Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य - बीट आणि खोबऱ्याच्या वड्या

लेखक पूर्वाविवेक यांनी शनिवार, 10/09/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
बीट आणि खोबऱ्याच्या वड्या . साहित्य : किसलेले बीट , - १/२ कप खवलेले ओले खोबरे - १ कप (कपात खोबरे हाताने दाबून भरून घ्यावे ) साखर - १ १/४ कप वेलची पूड- १ टीस्पून किंव्हा रोझ इसेंस - २ ते ३ थेब सायीसकट दूध- १ कप साजूक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून कृती: बीट स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्यावे. किसणीवर किसून घ्यावे. खोबरे खवल्यावर फक्त पांढरा भागच घ्यावा. जाड बुडाचे नॉन- स्टिक भांडे घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे, लगेच त्यात बिटाचा कीस घालून ५-७ मिनिटे मऊ होईपर्यंत परतावा. नंतर त्यात खवलेले खोबरे, साखर, दूध घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. सतत ढवळावे. आच मध्यम ठेवावी. प्रथम मिश्रण पातळ होईल पण नंतर घट्ट होऊ लागेल. ताटाला तूप लावून तयार ठेवावे. मिश्रणात वेलची पूड घालावी व सतत ढवळावे. मिश्रण हळूहळू भांड्याच्या लागेल व कोरडे होऊ लागेल. भांडे गॅस वरून उतरावे व लगेच तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढून वाटीच्या मागच्या भागाने पसरावे व दाबावे. गरम असतानाच सुरीने वड्या पाडाव्यात. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

वाचने 15853
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

बीट+खोबर्‍याच्या वड्या सुरेख दिसत आहेत. स्वाती

मस्त प्रकार!

छान! मीही करते अश्या वड्या. फक्त बीट शिगवून घेते आधी थोडा.

वड्या मस्त दिस्ताहेत. छान. -दिलीप बिरुटे

वड्या आवडल्या. करून बघण्यासारख्या. घरात ३-४ नारळ दिसतात आहे, आज घरा शेजारी शनी बाजार लागणार आहे. सौ.ला बीट्स विकत घ्यायला सांगतो. घरात दहा दिवसांचा गणपती असतो. नवीन प्रसाद दाखविता येईल. असो.

काय सुंदर रंग आलाय वड्यांना. मला नारळाची वडी खूप आवडते त्यात गाजर, टोमॅटो रस मिसळलेली ही आवडते, बिटाची कधी खाल्ली नाही पण रंग बघून खावीशी वाटत आहे :)

छान सुंदर दिसताहेत वड्या. करून पाहिल्या पाहिजेत.

पण मला ह्या वड्या अजीबात आवडत नाहि. बीट कोशींबीरितच शोभून दिसतो....वडित त्याची कल्पनाच सहन होत नाहि. एकदाच चुकुन ह्या वड्या खाल्ल्या होत्या....बस तोच पहिला आणि शेवटचा दिवस..