लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार.
२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.
ही वस्तुस्थिती आज आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियो वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुस-या जागी जाता येत नाही. आपल्याच राजधानीत मराठीला दुय्यम स्थान मिळतं ही खेदाची गोष्ट आहे.
प्रश्न फक्त मुंबईचाही नाही. मराठी लोकांमध्ये मराठीच्या बाबतीत एक औदासिन्य आहे की काय अशी शंका येत राहते. चळवळीच्या नावाखाली काही हिंसक घडामोडी, जाळपोळ आणि भयंकर अस्थिर वातावरण एवढंच मराठीच्या वाट्याला येतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं या तथाकथित चळवळींचा हिस्सा होत नाहीत आणि याची कारणं स्पष्ट आहेत. पण म्हणून मराठीची अवहेलना होण्याचं थांबत नाही.
मला प्रामाणिकपणे वाटतं की एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. मराठीसाठी आपण मराठी भाषिकांनी एकत्र यायची आज जितकी गरज आहे तितकी यापूर्वी कधीच नव्हती. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.
मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सुरेश भटांच्या या शब्दांना मी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे ३०० गायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्याचा माझा मानस आहे. मराठीतल्या सर्व गायक – वादकांचा यात सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे.
या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च खरं तर सहज एका प्रायोजकाकडून उपलब्ध होईल. पण तसं केलं तर ते एक व्यावसायिक ‘प्रॉडक्ट’ होईल जो मुळात या मागचा हेतू नाही. ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर या ध्वनिमुद्रणाचा खर्च निघू शकेल.
यात तुमचा सहभाग असला तर मला आनंद होईल. हे काही नेहमीचं मदतीचं आवाहन नाही. हे आमंत्रण आहे – मराठीच्या चळवळीत तुम्ही सहभागी होण्याचं.
आपला,
कौशल श्रीकृष्ण इनामदार.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खुलास: मिपाचा या प्रकल्पाशी काहिही संबंध नाही. मराठी भाषेसाठी चालणार्या एका प्रयत्नाला मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यात मिपाचा एक व्यासपीठ एवढाच सहभाग आहे.
- नीलकांत
वाचने
6841
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
माहिती
+१
In reply to माहिती by इनोबा म्हणे
+२
In reply to +१ by आनंदयात्री
१+
In reply to माहिती by इनोबा म्हणे
धन्यवाद आणि शुभेच्छा
माहितीबद्
असेच म्हणतो !
In reply to माहितीबद् by लिखाळ
मराठी शिक्षणासाठी प्रयत्न करावयाला हवा.
छान उपक्रम..
ह्या स्तुत्य उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा
खारीचा वाटा
अतिशय छान उपक्रम!
अतिशय छान उपक्रम!
शुभेच्छा!
मराठी अस्मिता
काय मदत करु ?
मराठी अस्मिता