघात म्हाराज फटकाऱ्यात काय बोलतील याचा नेम नाही. शुभ्र पांढऱ्या झोपाळ्यावर बसल्यावर म्हाराजांना पानाचे तबक देण्यात आले. पान चघळत म्हाराजांनी मग आराम फर्मावला. संध्याकाळी खानपान उरकून म्हाराजांनी बागेत फेरफटका मारला. रामाला त्यांनी बोलावून घेतले. म्हणाले, "अरे त्या लमाणांचं काय केलं?" रामा म्हणाला, "चोख येवस्था केलीय म्हाराज. तुमी म्हणला तसं." "बरं, मी हाय माडीवरच्या खोलीत." म्हणत म्हाराज पुढे चालते झाले. रातीच्या गार काळोखात फिरताना म्हाराजांना बरं वाटायचं. रातराणीच्या चारपाच कळ्या कुस्करुन त्यांनी आपल्या धिप्पाड शरिरात तो मद्यधुंद गंध भरुन घेतला. राज्यावाड्याच्या पायऱ्या चढत असताना त्यांना शिरपाची लगबग दिसली. म्हणाले, "शिरपा, गव्याचं मुंडकं दिवाणखाण्यात आप्पाजींच्या तसबिरीसोबत लावा. मासकांडाचं वाटत कसंकाय?" शिरपा अदबीनं म्हणाला, "जी महाराज. रामुश्याच्या आळीत, धनगरवाड्यात, आन खाल्ल्या म्हारुड्यात मासकांडाचं वाटप चालूये. उरलं सुरलं घिसाड्यांच्या वस्तीत द्यायचा मानस आहे." "बरं. संपवून टाका ते. ऊद्या आपल्याला कोंडापूरला जायचंय. दिसलीच येकांदी वाघीण तर तिचं मुंडकं हितं चौकटीवर लावू. " म्हाराज आपला बाणा ताठ करत माडीवर चलते झाले. रोजच्यासारखाच त्यांचा आजचा दिवसपण धावपळीत गेला. गेला महिनाभर त्यांना आश्रमशाळेत जाणे जमले नव्हते. त्याचीच तेवढी हुरहुर लागून राहिलेली. बाकी त्यांचं ठरवल्याप्रमाणे अगदी चोख चाललं होतं. माडीवरची ती म्हाराजांची खास खोली होती. शिकारी म्हाराजांची शिकारी खोली. गुबगुबीत गालीचे, मऊशार गाद्या, उंची उत्तरं यांनी ती खोली अगदी रातराणीच्या कुस्करल्या कळ्यांसारखी मद्यधुंद होऊन गेली होती. बिछाण्यावर बसलेली ती भरगच्च रानटी उफाड्याची मुलगी बघितली. आणि त्यांनी रामाला मनातल्या मनात शाबासकी दिली. त्याने तीच मुलगी आणली होती जी दुपारी गिरणी चौकात म्हाराजांनी लमाणांच्या तांड्यातून हेरली होती. ***** म्हाराज म्हणाले, "बाळ, तुझं नाव काय?" आता ती 'बाळ' राहिली नव्हती. चांगली लग्नाला आली होती. पण म्हाराज कधी कुणाचा अनादर करत नाहीत. घाबरुन गेलेली ती पोर धाडसी होत म्हणाली, "सुक्री. आमी डुगरीत ऱ्हातो." मंद नितळ हवेच्या झोकाने खोलीतली एकमेव मेनबत्ती ईजून गेली. म्हाराज मनले, " सुक्रे, तुला पायातलं घालतू. गळ्यातलं घालतू. दसऱ्याला दिवाळीला कंठाहार घालतू." सुक्री म्हणाली, "म्हाराज, जे घालायचंय ते दिवाळीला घाला. आता घातलंय ते काढा." ***** सकाळी म्हाराज प्रसन्न उठले. घोड्यावरुन रपेट केली. कोंढापूरला जायची घोडागाडी सजवून ठेवली होती. ढोल ताशे नगारे. वाऱ्याच्या वेगाने नगरीत बातमी पसरली. 'म्हाराजांनी अडीचशे एकर जमीन लमाणांना दान केली आहे'.
वाचने
8946
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक!!! जव्हेरभौ...
अफाट लिहिलंय थोडक्या शब्दांत.
In reply to खतरनाक!!! जव्हेरभौ... by प्रभास
?
भारी सटायर.
=)) =)) अप्रतिम...
In reply to भारी सटायर. by प्रचेतस
खतरनाक!!! जव्हेरभौ...
ओह.... अप्रतिम
जव्हेरभौ ___/\__
=))=))
काय लिवलंय. लईच भारी.
आहाहाहा, भारी.
काही तरी घाण वास आला...!!
मस्त पण शीर्षोत्तरी
मस्त जव्हेरभाऊ!
वाघीण
हे महाराज ओळखीचे वाटतात
जव्हेरगंज जेव्हा भारी लिहित
च्यायला
चाणक्य भाउ लय शिंपल कथा आहे
In reply to च्यायला by चाणक्य
> 'म्हाराजांनी अडीचशे एकर
नै म्हणजे किती एकर जमीन
In reply to > 'म्हाराजांनी अडीचशे एकर by साहना
> "आज स्वारींनी शिकार साधली
श्रेष्ठ कलाकृती म्हणजे
लय भारी हो जव्हेरभौ..
हा हा हा
हे कुणाविषयी आहे ते कळतेय
हेच म्हणतो मी..!!
In reply to हे कुणाविषयी आहे ते कळतेय by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
संपादक मंडळ,
हि कथा काल्पनिक आहे, याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा.हा हा हा ....!!
In reply to संपादक मंडळ, by जव्हेरगंज
http://www.misalpav.com
In reply to हा हा हा ....!! by विशुमित
टका जी,
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
मग तसे पश्ट सांगावे ना...नैतर
In reply to टका जी, by विशुमित
ठीक आहे..
In reply to मग तसे पश्ट सांगावे ना...नैतर by टवाळ कार्टा