Skip to main content

मैत्र झुलवून बघ

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 05/08/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखनविषय:

वाचने 4361
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान जमलीय! शर्थ, अटी काही नकोत खुले-खुले सांग इथे अटी शर्थी काही नकोत असं पाहिजे होतं. म्हणजे लय कायम राहील.

मस्तच! कविता आवडली . प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !

ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात..... त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना...... ऋणानुबंधाच्या मुसळधार पावसासारख्या ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! - गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

असे का म्हणताय सर, अहो मैत्रि म्हटलि कि थोडेसे मतभेद कधि कधि असायचेच. ईथे सगळेच तुम्हाला मित्र समजतात.

आवडली कविता. थोडे प्रवचन - 'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....' - कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते. प्रवचन समाप्त.

In reply to by अभिजीत अवलिया

मैत्री दिनाच्या सर्व अबाल वृद्ध मिपाकरांना माझ्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

छान आहे. मोजत बसू नकोस मित्रा स्पंदनाची धग डोळे मिटून खांद्यावरती मान ठेवून बघ हे जास्त आवडले.