वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 2
लेखनविषय (Tags)
राणी मार्गारेटने लँकेस्टरांचा यॉर्कांविरुद्ध पाठिंबा मिळवणं चालू केलं. यापुढच्या अजून मोठ्या प्रमाणावर लढाया झाल्या त्या १४५९मधे. यात मात्र यॉर्कांचा दणदणीत पराभव झाला व रिचर्ड आणि त्याचा मुलगा एडमंड हे आयर्लंडला, तर त्याचा मोठा मुलगा एडवर्ड आणि त्याच्या बायकोचा भाचा अर्ल ऑफ वॉर्विक हे कालाईच्या बंदरात पळून गेले.
पण याचा परिणाम अगदीच उलटा झाला. कालाईचा समुद्री किल्ला आता यॉर्कांच्या ताब्यात आला आणि आयर्लंडने रिचर्डला पाठींबा दिला. परिणामी त्यांनी पुन्हा स्वारी करून राणीला राजपुत्रासहीत पळून जाण्यास भाग पाडले. राजा पुन्हा रिचर्डच्या ताब्यात आला.
आता रिचर्ड ऑफ यॉर्कची महत्वाकांक्षा पूर्ण बहरली होती. त्याने सरळ पार्लमेंटसमोर राजा होण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याने राज्य जिंकून घेतलं होतं, आणि त्याचा वारसाहक्कही होता, त्यामुळे त्याला वाटलं की त्याचा प्रस्ताव मान्य होईल. पण राजा जिवंत असताना दुसरा राजा स्वीकारायला पार्लमेंटने संमती दिली नाही. मात्र, राणीचा मुलगा हा राजाचा खरा वारस आहे की नाही यावर आधीपासूनच संशय होता. त्यामुळे पार्लमेंटने असा तोडगा काढला की हेन्रीच्या मृत्यूनंतर रिचर्ड आणि त्याचे वारस राजे बनतील.
इथे राणी स्वस्थ बसली नव्हती. स्कॉटलंडच्या पाठिंब्याने तिने पुन्हा उत्तरेकडून स्वारी केली. त्या युद्धात लढायला गेला असता रिचर्ड व एडमंड यांचा मृत्यू झाला. आता पार्लमेंटच्या तोडग्यानुसार सिंहासनाचा वारस होता एडवर्ड. एडवर्डने युद्धात राणीच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला. आत्तापर्यंत युद्धांना वैतागलेली जनता पूर्णपणे एडवर्डच्या बाजूने झाली होती. यॉर्कची तीन मुलं आता जनतेला तीन सूर्यांसमान भासू लागली होती. त्यामुळे १४६१मध्ये एडवर्ड समारंभपूर्वक इंग्लंडचा पहिला यॉर्किस्ट राजा ‘चौथा एडवर्ड’ झाला. राणी दूर फेकली गेली.
या सर्व युद्धात एडवर्डचा प्रमुख पाठीराखा आणि गुरूसारखा असणारा अर्ल ऑफ वॉर्विक आता ‘किंगमेकर’ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. किंगमेकरचं आता मुख्य काम होतं, राजा एडवर्डचं लग्न एखाद्या बलाढ्य घराण्यातील राजकन्येशी लावून युद्धाने बेजारलेल्या इंग्लंडला परदेशी साथीदार मिळवून देणे. पण इथे एडवर्डने त्याला जबरदस्त धक्का दिला. त्याने जाहीर केलं की त्याचं लग्न झालेलं आहे, आणि त्याची बायको आहे ती सर्वसामान्य वूडविल घराण्यातील, आधी एक लग्न होऊन दोन मुलं पदरात घेऊन विधवा झालेली एलिझाबेथ वूडविल.
या लग्नाने एडवर्ड आणि वॉर्विकमध्ये मोठीच ठिणगी पाडली. प्रेमासाठी लग्न करणं ही राजाची घोडचूकच म्हणायची. पण राजाने असं जाहीरच केल्यावर कोण काय करणार? वेळ निभावून गेली खरी, पण इंग्लंडला काही फार काळ शांतता लाभणार नाही अशी चिन्हं दिसू लागली. वूडविल लोकांनी या लग्नाचा वापर करून घरातील होत्या-नव्हत्या तेवढ्या मुला-मुलींची लग्नं इंग्लंडच्या प्रतिष्ठित घराण्यांमध्ये लावून दिली. आपल्या घरातली कुणी राणी झाली, की यश आणि समृद्धीचा राजरस्ता खुला होणं, पण त्याचवेळी शत्रूंच्या संख्येत लक्षणीय वाढ करून घेणं; ही गोष्ट इतिहासात पहिल्यांदा घडत नव्हतीच. आणि शेवटचीही घडणार नव्हती.
एडवर्ड आणि वॉर्विकमधे सतत खटके उडू लागले आणि वॉर्विक बंड करून उठला. यावेळी किंगमेकरने शोधून काढलेला राजा होता, स्वत: एडवर्डचा धाकटा भाऊ- जॉर्ज. एडवर्ड हा रिचर्डचा अनौरस मुलगा असून जॉर्ज हाच खरा राजा असला पाहिजे अशा सनसनाटी युक्तिवादावर त्यांचं युद्ध आधारलेलं होतं. या दोघांनी एडवर्डला लढाईत हरवून त्याला कैद केलं खरं, पण इतर प्रतिष्ठितांचा पाठिंबा एडवर्डलाच असल्यामुळे त्यांना राज्य करणं शक्य होईना. शेवटी तात्पुरता समेट होऊन त्यांना एडवर्डला सोडून द्यावं लागलं.
एडवर्डने आत्ता समेट केला आणि त्यांना माफ केलं. पण काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा बंड केलं. यावेळी त्यांचा पराभव झाला आणि वॉर्विकला फ्रान्सला पळून जावं लागलं. तिथे त्याने त्याची जुनी शत्रू राणी मार्गारेटशी संधान साधलं आणि पुन्हा सैन्य गोळा करून एडवर्डचा पराभव केला. यावेळी हेन्रीला पुन्हा गादीवर बसवण्यात आले. मात्र, एडवर्डने पुन्हा स्वारी केली आणि यावेळी हेन्रीचा राजपुत्र आणि वॉर्विक दोघेही मारले गेले. ट्युक्सबरीच्या युद्धात एडवर्ड पुन्हा एकदा इंग्लंडचा राजा झाला. बंड केल्याबद्दल धाकटा भाऊ जॉर्जचा वध करण्यात आला. असं म्हणतात की त्याला वाईनच्या पिंपात बुडवून मारण्यात आलं. या युद्धानंतर टॉवरमध्ये हेन्रीचा पण मृत्यू(कदाचित खून) झाला.
पण लँकेस्टर वंश अजून संपला नव्हता. मार्गारेट बोफर्टचा मुलगा हेन्री ट्यूडॉर इंग्लंडबाहेरून स्वारीची स्वप्ने बघत होताच. मार्गारेटने एव्हाना तिच्या दुसऱ्या पतीचा मृत्यू झाल्यावर अत्यंत धूर्त अशा डर्बीचा अर्ल थॉमस स्टेन्लीशी लग्न करून राजदरबारात शिरकाव करून घेतला होता. पण एडवर्डच्या काळात मात्र यानंतर इंग्लंडने खरंच शांततेचा श्वास घेतला. १४८३ मध्ये एडवर्डचा मृत्यू झाला आणि सत्तेचा जीवघेणा खेळ अजून क्रूरपणे सुरू झाला.
एडवर्डला मुलगे २ होते. त्याचा मोठा मुलगा फक्त बारा वर्षांचा असल्याने त्याने आपल्या प्राणप्रिय भाऊ रिचर्डवर ‘ लॉर्ड प्रोटेक्टर’ अशी जबाबदारी दिली होती. पण रिचर्डची महत्वाकांक्षा आता एडवर्डच्या मृत्यूनंतर पालवली, आणि त्याने दोन्ही राजपुत्रांना राज्याभिषेकाच्या मिषाने टॉवर ऑफ इंग्लंडमधे जवळपास कैद करून घेतलं. आता हे राजपुत्र हवे असणारे तीन पक्ष होते. एक, ज्याच्या ताब्यात ते होते तो रिचर्ड. दोन, आता आपल्या मुलांच्या वारसाहक्कासाठी झगडणाऱ्या मार्गारेटच्या भूमिकेत जायची वेळ आलेली त्यांची आई, एलिझाबेथ वूडविल. आणि तीन, आत्तापर्यंत आपला लँकेस्टर अभिमान गिळून राजपटलावर कायम राहण्यासाठी राणीच्या सेवेत राहणारी, पण उराशी आपल्या मुलाला राजा बनवण्याचं स्वप्न बाळगून असणारी मार्गारेट बोफर्ट.
रिचर्डने हळूहळू हे पसरवायला सुरूवात केली, की एलिझाबेथ वूडविल आणि एडवर्डचं लग्न हे गुप्ततेत झालेलं असल्याने ते बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे राजपुत्रांना औरस वारस म्हणणं योग्य होणार नाही. ही अफवा बऱ्याचजणांच्या वूडविल घराण्यावरील रागामुळे फार लवकर पसरली. या राजपुत्रांना अनौरस ठरवले गेले. एडवर्डशी इमान राखणाऱ्यांना त्याची राणी आवडायचीच असं नव्हतं. पण हा विषय अचानकच संपला, आणि टॉवर ऑफ इंग्लंडमधून हे दोन्ही राजपुत्र गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांना कुणी पळवलं, का कुणी मारलं, का त्यांचं नक्की काय झालं याचा शोध आजतागायत लागलेला नाही.
आता एलिझाबेथ वूडविलची स्वप्नंच भंगली. आता तिला फक्त आपल्या मुलींसाठी जगायचं होतं. त्यांना उपेक्षित आणि दुर्लक्षित जीवनात रहावं लागू नये, म्हणून तिने सगळे अपमान, राग आणि विश्वासघात गिळून आपल्या मोठ्या दोन मुलींना त्यांच्या नवीन राजा झालेल्या काकाच्या, म्हणजेच रिचर्डच्या दरबारात पाठवून दिलं. इंग्लंडला १४८३मधे पुन्हा एकदा एक महत्त्वाकांक्षेने गादीवर आलेला राजा मिळाला होता. एलिझाबेथ वूडविल वरवर शांत असली, तरी राजाविरोधात कट शिजवायचे उद्योग तिने जोरात सुरू केले होते. आणि एलिझाबेथची मुलगी ‘एलिझाबेथ ऑफ यॉर्क’ दरबारात आपल्या सौंदर्याने आणि हुशारीने प्रत्यक्ष तिच्या नात्याने काका असणाऱ्या राजालाही झुलवीत होती, तेव्हा हेन्री टयूडॉर फ्रेंच पाठिंबा घेऊन इंग्लंडच्या स्वारीची तयारी करत होता. १४८५ मध्ये हेन्री टयूडॉर आपले सैन्य घेऊन स्वारी करून आला आणि रिचर्ड बोस्वर्थला झालेल्या युद्धात मारला गेला. लँकेस्टर पुन्हा एकदा जिंकले आणि त्यांचा एकमेव वारस हेन्री गादीवर आला. ही युद्धं एकदाची संपून जावीत यासाठी त्याने एडवर्ड-एलिझाबेथ वूडविल यांची थोरली मुलगी एलिझाबेथ ऑफ यॉर्कशी लग्न केलं आणि अशा रीतीने ‘गुलाबांची युद्धे’ एकदाची संपुष्टात आली. प्लँटाजीनेट वंश राजसत्तेवरून हटला आणि सातव्या हेन्रीसोबत सुरू झाला, इंग्लंडच्या इतिहासातील कदाचित सर्वात चर्चिला जाणारा ‘ट्यूडॉर वंश’.
समाप्त
(अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
છાન
रोचक. छान लिहिलंय.
आवडलं
आवडलं. तुझ्या लेखांचे विषय
छान लिहिलंय !
छान..
GOT ची पार्श्वभूमी समजली बर्
मस्त लिहिलंय. लिहीत राहणे.
मस्त!
रोचक कथा आहे , पण खूप
इथे थोडे नकाशे, वंशावळीचे
अरे मस्तच अनीमेशन. असलं मात्र
एकदम रोचक वेगळाच विषय.किचकट
लँकेस्टर
सर्वांना वाचून प्रतिसाद
मस्तच
छान!!!
खूपच मस्तं!