तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या. तो तिला जवळ घेऊन समजावत होता. पण ती हट्ट सोडेना. जणू तिला काहीतरी अपेक्षित होतं, ते तिला मिळेना. आणि तिला काय हवंय हे त्याला कळेना. म्हणून त्याने शब्दांच्या सुंदर जाळ्यात तिला अडकवण्याचा प्रयत्न सुरु केला, म्हणजे गोंधळून तिची तीच सावरेल. हुंदके देत ती म्हणाली,
"ठीकेय. मला मान्य आहे तुझं प्रेम मानसीवर आहे. पण म्हणून मला तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही?"
तो शांतपणे हसत होता. त्याचा हसणं तिला बोचत होतं. तो तिचे डोळे पुसत तिला उत्तर देऊ लागला,
"श्रावणी, प्रेम आणि मैत्री दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जसा गुलाब आणि मोगरा. दोन्ही आपापल्या परीने सुंदर, सुगंधी. पण म्हणून प्रियकराच्या हातात मोगरा शोभत नाही तिथ गुलाबंच हवा."
"म्हणजे आपल्या मैत्रीचं आता तुझ्यासाठी काहीच मोल उरल नाही." , तिचा राग अजून आवरत नव्हता. तोही इतक्यात हार मानणार नव्हता.
"मी असं कुठं म्हटलं कि आपली मैत्री मला उणी वाटते. गुलाब आणि मोगरा यातलं कोण उजवे कोण डावे हा भेद मी कधीच करत नाही. आपण दोघांना आपापल्या जागी असू द्यावं. प्रेयसीच्या केसात गुलाबंच माळता येतो आणि मैत्रिणीचा ओंजळीत मोगराच टाकता येतो."
त्याने खिशातून आणलेली मोगऱ्याची फुले अलगद तिचा ओंजळीत टाकली. त्यातली एक कळी हातात घेऊन तिच्याकडे पाहत तो म्हणाला,
"श्रावणी, प्रेम आणि मैत्री यातलं अंतर फार पुसट असत. मोगराही गुलाबाइतकाच सुंदर. पण कोणीतरी वेड्याने गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले आणि जगाने त्याला अनुसरल म्हणून मोगाऱ्याने रुसून कसं चालेल?"
तिचे रडू आवरत होतं. त्याने कळीकडे एकटक पाहत म्हटलं,
"ही मोगऱ्याची कळी पहातेयस. कधी-कधी मला ती गुलाबापेक्षा हवी-हवीशी वाटते. मैत्रीण ही सर्व सुख-दुखाची सोबतीदार असते. आपल्या आयुष्यात तिचं निराळं स्थान असतं. कदाचित हे सगळं तूच नीट समजू शकते, म्हणून तू माझी मैत्रीण आहेस आणि मानसी प्रेयसी."
त्याचाकडे पहात, मग ओंजळीतल्या मोगऱ्याशी खेळत, मग तिने विचारले,
"जर त्या मानणाऱ्या वेड्याने कधी गुलाब पाहीला नसता आणि गुलाबा ऐवजी मोगऱ्यालाच प्रेमाचे प्रतिक मानले असते तर ..."
"तर कदाचित तिच्याऐवजी तूच..."
तो गोंधळला. त्याच्या शब्दजाळ्यात त्यालाच अडकवून तिने हवे ते उत्तर मिळवलं. त्याने तिच्या डोळ्यात पहिले. तिथलं पाणी कुठल्याकुठ गायब झालं होतं. त्यांत आता त्याला त्याचं स्वच्छ प्रतिबिंब दिसत होतं. त्याचा डोळ्यातून मात्र हसता हसता नकळत अश्रू पाझरत होते.
हातातली मोगऱ्याची फुलं सावरत ती सावकाश उठली. ओंजळीतली फुलं पडू न देता वळून ती निघणार इतक्यात तिचं लक्ष त्याच्या हातातील मोगऱ्याच्या कळीकडे गेले. भरदुपारी त्यावर दव उतरलं होतं.
* * *
त्याच्या अस्वस्थतेला डोळ्यांवाटेच मार्ग मिळत होता. मनातलं सारं मानसीला सांगितल्यावर इतका वेळ त्यांना घातलेला बांध फुटला.
"मानसी, मला ठाऊक आहे की तू किती समजूतदार आहेस ते. पण श्रावणीशी बोलताना नकळत निसटून गेलेले शब्द मला अजूनही बेचैन करत आहेत."
पण तिला मात्र कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नव्हती. ती सहजच म्हणाली,
"पुरे आता. तू जे बोलून गेलास ती तुझ्या मनातली एक खरी भावना होती. तिचा मी स्वीकार आणि आदर करते. कारण, तरीही मीच तुझी प्रेयसी आहे आणि श्रावणी मैत्रीण. आता तर झालं. आता माझासाठी आणलेला गुलाब मला दे पाहू."
हाताततल्या टपोऱ्या लाल गुलाबाचा गंध घेत तो म्हणाला,
"नाही मानसी. आज या गुलाबालाही मोगऱ्याचाच सुगंध येतोय..."
आणि तिने थांबवण्याधी त्याने तो गुलाब दूर फेकून दिला. आश्चर्याने हसत ती म्हणाली,
"वेडायस तू. अरे, तूच म्हणाला होतास ना की गुलाब आणि मोगरा यातलं कुणीही उजवं-डाव नसतं, प्रेम आणि मैत्री या दोघांचं जीवनात वेगळं स्थान असतं. मैत्रीत सुख:दुखाची देवाणघेवाण असते, एकमेकाला ओळखणं असतं. पण खरं सांगू, प्रेमात तर सुख:दुखं दुसऱ्याची नसून आपलीच असतात. तिथे समजूतीच्या ऐवजी समर्पण असते."
नेहमी तो बोलत राहायचा आणि ती ऐकत राहायची. त्याच्या अशा बोलण्याच्याच तर ती प्रेमात पडली होती. पण आज त्याच्या ऐवजी तीच बोलत होती आणि तिच्या बोलण्याने त्याच्या मनातली सल कमी होत होती. पण तिच्या शब्दांऐवजी, त्याच्या मागचा, त्याच्या प्रत्येक भावनेचा आदर आणि समर्पण, अगदी अशा बाबतीतही, हे त्याला जास्त सुखावत होतं. ती बोलतच होती.
"जर मानणाऱ्या वेड्याने गुलाबाऐवजी मोगऱ्यालाच प्रेमाचे प्रतिक मानले असते गुलाबाला त्याचे दुख वाटले नसते. माझा अधिकार तुझ्यावर प्रेम करण्यावर आहे, तुझे प्रेम फक्त मलाच मिळू देण्यावर नाही."
आज तिच्या बोलण्याची जादू त्याचावर होत होती. तो नव्याने तिच्या प्रेमात पडत होता.
"निरस, अनासक्त आयुष्याला मोगरा नक्की आनंदी, सुगंधी बनवू शकतो. पण मुळातच समृद्ध जीवनास नवचैतन्य देण्यासाठी गुलाबाचेच सामर्थ्य लागते."
तिचे बोलणे थांबले. आज त्याला पूर्ण जाणीव होत होती की ती त्याचात किती एकरूप झालीये. मानसीला श्रावणीप्रमाणे हे सगळा त्याचा तोंडून काढून घेण्याची काहीच गरज नव्हती. त्याने काही न बोलताही ती तिच्या शब्दांत मांडत होती ते त्याचेच भाव. कदाचित म्हणूनच श्रावणी त्याची फक्त मैत्रीणच होती आणि मानसी प्रेयसी. मानसीच्या डोळ्यात त्याला हवी तेव्हा मैत्रीण दिसू शकत होती आणि हवी तेव्हा प्रेयसी.
खरंच मैत्रीस काही बंधनं असली तरीही प्रेमास कुठलेच बंधन नसते. मैत्रिणीच्या ओंजळीत मोगराच टाकता येतो, पण प्रेयसीच्या केसांत गुलाबच माळता येतो असा कुणी सांगितलंय. दोन एकरूप जीवांच्या बंधनास रंग आणि गंधाचेही बंधन नसायला हवे.
त्याने बाजूला पडलेली मोगऱ्याची एक कळी उचलली आणि तिच्या समोर धरली. त्याला समजलेला प्रेमाचा अर्थ तिलाही समजल्याने तिने गुलाबाचा हट्ट धरला नाही. अलगद ती मोगऱ्याची कळी घेऊन तिने तिचा सुगंध घेतला आणि ती आश्चर्यचकित झाली. त्या आगळ्या भावांचे कोडे त्याला उलगडले नाही. मग तिने ती कळी त्याच्या नाकाशी नेली आणि तोही थक्क झाला.
आज त्या मोगऱ्याच्या कळीला देखील जणू गुलाबाचाच सुगंध येत होता.
***
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3482
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! उत्तम!!
मी पैला
राजकपूरच्या संगम आठवण झाली .
धन्यवाद...
मस्तच....
सुसाट! सुरेख! क्लास !