Skip to main content

भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 21/08/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ? मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो.... ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत? जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !

वाचने 43795
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

In reply to by तेजस आठवले

गुरखा हे नेपाळीच. मूळ शब्द गोरक्षक. नैसर्गिक अंगकाठी काटक, चपळ, शिस्तबद्धता आणि आदेशपालनात सर्वोत्कृष्ट अशे यांची खासियत आहे. ही माणसे धन्याला अतिशय लॉयल असल्याने त्यांना अनेक ठिकाणी आपलेसे केले गेले आहे. सिण्गापुरात दंगल नियंत्रनानिमित्त गोरखांना पाचारण केले गेले, आज सिंगापुरात गोरखा कायदा सुव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामागे त्यांचे अत्युच्च दर्जाचे सेवाव्रती असणे हे आहेच. इतर अनेक गोष्टी आहेत.

In reply to by संदीप डांगे

मूळ शब्द गोरक्षक आहे ह्याबद्दल काही खात्री नाही, आता जालावर चेक केले. असे काहीही नाही आढळले (च्यायला, कुठनं कुठनं काय वाचनात येतं कोण जाणे) चुकीच्या माहितीसाठी क्षमा असावी.

In reply to by तेजस आठवले

गुरखा/गोरखा, लिंबु, लेपचा, भुटीया ह्या पूर्वी हिमालयीन राज्यांतल्या (नेपाळ, उत्तर बंगाल, सिक्कीम) इथल्या लढाऊ जमाती होत, ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लहानखुरी चण पण विलक्षण लढाऊ बाणा, अतिशय जास्त चिवटपणा, मुळात पहाडी जमाती असल्यामुळे ह्या जमाती विलक्षण जास्त काटक असतात, ह्यांच्यासाठी सिंगापूरच नाही तर अगदी ब्रिटन सुद्धा आजही खुले आहे, आजही ब्रिटिश आर्मी गोरखा रेजिमेंट मेन्टेन करते अन रिटायर्ड गोरखा जवानांस रिटायरमेंट नंतर नागरिकत्व मिळण्याचे ऑप्शन सुद्धा बहुतेक खुले असते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ह्यांची पेरेंट रेजिमेंट सुद्धा गोरखाच होय, अन गोरख्यांबद्दल त्यांनी एक विलक्षण वाक्य म्हणून ठेवले आहे "जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मृत्यूला घाबरत नाही तेव्हा, एकतर तुम्ही खोटे बोलता आहात किंवा तुम्ही गोरखा आहात"(If u say u do not fear death, either you are lying or u r a Gorkha), गोरखे कालीभक्त असून त्यांचा युद्धघोष हा "जय महाकाली, आयो गोरखाली" हा असतो, वरती सांगितल्याप्रमाणे, गोरखा रेजिमेंट मध्ये गोरखा सोबत इतर भारतीय जमाती म्हणजेच लिंबु (ही खरेतर नेपाळी जमात) लेपचा, भुटीया (ह्या सिक्कीमीज जमाती होत) सुद्धा भरती केल्या जातात, गोरखाज ने मिळवलेली पदके, गौरव अन त्यांचे युद्ध सन्मान (बॅटल ऑनर्स) पाहूनच छाती दडपून जाईल इतके अतुलनीय अन प्रचंड शौर्य गोरखा जवानांनी अन अधिकारी मंडळीने गाजवले आहे, त्यांना अधिकारी मंडळी अतिशय लाडाने "जॉनीज", असे म्हणते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरेच निरागसही असतात हे लोक्स. बालपण इंडस्ट्रीयल एरीयामधे गेल्यामुळे बर्‍याच गुरखा वॉचमन लोकांशी दोस्ती होती...गफ्फा मारायला खूप मजा येते या लोकांबरोबर. एक गुरखा तर रेल्वेतून उतरल्यावर सात दीवस चालत घरी जातो कारण खूप दर्‍याखोर्‍यात घर आहे त्याचे.

In reply to by खटपट्या

होय, भोळे असतात अन निस्सीम इमानदार, बंगाल मधून एकदा एका सुट्टीला घरी जाणाऱ्या गोरखा जवानाने (बिष्णु श्रेष्ठ) गँगरेप अन दरोडा ह्याच्या प्रयत्नात असलेले , जवळपास १५ सशस्त्र दरोडेखोर एकदम उरावर घेतले होते, ते ही फक्त आपली खुकुरी परजत!, २ सप्टेंबर २०१० मध्ये, मुळात गाडीवर दरोडा पडला तेव्हा ३५ वर्षांचा श्रेष्ठ निवांत झोपला होता, त्याला दरोडेखोरांनी उठवले तेव्हा तो त्यांना मुकाट पैसे देणार होता, तितक्यात दरोडेखोरांनी एका १८ वर्षीय मुलीला उचलले, त्यावेळी मात्र श्रेष्ठ ने भडकून एकदम सगळे उरावर घेतले होते, आधीच गोरखा, त्यात सैनिक, त्यातही भारतीय थलसैन्यातला, बॉस त्याला तोड तोडगा चेटूक काहीच नसते, डोके फिरले की संपले! श्रेष्ठची कथा आपण इथे वाचू शकता . (लढ्यात जखमी झालेला श्रेष्ठ) . (अतुलनीय शौर्य प्रदर्शनासाठी सेना मेडल घेताना श्रेष्ठ)

In reply to by खटपट्या

श्रेष्ठची कथा वाचून मलाही काही वर्षांपूर्वी वाचलेली एका ब्रिटिश गोरखा सैनिकाची शौर्यगाथा आठवली. दिपप्रसाद पुन याच नाव, अफगाणिस्तान मध्ये असताना एकट्याने 30 तालिबान सैनिकांचा एकट्याने खातमा केला. http://www.nationalturk.com/en/hero-british-army-gurkha-soldiers-dippra…

In reply to by अमितदादा

होय, दीपप्रसाद पुन अन "आय लव्ह न्यूयॉर्क" प्रिंट ची (फक्त) बॉक्सर चड्डी घातलेला अन पोस्ट वर तालिबानी हल्ला झाला म्हणून तसाच बंकर मध्ये रायफल घेऊन उभा राहिलेला अमेरिकन सैनिक झॅकरी बॉईड हे खासे प्रसिद्ध झाले होते

खूप माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत.
भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...
हे शीर्षक वाचून दचकले होते. पण प्रतिसाद वाचून जीव भांड्यात पडला.

In reply to by पैसा

तुझ्याहून डब्बल मी दचकलो होतो =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

=)) साहजिक आहे!

सोन्याबापू यांचा प्रतिसाद दिलासादायक आहे. निदान सैन्यात तरी जातीपातीवरून उच्चनीच मानसिकता नाही. तरीदेखिल सामान्य नागरीकांचा समज हा दिसणार्‍या रेजिमेंटच्या नावावरूनच होतो (जसा माझा आणि इतर वाचकांचा या आधी होता). लोकांची जातीबाबतीतची मानसिकता बदलणे हे फारच कठीण आहे, त्यामुळे ही नावे बदलून सैन्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात थोडासा फरक पडणार असेल तर ह्या जातीच्या नावांना चिकटून रहाण्यात विशेष हशील आहे असे वाटत नाही.

Short Service Commission बद्दल अधिक माहिती मिळेल का ? माझ्या अपुर्‍या माहितीनुसार यामधे १५ वर्षेच सर्विस असते आणि नंतर रीटायरमेंट असते ( काही लोकांनाच पर्मनंट कमिशन मिळते)

In reply to by ओम शतानन्द

सैन्यात १००% आरक्षण आहे आणि त्यासाठी आपली जात फक्त मनाने आणि शरीराने "भारतीय" असणे आवश्यक आहे. बाकी कोणत्याही जातीला प्रवेश नाही.

In reply to by चंपाबाई

चरुन मरायला अनेकजण देशाबाहेर चालले आहेत... त्या दुर्दैवी जीवांचं कौतुक करण्याचा नतद्रष्टपणा सुद्धा चालु आहे.

हाच निकष लावला तर कधीतरी होणार्या लढाईसाठी सैन्यतरी कशाला? शत्रु आला कि भरती सुरु करावी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काय खतरनाक फिलॉसॉफी आहे. डांगे साहेब आणि बापुसाहेब.. दोघांनाही धन्यवाद.

सैन्यामध्ये अधिकारी, सुभेदार आणि इतर रँक मध्ये जातीय आणि प्रांतिक भेदभाव नसला तरी उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो. प्रांतिक सीमावाद नसतो हे म्हण्यासाठी ठीक आहे पण "ग्राही-ग्राही" हा शब्द खूप प्रचलित आहे सैन्यामध्ये. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by विशुमित

सेनेत अधिकारी आणि जवान हे खांद्याला खांदा लावून छातीवर गोळी झेलतात. कारगिलपासून मागे इतिहासात जात जात कोणतेही युद्ध घ्या, तुम्हाला प्रत्येक लढाई-चकमकीत अधिकारी कामी आलेले आढळतील. युद्धभूमीवर तुम्ही मागे उभे राहून, कमरेवर हात ठेवून हुकूम सोडू शकत नाही. तुमच्या एका हुकुमावर तुमचे जवान जिवाची पर्वा न करता शिर हातावर घेऊन लढावेत अशी जर तुमची अधिकारी म्हणून अपेक्षा असेल (आणि ती तशी असायलाच हवी. शेवटी देशाचा प्रश्न आहे), तर तेवढा आदर, दरारा, विश्वास, प्रेम आणि धाक हे तुम्हाला घाम गाळून, प्रसंगी रक्त सांडून कमवावे लागतात. कारण ज्याने बॉम्बगोळ्यांच्या वर्षावात तुमचा हुकूम मानायचा आहे, तोही एक अभिमानी, कर्तव्यपरायण सैनिक असतो. हे असे नाते निर्माण करायचे असेल, तर अधिकारी आणि जवान यांच्यामध्ये प्रसंगी निकटता आणि प्रसंगी अंतर हे दोन्ही असणे जरुरी आहे. जातिसंस्था हे आजही भारतीय समाजातील एक कटुसत्य आहे. सेना ही समाजाचाच भाग असून सैनिक हे व्यापक समाजाइतकेच भले-बुरे असतात. जातिअंत हे ध्येय म्हणून कितीही उच्च असले, तरी ते अंमलात आणणे हे सेनेचे कार्य नव्हे. समाजाच्या सर्व बलाबलस्थानांनी युक्त असे सैनिक एकत्र करून, त्यांना प्रशिक्षित करून, त्यांना कुशल आणि प्रेरणादायक नेतृत्व देऊन देशरक्षणासाठी तयार करणे हे सेनेचे कार्य आहे. जातिभावनेमुळे कुणाही सैनिकावर अन्याय होणार नाही आणि या भावनेचा राष्ट्रकार्यासाठी सकारात्मक उपयोग होईल इतकेच सेना करू शकते, आणि करतेही. वरील शब्द politically incorrect वाटतील, पण ते सत्य आहेत. पण उद्या, जातिविरहित सैन्य हे आपले कार्य अधिक निष्ठेने व कुशलतेने करू शकेल अशी सामाजिक प्रगती भारतात झाली तर भारतीय सेना सर्व जातिविशिष्ट पलटणी ताबडतोब विसर्जित करील याबद्दल मला तरी मुळीच शंका नाही. पण ती वेळ अजून यायची आहे.

In reply to by चलत मुसाफिर

जातीच्या संदर्भाबाबत प्रतिक्रियेशी सहमत. सैन्यामध्ये कोणाची जात काढणे हा खूप मोठा गुन्हा आहे. पण माझा सैन्यामधील हुद्यानुसार उच्च- निचतेबद्दल संभ्रम आहे. ट्रूप/कंपनीच्या आतमध्ये आणि युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळाला, हे मी माझ्या एका काकांच्या बरोबर दिघी येथे अनुभवलं आहे. कमांड हॉस्पिटल मध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार हुद्यावर असणाऱ्यांना विशेष वागणूक दिली जाते, असे मला आलेल्या अनुभवावरून दिसले. आहाराच्या मेनू/रेशन मध्ये सुद्धा रँक नुसार फरक असतो, असे ऐकले आहे. असे का हे समजले नाही. CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते, हे पटलं नाही. मी अधिकारी वर्गाच्या आकसातून हे लिहले नाही पण प्रत्येक सैनिकाला त्याच्या कामा व्यतिरिक्त सोयी सुविधा आणि वागणूक समान मिळाली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. शेवटी प्रत्येक सैनिक हा प्राण पणाला लावून, हाल अपेष्टा सोसत देशाचं रक्षण करत असतात. (इथे "प्रत्येक सैनिक" सर्व सैनिक या अर्थाने घ्यावा) मिपा/अन्य सोशल मीडिया वरती भारतीय सैन्याच्या कार्यपद्धती बदल विचार मांडणे, विरोध करणे, चुका शोधणे हे कायदेशीर/नैतिकतेच्या कक्षेत बसते का? हे जाणकारांनी समजून सांगावे, ही विनंती. नसेल तर मी माझी प्रतिक्रिया मागे घेतो. (हा पळपुटेपणा समजला जाऊ शकतो पण भारतीय सैन्य ही आपल्या भारतीयांसाठी अति संवेदनशील बाब आहे आणि मला तो आदर टुचभर ही कमी होऊन द्यायचा नाही)

In reply to by विशुमित

सैन्यातील हुद्द्यांची उतरंड ही युद्धक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निर्माण केलेली आहे. शंभर लोकांची कंपनी जर एका व्यूहरचनेनुसार बिनचूक हल्ला करू शकली नाही तर लढाई जिंकता येणार नाही. युद्ध सांगून होत नसते. आज्ञापालनाची मानसिकता सैन्यातील प्रत्येकाच्या (अधिकारी व जवान दोन्ही) रक्तात भिनलेली असते. ती शांतिकालातही तशीच शाबूत रहावी यासाठी सदोदित, निरंतर, कठोर प्रशिक्षण हे सेनेचे इतिकर्तव्य होऊन बसते. त्यात मानसिकता हा मूळ मुद्दा असल्यामुळे "नोकरी आणि घर" असा फरक करणे अशक्य असते. पण हुद्दा काहीही असला तरी अखेर प्रत्येकजण हा पलटणीसाठी प्राणाला पेटून लढणारा सैनिकच असतो.

In reply to by चलत मुसाफिर

विशुमत सर, चमु सर, थोड्या वेळात ह्या विषयावर माझे विचार मांडतो, ते परिपूर्ण असावेत त्यांच्यावर प्रश्न येऊ नयेत असे नाही तर माझ्या अल्पमतीला जे सुचतील ते सांगतो

In reply to by विशुमित

विशुमित साहेब भारतीय सैन्यात कॊणतीही जात किंवा धर्म मानला जात नाही. धर्म हा प्रत्येकाच्या घरात बंदिस्त असतो. उदा दहीहंडीसाठी हुल्लडबाजी किंवा मशिदीवर भोंगे लावले जात नाहीत. परंतु ज्येष्ठ आणि कनिष्ठ हे मात्र फार कसोशीने पाळले जाते. लष्करात एका पातळीपर्यंत लोकशाही आहे आणि जेवढी आहे ती नागरी लोकांच्या पेक्षाही नक्कीच जास्त चांगली आहे. परंतु जेंव्हा प्रत्यक्ष कामाची वेळ येते तेंव्हा हुकूमशाहीच आहे(आणि असावी लागते.) एखाद्या वेळेस अधिकाऱ्यांनी सैनिकाला दिसताक्षणीच गोळ्या घालायचा आदेश दिला तर तो त्याने विनातक्रार पाळलाच पाहिजे. अन्यथा दंगली, आंदोलने इ. वेळेस हे तर आपलेच लोक आहेत मी गोळ्या चालवणार नाही असे सैनिक म्हणून लागले तर अनागोंदी होऊ शकते. मी विक्रांत वर असताना आमच्या कॅप्टन ने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते कि डॉक्टर, बहुसंख्य वेळेस मी तुला असे का करायचे त्याचे स्पष्टीकरण देईन. परंतु काही वेळेस हे स्पष्टीकरण तुला मिळणार नाही आणि तू केवळ मी आज्ञा दिली म्हणून ती तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. अधिकारी आणि सैनिक यामध्ये सुद्धा असा सुस्पष्ट फरक केला जातो आणि हा भरती पासून कसोशीने पाळला जातो. सैनिकांच्या डोक्यात हा माणूस अधिकारी आहे आणि त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे याबद्दल कोणताही किंतु असता कामा नये. यासाठी पायदळ नौदल आणि वायुदलात त्यांची मेस वेगळी असते. त्यांची घरे वेगळी असतात. त्यांना मिळणाऱ्या सुविधा या त्यांच्या हुद्दयाप्रमाणेच असतात.रेशन मध्ये फरक नाही. उलट सैनिकांना गणवेश बूट इ गोष्टी फुकट मिळत असत आणि अधिकाऱ्यांना मात्र विकत घ्याव्या लागत. अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता मिळत असे (पण २००५ साली सात वर्षात एकदा ७०००/- रुपये मिळत आणि माझ्या नौदलातील पांढरा गणवेश विकत घेऊन धुवून पांढरा शुभ्र वापरण्यायोग्य ठेवणे यासाठी हा भत्ता फारच अपुरा असे) आता तो १४०००/- आहे. मेस मध्ये सैनिकांना जेवण पूर्ण फुकट असते. अधिकाऱ्यांना आपले जेवण अधिकाऱ्यांच्या इतमामाने ठेवण्यासाठी साधारणपाने रेशन मिळून सुद्धा महिना १८००-२००० रुपये अतिरिक्त द्यावे लागत. बाहेरून दिसताना अधिकाऱ्यांचे जेवण हे जास्त चकाचक दिसते आणि लोकांचा गैरसमज होतो. CSD कॅन्टीनमध्ये सुद्धा अधिकारी-सुभेदार-आणि इतर रँक वाल्यांसाठी वेगळी लाईन असते हे एक बहुसंख्य नागरी माणसांना न पटणारे कारण आहे. पण कुठेतरी हा माणूस वरिष्ठ आहे हे सारखे सैनिकांच्या मनावर बिंबवले जावे यासाठी या गोष्टी वेगळ्या असत. जहाजात किंवा रेजिमेंट मध्ये रोज सैनिक आणि अधिकारी एकाच वातावरणात राहत असतात. त्यातून लष्करी अधिकारी आणि आजकाल सैनिक यांची पदवी एकच असते. बी ए किंवा बी एस सी. त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड निर्माण होऊ शकतो, इंजिनियर किंवा डॉक्टर या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असा प्रश्न कमी वेळेस येतो. इंजिनियरिंगचे वरिष्ट सैनिक हे पदविका धारक (डिप्लोमा) असतात. आणि अधिकारी पदवी धारक असतात. वैद्यकीय खात्यात तर डॉक्टर आणि इतर असा सरळ फरक असल्याने हा प्रश्न कधीच येत नाही. "अतिपरिचयात अवज्ञा" होऊ नये म्हणून या गोष्टी फार कसोशीने पाळाव्या लागतात. वायुदलात (आणि नौदलात) एकंदर सैनिकांचे शिक्षण बऱ्याच वरच्या पातळीचे असते आणि बरेच सैनिक पदवीधर आहेत त्यामुळे सैनिकांना आपण अधिकाऱ्यांपेक्षा कमी नाही असा गंड पटकन होऊ शकतो त्यातून वायुदल हे फक्त ८० वर्षे अस्तित्वात आहे आणि त्यांच्या परंपरा अशा नाहीतच. त्यामुळे तेथे शिस्तीच्या बाबतीत परिस्थिती थोडी कठीण आहे. वायुदल हे वैमानिकांचे, वैमानिकांसाठी आणि वैमानिकाने चालविलेले असे मला एका वायुदलाच्या तळावर वायुसैनिकाने सांगितले होते. त्याला मी ताडकन जबाब दिला होता कि जेंव्हा युद्ध होईल तेंव्हा वायुदलात प्रत्यक्ष लढाईत लढणारा माणूस हा वैमानिकच असेल आणि तू वायुदलाच्या तळावर शान्त बसलेला असशील. नौदलात आणि पायदळात अधिकारी आणि सैनिक (च काय डॉक्टर सुद्धा) दोघेही प्रत्यक्ष युद्धात भाग घेत असतात. त्याच्या आगाऊपणाला उत्तर देण्यासाठी मी थोडी अतिशयोक्ती केली असली तरी हि सत्य गोष्ट आहे. नौदलात असताना आमच्या कॅप्टनने स्पष्ट आदेश दिलेले होते कि अन्न फुकट गेले तरी चालेल पण अधिकाऱ्यांचे अन्न सैनिकांना( अधिकाऱ्यांचे आचारी वाढपी इ सैनिक असले तरीही) देता येणार नाही. त्यांनी त्यांचे जेवण सैनिकांच्या मेस मध्ये "च" जाऊन घेतले पाहिजे. सैनिक आणि अधिकारी यातील हा फरक त्यांना कायम डोक्यात ठेवलाच पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती मध्ये हा प्रोटोकॉल समजू शकतो पण "फॅमिली वेलफेर" सारख्या कार्यक्रमामध्ये जो सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असतो तिथे ही हा भेदभाव पाहायला मिळतो कारण प्रत्यक्ष युद्धाचे वेळेस सैनिकांना शिस्त लावायला वेळ मिळत नाही. जगभरात कोणत्याही लष्करात पूर्ण लोकशाही आणणे अशक्य आहे. मग ते अमेरिकन असो कि फ्रेंच. तेथील सैनिक ही अशाच तर्हेच्या तक्रारी करत असतात.

In reply to by सुबोध खरे

पाकिस्तानात असेच असते का ? की ते अब्दालीला फॉलो करतात ? ( अब्दाली रात्री टेहळणी करत असताना मराठा सैन्य तळात त्याला छोट्या छोट्या शेकोट्या व धूर दिसला.. उसने पूछा ये क्या है ? उसका नौकर बोल्या ... खाविंद ! ये लोग जात , पोटजात , धर्म , पद , वर्ण के अनुसार अलग अलग खाना पकाते है.. अब्दाली बोल्या ... जो लोग खाने कू एक नहीं होते वो लडने कू एक कैसे होंगे ? देख लेना अल्ला की दुवा से हमही जीतेंगे ! इस्वास पाटलांच्या पुस्तकात लिवलय . )

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

विश्वास पाटलानी पुस्तकात लिहिलय. ( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. )

In reply to by चंपाबाई

( फादर ऑफ हिंदुस्तान, फादर ऑफ पाकिस्तान व फादर ऑफ अफगाणिस्तान ... हे तीन्ही आम्ही प्रातःस्मरणीय मानतो. ) हे वाक्य माझे म्हणजे चंपाबाईचे आहे...

In reply to by चंपाबाई

हो ना अब्दाली त्याच्या खानसाम्या आणि चोपदाराबरोबरच जेवत असे आणि म्हणूनच त्याने बंगालपासून कन्याकुमारीपर्यःत दैदिप्यमान विजय मिळवलै

In reply to by चंपाबाई

परम दयाळु अब्दाली हिंदुस्थानाच्या धर्मशाळेत मुक्काम न ठेवता परत गेलेत ते ही युद्धात जिंकलेलं सगळे परत टाकुन! दैवी नायक ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ते कुठले तरी प्रभू जन्मभूमी गरियसी की कायसे म्हणून परत आले... तसेच अब्दालीही बोलले व त्यानी कविता लिहिली ... By blood, we are immersed in love of you. The youth lose their heads for your sake. I come to you and my heart finds rest. Away from you, grief clings to my heart like a snake. I forget the throne of Delhi when I remember the mountain tops of my Afghan land. If I must choose between the world and you, I shall not hesitate to claim your barren deserts as my own

In reply to by सुबोध खरे

आणि अफगाण लोक सुद्धा किती स्वामीभक्त? त्यांनी आपला देश जसाच्या तसा ठेवला आहे. सतराव्या शतकात बापाची आठवण तशीच.

In reply to by सुबोध खरे

ते मूळ पश्तू कवितेचे इंग्रजी भाषंतर आहे. लव ऑफ ए नेशन. http://www.itdunya.com/showthread.php?57326-Ahmad-Shah-Abdali-Poetry इथे मूळ कविता आहे... गांधारीची भाषा !

In reply to by चंपाबाई

मग अब्दाली तर हराम झाला. त्याला जन्मभूमी जन्नतपेक्षा प्यारी झाली. मुसलमान असून अल्ला सोडून जन्मभूमी तोबा तोबा लाहौल विला कुवत

In reply to by चंपाबाई

चंपू, लौ यु. नेहमीप्रमाणेच अभ्यासु प्रतिसाद द्यायला इतरांना उद्युक्त करतेस. किती उचक्या लागत असतील नै तुला? फ़क्त जनसेवा म्हणून च सहन करतेस ना गं?

In reply to by विशुमित

उच्च निच्चतेचे भेदभाव खूप असतात असे ऐकले होते. जसं की वेगळी मेस, आहाराचा मेनू, वेगळी स्वच्छता गृहे, वेगळी क्लब्स, वेगळ्या गाड्या. प्रोटोकॉल समजू शकतो पण तोच न्याय त्यांच्या कुटुंबाला पण लागू असतो वाटतो. त्याला "उच्च-नीच" असे नकारात्मक पाहिले तर कठीण होऊन बसेल, त्याला (व्यावसायिक दृष्ट्या)"वरिष्ठ-कनिष्ठ" असे म्हणाल्यास आपण त्या "रँक कॉन्शसनेस" चे "इसेन्स" पकडू शकू असे वाटते.ऑफिसर्स-जेसीओ-ओआर मेस वेगवेगळ्या का असतात? तर शुद्ध उत्तर प्लॅनिंग (पर्सोनेल मॅनेजमेंट ते कॉम्बॅट) ते भडास काढणे, सगळ्यासाठी. कारण आर्मी पूर्णपणे नीड टू नो बेसिस वर काम करते, कोणाला कुठल्या मिशन बद्दल काय अन किती माहिती असावे ह्याचेसुद्धा कडक नियम असतात, उदाहरणार्थ ,एखादे मिशन पार पाडताना केजुअल्टी किती होऊ शकतात, जखमी लोकांना बाहेर कसे काढायचे, शत्रूच्या गोटात हत्यारे कुठली आहेत ह्याचे (जर उपलब्ध असले तर) इंटेलिजन्स रिपोर्ट्स त्या हत्यारामुळे कुठल्या प्रतीच्या अन किती जखमा होऊ शकतात, त्यांना टेकल करायला कुठली औषधे हत्यारे फिल्ड हॉस्पिटलला असावी, फिल्ड मेडीक युनिट ड्युटी ला किती जवान डेप्युट करायचे हे डिटेल्स सीओ ने डॉक्टर सोबत डिस्कस करायचे असतात, ही डिस्कशन होतात मेस मध्ये! आता मेस मध्ये का ? तर वरती खरे साहेब म्हणाले आहेत तसे माणुस जरी 24 तास काम करत नसला तरी सैन्य करते, अन कठीण परिस्थिती मध्ये सीओ अव्याहत फक्त "बॉईज"चा विचार करत असतो, अश्यावेळी जर ऑफिसर्स/ओआर मेस एक केली अन एखाद्या ओआर (शिपायाने) जर वरती दिलेली मेडिकल कॉन्टिनजन्सी डिस्कशन ऐकली तर काय होऊ शकते, कर्णोपर्णी वार्ता होऊन एकंदरीत पूर्ण युनिटचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते, जवान साधे असतात, 10-12वी पास पोरे असतात ती तरुण, 18 ते 22 मधली सहसा 22 पर्यंत पोरे लान्स नाईक होऊन जातात, त्या पोरांना फक्त "कॉम्बॅट" शिकवलेली असते, "कॉम्बॅट मॅनेजमेन्ट" नाही, त्यांचा विश्वास असतो "सीओ साब" वर हा सीओ साब तोच असतो ज्याला वर्षानुवर्ष अगोदर एनडीए मध्ये शिकवतात "Lead your men into battle, because there is no runner up trophy for the war" , एक कारण हे झाले मेस वेगळी ठेवायचे,उरला मुद्दा भडास, जवान अगदी आज्ञाधारक बाळे असतात असे नाही, कधीमधी एखाद्या अधिकाऱ्याचा त्यांनाही राग येतो, दिलेली शिक्षा रुचत नाही पण कडक लष्करी शिस्तीपाई ती निभवावी लागते, परत संध्याकाळी जर तोच अधिकारी अन तोच जवान एकाच मेस मध्ये असले तर त्या जवानाला परत डिनर प्रोटोकॉल पाळणे क्रमप्राप्त झाले, मग भडास काढणार कुठे तर ओआर मेस! मजबूत दारू प्या आपापसात त्या अधिकाऱ्याचा उद्धार करा, मनाची पाटी कोरी करा अन दुसऱ्या दिवशी सकाळी परत फ्रेश मूड ने पीटी परेडला फॉलइन व्हा, अशी ती सोपी सुलभ अनलॉजी असते!. दुसरे म्हणजे मेनू, तो वेगळा असतो असे माझ्या ऐकिवात नाही, त्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल, फॅमिली, ह्या बाबतीत मला तितकीशी कल्पना नाही, पण आर्मी ऑफिसर्स वाईव्ज ह्यांनी चालवलेले "आर्मी वाईव्ज वेल्फेर असोसिअशन" त्याच्या अंतर्गत भरवलेली प्रदर्शने, त्यांनी आर्मी पेराप्लेजिक सेंटरला वेळोवेळी दिलेला भरघोस आर्थिक अन भावनिक आधार हे पाहता आर्मी हीच एक प्रचंड मोठी फॅमिली असल्याचे पटते. ह्यावर अजून काही मुद्दे आहेत, मांडलेल्या मुद्दयांनी जर तुमचे तार्किक समाधान होत नसले तर अजून मांडेन म्हणतो मी मुद्दे :) ता. क. - स्वच्छतागृहे वेगळी असली तरी एखाद्या आयएएस अधिकऱ्याच्या हापिसात असतील त्या तोडीची स्वच्छ असतात, बाकी हायरर्की हे जीवनात कायम असलेले सत्य आहे, तुलना करायची म्हणूनच नाही पण हेच सेम मुलकी प्रशासनात सुद्धा असते, किंबहुना तिथे तर आयएएस मेस अन क्लर्क मेस मध्ये दर्जात्मक अंतर दाखवून देणारे घटकही असतात, इतकेच कश्याला कॉर्पोरेट-इंडस्ट्रियल मध्ये पहा, एमप्लॉयी लोकांना सोडेक्सो कूपन अन मॅनेजमेन्ट मधल्या हाय लेव्हल जनतेला गोल्फ क्लब मेम्बरशिप्स वगैरे, हे सुद्धा "उच्चं नीच" म्हणावे का?? माझ्यामते नाही :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू साहेब- कोणत्या ही संस्थेमध्ये वरिष्ठ- कनिष्ठ चा मुद्दा मला पहिल्या पासूनच मान्य आहे. त्या बाबत माझे काहीच दुमत नाही. तशी मी माझ्या मनाशी पक्की खून गाठ बांधून ठेवली आहे की कनिष्ठ-मध्यम-वरिष्ठ ही उतरंड युगें न युगे चालत आली आहे आणि ती अशीच युगें युगे चालत राहणार आहे . त्याला कोणतेच क्षेत्र अपवाद नसणार आहे. आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे. ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर या मागची पार्श्व भूमी समजेल. तुमचे काही अनुभव असतील तर अति उत्तम.

In reply to by विशुमित

साहेब, नक्की प्रॉब्लेम काय आहे ? शिक्षण कमी असणार्‍या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्‍या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा एक शिस्तबद्ध, प्रगतीकडे नेणारी, क्रीडा/शिक्षण यासाठी उद्युक्त करणारी जीवनशैली स्वीकारली तर आनंदाची गोष्ट नाही का ? या पार्श्वभूमीची माणसे जी लष्करात नसतात त्यांना सहसा अन-ऑर्गनाइझ्ड सेक्टर मधे जसे हेल्पर, अनस्किल्ड वर्कर वगैरे पद्धतीचे काम करावे लागते. तिथे त्यांना कोणती मानाची वागणूक मिळणार आहे ?

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा साहेब जी, मी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्यांत यशस्वी होऊन आणि प्रशिक्षण घेऊन सुद्धा हेल्परच काम करावं लागणाऱ्या जवानांबद्दल बोलत आहे. "शिक्षण कमी असणार्‍या, गरीब घरातल्या आणि शारिरीक क्षमता उच्च असणार्‍या लोकांनी हमाली कामे किंवा टगेगिरी करत बसण्यापेक्षा">>>> ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे? माझ्या पाहण्यात असलेली चांगली आर्थिक परिस्थिती असणारी गावातील प्रत्येक घरातील लोक सैन्यात रुजू आहेत. (तसं मला प्रॉब्लेम माझ्या घरातील व्यक्तीची, जी सैन्यात आहे, ह्या कथित वरिष्ठ-कनिष्ठ पद्धतीमुळे हेळसांड होते त्याचे दुःख वाटले म्हणून हा लेखन प्रपंच) सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे. तुम्हाला माझे प्रश्न विचारणे आवडले नसेल तर माझा पूर्ण विराम.

In reply to by विशुमित

ह्याच्याशी असहमत...!! याचा अर्थ असा घायचा का की सैन्यात भरती होणारे बहुतांश अगोदर हमाली आणि टगेगिरी करायचे? साहेब मी सैनिक केडरच्या लोकांबद्दल बोलत आहे. कमिशन्ड किंवा नॉन कमिशन्ड अधिकारी नव्हे. सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ? सैन्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे नेहमी अति संवेदनशील असते, हे मी आधीच नमूद केले आहे असे काही नाही. होली काऊ असे काहीच नसते.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणजे गरीब घरातील आहेत म्हणून, ज्या उद्देशासाठी सैन्यात भरती झाले तो उद्देश सोडून अधिकाऱ्यांची हेल्पर गिरी करायला मिळणे हे थोर भाग्य आहे असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नेमका हाच विचार मला खटकला सधन घरातील किती टक्के लोक सैनिक म्हणून भरती होतात ?>>>>> सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, इ मधील अशी किती तर गावं आहेत जिथे घरागणीस मुले सैन्यात आहेत. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, हरियाणा राज्यातील किती तरी सधन घरातील मुले सैन्यात जाणे प्रतिष्ठेचे मानतात. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यामधील किती तरी उच्च शिक्षित मुले सैन्यात भरती होतात. (ही मी प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत, बाकी प्रांतांचे पण योगदान आहेच ) मी सैन्य संस्थेला होली कॉव च मानतो.

In reply to by विशुमित

आणखी फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी सहायक (हेल्पर) म्हणून काम करणाऱ्या जवानांचे विशुमितजी, बहुतेक आपला एकसारखे दिसणारे गणवेश असल्यामुळे आर्मीचे वेगवेगळे आर्म/कोर त्यांची फंक्शन इत्यादी बद्दल प्रचंड जास्त गोंधळ उडालेला आहे असे वाटते, ऑर्डर्ली ज्यांना बॅटमॅन असेही म्हणतात हे खास प्रशिक्षित असे लोक असतात, ही मंडळी आर्मी सर्विस कोरची असते, ह्यांचे शास्त्रशुद्ध हाऊसकिपिंग, केटरिंग बार टेंडिंगचे ट्रेनिंग बंगलोर स्थित कॉलेज मध्ये मिळते, ह्या व्यतिरिक्त "सहाय्यक" ही एक पोस्ट असते ज्यात एक सैनिक strictly अधिकाऱ्याचा पर्सर म्हणून डेप्युटेड असतो, अश्या सैनिकांना कधीही अधिकाऱ्याची वैयक्तिक कामे करावी लागत नसतात, एखादा अधिकारी तसे करवून घेत असल्यास ते दुर्दैवी अन वन ऑफ इट्स काईन्ड उदाहरण होय, बाकी डिटेल नंतर बोलतो तूर्तास ह्या 2 लिंक्स कामी याव्यात, प्रश्न असल्यास जरूर विचारावेत ही विनंती विशेष, मला उत्तर द्यायला आवडेल लिंक क्रमांक एक लिंक क्रमांक दोन ह्याच्याशिवाय एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, राग मानू नये ही विनंती, इंडियन आर्मी विषयी आपल्या मनात काही अढी बसलेली आहे का? असल्यास ती चूक आहे असे मी म्हणणार नाही, ती जर काही चुकीच्या संकल्पनांमुळे बसली असेल तर त्या मी साफ करायचा प्रयत्न करू शकेल, अन ती अढी ठेवायचा तुम्हाला हक्कही आहेच, शेवटी आर्मी ही पण हाडामांसाच्या माणसांची बनलेली असते, हे तुम्ही काय किंवा मी काय कोणीच विसरू शकत नाही, हे ही खरेच -कळावे बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू साहेब- माहिती साठी तुमचे खूप खूप आभार..!! सैन्याबद्दल मला नितांत आदर आणि आपुलकी आहे. फक्त घरातील एक व्यक्ती जी सैन्यामध्ये आहे, त्यांच्या बरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जे काही खटकलं त्याबद्दल मी माझे काही प्रश्न मांडले. बहुदा मी नागरी आयुष्य आणि आर्मीचे आयुष्य यांची तुलना करत होतो त्यामुळे असेल कदाचित. आर्मी बद्दल अढी वगैरे असं काही ही नाही, गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

त्यांच्या बरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जे काही खटकलं त्याबद्दल मी माझे काही प्रश्न मांडले. बहुदा मी नागरी आयुष्य आणि आर्मीचे आयुष्य यांची तुलना करत होतो
विशुमत जी - नागरी आयुष्यात खटकण्यासारख्या गोष्टी आर्मीच्या आयुष्यापेक्षा १०० पट जास्त असतील.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझा रोख याच गोष्टींसाठी होता. http://www.loksatta.com/desh-videsh-news/video-of-army-personnel-came-c… (पण अशी संवेदनशील माहिती जवानांनी उघड करू नये असे प्रामाणिक मत आहे. तक्रार करण्यासाठी प्रॉपर चॅनेल चा वापर करायला पाहिजे होता.)

Armed Forces Special Powers Act च्या सैनिकांना अमर्याद पॉवर देणार्‍या तरतुदींवर, त्याच्या होत असलेल्या सुयोग्य/ गैर वापरावर त्याच्या आवश्यकतेवर अनावश्यकतेवर. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याचा धोका पत्करुन चर्चा व्हावयास हरकत नसावी.

In reply to by मारवा

वेगळा धागा काढा आरामखुर्चीत विचारवंत भरपूर आहेत मिपा वर त्यांचे म्हणणे (दुसरी बाजूही) हि ऐकायला मिळेल. ( हे मी उपहासाने नाही तर गंभीरपणे लिहीत आहे)