✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बादलीयुद्ध

ज
जव्हेरगंज यांनी
गुरुवार, 07/28/2016 - 21:25  ·  लेख
लेख
"केवड्याला दिली ओ ही बादली?" "सत्तर रुपये" मी क्यान्सल केली. एकतर सत्तर रुपये ही एक अवाढव्य रक्कम होती. एकरकमी एवढा प्रचंड खर्च करणे तेही एका बादलीसाठी मला अजिबात आवडले नव्हते. दुसरं म्हणजे शंभराची नोट मोडणे माझ्या जिवावर आले होते. खिशात शंभर रुपये असणे ही काय किरकोळ बाब नव्हती. शंभर रुपयात मी इथल्या मॅटीनी थेटरात किमान दोन महिने पिच्चर बघू शकलो असतो. गेलाबाजार शाबुद्दीनच्या गाड्यावर महीनाभर नाष्टाही करु शकलो असतो, पण त्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे लागले असते. जे की मी ठरवलेच होते. बादली क्यान्सल करुन मी न्यू राजस्थान स्वीटमध्ये जाऊन अंडा पॅटीस खाल्ले. नव्हे त्यासाठीच तर एवढ्या लांबवर आलो होतो. सॉस बरोबर पॅटीस खाल्लं की आमच्या मेंदूच्या तारा झंकारायच्या. आहाहा काय तो स्वाद! सोबतीला ढोकळ्याचीही एक प्लेट दाबली अन गावात आल्याचं मी सार्थक केलं. मग जरा बाजारात फिरलो. उगाचच. सवयच आहे तशी. एकदोन जुनी कॅसेटं विकत घेतली. तीस रुपयाला दोन. छंद आहे आपला. बोलून चालून अलिशा. कसली गाणी म्हणते यार. मग बसस्टँडवर लस्सी पिलो. दोन गल्ल्या ओलांडून थेटराकडं चक्कर टाकली. भारी भारी पोस्टर बघून घेतले. मग डबल अंडापाव तिथंच दाबला. मग मात्र निघालो. अर्थात फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक 'मग' तेवढा विकत घेतला. एका 'मगा'त आंघोळ उरकणे हे एक दिव्य काम होते. वाटेत खिसे चापचले. तीस रुपये उरले होते. मूडच गेला. पण वळणावर तो चायनीजचा गाडा दिसला. आणि... ----------------------- तर नेहमीप्रमाणेच फाटक्या खिशाने रुमवर पोहोचलो. बरीच रात्र झाली होती. जेवण नावाची गोष्ट मी रविवारी करतच नसतो. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हताच. चिंटूछाप राजेश समोर बसला होता. कायम जीन्समध्येच. झोपायचाही तसाच. एकदा कँटीगला नाष्टा करायला गेलतो याच्याबरोबर. एकशेदहा रुपयांचं मंच्युरीयन खाल्लं साहेबांनी. वळणावरच्या गाड्यावर पंचवीस रुपयाला मिळतं. याच्यापेक्षा भारी. दणक्यात आदर दुरावलाच. शेवटी बॉम्बेगाय. तर अशा या हाय प्रोफाईल पोराची बादली मागणे म्हणजे साक्षात गंगू तेलीनं राजा भोजला पोरगी मागण्यासारखं होतं. म्हणून मी ती कधीच मागितली नव्हती. त्याची बादली कॉटखाली ठेवलेली असायची. गुबगुबीत हिरव्या रंगाची उठावदार बादली. अगदी धष्टपुष्ट वाटायची. भरल्या अंगाची. रोज सकाळी जेव्हा मी उठायचो, तेव्हा राजेशची आंघोळ अगोदर झालेली असायची. अगदी फ्रेश. कॉटखाली न्हाऊन निघालेली बादली दिमाखाने मिरवायची. आतमध्ये सोपकेस, कपडे धुण्याचा ब्रश, आणि अंगाला लावण्याची कसलीतरी जाळी असायची. एकंदरीत ती एक समृद्ध आंघोळ होती. मी मात्र गोरखनाथ नावाच्या माझ्यासारख्याच एका कंगाल पोराच्या बादलीच्या शोधात असायचो. पोचे आलेली जर्मलची बादली. तिला सतराजण वापरायचे. आणि सोबतीला होता तांब्या चक्क. तोही असाच पोचे पोचे आलेला. खरंतर मला बादली आणण्याची गरजच पडली नसती. पण या गोरखच्या बादलीसाठी रांगा लावल्या जायच्या. नंबर लावले जायचे. काहीजण तर पॉलटिक्सच करायचे. मी मात्र उशीरा उठत असल्याने माझा नंबर सगळ्यात शेवटी. कित्येकदा माझा पहिला तास या बादलीमुळेच बुडालाय. ----------------------- तर त्या दिवशी राजेश माझ्या 'मगा'कडे बघून न बघितल्यासारखा करत म्हणाला, "उद्या डॅड येणारायत" खरंतर डॅड त्याचे येणार होते पण आनंद मला झाला. इव्हन झाला नसला तरी दाखवावा लागतो एवढी फॉर्म्यालीटी मला समजली होती. तीही त्याच्याकडून. शेवटी तो बॉम्बेगाय. आम्ही आपले खेडवळ. खाटंवर छापड्या हातरुन झोपणारे. खरंतर गादी मलाही घ्यायचीच होती. पण स्वस्तात मिळेपर्यंत मी छापड्या हातरुनच झोपायचं ठरवलं होतं. तसंही आमचं निम्मं होस्टेल छापड्या हातरुनच झोपायचं. "व्हय का? म्हंजे तू ऊद्याच जाणार का?" "हो..." त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य मावत नव्हतं. "आडमिशन मिळालं म्हण की तुला तिकडं" "हो... अरे पण सामानाचं काय करु? खूप त्रास होईल रे न्यायला, तुला देऊ?" "चालेल, कितीला देणार?" तर त्या दिवशी आम्ही जेवण करुन आल्यावर नक्की तो काय काय मला विकणार याचा आढावा घेऊ लागलो. "बोल, या गादीचे किती लावणार?" "मला माहित नाही रे, तुच सांग" "कितीला घेतली होती" "माहित नाही रे, मम्मी ने घेतली होती" "बरं, पन्नास रुपय देतो मी, चालेल?" "ओके, चालेल" "गादीसोबत ऊशी, बेडशीट फ्री असतं माहित्ये ना?" "हू..." राजेश जरा जास्तच बावळट निघाला. याला व्यवहाराचं जरासुदीक ज्ञान नाही. "हि पुस्तकं, किती लावणार याचे?" "नाही नाही, अरे पुस्तकं लागतील ना मला तिकडे" हे एक मोठं नुकसानच झालं मला. आता झेरॉक्स काढूनच अभ्यास करावा लागणार. "बादली?" "हू..." "वीस रुपयं" "चालेल" "बादलीसोबत सोपकेस, ब्रश, जाळी फ्री" "ठिक आहे, चालेल" "हँगर?" घेतलेल्या एकेका वस्तूंची लिस्ट केली. शेवटी बेरीज लागली दिडशे रुपयांची. ती चक्क मलाही फार कमी वाटली. उगाचच गिल्टी का काय वाटायला लागलं. पण मी लूटमार थोडीच करत होतो. रोख रक्कम देऊन मी सौदा फायनल केला. आणि सुखाने छापडीवर झोपलो. त्यानंतर मला कधी छापडीवर झोपल्याचं आठवत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजवरुन परत आलो, तेव्हा राजेशला त्याच्या डॅडनं झाप झाप झापलं होतं, असं एकदोघांकडून कळालं. पण त्यांनाही समजलं नव्हतं नक्की का? आणि विशेष म्हणजे मी यायच्या आत ते दोघे रिक्षाने निघूनही गेले होते स्टेशनवर. टेन्शनमध्येच मी रुममध्ये आलो. कॉटवर गादी दूमडून ठेवली होती. लिस्टप्रमाणे सगळं सामानही दिसत होतं. दिसली नाही ती फक्त बादली. मी सगळी रुम धुंडाळली. पोटमाळ्यावर चढून बघितलं. सगळी बाथरुमं पालथी घातली. पण बादली कुठेच सापडली नाही. होस्टेलवर येऊन आता कुठं पंधरा दिवस झाले होते. आणि माझी बादली चोरीला गेली होती. ----------------------- क्रमशः
  • बादलीयुद्ध २
  • बादलीयुद्ध ३
  • बादलीयुद्ध ४
  • बादलीयुद्ध ५
  • बादलीयुद्ध ६
  • बादलीयुद्ध ७
  • बादलीयुद्ध ८
  • बादलीयुद्ध ९
  • बादलीयुद्ध १०
  • बादलीयुद्ध ११
  • बादलीयुद्ध १२
  • बादलीयुद्ध १३
  • बादलीयुद्ध १४

Book traversal links for बादलीयुद्ध

  • बादलीयुद्ध २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
25229 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

मस्त

कविता१९७८
गुरुवार, 07/28/2016 - 21:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

ऐहाय, हॉस्टेल लाईफ आणि

संदीप डांगे
गुरुवार, 07/28/2016 - 22:02 नवीन
ऐहाय, हॉस्टेल लाईफ आणि जव्हेरगंज का जादू... लै भारी,, फूडचा भाग टाका!
  • Log in or register to post comments

फूडचा भाग???? या भागात काय

अभ्या..
गुरुवार, 07/28/2016 - 22:09 नवीन
फूडचा भाग???? या भागात काय कमी फूड आहे का? ;) एनिवे, मस्त मस्त आणि जब्बरदस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

"पुढचा भाग"

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 09:12 नवीन
"पुढचा भाग"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भन्नाट लिहिलंय. पुभाप्र

प्रचेतस
गुरुवार, 07/28/2016 - 22:13 नवीन
भन्नाट लिहिलंय. पुभाप्र
  • Log in or register to post comments

भाउ एकदम बाँम्बे... आपलं.

संजय पाटिल
गुरुवार, 07/28/2016 - 22:17 नवीन
भाउ एकदम बाँम्बे... आपलं..पुणेरी होउन र्‍हायला ...
  • Log in or register to post comments

भाउ एकदम बाँम्बे... आपलं.

संजय पाटिल
गुरुवार, 07/28/2016 - 22:18 नवीन
भाउ एकदम बाँम्बे... आपलं..पुणेरी होउन र्‍हायला ...
  • Log in or register to post comments

खुसखुशीत :)

अन्या दातार
गुरुवार, 07/28/2016 - 22:36 नवीन
खुसखुशीत :) मजा आली वाचताना. पुभाप्र
  • Log in or register to post comments

कं लिवलंय!

एस
गुरुवार, 07/28/2016 - 22:36 नवीन
कं लिवलंय!
  • Log in or register to post comments

मस्तं! वाचतेय...

पद्मावति
गुरुवार, 07/28/2016 - 22:38 नवीन
मस्तं! वाचतेय...
  • Log in or register to post comments

कोसला नको,हेच बरंय.

कंजूस
गुरुवार, 07/28/2016 - 22:50 नवीन
कोसला नको,हेच बरंय.
  • Log in or register to post comments

खास! पु भा प्र.

रातराणी
गुरुवार, 07/28/2016 - 23:23 नवीन
खास! पु भा प्र.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे सुंदर लेख..आवडला

अमितदादा
गुरुवार, 07/28/2016 - 23:24 नवीन
नेहमीप्रमाणे सुंदर लेख..आवडला...
  • Log in or register to post comments

अप्रतिम... झक्कास जमली आहे.

ज्योति अळवणी
Fri, 07/29/2016 - 00:18 नवीन
अप्रतिम... झक्कास जमली आहे. आवडली खूप.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलंय. मनातले भाव

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/29/2016 - 00:52 नवीन
सुंदर लिहिलंय. मनातले भाव शब्दांत उतरले आहेत.
  • Log in or register to post comments

हे हे हे जव्हेरभौ

चांदणे संदीप
Fri, 07/29/2016 - 01:05 नवीन
धुर्ळा धुर्ळा निस्ता धुर्ळा!! पुभाप्र! Sandy
  • Log in or register to post comments

+१

तुषार काळभोर
Fri, 07/29/2016 - 18:08 नवीन
जव्हेरभौ हवा करत नाय... वादळ करत्यात, नुस्तं वादळ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

तुला कसं कळतं बे आमचं दुःख

उडन खटोला
Fri, 07/29/2016 - 01:48 नवीन
तुला कसं कळतं बे आमचं दुःख भावड्या? ही भली मोठी लाईन लावून आंघुळ कराय जायाचं तवर तकडनं मास्तर ची हाजरी. मायची कटकट. ते क्रमश: आधी किती येळला आनि कुटं कुटं लिहिलंय त्ये बघा एकदा. आनि काय ती बनारस यात्रा करा.
  • Log in or register to post comments

मस्त!

रुपी
Fri, 07/29/2016 - 04:42 नवीन
मस्त! कॉटखाली बादली, आतमध्ये सोपकेस, कपडे धुण्याचा ब्रश >> होस्टेलचे दिवस आठवले. हा एक भाग स्वतंत्र कथा म्हणून पण चांगला आहे :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त...आवडली बादलीची

खेडूत
Fri, 07/29/2016 - 07:01 नवीन
मस्त मस्त...आवडली बादलीची गोष्ट!!
  • Log in or register to post comments

कोसलापेक्षा १०००% चांगल आहे.

जयंत कुलकर्णी
Fri, 07/29/2016 - 07:23 नवीन
कोसलापेक्षा १०००% चांगल आहे. हे मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो. फार छान...मुख्य म्हणजे स्टाईल थोडी बदलल्यामुळे बघा कसे मस्त वाटते आहे आता....अर्थात हे माझे मत...
  • Log in or register to post comments

आवडली

राही
Fri, 07/29/2016 - 08:01 नवीन
"समृद्ध आंघोळ"! कथा अतिशय आवडली. तुमचे इतर लेखनही खूप आवडले आहे. (दर वेळी प्रतिसाद जरी दिले नसले तरी).
  • Log in or register to post comments

लेख मस्त. टिपीकल होस्टेल लाईफ

मराठमोळा
Fri, 07/29/2016 - 08:16 नवीन
लेख मस्त. टिपीकल होस्टेल लाईफ. (शिर्षक तितके भावले नाही किंवा लेखाशी जुळले नाही असे वाटले.)
  • Log in or register to post comments

अहो ते बादलीच असणार काय तरं

राजाभाउ
Fri, 07/29/2016 - 14:51 नवीन
अहो ते बादलीच असणार काय तरं फुड , जव्हेरभौ हाय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

लई भारी लिवलंय राव.

संत घोडेकर
Fri, 07/29/2016 - 08:35 नवीन
लई भारी लिवलंय राव.
  • Log in or register to post comments

जबराट लिहिलंय.पुभाप्र.

अजया
Fri, 07/29/2016 - 08:40 नवीन
जबराट लिहिलंय.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

ह्या जव्हेरगंजच्या खाण्यावर

नाखु
Fri, 07/29/2016 - 08:50 नवीन
लक्ष ठेवा (च्छ्या बोकाभै असते) तर त्याम्नाच साम्गून मोसादला कामाला लावले असते. नक्की काय खातो तेच कळेना सगळे लेखन अचाट आणि परिघाबाहेरचे अस्सल जग दाखवणारे,टांग्याच्या घोड्याला रानात उधळवणारे. वाक्य छोटी करण्याचे कसब अफलातून.जियो शाळेपासून कॉलेज्पर्यंत सलग ७ वर्षे घराबाहेर राहिलेला वसतीगृही नाखु
  • Log in or register to post comments

काका

मी-सौरभ
Fri, 07/29/2016 - 10:17 नवीन
(च्छ्या बोकाभै असते) तर
आलेत म्हणे परत ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+१

राजाभाउ
Fri, 07/29/2016 - 14:53 नवीन
+१
नक्की काय खातो तेच कळेना सगळे लेखन अचाट आणि परिघाबाहेरचे अस्सल जग दाखवणारे,टांग्याच्या घोड्याला रानात उधळवणारे.
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

एकच णंबर जव्हेरभाव वाचतोय

स्पा
Fri, 07/29/2016 - 08:51 नवीन
एकच णंबर जव्हेरभाव वाचतोय
  • Log in or register to post comments

मस्त

अंतरा आनंद
Fri, 07/29/2016 - 08:54 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

यकच नंबर जव्हेरभौ !!

किसन शिंदे
Fri, 07/29/2016 - 09:39 नवीन
यकच नंबर जव्हेरभौ !!
  • Log in or register to post comments

जबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/29/2016 - 09:41 नवीन
शैली आणि लेखन अतिशय सुंदर. उतू नका, मातू नका, मिपावर लिहीण्याचा वसा टाकू नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त ! एकदम झक्कास सुरवात...

चिनार
Fri, 07/29/2016 - 09:57 नवीन
मस्त ! एकदम झक्कास सुरवात... रच्याकने...एका वेळी किती स्टोऱ्यांवर काम करता तुम्ही जव्हेर भाऊ ? इथं आम्हाला चार ओळी खरडायला महिना लागतो
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Fri, 07/29/2016 - 10:17 नवीन
लेखन नेहमी प्रमाणेच झक्कास
  • Log in or register to post comments

मस्तच भाऊ.

ब़जरबट्टू
Fri, 07/29/2016 - 11:44 नवीन
एक नंबर जमली कथा.. :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली

पैसा
Fri, 07/29/2016 - 12:39 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

ऑल इस वेल

सिरुसेरि
Fri, 07/29/2016 - 12:56 नवीन
जब लाईफ हो ओउट ऑफ कंट्रोल तो बोलो ऑल इस वेल . छान लेखन . +१००
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात

जगप्रवासी
Fri, 07/29/2016 - 13:14 नवीन
इतके वेगवेगळे विषय सुचतात कसे हो तुम्हाला?? आणि ते पण इतक्या ताकदीने अप्रतिमरीत्या लिहिता कसे? एक नंबर आहात राव.
  • Log in or register to post comments

मस्तय पयला भाग. क्रमशः नसती

मृत्युन्जय
Fri, 07/29/2016 - 13:19 नवीन
मस्तय पयला भाग. क्रमशः नसती टाकली तरी एक उत्तम कथा म्हणुन खपली असती. पण क्रमशः आहे त्यामुळे पुभाप्र
  • Log in or register to post comments

जमलय!

अनुप ढेरे
Fri, 07/29/2016 - 14:15 नवीन
जमलय!
  • Log in or register to post comments

जव्हेर भौ

बाबा योगिराज
Fri, 07/29/2016 - 14:16 नवीन
क्या बात है, मस्तच ना. झ्याक. एकदम आवड्यास. तुम्हाला शूबेच्छा द्याची काय गरज? फकस्त फ़टा-फ़टा लिवा म्हंजी झालं. आपलाच बाबा पंखेश्वर
  • Log in or register to post comments

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/29/2016 - 17:17 नवीन
आवडली, एकदम लाइव्ह बघतोय असा फील आला. पुढचा भाग लवकर लिहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

झक्कास जव्हेर भौ

श्रीरंगपंत
Fri, 07/29/2016 - 18:01 नवीन
झक्कास जव्हेर भौ.. जब्रा सुरवात! पुभालटं.. आपला पंखा श्रीरंगा
  • Log in or register to post comments

मस्त..

निर्धार
Fri, 07/29/2016 - 18:15 नवीन
भारीच केलीये सुरवात तुम्ही....
  • Log in or register to post comments

झकास !! तुमच्या अशा कथा

स्रुजा
Fri, 07/29/2016 - 18:17 नवीन
झकास !! तुमच्या अशा कथा नेहमीच आवडतात. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

झक्कास

अभिजीत अवलिया
Fri, 07/29/2016 - 22:25 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

एक नंबर जव्हेरभौ

आनंद कांबीकर
Sat, 07/30/2016 - 00:02 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

जहापन्ना, तुस्सी ग्रेट हो,

भीमराव
Sun, 07/31/2016 - 21:34 नवीन
जहापन्ना, तुस्सी ग्रेट हो, तोफो कबुल करे. होस्टेलची आठवण जागी केल्याबद्दल धन्यवाद. बाकी बादली, मग, आरसा, कांगवा, पावडर, बॉडीस्प्रे, एवढच काय टुथपेस्ट सुद्धा आम्ही फकस्त पहिल्या वर्षालाच विकत घेतलं, त्यानंतर मात्र वसतीगृहाने आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी जाणवु दिली नाही
  • Log in or register to post comments

क्लास! बाकी तुम्हाला वेगळे

निखिल निरगुडे
Mon, 08/01/2016 - 00:16 नवीन
क्लास! बाकी तुम्हाला वेगळे काय सांगणार. फॅन कम फॉलोवर!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा