खडकाचे मौन
लेखनविषय (Tags)
त्या निर्जन सागरी किनाऱ्यावरील एका खडकावर तो शांत एकटाच बसलेला होता. अगदी शांत, निश्चल, निर्विचार अवस्थेत. न कसली चिंता, न दुख, न आनंद, न मोह, न लोभ. निर्विकार…
क्षितिजाजवळ सूर्य आज्ञाधारक बालकासारखा अंधार पडण्यापूर्वी घाईने घराकडे निघाला होता. दूरवर सागरात एक नाव हेलकावत होती, कुठेतरी नारळाची झाडे वाऱ्याच्या संगतीने डोलत होती, सागर तर जणू एका आगळ्या धुंदीत थैमान घालत होता. पण, तो स्तब्ध होता. त्याच्या पायांपासून काही दूर, सागरा पर्यंत पसरलेल्या खडकासारखा…
खोडकर लाटा त्या खडकाचे मौन भग्न करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तो खडक एका तपस्वी योग्यासारखा दृढ स्तब्ध होता. लाटांचा आणि खडकाचा हा गमतीशीर खेळ पाहत तो खडकावर बसला होता, त्या खडकाइतकाच स्तब्ध. इतक्यात एक अवखळ लाटेने खडकावर एक वेगवान प्रहर केला. पाण्याचे काही तुषार त्याच्या चेहऱ्यावर उडाले आणि इतक्या वेळात पहिल्यांदा त्याची पापणी लवली...
लवलेली पापणी उघडताना त्याने एक अद्भुत दृश्य पहिले. बाजूचा सागर किनाऱ्यावरून एक अस्पष्ट आकृती त्याच्या दिशेने चालत येत होती. शुभ्र वस्त्रांमधली अस्पष्ट आकृती. ती एक लावण्यवती तरुणी होती. वारा तिच्या केसांशी खेळत होता आणि सागर आपल्या लाटांना अधिक विस्तारून तिच्या पायांना स्पर्श करू पाहत होता. काळे दाट मोकळे केस वाऱ्यावर भूरभूरत होते. ओल्या पायांचे रेतीवर ठसे उमटत होते. ती संथ गतीने त्याच्याच दिशेने येत होती.
ती त्याच्या अगदी जवळ येऊन उभी झाली. तिच्या निर्मळ, निखळ सौंदर्यात कसलीतरी नैसर्गिक ताकत होती जी एका हाकेत खडकालाही उठवून उभा करेल. तो तर एक सचेतन मनुष्य होता.
तिने पुढे केलेला हात नकळत त्याने हातात घेतला आणि तिच्या डोळ्यांत पहिले. वरून तुफान अशांत असणाऱ्या खोल सागरातील भयाण शांतातेशी जणू त्याची नजरानजर झाली. तिने हलकेच त्याच्या हाताला घट्ट पकडलं आणि एक हलका झटका दिला. तिचा इशारा समजून तो उठला. तो संवाद नजरेतून झाला की स्पर्शातून की आगळ्याच कुठल्या अज्ञात अदृश्य लहरींतून हे सांगणं त्याला शक्य नव्हतं. एकाएक तोही उठून उभा झाला. ते पाहून तिने एक जीवघेणं गोड स्मित केलं.
आता त्यांच्यासाठी कुठलाही अनैसर्गिक ध्वनी हा कल्लोळ होता, अनैसर्गिक प्रकाश हा प्रखर तापट होता. त्यांचा इंद्रियांना एकांतात फक्त निखळ निसर्गाचीच सोबत हवी होती..
पुढच्या क्षणी दोघांची नजर निसटत चाललेल्या क्षितिजावरील सूर्याकडे गेली. हातात हात गुंतलेले, पाऊले सोबतीने पडत होती, जणू दोन देह एक प्राण. क्षितिजावरची नजर न हटवता ते पुढे पुढे चालत होते, क्षितिजाच्या दिशेने, खोल सागराच्या दिशेने. हळू हळू ते दोघे हातात हात गुरफटून खोल खोल सागरात चालले होते, त्या अथांग अशांततेत विसाव्याचे दोन क्षण शोधण्यासाठी...
आणि त्याची लावलेली पापणी पूर्ण उघडली.. तो खडकावरच होता, एकटाच. एक लाट खडकावर नुकतीच आदळून सागरात परतत होती, नारळाची झाडे वाऱ्यावर डोलत होती, दूरवर सागरात एक नाव हेलकावत होती, सूर्य अजूनही मावळतच होता. खडकावर आदळलेल्या लाटेने खडकाचे नाही पण त्याच्या मनाचे मौन एक क्षण का होईना भंग केले. आता ती शांतता, स्तब्धता फक्त खडकालाच शक्य होती, म्हणून तो रेती वरून संथ पाऊले टाकीत निघून गेला...
प्रतिक्रिया
अप्रतिम मुक्तक!!
छोटेखानी
सुंदर लिहिलंय
सुरेख..
खुपच सुंदर
अप्रतिम सुंदर वर्णन आणि
आता खडकावर बसून तपस्या करीत
धन्यवाद