Skip to main content

रात्र.....!

लेखक शंतनु _०३१ यांनी गुरुवार, 11/08/2016 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र एक रात्र ...... एक रात्र शांत बसलेली, उजव्या कुशीवर वळून शांतपणे निजलेली. मनात दिवसभराचा हिशोब मांडते आहे, एक रात्र कपाळाला आठ्या घालून दिवसाबद्दल नाक मुरडते आहे. एक रात्र दिवसाचा श्रम परिहार करते आहे. एक रात्र दिवसच्या रगाड्यातून निवांत पण शोधते आहे. कमाल आहे, निव्वळ प्रकाशाच्या खेळामुळे जागांची ओळख बदलते. एरवी गजबजणारा रस्ता रात्री मात्र निर्मनुष्य असतो, जसा आपला अगडबंब देह जसा अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरून आराम घेतो. तेव्हा या रस्त्याची भव्यता, सौंदर्य अगदी उठून दिसते. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ मात्र अव्याहत पणे चालू असतो. रात्र आपल्या बरोबर अनेक विचार घेवून येते, या विचारांना अनेक आकार, कंगोरे असतात. उद्या आपल्याला काय काय करायच आहे ? स्वतःला कस सिद्ध करायचे आहे ? अश्या कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा अथवा स्वप्नांना रात्रच जन्माला घालते. मल्टी टास्किंग करणारी डोकी रात्रीच शांत असतात. दिवसभर मारलेले / दबलेले मन मात्र रात्री तरुण होते. हम कारे सो कायदा म्हणत सैराटा सारखे धावत सुटते. कधी कधी विधिनिषेध, ताळतंत्र ही सोडते. पण या इच्छांना एक शाप आहे. विस्मृती चा .... बहुतेकाना रात्रीची स्वप्न दिवसा आठवत नाहीत. रात्रीच्या कॅनवास वर उद्याचे उज्वल स्वप्न पांढऱ्या रंगाने रंगवत जातो आपण .. अगदी बेफाम पणे एक एक चित्र काढत असतो. पण या सर्व खेळला वेळेचा बंधन आहे. रात्रीच्या काळ्या कॅनवास वर पूर्ण पांढऱ्या रंगाचं राज्य आलेल असत..पुन्हा नवीन कोरा दिवस, पुन्हा दिवसातले काळे व्यवहार ... मनातून उमटणारे निषेधाचे काळे झेंडे ... पुन्हा तोच खेळ काळ्या पांढऱ्या चा... रात्र म्हणजे एक ध्यानस्थ योगी. प्रकाशाच्या खेळामुळे जगाच्या व्यावहारिक बदलांशी काहीही देणं घेणं नसलेला. पण हा योगी कधी कधी हसतोही स्वतःच्या वक्तशीरपणा बद्दल. आणि माणसांच्या स्वतःच्या रात्रीच्या निर्णयांवर ठाम न राहण्याबद्दल ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2352
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

असे लिखाण वाचून आपण स्वत।च अंतर्मु़ख होतो. विचार करायला भाग पडतो, नक्की कुठे चाललो आहोत. आवडले हेवेसांनल.