Skip to main content

गणेशचित्रमाला

लेखक रंगभूषा मंडळ यांनी सोमवार, 05/09/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपागणेशचित्रमालेतील पहिले पुष्प गणेशचरणी अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांमध्ये असलेल्या विविध कला, कलेच्या सादरीकरणात असलेला त्यांचा उत्साह पाहता अशा कित्येक चित्रमाला मिपावर येऊ शकतील, हा विश्वास आहे. g1 विविध कलांचा स्वामी गणाधिदेव गणेशाचे हे प्रथमरूप आहे ओरिगामीतील. कागदाला केवळ घड्या घालून साकारलेली ही त्रिमित शिल्पे बनवण्यात आपले मिपाकर सुधांशुनूलकर ह्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ओरिगामीत साकारलेला हा गणेश व मोदक समुच्चय. आपल्या मिपाच्या विशेषांकांच्या मुद्रितशोधनात सुधांशूदादांचा सिंहाचा वाटा आहे. कीटक/पक्षी/निसर्गनिरीक्षण ह्या त्यांच्या निस्सीम छंदांबद्दल मिपाकरांना माहीत आहेच. ------- ०६/०९/२०१६ . 1 . पारदर्शक काचेवर मेहंदीसारख्या दाट रंगाने बाह्यरेषा रेखाटून त्यात पारदर्शक रंग भरणे म्हण्जे ग्लास पेंटिंग. हा छंद जोपासलाय आपल्या मिपाकर सूड ने. प्रभावी व अनवट शब्दकळा लाभलेल्या ह्या मिपाकराची गती स्वयंपाकघरातही चालते. अनेक लेख, कविता, विडंबने आणि पाककृती मिपावर सादर करतानाच ग्लास पेंटिंग मध्ये सूडने साकारलेला हा गणेश तितकाच अप्रतिम आहे यात शंका नाही. -------- ०७/०९/२०१६ 1 रंगीत कागदाच्या पट्ट्यांना गुंडाळ्यांचा आकार देऊन त्यांनाच विविध आकारात बसवायचे. पेपर क्विलिंग असे नाव असलेल्या या तंत्राने विविध आकारातून,रंगातून साकारलेल्या गणेशचित्रकृतीला सादर केलेय आपल्या मिपाकर कलावंत नूतन यांनी. लहानपणापासूनच निसर्गरंगांशी गोडी लागली की प्रत्येक कृती कशी कलाकृती बनत जाते हे जाणवून देणारा अनोखा बाप्पा. पेपरक्विलिंग बाप्पा. -------- ०८/०९/२०१६ . मिपा बाप्पा मोरयाच्या ह्या उपक्रमात अगदी नवीन/अपरिचित आयडींनी पण उत्साहाने आपल्या कलाकॄती पाठवल्यात. भिंतीवर लावण्यासाठी केलेले हे बाप्पाचे सुंदर म्युरल बनवले आहे आपले मिपाकर झुमकुला यांनी. एकदम साध्या भौमितिक आकारांचा, आकर्षक रंगाचा व पोताचा (टेक्ष्चर) वापर केलेले हे म्युरल नजर वेधून घेतेय एवढे मात्र नक्की. --------- ०९/०९/२०१६ . कुलाबा (अलीबाग) किल्ल्यातील उजव्या सोंडेचे गणेश पंचायतन. आपण सहसा विष्णूपंचायतन बघीतलेले असते पण गणेश पंचायतन कमी आहेत. हे किल्ल्यातील गणेश मंदीराच्या गाभार्‍यात आहे आणि हे मंदीर रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्र्यांचा नातु) यांनी १८व्या शतकात बांधले आहे. हा फोटो टिपलाय आपला भटकंतीचा ज्ञानकोष असलेल्या स्वच्छंदी_मनोज ने. डोळस भटकंती आणि अफाट माहितीचा खजिना हा मिपावरच्या अनेक लेख व प्रतिसादातून कायम दिसतो. त्याचे ह्या फोटोसोबतच मांडलेले विचार वाचायला हरकत नाही. .................................. "गणेश चित्रमालेची मिपावर घोषणा झाली आणि आपल्या जवळील गणपतीची चित्रे, फोटो पाठवण्याची विनंती झाल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण काय पाठवू शकतो. मग असे सुचले की आपण एवढे ट्रेक करतो आणि इतक्या वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी गणपतीच्या मुर्ती बघीतल्या आहेत, मग त्या किल्ल्यावर असोत, कि कुठल्या घाटवाटेत असोत, की कुठल्या लेण्यात असोत की कुठल्या गावातल्या मंदीरात, मग त्याच पाठवायला काय हरकत आहे. सध्या आजूबाजूला वर्षागणीक वाढत जाणारा गणपती उत्सवाचा आनंद बघितला की वाटून जाते की एखाद्या मुर्तीलापण मिरवून घ्यायला तिचे स्वतःचे नशीब लागत असावे. कोणे एके काळी (फार नाही हो फक्त काहीशे वर्षेच झाली असतील) ह्या किल्ल्यांवरच्या, आडवाटेवरच्या, कुठल्यातरी गुहेतल्या, दुर्गम आणि कोपर्‍यातल्या गावातल्या मंदीरातल्या ह्या गणेशमुर्ती पुजल्या जात होत्या, नवस बोलल्या जात होत्या. पण जशी जशी माणसांची गळती गावातून शहराकडे होऊ लागली तशी ही गणेश मंदीरे ओस पडू लागली. एके काळी ज्यांच्या समोर दिपमाळा लागल्या, नैवैद्य ठेवले गेले, आरत्या म्हटल्या गेल्या, नवस बोलले/फेडले गेले, गावातल्या पोरापासून थोरापर्यंत ज्यांनी त्याला तुच आमचा रक्षणकर्ता, तुच आमचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता असे म्हटले त्या गणाधीशाला असे वर्षभर भक्तांच्या दर्शनापासून वंचीत बघीतले की वाईट वाटते. ज्या मंदीरांनी विजयगाथा ऐकल्या, ज्या गणेशाने विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी भुमीका बजावली, ज्याच्यात तिथे मंत्रानी प्राणप्रतिष्ठा करून देवत्व फुंकले त्याच गणपतीला तिथेच त्याच जागी असे भक्तवंचीत बघून वाईट वाटते. शहरातल्या डिजेंच्या कोलाहालात, खिशातल्या पैश्यांच्या वजनावर भक्त जोखणारा, आमचाच राजा कसा श्रेष्ठ असे हिरीरीने ओरडणार्‍या कार्यकर्त्यांमधे हरवलेला गणपती उत्सव त्याला तरी आवडेल काय याची शंका वाटते. गणेशोत्सव हा सण न गणेश केंद्रीत न राहाता सत्ता आणि पैसा केंद्रीत झालाय किंवा होतोय की काय अशी शंका शहरातले उत्सव बघून वाटते. शेवटी देव हा देखील भक्तांचा भुकेला असतो हे खरे, पण न जाणे का पण माझे हात ह्या शहरातल्या मंदीरांपेक्षा त्या दुर्लक्षीत मंदीरातल्या एकदंताला जास्तच भक्तीभावाने जोडले जातात." ----------- १०/०९/२०१६ . हरिश्चंद्रगडावरचा हा बाप्पा राकट, कणखर, दगडाच्या देशाचा बाप्पा वाटतो कि नाही? अगदी त्याच्या ह्या शेंदूरमाखल्या रुपाला कॅमेर्‍यात उतरवलेय आपला मिपाकर मंदार भालेराव याने. सोबत कुणा अनामिक भक्ताने लावलेल्या अगरबत्तीचा दरवळ दिसतोय ह्या प्रकाशचित्रात. मंदारचे अनेक सुंदर अनुवाद मिपावर वाचायला मिळतात. प्रतिसादातून अन लेखनातून नवीन मिपाकराच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतोय असे म्हणायला हरकत नाही. ------------ ११/०९/२०१६ . मिपाकरांच्या वाढत्या अन उत्साही प्रतिसादाने आज मात्र मिपाचित्रमालेचे रूपांतर एका चित्रगॅलरीत झाले आहे. आज या गॅलरीत तीन सुंदर चित्रे विराजमान झाली आहेत. डावीकडून पहिले जे गणेशचित्र आहे, ते पाठवले आहे amol gawali यांनी. राजकारणावर आणि सामाजिक कार्टून्स काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. मध्यभागीचे जे चित्र आहे ते रेखाटले आहे ज्येष्ठ मिपाकर राजेश घासकडवी यांनी. उत्क्रांतीविषयक अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणार्‍या घासकडवी गुरुजीकडून ही सरप्राईज गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूचा झेंटँगल या चित्रकला शैलीतला गणेश आहे मिपाकर मोक्षदा यांचा. रासायनिक प्रदूषण टाळून नैसर्गिक गोष्टींचा पुरस्कार करणार्‍या चित्रकर्तीकडूनच गणेशाचे हे रूप आलेले आहे. ------------- १२/०९/२०१६ . उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या खोऱ्यामध्य १२,०७३ फूट उंचीवर तुंगनाथाचे शिखर उभे आहे. शिखराच्या माथ्यावर पंच- केदारांपैकी तिसरेे म्हणून गणले जाणारे १००० वर्षांचे जुने शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील हा द्वारपाल गणराया. ह्या अप्रतिम गणेशाला आपल्या भेटीसाठी आणलेय मनाने हिमालयातच मुक्काम ठोकून असलेल्या मिपाकर यशोधरा यांनी. ------------- १३/०९/२०१६ . आजचे प्रकाशचित्र कुणी पाठवले असावे ते सांगायची गरज नसावी. अर्थातच प्रचेतस. लेण्या, मंदीरे आणि इतिहासावर अत्यंत अभ्यासू लेखांचा धनी असणार्‍या प्रचेतसला भुलेश्वराने पाडलेली भूल मिपाकरांना परिचयाची आहे. पुणे-सोलापूर रोडवरील यवतनजिक असलेल्या भुलेश्वर मंदिरातील हे अप्रतिम वैनायकी/गणेशिनी शिल्प. जशा मातृका ह्या त्यांच्या पुरुष रुपाच्या शक्ती असतात तशी ही गणेशाची शक्ती शाक्त वा तंत्र पंथीयाकडून मानली जाते. -------------- १४/०९/२०२१६ . ह्या रॉकस्टार गणेशाला फोटोशॉप वापरुन सजवलेय मिपाकर कलावंत नीलमोहर यांनी. नेहमीच्या रंगीत माळांच्या उजेडात असणारा बाप्पा आज निऑनग्लो मध्ये स्टार बनलाय. -------------- १५/०९/२०१६ . आज समारोपाचे हे बॅनर देताना मला अतिशय समाधान वाटतेय. आपल्या मिपाचा हरहुन्नरी कलाकार स्पा याने खास मिपासाठी वेळात वेळ काढून ही गणेशाची प्रतिमा पाठवली आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर, थ्रीडी मॉडेलर आणि भयकथा लेखक म्हणून स्पा यांची मिपाला ओळख आहेच. सोबतच ह्या चित्रात ज्या काव्यमाला दिसताहेत त्या आहेत आपल्या मिपाकर साहित्यिक माधुरी विनायक यांच्या. जडणघडण सारख्या प्रांजळ लेखमालेतून आपला एक ठसा उमटवणार्‍या माधुरी विनायक यांनी ह्या भक्तीपूर्ण ओळी खास मिपाचित्रमालेसाठी लिहिल्यात हे विशेष.

वाचने 56178
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

तिनही कलाकृती जबरदस्त आवडल्या. नुलकर काकांचा ओरीगामी, सूडचे ग्लास पेंटींग आणि नुतन यांचे क्विलींग. शिवाय या धाग्याची मांडणीही सुंदर केली आहे. याच कलाकृती जशा आहेत तश्या पहायला मिळतील का? (म्हणजे त्यांचे वरीगीनल फोटो) गणपती बाप्पा मोरया. पैजारबुवा,

पेपरक्विलिंग बाप्पा सुरेख आहे नूतन! स्वाती

तीनही चित्रं एकापेक्षा एक सरस. चित्रावर क्लिक केल्यावर त्याची मोठी आवृत्ती पाहायला मिळण्याची सोय करता येईल का? विशेषतः पेपर क्विलिंगच्या चित्रात खूप बारकावे आहेत. मोठ्या चित्रात ते दिसायला मदत होईल.

आजचे बॅनर फारच आवडले. फारच "फेस्टिव्ह" वाटत आहे!! ह्या उपक्रमाचे परत कौतुक करावे वाटते. नुतन सारख्या, फारशा मुख्य बोर्डावर न लिहीणार्‍या आयडींकडे इतकी सुंदर कला आहे हे ह्या उपक्रमामुळेच कळाले. खरं तर अभ्या सारखे व्यावसायिक कलाकार असताना आणि रंगभुषा मंडळच अशा कलाकारांनी समृद्ध असताना, संपुर्ण गणेशोत्सवात त्यांनी एकाहुन एक सरस बॅनर्स दिले असते आणि संपुर्ण मिपाने त्यांना नावाजले असते.. पण अशावेळी स्वतःचे कौतुक मागे सारुन मंडळाने मिपावरच्या ह्या लपलेल्या कलाकारांना वाव देणे अत्यंत कौतुकास्पद आहे! मिपाकरांच्या कलाकृती आणि रंगभुषा मंडळाचे कौशल्य ह्यातुन अप्रतिम बॅनर्स बनत आहेत. अशा सर्वसमावेशक उपक्रमाबद्दल रंगभुषा मंडळाला धन्यवाद!

पेपर क्विलिंगचा गणपतीही सुरेख आहे! खरंच हा उपक्रम फारच आवडला. शिवाय रोज एक-एक लेख, पाकृ आणि बॅनर येत असल्यामुळे वाचायला वेळही पुरेसा मिळत आहे.

म्युरल फारच भारी आहे! कामाच्या व्यापातून वेळ मिळाला की असे एखादे स्वतःच्या घरासाठी बनवायची माझी इच्छा आहे. "झुमकुला" आयडी पण फारच भारी ;)

सर्वप्रथम या उपक्रमासाठी संचालक मंडळ व रंगभूषा मंडळाचे आभार. गणेशचित्रमाला या उपक्रमाने नवनवीन कलाकारांना एक व्यासपीठ लाभले आहे. आतापर्यंतच्या सर्वच कलाकृती खूप आवडल्या. मी हौस म्हणुन क्विलींग शिकायला सुरूवात केली व नातेवाईक तसेच मित्रमंडळींसाठी शुभेच्छा पत्र, वाचन खूणा, की चेन, गिफ्ट टॅग्स, निरनिराळ्या प्रकारचे कानातले, गाडीत लावायच्या बाप्पाच्या मस्तकावर टांगण्यासाठी छत्री असे अनेक प्रकार केले. मिपाच्या या उपक्रमामुळे मला क्विलींगचा बाप्पा करायची प्रेरणा मिळाली व गजाननाच्या चरणी अल्प सेवा रुजू झाली. सर्व सदस्यांचे व कौतुक करणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.

मिपाकरांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न आवडला. मिपाकरांनीही या संधीचं सोनं केलं. नुलकर काका, सूड, नुतन यांची कलाकारी आणि आजचे म्युरल अतिशय आवडले. या धाग्याचा दुवा कुठे सहज दिसेल असा देता येईल का? नविन चित्र पाहिले की त्याच्या मागचा कलाकार कोण आहे जाणण्यासाठी हा धागा शोधावा लागतो.

In reply to by सतिश गावडे

गणेशचित्रमालेच्या चित्राला या धाग्याची लिंक द्या

In reply to by पैसा

सर्वप्रथम सगळ्या प्रतिसादकांचे आभार, पैसाताई हे म्युरल टाकाऊतून टिकाऊ ह्या प्रेरणेतून बनवले होते. घरी फर्निचर चे काम चालू असताना राहिलेल्या लाकडी पट्ट्या आडव्या कापून पाठीमागे लावल्या. POP वापरून बाप्पा मोल्ड केला आणि थोडा ओबड धोबड मोल्ड केला जेणेकरून त्याला एक दगडी texture येईल. नंतर एक उरलेला सनमायकाचा तुकडा कापून त्यावर textured कागद चिटकवून त्यावर बाप्पा चिकटवले आणि वर्तनमानपत्रांचा कागद वापरून बाजूचे दोन आकार बनवले आणि वरून हॅन्डमेड पेपर चिटकवले. सगळ्यात शेवटी रंगकाम करून बाप्पाला भिंतीवर विराजमान केले.

क्विलींगी बाप्पा व म्युरली बाप्पा दोन्ही कलाकृती फारच आवडल्या गेल्या आहेत! ॲचकुली ह्यातल्या बऱ्याच प्रकारांबद्दल ऐकूनही माहिती नव्हते! फिलींग सो ब्याकवर्ड इन आर्ट! :( Sandy

नुतन आणि झुमकुला.. अजुन कलाकृती असतील तर इथे एक धागा काढा ना. कसं करतात हे ही सांगा. अनेकांना उपयोग होईल!

अतिशय सुबक आलाय फोटो. उजव्या सोंडेच्या गणपतीचे कर्मकांड फारच अवघड असते असे कुठेतरी ऐकलेले आठवते. कदाचित त्यामुळे या देवळात कोणी जात नसावा. अशा वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवरचे गणेश एकत्र लेखात येऊ देत!

पंचायतन ऐकून माहित होतं, पाहिलं पहिल्यांदाच. सुंदर आहे.

हरिश्चंद्रगडावरचा शेंदूरमाखला बाप्पा छानच.. (संपादकांनो, १०-१०-१६ पडली आहे तारीख चुकून तिला सप्टेंबरात आणा.) स्वाती

In reply to by यशोधरा

यशो तै फोटो जबर्या बरं का!!! याबद्दल अजून माहिती मिळेल का ??

बाप्पाची तिन्ही चित्रे आवडली. अमोल चित्रे छान काढतात हे माहित होते. मोक्षदाची कलाही माहित होती. श्री घासकडवी यांच्याकडून छान सरप्राईझ!

माझं चित्र स्वीकारल्याबद्दल मिपा चित्रसंपादकांचे आभार. मात्र चित्र प्रकाशित करताना काही कारणाने आस्पेक्ट रेशो बदलला गेला आहे. ते खूपच आडवं दिसतं आहे. तुलनेसाठी उजवीकडचं गणपतीचं जे चित्र आहे, साधारण त्याच लांबी-रुंदीप्रमाणाचं माझं चित्र आहे. ते मूळ आस्पेक्ट रेशोमध्ये छापावं ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

मा. घासकडवी गुरुजी, क्षमा असावी. घडल्या गोष्टीसाठी कारणे बरीच आहेत. पण ती न देता माफी मागतो. आता परत इमेज एडीट करुन अपलोड करायला थोडा वेळ लागेल, तेव्ढ्यात उद्याची बॅनर सेटिंग करायची आहे. त्यामुळे ते होईल असे वाटत नाही. आज सूट्टीचा दिवस असलेने दोन्ही बॅनर कालच पाठवलेले होते. येत्या २०१७ च्या गणेशोत्सवात तुमचे गणेशचित्र अगदी योग्य तुम्हास अपेक्षित अशा आस्पेक्टमध्ये लावले जाईल असे मी आश्वासन देतो. आपण उत्साहाने चित्र पाठवले त्याबद्दल धन्यवाद. झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो.

In reply to by अभ्या..

नो प्रॉब्लेम. माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाही. तुम्ही किती कष्ट घेऊन दररोज बॅनर बनवता तेव्हा एवढंसं काहीतरी झाल्यामुळे दुखावण्याइतक्या माझ्या भावना नाजूक नाहीत. सगळेजण चित्रांचं कौतुक करतात, पण तुम्ही दिलेल्या पार्श्वभूमीही सुंदर आहेत. विशेषतः ओरिगामीच्या चित्राला दिलेली कागदाला घड्या पडल्याच्या टेक्श्चरची आणि क्विलिंगच्या गणपतीला दिलेली कागदाच्या गुंडाळ्या केल्यासारखी पार्श्वभूमी आवडल्या. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. माझं गणपतीचं चित्र पुढच्यावेळी छापण्यापेक्षा - सगळ्यांचीच चित्रं याच धाग्यावर थोड्या मोठ्या आकारात छापता येतील का? म्हणजे चित्रांचे बारकावेही पाहाता येतील.

In reply to by राजेश घासकडवी

तुमचे चित्र चौरासाकृती दिसत असल्याने त्याला एक भारदस्तपणा आला आहे, "लंबोदर" हे फीचर आपोआपच अधोरेखित झाले आहे. मला आत्ता आहे तसेच आवडले.

यशो, द्वारपाल गणपती सुरेखच. तुझ्याकडून तुंगनाथाचे शिखर आणि त्या परिसराचे तेथल्या अनुभवांचे वर्णन ऐकायला सर्वांनाच नक्कीच आवडेल. स्वाती

मांडी ठोकून लाडू खाणारा बाप्पा खूप आवडला. कुठे भेटेल त्याचा काही नेम नाही! यशोधराने काढलेला फोटो फार सुरेख आहे!

चित्रमाला! वेगवेगळ्या भागातले गणपती एकत्रितपणे पाहून अजून भारी वाटल आणि एक विचार डोस्क्यात आला की अशाच आडवळणांच्या फक्त गणपतींच्या फोटोंचे संकलन व्हायला पाहिजे.... इथे मिपावरच! त्यात आणि बाहेरील देशाचे गणेश आले तर मोठा खजिनाच होईल! गणेशचित्रमाला ही कॉंसेप्ट फारच आवडल्या गेली आहे! कीप रॉकींग मिपा! Sandy

यशोधराताई, फोटो मस्तच! खरंच, तिकडच्या भेटीचे अजून अनुभव येऊ द्या! चित्रगॅलरीतलीही तीनही चित्रे आवडली! शिवाय सगळ्या कलाकृतींना शोभेल अशी बॅनर्स बनवण्यातल्या मेहनतीसाठी मंडळाचेही आभार!