मुंबई लोकल……..हिच्याबद्दल प्रेम वाटणारं कोणी असेल असं हिलाही वाटत नसावं. पण ती माझी फार आव़डती सखी आहे. सोळाव्या धोक्याच्या वर्षातल्या अतरंगी करामती वयापासून ते आजच्या ठाय लयीतल्या कुटुंबवत्सल आयुष्यापर्यंत हिने मला फार सुंदर साथ दिली आहे. लोकलचं बदलतं बाह्यरूप तो सब जाने है. पण तिची अंतरंग सुखदु:ख एखाद्यालाच सांगते ती. नीट ऐकणारा मात्र पाहिजे.
तिचं टेचात येणं पहात रहावसं. व्ही.टी. ला संध्याकाळी पाचनंतर फलाटाच्या दुतर्फा तुफान गर्दीची खडी ताजिम स्वीकारत ती राणीसारखी येते. रूळांवरून मोहक नागमो़डी लचके घेत. जणू रँपवर कॅटवॉक करणारी सेक्सी शुश्मिता सेन. बाईपणाचा सारा नखरा तिच्यात असतो. तिच्या ध़डधडण्याने गर्दीचीही ध़डकन वा़ढत जाते. हजारो प्रवासी जागा पकडायला धडपडतात. पडतात. जखमी होतात. कितीदा जीव गमावतात.
तिची रोजची चाल वेगळंच सांगते. दररोज प्लॅ़टफार्मवर उभं राहून तिला बघताना मनात येतं, आज काय बये घेऊन आलीस? कधी तिचं येणं म्हणजे सुखद धक्का. अगदी वेळेवर आणि कदम बरकदम. सगळ्याच लोकलसुंदर्या वेळेत आल्या, की मग गर्दीही नसते फारशी. चढताच मिळणारी जागा, हिंदकळत्या हँडल्सच्या तालावर रंगत जाणार्या गप्पा, वार्याची मस्त झुळूक आणि हातासरशी केलेलं शॉपिंगही. भाजीपासून ते ज्वेलरीपर्यंत. हा गर्दीमुक्तीयोग मात्र अतिदुर्मिळ…….उंबराच्या फुलासारखा. कधी फलाटावर दाखल होताना कर्कश्श न थांबणारा कर्णा वाजवत सखू येते. ही म्हणजे झालेल्या अपघाताची भयसूचना. पाठोपाठ स्टेशनवर अनाउन्समेंट! ऍम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर्ड हमाल यांच्यासाठी. जीव गोळा होतो त्या अनामिकांसाठी. कोणाचे काय झाले असेल? मनावर सकाळीच मळभ येतं अशाने. पण तिच्या खडखडाटात हळूहळू सारं काही विसरायला होतं. अगदी सक्काळीच घरात झालेला वाद , न आलेली कामवाली , किंचित दुखणारं डोकं यासारखं सगळं सगळं लोकलगर्दिर्पणमस्तु होउन जातं.
गर्दीच्या वाढता वाढता वाढे भस्मासुरात मुर्दाडमठ्ठ राजकारणी आणि प्रशासकांनी लाखोंचे बळी घेतले आहेत. कित्यकजण कायमचे अधूअपंग होउन बसले आहेत. लोकलच्या चौतीस वर्षे अखंडीत चाललेल्या अशा प्रवासयोगात पुष्कळ स्थित्यंतरं मला अनुभवायला मिळांल्येत. माझ्या सखीचा बाह्यरंग पूर्ण बदललाय. कित्येक वर्षे चॉकलेटी – क्रीम अशा दोरंगाचे कपडे घालणारी लोकल आज फुल्टू कमर्शियल अॅडक्वीन झाल्ये. तिच्यावर झंडू बाम पासून रिलायन्स जियोपर्यंत काहीही चिताडकाम रंगवलेलं असतं. जो पैसा देगा , उसका कपडा. पूर्वीची लोकल - ती जाणार कुठे हे तर सांगेच, पण मी कुठून आले आहे, हेसुध्दा प्रेमाने सांगत धावत असे. लोकल बदलली, रोज दिसणारी - भेटणारी माणसेही बदलत गेली. पण तिचा स्वभाव मात्र तसाच राहिला आहे. सगळ्यांना पोटात सामावून घेणारा. चार टोले देत घेत रफ-टफ जगायला शिकवणारा. आडवेतिडवे धावत , अडथळयांची शर्यत पार करत लोकल पकडताना जगण्याचा आत्मविश्वास देणारा. भोवतीचे अचाट विश्वरूप लोकलच्या एका डब्यात अनुभवायला देणारा. बाहेरच्या माणसांना पहाताक्षणी धडकी भरेल असं तिचं विक्राळ रूप आणि भयंकर प्रवासकथा सर्वश्रुत आहेत. पण, मला मात्र या मैत्रीणीबद्दल यापेक्षा काही वेगळं जाणवत गेलं, जे जे आवडलं-नावडलं ते शेअर करावसं वाटलं कोणाशीतरी, म्हणून मिपावर हा लेखनप्रपंच. पाचेक लेख सहज लिहू शकू असं आत्ता तरी वाटतंय. या अर्थाची हि लोकलपंची.
वाचने
8985
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच आहे.लिहा अजुन..
नेहामीप्रमाणेच उत्तम
अजून
In reply to नेहामीप्रमाणेच उत्तम by औरंगजेब
पहिलाच लेख आणि नेहमीप्रमाणे
In reply to नेहामीप्रमाणेच उत्तम by औरंगजेब
मिपावर पहिलाच पण इतर ठिकाणी लिहित असतील की.
In reply to पहिलाच लेख आणि नेहमीप्रमाणे by महासंग्राम
नाही ही माझी आई आहे. म्हणुन
In reply to पहिलाच लेख आणि नेहमीप्रमाणे by महासंग्राम
अरे वा! मस्तच!
In reply to नाही ही माझी आई आहे. म्हणुन by औरंगजेब
शाळेचे दिवस आठवले.
In reply to अरे वा! मस्तच! by बोका-ए-आझम
हाका नका मारू, असं सांगितलंय
In reply to शाळेचे दिवस आठवले. by अभ्या..
+१०० . काहि अप काहि डाउन .
खुपच छान लेखन
लेखन आवडलं.
धन्यवाद
ट्रॅकला क्रॅक
वेल सेड !
In reply to ट्रॅकला क्रॅक by नमकिन
लेख छान !
लेख आवडला! पुभाप्र!
मुंबई लोकलबद्दल चांगलं
मस्त
मस्त लेख!
सुरेख लिहिलंय
छान