Skip to main content

हमखास हिट - दाल बाटी!

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 30/07/2016 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा! तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अ‍ॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्‍या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्‍या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते! लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत! तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात. kanik bati 1 आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...! हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी! सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!! cooking bathi cooling ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी! frying हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!) ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात. Daal Bati कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने 49664
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by चंपाबाई

फरक इतकाच, आम्ही बाटीला गोल करुन एका साइडने थोडे दाबून किंचीत कॉन्केव्ह केले होते. त्यामुळे त्याचे तुकडे किंचीत बीन शेप्ड झालेत.

In reply to by चंपाबाई

अरे वा! छानच दिसतेय. तुमच्या सौं ना सांगा! कधी मी तुपावर परतुन केली तर त्याचे फोटो टाकेन. कुकर मध्ये वाफवल्याने पटकन होणारा आणि गुळ तुपासोबत खायला जास्त सोपा प्रकार आहे तो.

In reply to by पियुशा

ताज्या घडामोडी धाग्यावर बच्चनचे भाषण ऐकतानाचा फोटोही आहे. हातिमताई पुरुष असु शकतो , मग चंपाबाई का नाही ?

पाककृती आवडली. वरण, आमटी अशा कोणत्याही प्रकारच्या डाळीचा भक्त असल्याने हा प्रकार आणखीच आवडला. अनेक बुफेंमधे बाट्या / बाटे वितळलेल्या गरम तुपात बुडवूनच ठेवलेले दिसतात. बाट्यांचे दोन्ही व्हेरियंट्स उत्तम.

ह्याला आम्ही दाळबट्टी म्हणतो. दाल बाटी म्हणले कि राजस्थानातली वाटते. आईकडे काल हाच बेत होता.

नंबर १ - राजस्थान ढाबा, भारत पेट्रो. पंपाच्या बाजुला, पुणे-सोलापुर हायवे, मोहोळच्या अलिकडे, इथं चुरमा देखिल जबरदस्त असतो, गरम गरम बाट्यांचा चुरमा करुन देतात, लाकडी दांड्क्याने बाटी तोडुन त्यात गुळ आणि तुप घालुन केलेला हा प्रकार मला लास्ट सपरला चालेल. इथं तुप देखिल खुप चांगलं मिळतं, आणि मिळाले तर गुलाबजामुन , शुद्ध तुपातले आणि मिनिमम साखरेतले, नुसता तुपाचा वास आणि प्युअर खव्याची चव. नंबर २ - रामदेव बाबा ढाबा निगडी . गरम मडक्यात तुप घालुन त्यात बाटी देण्याची पद्धत लई भारी. नंबर ३ परमहंस - वडाचा स्टॉप, कर्वेनगर, दालबाटीची मेस असा प्रकार आहे, दररोज दोन्ही वेळेला दाल बाटी मिळते, तडका दाल हा कुटुंबाचा प्रचंड आवडता प्रकार आहे. नंबर ३ - क्वालिटि का रंगोली, आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत ( या एरियात पुर्वीचे गिरिजा राहात होते असं ऐकुन आहे)- रामदेव बाबा पर्यंत जाणं लईच लांब वाटत असेल तर... गुलाबजामुन मात्र लई भारी, प्रत्येक वेळी गरम गरम देतात. नंबर ४ - हॉटेल भोज - दुर्वांकुरच्या समोरच्या बोळात - गुजराथी थाळी - गावातला ऑप्शन, दाळीची चव लई भारी, बहुधा मिक्स दाळीची असते.

In reply to by ५० फक्त

रामदेव बाबा ढाबा निगडी
अतिशय महाग आहे असे निरीक्षण नोंदवतो. अजून भर घालतो. कोथरूड ला चांदणी चौकाच्या अलीकडे बुलेट शोरूम च्या लाईनीत एक खान्देश म्हणून हॉटेल आहे तिथे डाळ बट्टी भारी मिळते. रच्याकने काढूनि मिरच्यांची भाजी खाल्ली आहे का या सोबत काय जगात भारी चव आहे त्याची.

पाकृ वाचली, पाहिली. चवीला चांगली लागत असणार हे नव्याने सांगायला नको. तळलेली बाटी गुळाबरोबरही खातात ही नवीन माहिती झाली. चुरमा करताना पिठीसाखर घालतात हे माहित होते.

In reply to by रेवती

ट्राय करून बघा. खरे तर कणीक, रवा ह्यात गूळच मस्त लागतो.

In reply to by स्मिता_१३

I have used Usha halogen Air Fryer. I used 250 centigrade, 9 minutes first side up, 9 minutes second side up (18 minutes total). If your air fryer max temp capacity is 200 centigrade, then I feel 200 C / 15 min each side (total 30 min) should do the job.

मी फक्त राजधानीत खाल्लाय हा प्रकार. चव आवडली, पण त्या लोकांनी तुपाचा आग्रह करकरून वैताग आणला. ते काय ते आयुर्वेदिक डॉक्टर तूप खायला घालून उलट्या करवतात तसा यांचा बेत आहे की काय अशी शंका आली इतका. म्हणून मग परत जायची हिम्मत नाही केली. आता करून बघितला पाहिजे तुझ्या पद्धतीने.

पिरा, मस्त लिहिलं आहेस. अवांतर- आता माझ्या मारवाडी मैतरीणीकडे दाल बाटी खायला म्हणूनच जाते. फोन करून सांगतेच आता तिला खूप दिवसात दाल बाटी खाल्ली नाहीये..:) स्वाती

नागपंचमीच्या दिवशी चिकोल्या आणि काल बट्टी पण केली. रोडगे ओव्हन मधे भाजून घेतले असे भारी झाले होते की विचारु नका. वरण आणि बट्टीचं जेवण करतांना इतका जोरात ठसका लागला की नाका डोळ्यातून पाणी आलं, म्हटलं कोणी आठवण केली असेल बरं ? मनात म्हटलं आपण पिराकाकूच्या धाग्यावर प्रतिसाद लिहिले होते, पैकीच कोणी आठवण केली असेल म्हणून प्रतिसादाचा प्रपंच.... ! ;) कॉलेजमधून घरी गेलो की फोटो टाकतो.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नागपंचमीला तुमची आठवण आली होती.. चिकोल्यांमुळे हो!! ;) वाटलं होतं की इथे आठवण करुन द्यावी. पण म्हणलं कशाला उगाच हात दाखवुन... असो.. टाका फोटो नक्की. आणि तुमच्या सौंना धन्यवादही द्या. बाकी जपुन हो.. ठसका वगैरे.. ह्या वयात काळजी घ्यावी! (बिरुटेंच्या पुतणीच्या वयाची) पिरा! ;)