✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

ट
ट्रेड मार्क यांनी
गुरुवार, 09/01/2016 - 02:22  ·  लेख
लेख
पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील. म्हणजे ते आले एप्रिलमध्ये आणि जाणार होते जुलै मध्ये, पण डिसेंबर पर्यंत पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. बरं महिन्याचा हप्ता जवळपास $४०० होत होता. मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं. किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधं भारतातून येताना बरोबर आणायला सांगितली. ते प्रथमच न्यू यॉर्कमध्ये आले असल्याने भरपूर भटकंती सुरु होती. अश्यातच वेस्ट कोस्टची ट्रिप ठरली. ग्रँड कॅन्यनला माझी ४ वर्षांची मुलगी माझ्याच बरोबर आलेल्या एका व्यक्तीमुळे जवळपास ४ फूट उंचीच्या दगडावरून पडली (त्यातले खास भारतीय व्यक्तींचे वागणे व तो अनुभव दुसऱ्या लेखात सांगीन). मुलीचा पाय दुखावला पण फ्रॅक्चर आहे का नाही ते कळेना. गाडीत बसल्यावर ती शांत झाली आणि मग आम्ही ४-५ तासांचा प्रवास करून वेगासमध्ये परत आलो. पायाला नक्की फ्रॅक्चर आहे का नुसताच मुरगळलाय ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) चर्चा करत होतो की काय करावं. अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या आणि खर्चाच्या भयानक कथा ऐकल्या होत्याच. त्यात इन्शुरन्स नसल्यामुळे कसं आणि काय होणार याची पण चिंता होती. वेगासला येईपर्यंत तसा उशीर झाला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला एका हॉस्पिटल मध्ये नेलं. तातडीच्या सेवेमध्ये (ER) हॉस्पिटलने दाखल करून घेतलं व आमची रवानगी एका खोलीत झाली. थोड्या वेळाने एक नर्स येऊन वय, वजन, उंची ई घेऊन गेली. मग अर्धा तास झाला, एक तास झाला आम्ही आपले वाट बघतोय. मध्ये २ वेळा विचारून आलो तर नुसतंच डॉक्टर येताहेत (Doctor is on his way) असं सांगत होते. डॉक्टर पण ग्रँड कॅन्यनहून येत होता की काय कोण जाणे. साधारण दीड तासाने एक माणूस डुलतडुलत आला म्हणलं चला आता उपचार चालू होतील, तर तो निघाला X-Ray काढणारा. पाय वेडावाकडा करून करून त्याने ५-६ X-Ray काढले व परत आमची रवानगी एका खोलीत झाली. आधीच्या अनुभवावरून फार लवकर काही होईल अशी आशा नव्हती पण यावेळेला फक्त ३ तासांनी डॉक्टर आले. तोपर्यंत आम्हाला फ्रॅक्चर आहे वा नाही हे पण कोणी सांगत नव्हतं. अमेरिकन प्रथेप्रमाणे छान छान बोलून डॉक्टरांनी सुरुवात केली. इथे माझ्या मनात मी म्हणतोय बाकी सगळं राहूद्या हो, आधी सांगा काय झालंय ते. पण नाही... आधी आमच्याशी, मग मुलीशी छान छान बोलून डॉक्टरांनी ५-७ मिनटं घालवलीच, मग मुद्द्यावर आले. घोट्याच्या २-३ इंच वर नडगीला अगदी बारीक (Hairline) फ्रॅक्चर होतं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आत्ताच्या फ्रॅक्चरच्या थोडं वर एक जुनं फ्रॅक्चर पण होतं जे भरून आलं होतं. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की ती या आधी कधी अशी पडली नाही किंवा पाय दुखतोय अशी तक्रार पण केली नाही, मग असं जुनं फ्रॅक्चर असणे कसं शक्य आहे? पण तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच येताय त्यामुळे आधीचं आम्हाला काही माहित नाही आणि जे दिसतंय ते आम्ही सांगतोय असं उत्तर देऊन प्रश्नच फेटाळून लावला. आता प्लॅस्टर घालायचं का विचारल्यावर नर्स येऊन घालेल म्हणाले. नशिबाने या वेळेला नर्स लवकर आली पण हातातलं सामान प्लॅस्टरचं वाटत नव्हतं. तिने पायाची पाहणी केली आणि मग एक पट्टीसारखं काहीतरी काढलं. जवळपास २ इंच रुंद आणि ३ फूट लांब असेल. ते पाण्यात भिजवलं आणि पोटरीच्या खालून अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत लावून त्याला पायाचा आकार दिला आणि ते वाळल्यावर स्ट्रेच बँडेज गुंडाळून टाकलं. एवढ्यात झालं का अश्या मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले तर म्हणाले झालं सगळं. तेवढ्यात परत डॉक्टर आले आणि म्हणाले तिला जर वाटलं तर २ आठवड्याने ते बॅंडेज बदलून टाका. मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे राहत नाही व २ दिवसात परत जर्सीला जाणार आहे, तर म्हणाले घरीच बदलून टाका. आम्ही विचारलं की तिचे X-Rays आणि रिपोर्ट्स मिळतील का? कारण जर जर्सीमध्ये डॉक्टरांना दाखवायचं असेल तर उपयोगी पडेल. तर CD वर कॉपी करून देतो म्हणाले. मी परत जुन्या फ्रॅक्चरचा विषय काढला, तर म्हणे तिची हाडं ठिसूळ आहेत. त्यावर लवकरात लवकर टेस्ट्स आणि ट्रीटमेंट करून घ्या. प्रकरण वाढलं तर ती नुसतं चालता चालता पडली तरी फ्रॅक्चर होईल. हे ऐकून आम्ही दोघे एकदम टेंशनमध्ये आलो. तेवढ्यात ते धडकी भरवणारे वाक्य आलं - बिल भरून या. जड पायांनी आणि धडधडत्या छातीने मी गेलो. बिलिंग डेस्कवरची स्त्री आणि माझा संवाद खालील प्रमाणे - ती: इन्शुरन्स कोणता आहे? मी: नाहीये. मी थोडक्यात तिला परिस्थिती समजवायचा प्रयत्न केला. परत मीच: घाबरत तिला बिल विचारलं ती: ३,५०० डॉलर्स माझ्या पोटात गोळा आला. जे भारतात ३,५०० रुपयात (तेव्हा) झालं असतं त्याला जवळपास २,००,००० रुपये द्यायचे? तिला बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं. ती: तुम्ही भरू शकता का? मी: हे बरेच पैसे आहेत. ती: तुम्ही यातले २०% भरू शकता का? $६०० वगैरे. माझ्या मनात एकदम बऱ्याच भावना आणि प्रश्न आले. त्यामुळे चेहऱ्यावर बावळट भाव आले असावेत. तिने पटकन माझ्याकडे एक फॉर्म दिला आणि म्हणाली हा भर, ६०० डॉलर दे की तुझं काम झालं. मी: (अविश्वासाने) बाकीचे पैसे मी नाही भरायचे? ती: नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. मी फॉर्म भरून दिला. ती: हे ६०० डॉलर्स तुला एकदम भरता येणार नसतील तर आपण महिन्याला ठराविक रक्कम ठरवू तेवढे भर. मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे. मी: ६०० डॉलर्स भरतो. पुढे एका विभागात जाऊन मी रिपोर्ट्सची CD घेतली व सकाळी ८ ला ER मध्ये गेलेलो आम्ही साधारण संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडलो. यात खरं काम किती वेळाचं तर फार तर १ तास, बाकी वेळ नुसतच बसून. उर्वरित ट्रिप तशीच लेकीचा "प्लॅस्टर" मधला पाय घेऊन पार पाडली. समारोप जर्सीला परत गेल्यावर ते रिपोर्ट्सचं पाकीट उघडलं. याआधी ते वाचायला वेळ झाला नव्हता. ३ पानी रिपोर्ट वाचता वाचता दुसऱ्या पानावर एका परिच्छेदात काय लिहिलं होतं त्याचा संदर्भच लागेना. लिहिलं होतं - किडनीच्या आजाराचे डिटेल्स, किडनीमधून स्टेंट टाकल्याचे आणि अजून कसलेकसले मार्क्स आहेत. आम्हाला दोघांनाही काय करावे ते कळेना. भारतात आमच्या डॉक्टरना फोन झाले. अमेरिकेतल्या डॉक्टर असलेल्या माझ्या चुलत बहिणीला विचारून झालं पण कोणाला काही कळेना. मग दुसऱ्या दिवशी वेगासमधल्या हॉस्पिटलला फोन केला. त्यांनी शांतपणे सांगितलं की टाईप करताना चुकलं असेल. म्हणलं प्रत्येक पानावर रुग्णाचं नाव लिहिलंय आणि पानावरचा एकच परिच्छेद कसा चुकू शकतो? तर ते म्हणे झालं असेल चुकून, तुम्ही दुर्लक्ष करा. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला बायकोमुलींची सुट्टी वाढवायला लागली. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे बायकोमुलीं सुट्टीनंतर परत जाणार होते व मी एकटा अमेरिकेत राहणार होतो. परंतु, मुलीच्या हाडांच्या ठिसूळपणाचं पुढे योग्य निदान आणि उपचार करावे म्हणून आम्ही सगळ्यांनीच अमेरिकेतला गाशा गुंडाळून परत जायचं ठरवलं. दरम्यान पुढील १-२ महिन्यांमध्ये त्या हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून $५०-$६० ची २-३ बिलं आली, जी मी भरली. भारतात परत आल्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ् आहेत त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Dexa Scan केलं. त्याचे रिपोर्ट्स व अमेरिकेतले रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो. Dexa Scan रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणले ती व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. मी अमेरिकेतले रिपोर्ट्स दाखवले. ते बघून ते म्हणाले कि अमेरिकन स्टॅंडर्डप्रमाणे सगळ्याच भारतीयांची बोन डेन्सिटी कमी असते. त्यामुळे ते लोक म्हणतात की तुमची हाडं ठिसूळ आहेत. पण तसं काही नसतं आणि तुमच्या मुलीलाही काही झालेलं नाहीये. अशी ही अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्सची गम्मत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
58303 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/01/2016 - 21:40 नवीन
इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कदाचित किडन्या विकाव्या लागतील असा अंदाज आहे!! -- अबबबब. नुसती कटकट. आता मी बायको आणि मुलाला इकडे घेऊन आलो नाही ते योग्य केले असे वाटायला लागलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या

योगेश कोकरे
गुरुवार, 09/01/2016 - 18:27 नवीन
भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या वर धागा काढा आता . कोणी कोणी कोणत्या वैद्यकीय मदतीसाठी भारतात आले होते आणि त्यामुळे त्यांचे किती पैसे वाचले ह्या बद्दल मिपाकरांनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी . मेडिकल ट्रीटमेंट चा दर्जा ऊस(US) मध्ये चांगला असेल तर मग इकडे का बरं यावं. असो अखिल भारतीय स्वस्तात मस्त संघटना आपले कायम स्वागत करेल भारतात ......
  • Log in or register to post comments

मलाही अजुन दर्जात फरक नाही

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 18:35 नवीन
मलाही अजुन दर्जात फरक नाही जाणवलाय. म्हणजे हे पैसे नक्की कशाचे आहेत आणि तमाम अमेरिकन जनता का ते सहन करते आहे देवच जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे

पैसे कशाचे .... ?

चौकटराजा
गुरुवार, 09/01/2016 - 18:50 नवीन
दुसर्‍या देशामधे युद्ध लावायचे शस्स्त्रात्रे विकायची अर्थव्यवस्था मोठी होते दरडोकी उत्पन्न वाढते क्रयशक्ती वाढते अशावेळी दर्जाचा काय संबंध....आपल्या कडील काही श्रीमंत मंडळी कांदा आवक कमी झाली की कोणत्याही भावाने कोणत्याही दर्जाचा कांदा घेतोच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी सुट्टीसाठी आले असताना

रेवती
गुरुवार, 09/01/2016 - 18:46 नवीन
मी सुट्टीसाठी आले असताना धडपडले. हॉस्पि. मध्ये सेवा चांगली मिळाली. इन्शुरन्स आहे पण त्यासाठी २४ तास अ‍ॅडमिट व्हावं लागेल, त्याकळात फक्त निरिक्षणाखाली ठेवलं जाईल असं सांगितलं. मला फ्रॅक्चर असल्याने कास्ट घालावा लागणारच होता पण नियमात बसण्यासाठी थांबायची तयारी नव्हती म्हणून इन्शू. न वापरता उपचार करवून घेतले. तिथे काही तासां चे १५०००रु बिल आले ते भरले. हामेरिकेत असे करणे परवडले नसते. हामेरिकेत अनुभवलेली सेवा (दर्जा) व भारतातील सेवा सुदैवाने सारखी अनुभवास आली. इथे किरकोळ फरक ध्यानात घेतले नाहीत. सुदैवाने दिसेल त्या हॉस्पि. मधे जाण्याची वेळ आली नाही तर चांगल्या ठिकाणीच नेले गेले हे ही होतेच. अगदी चुका काढायच्याच तर मोडक्या पेशंटास कमीत कमी दुखवून कपडे बदलावेत ही गरज होती, त्यावेळी इतर गप्पा चालू होत्या, तसेच हामेरिकेत पेशंटास तयार करून ठेवले व दीड तास वाट बघत झोपवले. हे सोडता तक्रार नाही. हॉस्पि.च्या बर्‍या सेवेबद्दल तुम्ही समधान व्यक्त करू शकता ..........आनंद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे

तुमचा अनुभव

फेरफटका
गुरुवार, 09/01/2016 - 20:08 नवीन
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कुठेही रहायचं असल्यास तिथल्या पद्धतीनं राहिल्यास गोष्टी सुकर होतात. अमेरिकेत टेंपररी येणारे - बहुतेक आय.टी. वाले, अमेरिकेत राहून, देसीपणा, जुगाड करून रहातात आणी चटका बसला की भारताचे गोडवे गातात असं माझं निरिक्षण आहे. तसच आणी तितकच, अमेरिकेतून भारतात सुट्टीसाठी गेल्यावर अमेरिकन सुविधांची अपेक्षा भारतात करतात आणी नाकं मुरडतात हा सुद्धा अनुभव कॉमन आहे. ह्या वाक्यात जनरलायझेशन वगैरे नाहीये आणी ते ज्याला लागू पडत नाही त्याने मनावर घेऊ नये. पण हा अनुभव खोटा नाहीये आणी अपवादात्मक सुद्धा नाहीये. ज्याला जिथे आवडतं, पटतं, जमतं तिथे रहाण्याचा चॉईस असल्यास आनंदाने तिथे रहावं पण एकीकडे राहून, दुसर्या ठिकाणचे फायदे हवेत, पण तिथल्या त्रुटी नकोत असे नकाश्रू वहायचे - बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स- ही अपेक्षा अवास्तव आहे.
  • Log in or register to post comments

मुद्दा पटतोय तुमचा कारण मी

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 20:12 नवीन
मुद्दा पटतोय तुमचा कारण मी सुद्धा असे लोक पाहिले आहेत. पण फक्त वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी हे माझे मत आहे. ह्यात बेस्ट ऑफ बोथ वर्ड्ल्सचा प्रश्न नाही. ही मुलभुत गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

वैद्यकीय सुविधा

फेरफटका
गुरुवार, 09/01/2016 - 20:40 नवीन
"वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी" - सहमत. चांगले - वाईट अनुभव दोन्हीकडचे आहेत. प्रश्न आपल्या कंफर्ट झोन चा आणी कुठल्याही सिस्टीम ला सरावायचा आहे. अमेरिकेत सुद्धा डॉक्टर ला संध्याकाळी घरी फोन करून किंवा टेक्स्ट मेसेज करून सल्ला घेतला आहे, किंबहून डॉक्टर ने स्वतः सुद्धा शनिवारी टेक्स्ट करून मुलाच्या तब्ब्येतीची चौकशी केलेली आहे. भारतात जायच्या दिवशी मुलगा आजारी पडला असताना, त्या पिडीयाट्रीशीयन ने ऑफिस अवर च्या अर्धा तास आधी येऊन तपासणी करून औषध प्रिस्क्राईब केलं आणी फारमसिस्ट ला फोन करून ते अगदी तयार करून ठेवायला सांगितलं आणी वेळ आलीच तर म्हणून स्वतःकडची सँपल्स पण दिली. हे अनुभव सगळीकडे येतात. चांगला ईंश्यूरन्स असेल तर बाळंतपणं पूर्णपणे फुकट सद्धा होतात. आणी त्या च्या विरुद्ध टोक म्हणजे भारतातल्या एका दंतवैद्याने अर्धवट केलेलं रूट कॅनॉल, केवळ तुम्ही अमेरिकेत रहाता म्हणून आम्ही तुमच्याकडून जास्त पैसे घेतो असं सांगून घेतलेले जास्त पैसे (मग, आम्ही गरिबांकडून घेत नाही . आयजीच्या जीवावर बायजी उदार) हे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. तरीसुद्धा कुठलीही एक सिस्टीम संपूर्ण चांगली / वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ज्या सिस्टीम मधे रहायचं त्या सिस्टीम चे संकेत, नियम पाळल्यास ते सुकर - सुसह्य होतं ईतकच मी म्हणीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

आजानुकर्ण
गुरुवार, 09/01/2016 - 20:45 नवीन
फेरफटका दोन्ही प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

अर्थातच..

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 20:55 नवीन
अर्थातच.. भारतातल्या वैद्यकीय सुविधेबद्दल खुप चर्चा आधीच झालेली आहे. मुर्ख डॉक्टर सगळीकडेच असु शकतात. भारतातली सुविधा किमान आवाक्यात तरी आहे हेच काय ते सुदैव! ह्या चर्चेतुन ह्या सिस्टीममध्ये ज्यांना रहायचं आहे त्यांना ती अधिकाधिक सुकर कशी होईल हेच शोधायचे आहे. नवख्यांना अनेक गोष्टी माहिती नसतात. अनेकदा केवळ माहिती नाही म्हणुन अकारण बरेच जास्त पैसे भरावे लागतात. त्या दृष्टिने ही चर्चा महत्वाची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

याला पूर्ण सहमत

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 20:57 नवीन
याला पूर्ण सहमत ते संकेत, नियम सांगणे हाच उद्देश होता. बहुधा सफल झाला नसावा. लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, कमी जास्त झालं असेल ते सांभाळून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

+100, दोन्ही प्रतिसादांना !

प्रियान
Fri, 09/02/2016 - 01:51 नवीन
+100, दोन्ही प्रतिसादांना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

फेरफटका यांच्या प्रतिसादांना,

प्रियान
Fri, 09/02/2016 - 01:52 नवीन
फेरफटका यांच्या प्रतिसादांना, असे म्हणायचे होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियान

धाग्याचा उद्देश

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 20:54 नवीन
धाग्याचा उद्देश फक्त माझा अनुभव सांगणे आणि त्यातून बाकीच्यांना काही झालीच तर मदत हा आहे. इथली वैद्यकीय व्यवस्था गंडलेली आहे हे म्हणणं म्हणजे शिव्या घालणं नसून फक्त माझं झालेलं इम्प्रेशन आहे. तिथल्या पद्धतीने राहायचं म्हणजे या प्रसंगात काय करायला पाहिजे होतं ते स्पष्ट केलंत तर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन होईल. तुमच्याशी काही अशी अंशी सहमत. तुम्ही म्हणताय अनुभव खोटा नाहीये पण तो मनुष्य स्वभाव नाही का? साध्या हॉटेलात बसून खाताना लोक म्हणतात की कधी ५ स्टार मध्ये खायला मिळेल आणि ५ स्टार मध्ये गेल्यावर खाद्यपदार्थांना साध्या हॉटेलात कशी चव छान असते हे बोलतात. फक्त भारतीयच नाही तर अमेरिकन्स पण इथल्या हेल्थ सिस्टिमला शिव्या घालतात. पिरा म्हणतात तसं वैद्यकीय सेवा ही जीवनावश्यक आहे. त्यामुळे ती तरी आवाक्यात हवी. आपल्याकडून कोणी उगाच पैसे जास्त काढत नाही ना, जे पैसे आपण मोजतोय ते त्या सेवेसाठी योग्य आहेत ना, एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना घेणं याला देसीपणा, जुगाड कसं म्हणता येईल? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

साधारण अंदाज येण्यासाठी या साधनांचा उपयोग करू शकता

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 21:22 नवीन
MDsave PriceCheck Estimate My Costs
  • Log in or register to post comments

ईंशूरन्स

फेरफटका
गुरुवार, 09/01/2016 - 21:28 नवीन
अगदी सुरूवातीला लिहील्याप्रमाणे तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. ह्या शेअरींग मधून खूप गोष्टींचा उहापोह होतो आणी बरीच वेगळी माहिती मिळते. ईंशूरन्स ईंडस्ट्री ने बर्याच क्षेत्रांना वेठीस धरलय हे तर खरंच आहे. पण त्यातही अधिक - उणं आहेच. आणी कितीही सरकर-बदल वगैरे झाले तरी ईतकी मोठी आणी खोलवर रुजलेली सिस्टीम फार मोठे बदल सामावून घेऊ नाही शकत. आपल्या हातात चांगला ईंश्यूरन्स घेणं, तुम्ही म्हणता तसं जास्तीत जास्त प्रश्न विचारून स्वतःला वेल-ईन्फॉर्म्ड ठेवणं हे असतं. एक चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेत डॉक्टर ला प्रश्न विचारल्याचा राग येत नाही. किंबहूना तुम्ही विचाराल तितकी तुमच्या तब्ब्येतीची माहिती, औषधांची माहिती, आफ्टर-केअर विषयी महिती तुम्हाला दिली जाते. ह्यातली बरीचशी न विचारता सुद्धा दिली जाते. कदाचित ह्या ईंश्यूरन्स ईंडस्ट्री च्या दणक्यामुळे सुद्धा तसं असावं. पण सवय नसताना कधी कधी गांगरून जायला पण होतं. २०% पैसे मागण्यामागे मला वाटतं की जर तुमचा ईंन्शूरन्स नसेल तर निदान ऑपरेटींग कॉस्ट तरी वसूल व्हावी हा उद्देश असावा. बाकीचं बिल बहूदा बॅड डेट म्हणून राईट-ऑफ केलं असावं. पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत. ईमर्जन्सी रूम मधे वाट पहायला लागणे हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे. पण वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे तुम्ही बरेच वेळा मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतो. "एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना" - ह्या बाबतीत माझं तरी असं मत आहे की यू गेट व्हॉट यू पेड फॉर.
  • Log in or register to post comments

सहमत

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 23:21 नवीन
पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत.
हे महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट. इथे नियमाप्रमाणे पहिले उपचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पैसे देऊ शकता की नाही, कसे आणि कधी देणार हे सगळं नंतर येतं. त्यामुळे पहिले पैसे भरा मगच उपचार सुरु करू असं इथे होत नाही.
मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतो
मान्य. मी केवळ ER मध्ये गेलं की तत्पर सेवा मिळेल अशी कोणी अपेक्षा ठेवू नये म्हणून सांगितलंय. मी तिथे भांडलो नाही, आवाज चढवला नाही वा शिव्याही घातल्या नाहीत. पण मी म्हणल्याप्रमाणे सगळे निवांत दिसत होते, म्हणून मग असं वाटलं की इथे माझी मुलगी त्रासात आहे तर तिला तरी पटकन ट्रीटमेंट द्या. दुसऱ्याबाजूने विचार केला तर ER मध्ये आलो म्हणून जास्त पैसे घेतात, मग काहीतरी SLA पाहिजे ना. नुसता एक्सरे काढायला २ तास, पुढे प्लॅस्टर (?) घालायला ३ तास. तेवढा वेळ मुलींसकट आम्ही उपाशी. पाणी प्यायचं असेल तर फक्त फाऊंटनवरून. बाहेर जाता येत नाही कारण ते कधी बोलावताहेत ते माहित नाही. त्यामुळे जरा अनुभव सांगावासा वाटला. तसंही प्रत्येकाला आपला पेशंट जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मलाही वाटले असेल तेव्हा की लवकर उपचार मिळावेत.
यू गेट व्हॉट यू पेड फॉर
नॉट ऑल्वेज ट्रू. एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये मी हॉटेलच्या वेबसाईट वरून रूम बुकिंग केलं तर $XX मध्ये मिळते आणि तेच priceline, expedia ई वरून केलं तर $XX - Y मध्ये मिळते. तर इथे काय फरक असेल? अश्या वेळेला उगाच बाणेदारपणा कशाला दाखवा? काही काही गोष्टीत देसीगीरी दाखवायला लागते त्याला काही उपाय नाही. उदा. इथे रेस्टोरंटमध्ये एका प्लेटमध्ये एवढं मिळतं की आम्ही दोघे खाऊ शकतो. मग आम्ही सरळ २ प्लेट घेऊन चौघे खातो. काही लोक विचित्र नजरेने बघतात पण काही पर्याय नाही. उगाच ४ प्लेट घ्यायच्या आणि टाकून द्यायचं पटत नाही आणि बांधून घरी घेऊन गेलं तर शिळं चांगलं लागत नाही. त्यामुळे आम्ही इग्नोर करतो त्या नजरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

http://mobile.nytimes.com

सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 21:29 नवीन
http://mobile.nytimes.com/2015/09/21/business/a-huge-overnight-increase-in-a-drugs-price-raises-protests.html औषधांच्या किमतीवर नियंत्रण नसल्याचे तोटे.
  • Log in or register to post comments

मुक्त बाजारपेठ

फेरफटका
गुरुवार, 09/01/2016 - 21:43 नवीन
मुक्त बाजारपेठेची फायदे-तोटे आपण सर्वजण च भोगतो. त्याची दुसरी बाजू - खुली स्पर्धा ही पण आहेच. हे बघा: http://www.cbsnews.com/news/express-scripts-will-offer-1-alternative-to-750-daraprim-pill/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

३५००?

पद्माक्षी
गुरुवार, 09/01/2016 - 21:32 नवीन
काही असले तरी प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते ? रच्याकने, अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात?
  • Log in or register to post comments

समर्थन

फेरफटका
गुरुवार, 09/01/2016 - 21:40 नवीन
"प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते" - किती डॉलर्स पर्यंत समर्थन होऊ शकेल? हा प्रश्न उपरोधिक आहे ह्याची मला जाणीव आहे. पण कुठल्याही गोष्टीची किंमत ठरवताना बर्याच गोष्टी त्यात अंतर्भूत असतात - ज्यात फिक्स्ड कॉस्ट, ओव्हरहेड वगैरे पण येतं. "अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात" - मी कुठेही अमेरिकेचा बचाव वगैरे केला नाहीये. ज्याला जिथे सुखानं रहाता येईल तिथे रहावं, ज्या सिस्टीम मधे रहायचं असेल त्याचे संकेत / नियम पाळून रहावं, चांगले-वाईट अनुभव सगळीकडे येतात असा साधारण माझा सूर आहे. मांडलेल्या अडचणीवर एक दुसरी बाजू मांडली तर ते बचाव / समर्थन नाही तर, चर्चेची दुसरी बाजू आहे. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धागाकर्त्याचं अभिनंदन केलं ते त्याच भुमिकेतून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी

कॉस्ट संदर्भात.

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 21:54 नवीन
कॉस्ट संदर्भात. अगदी इमर्जन्सी नसली तरी इथे खुप जास्त पैसे लावतात. जसे की डोळ्यांच्या डॉक कदे पहिली व्हिजिट मुलाची,५८२$, एक्स रे - ४००$ इ. मुलाच्या वेलनेस व्हिजिट्चे (ज्यात अगदीच प्राथमिक तपासणी झाली) आम्हाला काही बिल नसले तरी डॉक्टरने ८५०$ क्लेम केले आहेत. तर इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते. एकवेळ जिथे मनुष्यबळ लागते तिथे मी समजु शकते. पण केवळ एक्स रे "काढण्याचे" ४००$ कसे काय होऊ शकतात? इतकी कसली कॉस्ट आहे? इथल्या जनतेचे पगार काय ते नक्की माहिती नाही, पण उत्पन्नाच्या मानाने अशा साध्या गोष्टींची कॉस्ट मला तरी जास्त वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका

तुमचा इन्शू पुन्हा एकदा

रेवती
गुरुवार, 09/01/2016 - 21:59 नवीन
तुमचा इन्शू पुन्हा एकदा तपासावास असे सुचवते. आम्हीही डोळे तपासून घेतो पण एवढी बिले अजून तरी आली नाहियेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 22:01 नवीन
कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की काय तपासुन घेऊ? डोळे तपासले, काही प्रॉब्लेम नाही म्हणाले आणि इतकं बिल पाठवलं.. ह्यात मी नक्की काय करु शकते. आमचा डोळ्यांचाही इनशुरन्स आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थांब जरा, एवढे लिहिणे जमणार

रेवती
गुरुवार, 09/01/2016 - 22:06 नवीन
थांब जरा, एवढे लिहिणे जमणार नाही. माझे उत्तर तयार झाले की फोन करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एवढे बिल

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 22:45 नवीन
तुम्हाला एवढे पैसे देणं आहे का टोटल बिल एवढं आहे? डोळ्याच्या इन्शुरन्समध्ये नेत्रतपासणी फुकट असते. एक्सरे चे जास्त पैसे लावलेत असं मला वाटतंय. रेवतीताई म्हणतायेत त्याप्रमाणे एकदा इन्शुरन्स काय आहे ते तपासून बघा. इथल्या जनतेचे पगार तुलनेने कमी असतात. NJ मध्ये personal per capita income of $50,781 आहे तर हाऊसहोल्ड इनकम (दोघेही काम करतात असं समजलं तर) $७२००० च्या आसपास आहे. बहुतेक करून IT वाल्यांना यापेक्षा बरा पगार असतो. अवांतर: इथल्या शाळाशिक्षकाला पगाराची सुरुवात साधारण ३०-३५००० डॉलर पासून होते तर पोलिसाला साधारण ४५-५०००० डॉलर्स पगार मिळतो. मला व्यनी करून कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवलेत तर मी काहीतरी सांगू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कॉस्ट

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 22:54 नवीन
इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते. पिराताई: तुमच्या दुसर्‍या धाग्यात दिलेलं स्पष्टीकरण (चार्जमास्टर) हे कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करेल. तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला फोन करून 'साध्या' टेस्ट्स ची त्या हॉस्पिटल मधील त्यांची निगोशिएटेड किंमत काय आहे ते विचारा (तो तुमचा हक्क आहे), तुमच्या विभागातल्या फेअर प्राईस अंदाजावरून ती अवास्तव असेल तर ती तशी का आहे ते त्यांना विचारा. काही वेळा ते सभासद गमावण्यापेक्षा निगोशिएट करून चार्जेस कमी करतात. वचने किं दरिद्रता? फोन-पलिकडचे इंन्शुरन्स एजंट काही तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाहीत, ना तुम्ही त्यांना, नुसतं विचारण्याने फायदा होत असेल तर बोलून पहायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कॉस्ट संदर्भात.

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/01/2016 - 23:11 नवीन
पैसे जास्त का वाटतात ते कळले नाही ? डॉलर वि. रुपया अश्या हिशोबामुळे तुम्हाला कदाचित ते जास्त वाटत असावेत. तुम्ही भारतात आहात आणि एक्स रे साठी ५०० रु. डॉक्टर चार्ज ८५० रु. असा विचार करुन पाहिला तर कदाचित जास्त वाटणार नाही. फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा ! अवांतर (तुम्हाला उद्देशुन नाही) : बाहेर देशात जाताना घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुलनेची पद्धत चुकीची आहे

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 23:35 नवीन
फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा !
याच धर्तीवर रुपयाच्या जागी डॉलर लिहा... भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग एक्सरे साठी $५०० द्यायला काहीच हरकत नाही. $१० लक्ष पगार - कधी येणार तो दिवस? सगळ्यांनी प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा रे.
घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?
तसं नाही म्हणणार मी. फेफा साहेब/ ताई (?) जसं म्हणताहेत की नवीन जागी तुम्हाला तिथले नियम किंवा हे कसं चालतं हे माहित नसतं म्हणून सुरुवातीला त्रास वाटतो. कोणी सांगणारं असेल किंवा स्वानुभवातून एकदा कळलं की मग काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

भारतात मला समजा रु. १० लक्ष

पिवळा डांबिस
Fri, 09/02/2016 - 01:46 नवीन
भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग
हा तुमच्या आणि तुमच्या एम्प्लॉयरच्या मधला प्रश्न आहे की नाही ट्रेडमार्कसाहेब? त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे? :) अमेरिकन हेल्थ केअर सिस्टीम ही त्यांनी त्यांच्या नागरिकांसाठी बनवलेली आहे. तिथे प्रत्येक काम करणार्‍या व्यक्तिने हेल्थ इन्शुरन्स बाळगणं हे अपेक्षित आहे. जे रिटायर्ड वा अतीगरीब अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी अनुक्रमे मेडिकेअर आणि मेडिकेड हे फुकट/स्वस्तातले इन्शुरन्स आहेत. दर्जाच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ कारणांसाठी भारत आणि अमेरिका इथे फारसा फरक नाही. पण इमर्जन्सी/ मोठ्या कारणांसाठी उपचार (इन्क्लूडिंग चाईल्डबर्थ) ह्याचा विचार केला तर दर्जात अजीन-अस्मानाचा फरक आहे. एक स्वतःचा अनुभव सांगतो... अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीला एकदा अचानक भोवळ आली. तेंव्हा मी तिच्यासमोरच उभा असल्याने मी तिला पडण्यापासून सावरलं आणि बेडवर निजवलं. ९११ ला कॉल केलं. आता हॉस्पिटलला जावं लागणार म्हणून कपडे बदलले आणि शूज घालेपर्यंत (५-७ मिनिटे) दारावर नॉक झालं. दार उघडून बघतो तर बाहेर पोलीस उभा. "मेडिकल इमर्जन्सी?" "येस" "व्हेअर इज द पेशन्ट?" "इन द बेडरूम" तो पोलीस बाजूला झाला, त्याच्यामागे उभे असलेले दोन पॅरामेडीक्स आत शिरले. त्यांनी पेशंटला त्यांच्याबरोबर आणलेल्या फोल्डिग व्हीलचेअरवर बसवलं, तिथेच सलाईन चालू केलं. पेशन्ट अजून बेशुद्धच.... मी काही सांगू गेलो तर त्यांनी मला थांबवून त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, "विच इज युवर हॉस्पिटल?" मी सांगितल्यावर ते ती व्हीलचेअर घेऊन दोन जिने उअतरून निघून गेले. मी घराला कुलूप लावून खाली येऊन बघतो तर पुढे पोलीस कार आणि मागे अ‍ॅम्ब्युलन्स लाईटस लावून सायरन मारत बघता बघता भरधाव निघून गेले. त्यांच्या मागे मी शक्य तितल्या वेगाने पण सिगन्ल्स पाळत हॉस्पिटलात पोहोचलो (अंदाजे १५ मिनिटांचा ड्राईव्ह). मी गाडी पार्क करून आत जाऊन बघतो तर त्यांनी तिला अ‍ॅडमिट करून घेऊन आधीच उपचार सुरू केले होते. पेशन्ट शुद्धीवर आणला गेला होता, टेस्टींगसाटी ब्लड घेऊन ते लॅबला पाठवलं गेलं होतं.... लॉन्ग स्टोरी शॉर्ट, रात्रभर ऑब्झर्व्हेशनखाली ठेवून दुसर्‍या दिवशी पेश्न्टला डिस्चार्ज मिळाला. दुखण्याचं निदान आणि त्यावरची प्रिस्क्रिप्शन्स मिळाली... खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल. बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला.... सारांश काय, की इन्शुरन्स चांगला भरवशाच्या कंपनीकडून हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय

ट्रेड मार्क
Fri, 09/02/2016 - 02:15 नवीन
त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे?
धर्मराजांनी $५०० आणि रु. ५०० सारखे माना म्हणलं म्हणून मी ते उदाहरण दिलं हो. माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे. बाकी तुम्ही सांगितलेला अनुभव बरोबर आहे आणि इतकी तत्पर सेवा मिळते यात वादच नाही. बाकी भरवशाच्या इन्शुरन्सकडून पण बरेच अडवणुकीचे किस्से आहेत. त्यामुळे भरवशाची म्हैस कधी कधी टोणगा पण देऊ शकते ;) इन्शुरन्स असो वा नसो इतकीच तत्पर सेवा प्रत्येकाला मिळेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जरूर

पिवळा डांबिस
Fri, 09/02/2016 - 07:54 नवीन
माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे.
मी फारसा आस्तिक नाही त्यामुळे माझ्या प्रार्थनेचा कितपत उपयोग होईल ते माहिती नाही... पण तुमच्यासाठी आणि अशा अन्य लोकांसाठी मी जरूर प्रार्थना करीन. शेवटी सगळ्यांचं कल्याण झाल्याशी मतलब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

पिडाकाका, हे असे पाहिजे.

उदय
Tue, 09/13/2016 - 21:44 नवीन
पिडाकाका, हे असे पाहिजे. एक स्वतःचा अनुभव सांगतो... अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे........ खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल. बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला.... आता कुठलाही इंश्युरन्स ३० डॉलरमध्ये इआरमध्ये पाऊल टाकू देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये

रुपी
Wed, 09/14/2016 - 01:52 नवीन
मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्हाला $३५ आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

पण तुझी डिलिव्हरी सुद्धा

पिलीयन रायडर
Wed, 09/14/2016 - 04:24 नवीन
पण तुझी डिलिव्हरी सुद्धा काहीही न देता झालीये ना? इकडे आम्च्या मित्राला ६ हजार खर्च आलाय. इन्शुरन्स मुळे हा फरक पडतोय. तुझा इन्शुरन्स खुप चांगला असणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

खूप चांगला आहे असं म्हणणं

रुपी
Wed, 09/14/2016 - 04:39 नवीन
खूप चांगला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. कारण माझ्या इन्शुरन्समध्येही बरे-वाईट सगळेच आहे. माझा आत्तापर्यंतचा अनुभव चांगला आहे खरा. शिवाय, डिडक्टेबल हा त्यातला एक भाग झाला. कुठल्या डॉक्टरकडे जाता येऊ शकते, स्पेशॅलिस्टची गरज पडली तर काय, ट्रॅव्हल करताना गरज पडली तर काय अशा अनेक बाबी आहेत. त्यादृष्टीने सगळ्यांनाच हा इन्शुरन्स जमेल/ आवडेल असेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ते ओबामा केअर चा फार गवगवा

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 22:28 नवीन
ते ओबामा केअर चा फार गवगवा झालेला मागे, काय स्थिती आहे आता? तेव्हा बरीच चर्चा वाचलेली, आता काय आठवत नाहीये,
  • Log in or register to post comments

ओबामाकेअर

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/01/2016 - 22:51 नवीन
मला फारशी माहिती नाही याबद्दल. पण माझ्यामते हे फक्त सिटिझन्ससाठी आहे. त्यातही इन्शुरन्स कंपन्यांचा बऱ्यापैकी विरोध आहे याला. कोणी माहितगार असेल तर अधिक माहिती पुरवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नागरिक आणि पर्मनंट रेसिडेंट्स

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 23:02 नवीन
अफोर्डेबल हेल्थकेअर अ‍ॅक्ट (ओबामाकेअर) मधील तरतुदींचा फायदा* फक्त अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड-धारक पर्मनंट रेसिडेंट्स यांना उपलब्ध आहे. (* फायदा: ही वादग्रस्त गोष्ट आहे, निवडणूकीत बरंच भलंबुरं ऐकायला मिळेल!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हामरिकेत असे अचानक तर रेटस

अभ्या..
गुरुवार, 09/01/2016 - 23:06 नवीन
हामरिकेत असे अचानक तर रेटस वाढले नसतील ना? एकतर पहिल्यापासूनच डॉक्टर हा प्रकार महागडा असतो असे काहीतरी असणार किंवा काहीतरी ट्रिगर झाले असणार कि (उदा रिस्टरिक्षन्स, अव्हेलिबिलिटी, सिक्युअर दृष्टिकोन) तेव्हापासून वैद्यकीय सेवा महागल्या.
  • Log in or register to post comments

रेटस बद्दल कल्पना नाही

अनन्त अवधुत
Fri, 09/02/2016 - 07:01 नवीन
पण ओबामा केअर आल्यापासून इन्शुरन्स कडून डॉक्टर्सना कुठल्याही तपासणीसाठी जे प्री-अप्रूव्हल मिळायचे त्याला फार वेळ लागतोय असे मला डेंटिस्ट कडे कळले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अमेरिकेत किंमती जास्त का?

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 23:45 नवीन
काही नेहेमी सांगितली जाणारी कारणं:
  • इथल्या प्रॅक्टिसमध्ये मेडिको-लीगल अ‍ॅक्शनच्या दबावाखाली कदाचित अनावश्यक अशा अतिरेकी निदान-चाचण्या,
  • औषध कंपन्यांनी आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांनी पेटंट्सच्या खर्चाच्या (आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये अयशस्वी ठरणार्‍या कँडिडेट ड्रग्ज च्या खर्चाच्या) कारणास्तव चढत्या किंमती ठेवणं, तसंच
  • मानवी वेळाच्या (लेबर चार्जेस) तुलनेने आधिक किंमती.
या दुव्यातूनः It is difficult to untangle precisely why prices are higher in the U.S., but two things are apparent: U.S. physicians get higher incomes than in other countries and the U.S. uses more expensive diagnostic procedures. More generally, with so many different kinds of insurance, no one organization has a strong incentive to cut out wasteful practices and ensure that all Americans get value for the very high levels of expenditure incurred when they are sick. मला भीती आहे ती ही हेच सगळं इंन्शुअरन्स कंपन्यांच्या सुळसुळाटाने भारतातही येऊ घातलं आहे, नव्हे मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे! जाता जाता: ही किंमतीतील वाढ गेल्या १५ वर्षा॓ंत किती अतोनात आहे ते पहाण्यासारखं आहे!
  • Log in or register to post comments

मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी

रेवती
Fri, 09/02/2016 - 00:02 नवीन
मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे! सहमत. माझ्याबाबतीतही तेच झाले. २४ तास ऑब्झर्वेशनखाली ठेवून मग कास्ट घालू म्हणाले. का ते माहित नाहे व तो इन्शू. कंपनीचा नियम आहे म्हणाले. तसे येथे होत नाही. त्यावेळी भारतात मला आलेली ती अडचणच होती......फक्त परवडत होते म्हणून ते झाले. नाहीतर १ दिवस वाट पहावी लागली असती. माझ्या वडिलांनाही इन्शू. कं. च्या नियमामुळे अमूक एक ट्रीटमेंटच करून घ्यायला हवी अशी सक्ती केली गेली होती. त्यांनी इन्शू. नाकारून हवी ते ट्रीटमेंत चांगल्या हॉस्पि. मध्ये कमी दरात करून घेतली.
  • Log in or register to post comments

ट्रेडमार्क, खरंच धागा काढून

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 02:03 नवीन
ट्रेडमार्क, खरंच धागा काढून तुम्हीं खूप चांगले काम केलेत, बरीच चांगली आणि उपयुक्त माहिती सर्वाना मिळाली, 911 च्या तात्काळ मेडिक सर्वीसासारखी आपल्याकडे महाराष्ट्रात ambulance सेवा सुरू झाली आहे, 15 मिन turn around time आहे, शहरात लोकांना माहित नाही पण खेड्यापाड्यात, गावांमध्ये चांगली चालू आहे, 108 ला कॉल करावा!
  • Log in or register to post comments

काय सांगता?

पिवळा डांबिस
Fri, 09/02/2016 - 08:07 नवीन
911 च्या तात्काळ मेडिक सर्वीसासारखी आपल्याकडे महाराष्ट्रात ambulance सेवा सुरू झाली आहे, 15 मिन turn around time आहे, शहरात लोकांना माहित नाही पण खेड्यापाड्यात, गावांमध्ये चांगली चालू आहे,
:) हे जर खरं असेल तर आनंदच आहे. विशेषतः खेड्यापाड्यांत, गावांमध्ये ९११ च्या तोडीची सेवा मिळत असेल तर हार्दिक अभिनंदन! मला हल्लीची भारतीय शहरांतली विशेष माहिती नाही, खेड्यापाड्यां- गावांची तर कधीच अजिबात माहिती नव्हती. तेंव्हा भारतातील जाणकारांकडून अधिक माहितीच्या अपेक्षेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सद्यस्थितीत मी नगर, नाशिक,

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 09:02 नवीन
सद्यस्थितीत मी नगर, नाशिक, पुणे ह्या तिन्ही जिल्ह्यांत कामानिमित्त भरपूर प्रवास करतोय, वरील अनुभव स्वत:चे निरिक्षण आहे. पक्षाची जाहिरात नाही, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बाकी ते 3500 डॉलरचे बिल 600

अभिजीत अवलिया
Fri, 09/02/2016 - 02:44 नवीन
बाकी ते 3500 डॉलरचे बिल 600 डॉलर केल्याबद्दल त्या बाईची खणा नारळाने ओटी भरायला पाहिजे होती.
  • Log in or register to post comments

हाहा... खरंय, विचार होता माझा

ट्रेड मार्क
Fri, 09/02/2016 - 05:17 नवीन
फेफा साहेब म्हणल्याप्रमाणे मीही इथली प्रथा पाळावी म्हणून तिला मिठी मारणार होतो. पण विचार का रद्द करावा लागला ते लेखात सांगितलंच आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

अमेरीकेत शक्यतो भारतीय दंतवैद्याकडे जायचे

नेत्रेश
Fri, 09/02/2016 - 07:02 नवीन
जनरली कसलेही बील लावत नाहीत. रुट कॅनाल, सिरॅमीक क्राउन वगैरे यासाठी पण को-पे घेत नाहीत. सेवा उत्तम असते. सगळे पैसे ईंशुरंस कंपनीकडुन वसुल करुन घेतात. बाकी ई.आर. चा अनुभव अमेरीकेत सगळीकडे सारखाच दीसेल. खरोखर ईमर्जन्सी असेल तर तात्काळ उपचार मिळतात. नाहीतर जेवढावेळ थांबु शकतो तेवढा वेळ बसउन ठेवतात. ईकडे कायद्याने कुणालाही वैद्यकीय सेवा ईमर्जन्सी मध्ये नाकारु शकत नाहीत. ईंशुरंस कींवा पैसे नसले तरीही. त्यामुळे बरेच गरीब, गरजु, ईलिगल ईमिग्रंटस, होमलेस, भिकारी, ड्रग अ‍ॅडीक्ट वगैरे लोक बारीक सारीक उपचारा साठी ईआर मध्ये बिनदीक्कत उपचार घेतात. त्यांची बिले थोडीफार सरकार कडुन मिळतात. पण त्या मुळे बाकी लोकांसाठी वैद्यकीय सेवा महाग होते. तसेही अती बील लावले तर लोक पैसे बुडवण्याची भीती असते. म्हणुन बहुतेक हॉस्पिटलस इंशुरन्स नसणार्‍यांना स्वतःहुन डीस्काउंट देतात.
  • Log in or register to post comments

+ 1 अमेरीकेत शक्यतो भारतीय दंतवैद्याकडे जायचे

अनन्त अवधुत
Fri, 09/02/2016 - 11:26 नवीन
हो, मी आधी इथल्या एका डेंटिस्ट कडे जात होतो. पहिल्या तपासणीसाठी गेल्यावर त्याने जवळ जवळ 9000 चा प्लॅन मला दिला. प्लॅन 3-4 वर्षासाठी होता. या 3-4 वर्षात मला 2000 बिल भरावे लागणार होते. मी नाही म्हणालो. दुसऱयांदा क्लिंनिंग साठी गेल्यावर पण परत तीच उजळणी झाली. आधी त्याच्या असिस्टंटने, मग त्याने डेंटल प्लॅन सांगितला. अर्थात मी परत एकदा त्या ट्रीटमेंटला नाही म्हणालो. पुढच्यावर्षी कळले कि तो डेंटिस्ट आता प्लॅन मध्ये नाही. पुढचा डेंटिस्ट नेमका पंजाबी मुंडा सापडला. "तेरे दातो को कुछ नहीं हुआ है | एक रूट कॅनाल कराना पडेगा." असे म्हणून विषय संपवला. ते रूट कॅनाल पण त्याने 2 वर्षांनी केले. खर्च 500 डॉलर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा