Skip to main content

नरसिंगचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं...?

लेखक पी महेश००७ यांनी बुधवार, 27/07/2016 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
नरसिंगचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं...? भयंकर वाईट वाटलं. आपला नरसिंग यादव डोपिंगमध्ये दोषी ठरला आणि काही क्षण कोमात गेल्यासारखं वाटलं. वाईट वाटण्याची दोन कारणं आहेत. एक तर जागतिक कुस्ती स्पर्धेत 74 किलो वजनगटात ब्राँझ मेडल जिंकून त्याने भारताला कोटा मिळवून दिला आणि दुसरे म्हणजे रिओ ऑलिम्पिकला कोण जाणार (सुशीलकुमार की नरसिंग) यावरून कुस्तीच्या बाऊटबाहेर रंगलेला वाद... त्यावर मात करून नरसिंगला कुस्ती महासंघाने ऑलिम्पिकला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची दिलेली संधी. सुशीलकुमारला का नाकारले आणि नरसिंगला का पाठवले याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो.... कोणत्याही खेळात भारताला किंवा कोणत्याही देशाला ऑलिम्पिकचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्यासाठी खेळनिहाय पात्रतेचे काही निकष असतात. उदा. 100 मीटर विशिष्ट वेळेचं अंतर पार केलं तर तो खेळाडू ऑलिम्पिकला पात्र ठरतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे द्युती चांद, जी पी. टी. उषानंतर 30 वर्षांनी प्रथमच भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. कुस्तीचंही तसंच आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल असावं लागतं. काही वेळा वाइल्ड कार्डद्वारेही एखाद्या देशाला काही खेळांमध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, पण नरसिंगने 74 किलो वजनगटा पात्रता सिद्ध करून भारताला प्रतिनिधित्व मिळवून दिले. त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकले. ती ब्राँझ मेडलची कुस्ती खरोखर पाहण्यासारखी होती. या स्पर्धेत नरसिंग हरणार हे जवळपास निश्चित होतं. प्रतिस्पर्ध्याचे 14 गुण होते, तर सुशीलचे अवघे चार गुण होते. तीन मिनिटांच्या या स्पर्धेत नरसिंगच्या हाती केवळ 40 सेकंद उरले होते आणि 40 सेकंदांत 11 गुण नरसिंग जिंकणे अजिबात शक्य नव्हते. आणि एका झटक्यात 11 गुण घेताही येत नाही. मग भारंदाज मारो वा धोबीपछाड. पण नरसिंगने अशी काही कमाल केली, की प्रतिस्पर्धी खेळाडूला (कझाकस्तानचा असेल बहुतेक) त्याने शेवटच्या 40 सेकंदांत चीतपट केले आणि ब्राँझ मेडलबरोबरच भारताचे ऑलिम्पिकचे द्वारही खुले केले. अर्थात, नरसिंग जिंकला असला तरी तोच भारताचं प्रतिनिधित्व करेल असं अजिबात नाही. त्याने फक्त कोटा मिळवून दिलेला असतो. मल्ल ऑलिम्पिकला कोणता पाठवायचा ते कुस्ती महासंघ ठरवतो. मात्र, भारतीय कुस्तीच्या इतिहासात ज्याने कोटा मिळवून दिला तोच ऑलिम्पिकला गेला आहे. त्यामुळे इथेही तोच निर्णय लागू पडला आणि कुस्ती महासंघाने नरसिंगलाच पाठवले. मात्र, सुशीलकुमारने आक्षेप घेत चाचणी घेण्याची मागणी केली होती. चाचणी घ्या आणि जो जिंकेल त्याला पाठवा असा आग्रह धरला. सुशीलकुमारचा हा आग्रह तात्त्विकदृष्ट्या चुकीचा अजिबात नाही, पण आतापर्यंत कोटा मिळवून देणाऱ्या मल्लालाच ऑलिम्पिकला पाठविण्यात आलं आहे. (भारतीय कुस्तीत हा अलिखित नियमच झाला आहे). मग नरसिंगसाठी वेगळा न्याय का? महासंघाने ते काही ऐकलं नाही. सुशीलकुमार कोर्टात गेला. पण कोर्टानेही हा निर्णय महासंघावरच सोपवला आणि नरसिंगचंच नाव फायनल झालं. (यापूर्वी असा प्रसंग कधीच आला नव्हता. वाइल्ड कार्डद्वारे भारताला अशीच संधी मिळाली तेव्हा काका पवार आणि पप्पू यादव या दोन मल्लांमध्ये अशी चाचणी झाली होती. त्या वेळी ही कुस्ती पाहायला स्वतः शरद पवारही हजर होते. या चाचणीत काका पवार पराभूत झाला होता. असं म्हणतात, की त्या वेळी अवघा महाराष्ट्र हळहळला होता.) असो... एकूणच ही सगळी पार्श्वभूमी पाहिल्यानंतर नरसिंगविषयी मला कमालीची उत्सुकता लागली होती. पण हाय रे दैव...राष्ट्रीय उत्तेजक द्रवविरोधी संघटनेच्या (नाडा) चाचणीत तो हरला... म्हणजे डोपिंगमध्ये सापडला. इथे भारताला जितका मोठा धक्का बसला तितकाच महाराष्ट्रालाही बसला. उत्तर प्रदेश ही त्याची जन्मभूमी असली तरी तो महाराष्ट्रावासी झाला आहे. तीन वेळा महाराष्ट्र केसरी, जागतिक कुस्तीतील पदकविजेता असलेला नरसिंग उत्तेजक कसा घेऊ शकतो? या निमित्ताने माझ्या मनात नाना प्रश्न उपस्थित होत आहेत... - नरसिंग जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळला आहे. त्या वेळी तो कोणत्याही उत्तेजक चाचणीत सापडलेला नाही. जो जागतिक कुस्ती गाजवू शकतो, तो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी उत्तेजक कसा काय घेऊ शकतो? - नरसिंगने यामागे कटकारस्थान असल्याचं म्हंटलं आहे. एकूणच ऑलिम्पिकला जाण्यापासून जे वाद सुरू होते त्या पार्श्वभूमीवर खरंच असा काही कट असू शकतो का? - ऑलिम्पिक महिन्यावर येऊन ठेपली आहे. या आठ- पंधरा दिवसांत उत्तेजकाचा अंश नष्ट होऊ शकतो का? (वैद्यकीय ज्ञान अजिबात नसल्याने हा बाळबोध प्रश्न वाटल्यास समजून घ्यावं... जसं दारूची नशा दुसऱ्या दिवशी उतरते तसं काही असेल म्हणून म्हंटलं..) - नरसिंग जर जाऊच शकला नाही तर मग निवड चाचणी घेता येईल का? कुस्ती महासंघाकडे तेवढा वेळ नसेल तर मग सुशीलकुमारला पाठवणे योग्य होईल का? काहीही असो, यातून नरसिंगवर आलेलं दुर्दैवाचं मळभ दूर होईल की नाही माहीत नाही... पण या प्रकाराने एक लक्षात आलं, ते म्हणजे भारतीय खेळाडूंनी गाफील राहू नये आणि त्याच्या प्रत्येक सेवनावर (अन्न असो वा अन्य काही) प्रशिक्षकालाही गांभीर्य असायला हवं... दुर्दैवाने तसं काहीही झालेलं यात दिसत नाही. कटकारस्थान असेल तर ती व्यक्ती शिक्षेस पात्रही ठरेल. पण एका मल्लाचं आयुष्य त्यामुळे धुळीस मिळालं हे नक्की...

वाचने 4161
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खरं काय ते बाहेर यायला हवं...बाकी भारतीय क्रीडा मंडळांचा भोंगळ कारभार पाहता आस काय होईल असं वाटत नाही.

- नरसिंग जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळला आहे. त्या वेळी तो कोणत्याही उत्तेजक चाचणीत सापडलेला नाही. जो जागतिक कुस्ती गाजवू शकतो, तो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी उत्तेजक कसा काय घेऊ शकतो?>>>> उत्तेजकं घेतल्यावर अमुक दिवसांनंतर ते रक्तात दाखवत नसेल आणि ते गणित यावेळी चुकलं असेल.सर्वच खेळाडू उत्तेजकं घेतात हे वाचलं आहे.

काही माहिती पुढे येत आहे. तिच्या विश्वासार्हतेची खात्री या घटनेच्या तपासात केली जाईल. ‘Intruder’ who may have spiked Narsingh Yadav’s food identified

आणि त्याला अडकवण्यात आले आहे असे त्याचे म्हणणे आहे. नि:पक्ष चौकशी तून काही निश्पन्न झाले तर खरेच त्याला अडकविण्याचा उपद्याप करण्याणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे (अधिकार्याम्सहीत) भविष्यात असा अन्याय होणार नाही.

नरसिंग जर जाऊच शकला नाही तर मग निवड चाचणी घेता येईल का? कुस्ती महासंघाकडे तेवढा वेळ नसेल तर मग सुशीलकुमारला पाठवणे योग्य होईल का?
आता उगाच बदली खेळाडू नाही पाठवता येणार. फक्त दुखापत झाली कोणाला तरच बदली खेळाडू पाठवता येतो.

नरसिंग यादवच ऑलिंपिकला जाणार हे कळलं तेव्हा लै भारी वाटलेलं... आता सगळ्याचा विचका झालाय!! श्या....

माझ्या माहितीप्रमाणे, २०१२ च्या लंडन ओलीम्पिक्स मध्ये सुशील कुमार सोबतच नरसिंग यादव, योगेश्वर दत्त आणि अमित कुमार असे एकूण ४ कुस्तीगीर होते. त्यापैकी सुशील कुमारने रजतपदक आणि योगेश्वर दत्तने कांस्यपदक मिळवले होते. मग, २०१६ च्या रिओ स्पर्धेसाठी फक्त नरसिंग यादव ह्यालाच पाठवणार आहेत का? बाकिंच्यांच काय ?

In reply to by प्रसन्न३००१

ते तेव्हा वेगवेगळ्या वजनी गटात खेळले होते. सुशीलकुमारचा वजनी 66 का 68 KG गट यंदा ऑलिम्पिक मध्ये नाही. म्हणून त्याला वजन वाढवून 74 KG च्या गटात खेळायचे होते. जो नरसिंगचा वजनी गट आहे. हुश्श...

भाऊ चाल्ला ना आॅलिंपिकला. नाडा ला पटला युक्तिवाद की उत्तेजक जेवणात मिसळले गेले होते. त्याच्या आधीच्या चाचण्याद्वारे सिद्ध झाले. चला पदकासाठी शुभेच्छा व प्रार्थना