श्रीगणेश लेखमाला - इतिहास एका इतिहाससंशोधनाचा..
इतर कुठल्याही मराठी माणसाप्रमाणे मलाही इतिहासाची ओळख शिवाजी महाराजांपासूनच झाली. यत्ता चौथीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित केले गेलेले (आणि गेली पन्नास वर्षे सिलॅबस न बदलता जवळपास आहे तस्से राहिलेले) 'शिवछत्रपती' हे मी वाचलेले इतिहासाचे पहिले पुस्तक. त्याआधीही दिवाळीतले किल्ले, शिवजयंती, इ. माध्यमांतून ओळख होतच होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत अनेक विषय शिकवले जातात, पण किमान महाराष्ट्रात तरी इतिहास हा एक विषय असा आहे की ज्याची किमान काही पैलूंपुरती तरी कायम ओळख होतच राहते. त्यामुळेच इतिहास हा बहुतेकांच्या आवडीचा विषय असावा असे वाटते - किमान माझ्या बाबतीत तरी ते खरे होते. घरी-दारी या विषयाची चर्चा कायम थोडीतरी होत असे (शिवाजी महाराज मिरजेला आले असताना त्यांचा तळ आमच्या घराच्या आवारात होता, असे तेव्हा बाबा मजेने सांगत.) शिवाय घरी यावरची अनेकविध पुस्तके असल्याने त्यांचे वाचन होतच असे. त्यातूनच उत्सुकता वाढत गेली, आणि इतिहासाचे बीज पेरले गेले. पुढे मग स्वातंत्र्यचळवळ, मध्ययुगीन व प्राचीन भारत, वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती, युरोपातील रेनेसाँ, पहिले व दुसरे महायुद्ध, हिटलर, स्टॅलिन, नेपोलियन, इ.इ. विषयांवर जमेल तसे वाचन केले, कारण यात जितके वाचू तितके नवलच वाटत असे. कायम काहीतरी नवीन सापडत असल्यामुळे आणि नवीन सापडण्याकरिता विशेष मेहनतीची आवश्यकताही नसल्यामुळे आय वॉज हूक्ड. त्या भरातच घरी सापडतील ती पुस्तके वाचून काढली. राजा शिवछत्रपती-स्वामी-ययाती-पावनखिंड-पानिपत इ. नेहमीच्या कादंबर्यांसकट काही बखरी, शेजवलकरांसारख्या तज्ज्ञ इतिहासकारांचा समग्र लेखसंग्रह... असे एकुणात वाचन बरे चालले होते.
तोवर इंजीनिअरिंगकरिता आमची बदली झाली पुण्याला. मिरजवियोगाच्या दु:खातून लगेच बाहेर यायला मदत झाली ती अनेक मित्रांची आणि लायब्रर्यांची. फुटपाथवर पुस्तके धुंडाळण्याचा जो छंद तेव्हापासून लागला, तो अजूनही कायम आहे. त्यातच इंजीनिअरिंगच्या दुसर्या वर्षात असताना एका संध्याकाळी सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळांमध्ये निरुद्देश भटकत असताना एका गल्लीत शिरताक्षणी एका जुनाट इमारतीने लक्ष वेधून घेतले. बाजूला भरत नाट्य मंदिर, समोर डेअरी आणि अपार्टमेंट अशा नॉर्मल परिसरात ही दुमजली इमारत अंमळ विजोडच दिसत होती. थांबून त्या इमारतीवरचा बोर्ड पाहिला - 'भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे' आणि लगेच ट्यूब पेटली. गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेतला तो उल्लेख आठवला. (ते आणि बाबासाहेब दोघेही तरुण असताना तिथे येत, मोडी वाचताना 'ते समयीं बाजीरावसाहेबांसमवेत दोनशे लोक होते" ऐवजी "दोनशे केक होते' असे वाचून केकचा शोध भारतातच लागला, कारण युद्धातही स्वतः बाजीरावसाहेब दोनदोनशे केक जवळ बाळगीत, वगैरे दिव्य शोध लावीत.) आणि 'स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे |' ही समर्थोक्ती जणू अनुभवल्याच्या आनंदातच त्या इमारतीत पहिले पाऊल ठेवले. त्यालाही आता जवळपास ९-१० वर्षे होत आली.
मंडळाचा (भारत इतिहास संशोधन मंडळाला सगळे चाहते 'मंडळ' असेच संबोधतात) शोध लागण्याअगोदर मिरजेतच उन्हाळी सुट्टीत श्री. मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून मोडीचे पहिले धडे गिरवले. मोडी शिकून प्रथमच अस्सल कागदपत्रे वाचताना जो आनंद झाला, तो शब्दांत सांगणे निव्वळ अशक्य आहे. घरी-दारी काही प्रसिद्ध पत्रे वाचून दाखवताना फार भारी वाटत असे. शिवाय अगोदर केवळ नाव ऐकलेली अनेक पुस्तके मंडळात प्रत्यक्ष पाहून हर्षवायू व्हायचाच बाकी होता. कवी भूषणापासून जदुनाथ सरकारांपर्यंत, होमरपासून हिटलरपर्यंत सर्व विषयांवरची पुस्तके मंडळात आहेत. हळूहळू त्यातली अनेक पुस्तके वाचून काढली. सोबतच अधूनमधून होणार्या व्याख्यानांनाही हजेरी लावणे सुरू केले. मंडळात काही लोक आपसात ऐतिहासिक चर्चा करतात, हेही तेव्हा पाहिलेले होते. जमेल तशी श्रवणभक्तीही करीत असे. पण त्यांपैकी कुणाशी ओळख नव्हती. पण त्याचीही चिंता एके दिवशी आपसूक मिटली. मंडळात एकदा काही लोक चर्चा करीत असताना मी तिथे एका गृहस्थांना विचारून फक्त ऐकत बसलो आणि मध्ये एक शंका तेवढी विचारली. दुसर्या एका गृहस्थांनी तिचे अगदी व्यवस्थित निरसन केले. ते दुसरे गृहस्थ खूप वेळेस मंडळात दिसत. त्यांना या अगोदरच्या भांडवलावर अधूनमधून काहीतरी विचारत असे, आणि ते अगदी तपशीलवार, न कंटाळता पूर्ण समाधान होईतोवर उत्तर देत. त्यांच्याबद्दलचा आदर हळूहळू वाढीस लागला, पण त्यांचे नाव काही माहीत नव्हते. एकदा मी सहज त्यांना नाव विचारल्यावर "मे-हें-द-ळे" असे नाव त्यांनी सांगितले. आमच्या एका मित्रवर्यांना हे सगळे सांगितल्यावर तो उडालाच. तोवर मला इतिहाससंशोधनात अलीकडे काय चाललेय याची वट्ट कल्पना नव्हती. बाबासाहेब पुरंदरे, वासुदेवशास्त्री खरे, इतिहासाचार्य राजवाडे, त्र्यं.शं. शेजवलकर, सेतुमाधवराव पगडी वगैरे संशोधकांची परंपरा नंतर जणू अस्तंगतच झाली अशा अतिशय मोठ्या गैरसमजुतीत मी वावरत होतो. मित्राने त्या भ्रमाचा फुगा लग्गेच फोडला आणि हे मेहेंदळे कोण आणि त्यांनी कुठले पुस्तक लिहिले इ. सांगितले. आता चकित होण्याची पाळी माझी होती. लगेच मंडळात गेलो आणि गजानन मेहेंदळे यांचे 'श्री राजा शिवछत्रपती' वाचायला सुरुवात केली.
बाबासाहेब पुरंदर्यांसोबत फोटो.
त्यानंतर मेहेंदळेंविषयीचा आदर झपाट्याने वृद्धिंगत होत गेला. त्यांचे पुस्तक म्हणजे माहितीचा अफाट खजिना आहे. निव्वळ माहितीच नव्हे, तर पानापानागणिक दिसणारी तर्कशुद्धता आणि चिकित्सक वृत्ती पाहून या माणसाने शिवचरित्राचा अभ्यास किती खोलवर केलाय हे सरळ दिसतच होते. इतके असूनही अन्य अज्ञ जनांसोबत वावरताना त्यांना कसलाही संकोच नाही. अगदी शांतचित्ताने सर्व प्रश्नांची उत्तरे देत (अजूनही देतात). त्यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टींचा नीरक्षीरविवेक कसा करावा, याचे थोडेतरी भान आले. कॉलेजमध्ये असताना खर्या अर्थाने गेमचेंजर ठरलेली गोष्ट म्हणजे सीओईपी हिस्टरी क्लब. काही मित्रांसोबत क्लबची स्थापना केली. सुरुवातीला कॉलेजपातळीवरच विविध विषयांवर विद्यार्थीच लेक्चर देत असत - ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. सुरुवात झाली ती ट्रोजन युद्धाने. पुढे चेंगीझ खान, सोन्याचा इतिहास, नाईट्स टेम्पलार, पानिपत, इ.इ. अनेक विषय अनेक मित्रांनी सादर केले. क्लबद्वारे ऑर्गनाईझ केलेला पहिला इव्हेंट म्हणजे क्रांतिकारकांच्या फोटोंचे प्रदर्शन. काही मित्रांच्या ओळखीने पेपरमध्येही त्याची बातमी दिली. त्यामुळे पुण्यातून बरेच लोक येऊन ते सर्व फोटो वगैरे पाहून गेले. परिणामी आउटरीच बर्यापैकी वाढला. त्यातच एका मित्रवर्यांनी 'हिस्टरी वीक' नामक भन्नाट आयडिया काढली - आठवडाभराची व्याख्यानमाला. प्रथम वर्षी विद्यार्थ्यांनीच लेक्चर्स दिली, आणि एक गेस्ट लेक्चर घेतले पुणे विद्यापीठातल्या प्रा.डॉ. राधिका शेषन यांचे टेक्स्टाइल हिस्टरीवर. प्रथम वर्षाची पुण्याई द्वितीय वर्षी (म्हणजे आमच्या इंजीनिअरिंग लास्ट वर्षी) खूप कामाला आली. तेव्हा सगळ्या क्लबकर्यांनी तुफान जोराने कामे केली. तेव्हाचा हिस्टरी वीक म्हणजे अजूनही आठवण आली तरी भारी वाटते. अगोदर बैठक होऊन निनाद बेडेकर, शशिकांत पित्रे, आनंद हर्डीकर, वि.ग. कानेटकर इ. दिग्गज वक्ते ठरवले, त्यांचे त्यांचे विषय नक्की करून त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचा होकार मिळवल्यावर आख्खे पुणे प्रचारार्थ पिंजून काढले. शाळा, कॉलेज, क्लास, लायब्ररी, होस्टेल्स... काही काही म्हणून शिल्लक ठेवले नाही. परिणामी ऑडिटोरियममध्ये तुफान गर्दी झाली. भाषणे तर हाउसफुल्ल झालीच, शिवाय बाहेर एक छोटेखानी पुस्तक प्रदर्शनही भरवले होते. तेव्हा आमच्या मित्रांच्या डोक्यात अशा काही भन्नाट आयडिया येत असत आणि ते ज्या पद्धतीने त्या राबवीत त्याला तोड नाही. म्यानेजमेंट-डिसलेक्सिक असलेला मी ते बह्वंशी अवाक होऊन पाहत असे. p>निनाद बेडेकरांसोबत सीओईपी हिस्टरी क्लब सदस्य.
२००९ सालचा हिस्टरी वीक तुफान जबरदस्त हिट झाला. त्याच वर्षी कॉलेजच्या इतिहासावरही थोडे संशोधन केले, केसरी पेपरच्या पुराभिलेखागारात चाफेकर बंधूंचे सहकारी महादेव रानडे यांच्याशी निगडित बातम्या हुडकल्या (ते सीओईपीचे विद्यार्थी होते). वर्ष आणि कॉलेज संपता संपताच निनाद बेडेकरांसोबत क्लबची दोनदिवसीय रायगड ट्रिपही केली. तेव्हा आम्हाला भूषणाचा किडा एकदम बिगटाईम चावला. येताजाता सगळे जण 'इंद्र जिमि जंभ पर', 'साजि चतुरंग भरि' वगैरे कवने गाऊन समोरच्याला एका श्लोकात गार करायचा प्रयत्न करीत असू. शब्दयोजना घिसीपिटी वाटेल, पण खर्या अर्थाने मंतरलेले दिवस होते ते. अजूनही त्या दिवसांची आठवण आली की स्फुरण चढते. सगळे एकाचढ एक नर्ड लोक्स आणि तितकेच उत्साही. कोणीच 'नॉर्मल' नाही. असा क्राउड आख्ख्या कॉलेजात तेव्हा दुसरा नसेल. माझ्या होस्टेल रूमवर कॉन्स्टंट अड्डा भरत असे. कोट्या, जोक्स, टवाळी यांना ऊत येणे ही नॉर्मल सिच्वेशन. फार फार फारच भारी दिवस. कधी जमल्यास सीओईपी हिस्टरी क्लबचा डीटेल इतिहास लिहावा म्हणतो. सुदैवाने त्याची बरीच साधनसामग्री उपलब्ध आहे.
हिस्टरी वीकमध्ये वि.ग. कानेटकरांसोबत क्लब सदस्य.
सीओईपीनंतर कोलकात्यात आगमन झाल्यावर हा इतिहासाचा किडा खूपच ष्ट्राँग होता. त्यातच ग्रीक भाषा शिकवणार्या एका क्लबबद्दल माहिती कळताक्षणी त्यांना जाऊन भेटलो आणि जोमाने ग्रीकाध्ययन सुरू झाले. कोलकात्यातल्या कॉलेजाची लायब्ररी अतिसुसज्ज असल्यामुळे तिथे इतिहासाचीही अनेक पुस्तके होती. त्यांचे वाचनही सुरूच होते. थोडक्यात, नव्या जोमाने गटणीकरण सुरू होते. त्या दोनेक वर्षांत खूप नवीन पुस्तके वाचली. ग्रीक क्लबमध्ये सुरुवातीला ग्रीक शिकलो खरे, पण काही महिन्यांनी ग्रीकऐवजी बंगाल-महाराष्ट्र सांस्कृतिक देवाणघेवाण यावरच भर आला. परिणामतः बंगालच्या इतिहासाची आणखी डीटेलमध्ये ओळख झाली. त्यानंतर मग विशेष काही सांगण्यासारखे नाही. तीच ती जुनी रेकॉर्ड - अनेक पुस्तके वाचली. नेटचा पुरेपूर वापर/दुर्वापर झाला. अनेक संशोधकांशी विविध प्रकारे संपर्क साधला. एशियाटिक सोसायटी, नॅशनल लायब्ररी, इ. मोठ्या नामवंत संस्थांच्या पुराभिलेखागारात थोडा शिरकाव झाला, त्यांच्या लायब्रर्या बघितल्या. पण इतिहासात नक्की कशावर संशोधन करावे हे काही कळत नव्हते. असेच चाचपडण्यात आणखी तीन-चार वर्षे गेली आणि अखेरीस गेल्या दोनेक वर्षांत दिशा मिळाली.... त्यामुळे शिवाजीमहाराज मिरजेला आल्याचे मूळ डच पत्र शोधता आले. (ते अगोदर पब्लिश्ड होते, फक्त मूळ हस्तलिखिताचा फोटो काढला, इतकेच.) शिवाय आणखी काही अप्रकाशित डच साधनेही शोधता आली, त्यांचे विश्लेषणही करता आले. हा झाला वाचक ते अमॅच्युअर संशोधक इथवर झालेला प्रवास. संशोधनही जसे जमेल तसे करतो, फुलटाईम युनिव्हर्सिटीवाल्यांच्या तोडीचे दर वेळेस होते असे आजिबात नाही. पण घाई कुणाला आहे? या सगळ्याचा मला काय फायदा झाला? आर्थिकदृष्ट्या पाहता काहीच नाही. पण यानिमित्ताने जगभर इतक्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला, इतक्या लोकांच्या विचारपद्धतींशी परिचय झाला, त्याचे मोजमाप पैशात करणे निव्वळ अशक्य आहे. मग मेहेंदळे सरांशी शिवचरित्राबद्दलची चर्चा असो किंवा विजापूरकर श्री. अब्दुल अझीझ यांच्याशी टेम्पल आर्किटेक्चरबद्दलची चर्चा किंवा मिरजेबद्दल कुमठेकर यांच्याशी.... या आणि अशा अनेक लोकांनी इतिहासाचे आत्मभान जागृत केले, जाणिवांना व्यवस्थित पैलूही त्यांच्यामुळे पडले. त्यांचे ऋण कायमच राहील. सरतेशेवटी 'इतिहाससंशोधनामागील प्रेरणा काय आहे?' असा प्रश्न कुणी विचारल्यास "जुनी रेकॉर्डे खोदत बसायला मजा येते" हेच उत्तर देईन. इतिहाससंशोधनातून समाजसुधारणा किंवा ओपीनियन फॉर्मेशन वगैरे बाकी सर्व गोष्टी सेकंडरी आहेत. या सर्व गोष्टींत - जुनी रेकॉर्डे खोदणे, त्यांच्या आधारे भूतकाळातील गोष्टी 'नक्की कशा घडल्या असतील?' याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, इ.मध्ये एक स्वयंसिद्ध मजा आहे. त्यांचा काहीतरी कुठेतरी उपयोग होतो हे खरेच, आणि प्रत्येकाने 'कलेसाठी कला' छाप अॅटिट्यूडच दाखवावा असे आजिबात नाही. कुणाला निव्वळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून इतिहास आवडेल, कुणाला आणखी कशामुळे, कुणाला कदाचित वट्ट आवडणारही नाही. पण माझ्यापुरते विचारल्यास मी तरी हेच उत्तर देईन!
बाबासाहेबांची सही व शुभेच्छा.
वाचने
43612
वाचनखूण
प्रतिक्रिया
94
झपाटलेला!
वा , झकास बॅटमॅन ...
मनापासून उतरलेले एकदम
In reply to मनापासून उतरलेले एकदम by गणामास्तर
+1
In reply to +1 by sagarpdy
+1111
मस्त लिहिले आहे, आवडला लेख.
झकास लिहिलय!
जबहरा.... गोथम सिटीत कधी
तुझा हा प्रवास थोडाफार माहितच
झकास लेख !!
वंध्यामैथुन धाग्यांच्या
In reply to वंध्यामैथुन धाग्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
+१
सुंदर
In reply to सुंदर by सुबोध खरे
>>>एक तरी "क्षेत्र" असे असावे
संशोधक कसा घडत गेला सांगणारा
मस्तच!!!
हायला बॅट्या,
In reply to हायला बॅट्या, by अभ्या..
मायला , बॅटमॅन एवढे सगळे आहेत
In reply to हायला बॅट्या, by अभ्या..
@प्रचंड मेमरी, त्यात साठवलेला
In reply to हायला बॅट्या, by अभ्या..
मनात कधीच काही, कुणाबद्दलच,
बॅटोबा
In reply to बॅटोबा by मारवा
कोणतं चित्र ?
अभिनंदन बॅटमॅन...
In reply to अभिनंदन बॅटमॅन... by पगला गजोधर
मला वाटतं बॅटोबा दर्जेदार उजवे आहेत.
अलीकडच्या काळातील सर्वाधीक
उत्तम लेख
छान..
बॅट्या म्हणजे माहितीचा खजिना
बॅटमॅन द ग्रेट
क्या बात है. मस्त. 'या
वाल्गुदस्वामींचा व्यासंग अफाट आहेच आणि तो दिसतोच लेखनातून.
या निमित्ताने श्री बॅटमॅन यांच्या वरच थोडं संशोधन व्हावं
कुतूहल
छान लेख
झकास लेख. छंद असावा तर असा!
छान लेख!छंदाच्या प्रवासाचा
In reply to छान लेख!छंदाच्या प्रवासाचा by इशा१२३
अभिनंदन,
In reply to अभिनंदन, by अभ्या..
अजून आणु का प्रतिसाद?
In reply to अजून आणु का प्रतिसाद? by इशा१२३
तुम्ही आहात व्हय त्या १००-२००
अप्रतिम!!!
व्यासंगाला सलाम_/\_
भारी ओ !
वरच्या प्रत्येक प्रतिसादाशी
In reply to वरच्या प्रत्येक प्रतिसादाशी by इनिगोय
वाखुसा कुठे गेलं!
पहिल्या दिवसापासून या लेखाची
अं.त्यांचे होईलच. पण तुमचेही
In reply to अं.त्यांचे होईलच. पण तुमचेही by अप्पा जोगळेकर
हा प्र्तिसाद प्रचेतस यांना
बॅटमॅन यांचे नाव काय आहे हे
In reply to बॅटमॅन यांचे नाव काय आहे हे by अप्पा जोगळेकर
नाही. हे ब्रँडबिल्डिंग असंच
In reply to नाही. हे ब्रँडबिल्डिंग असंच by आदूबाळ
थोडे अवघड वाटते दादा,