मॉडेस्ट रिसेप्शन
लेखनविषय (Tags)
अॅब्सर्डिस्ट परंपरेतलं किंवा ब्लॅक कॉमेडी प्रकारचं असलं काही मी कधी बघेन असा कधी विचारही केला नव्हता. पण पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि एनएफएआय यांनी आयोजित केलेल्या इराणी चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या 'मॉडेस्ट रिसेप्शन’ या अशा प्रकारच्या चित्रपटाने चक्क १ तास ४० मिनिटं खिळवून ठेवलं. त्यामुळे त्याबद्दल इथे लिहायचं धाडस करावं का असा विचार आला आणि तो जायच्या आत कृतीत आणायचा हा प्रयत्न आहे.
मनी हाघीगी या इराणी दिग्दर्शकाच्या या चित्रपटात स्वत: तो(कावेह) आणि तारानेह अलीदूस्ती(लैला) ही अतिगोड चेहऱ्याची अभिनेत्री मुख्य पात्रे आहेत. चित्रपट घडतो तो इराणच्या कुठच्यातरी सीमेनजीकच्या उंच पर्वतरांगांमध्ये. सुरू होतो तेव्हा एक शस्त्रधारी सैनिक त्यांची महागडी गाडी अडवतो. गाडीच्या काचा खाली जातानाच आतील दोघांचं कडाकडा भांडण सुरू असतं. ती गाडी चालवत असते आणि तो सैनिक तिला कागदपत्रे दाखवण्यास सांगतो खरा, पण त्यांच्या अखंड भांडणात नेमकं काय करावं हेच त्याला समजत नाही. बराच वेळ भांडण, शिवीगाळ, रागाने फोन बर्फात फेकून देणे, एक मधेच आलेला कुणातरी बाईचा फोन या सगळ्यानंतर तो सैनिक वैतागतो. तेव्हा ही लैला त्याला सांगते की ‘याचा(कावेहचा) खरा प्रश्न तर पैसा आहे.’ त्यावर तो सैनिक त्याला ‘कसा आपणा सर्वांनाच जास्त पैसा हवा असतो’ हे सांगत असतानाच हे लोक गाडीची मागची बाजू उघडतात आणि तिथे दिसतात त्या नोटांनी ठासून भरलेल्या असंख्य पिशव्या.. त्या सैनिकाच्या अंगावर दोन पिशव्या फेकून आणि गाडीची मागची बाजू तशीच उघडी टाकून हे लोक गाडी भरधाव सोडतात. जाता-जाता लैला त्या सैनिकाला ओरडून सांगते की 'तुमच्यात ते वाटून घ्या, कायदेशीर पैसा आहे तो..' काही वेळाने लैला आणि कावेह गाडी चालवता चालवता या प्रसंगाचं त्यांच्या आयफोनवरचं रेकॉर्डिंग पाहून मनमुराद हसताना दिसतात.
आता इथून पुढे त्या लोकांना त्या उजाड पर्वतांमध्ये भेटलेली माणसं आणि त्यांना पैश्यांच्या पिशव्या द्यायचे यांचे प्रयत्न याभोवती चित्रपट फिरतो. कुणीतरी तुमच्याकडे पैसाच पैसा भरलेली पिशवी घेऊन आलं तर तुम्ही काय कराल? माणसं काय करतील? काही वेळ वाटतं की या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण नाही, कोणत्याही तर्कशुद्धतेला पूर्णपणे धिक्कारून हे अॅब्सर्ड नाट्य पुढे चालू राहतं. ते हा पैसा का वाटत फिरत आहेत याचं उत्तर आपण शोधत बसतो. कधी मधेच ते कुठच्यातरी बाईबद्दल बोलतात-जी कदाचित त्यांची आई असेल किंवा दुसरी कुणी-जिच्यासाठी ते हे पैसे वाटत आहेत. आणि मधेच कुठच्यातरी अन्य लोकांबद्दल बोलतात, ज्यांच्यासाठी ते हे काम करत आहेत असं वाटतं. त्यांच्या त्या पिशव्यांवर आकडे आहेत. मधेच वाटतं त्या पैसे वाटण्याला काही शिस्त आहे, मधेच ते मनात येईल तसे उधळून टाकतात. २ लहान मुलांकडून जळणाची लाकडे विकत घेऊन त्यांना कावेह लाखो रियाल देऊन टाकतो. दोघंही पैसे देण्यासाठी निरनिराळी नाटकं करतात. अनेक गोष्टींवर त्यांचे वाद होतात, पण बऱ्याचदा एकमेकांच्या नाटकामधे ते सहभागी होतात. ते नक्की कोण आहेत हे कधीच समजत नाही. कधी ते भाऊ-बहीण असल्याचं भासवतात, कधी नवरा-बायको, कधी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड. कोणतंही नातं ते नाकारत नाहीत, पण स्वीकारतही नाहीत. पण पैसे देण्याचा प्रत्येक प्रसंग ते रेकॉर्ड करतात, का, कुणासाठी, ते असंच गुलदस्त्यात.
पण या संपूर्ण संदिग्धतेने आलेली अस्वस्थता अजून वाढू लागते जेव्हा त्यांची नाटकं हळूहळू क्रौर्याच्या सीमेच्या अलीकडे-पलीकडे झुकू लागतात. कोणत्याही नैतिकतेशी त्यांना काहीच देणं-घेणं नाहीच आहे(amoral मराठी शब्द?). पैसे घेऊ न इच्छिणाऱ्या माणसालादेखील येनकेनप्रकारेण पैसे घ्यायला तर लावायचेच, वरून त्याला अतिशय अनपेक्षित गोष्टी करायला लावायच्या. असं वाटतं की त्यांना या खेळात मजाही येत आहे, पण त्यांना त्याचं कधीतरी मधेच दु:खही होतं. आपल्या सरळ मार्गाने जाणारी प्रामाणिक माणसं यांच्या तावडीतून सुटत नाहीत. प्रत्येकाला यांच्या मानसिक खेळांची शिकार बनावं लागतं, एखाद्या वादळाने वाटेतील प्रत्येक झाडाला उन्मळून काढावं किंवा कमीत कमी त्याचं अपरिमित नुकसान करावं तसं.
या सगळ्यात कुठेही काहीही सुसूत्रता नाही. कोणतंही स्पष्टीकरण नाही. हे दोघं स्वत: नियती असल्यासारखा भास होत राहतो. नियती एक गोष्ट देऊन तिच्या बदल्यात दुसरं काही काढून नेते, तसं काहीतरी. बरं, ती गोष्ट तुम्हाला हवीच असते असं काही नाही. तुम्ही त्या नियतीच्या वाटेत येता आणि तिच्या खेळात अडकता. तुमच्यासमोरचे सर्व पर्याय सारखेच भयंकर असतात, किंवा तसं तुम्हाला भासवलं जातं तेव्हा तुम्ही काय कराल?
या दोघांनाही हा खेळ जड होत जातो. त्यांचं गुदमरणं दिसत राहतं. आधी दोन अति-श्रीमंत आणि अतोनात पैसा असणाऱ्या आणि हा खेळ खेळण्याची मजा लुटणाऱ्या वात्रट लोकांपासून त्यांचं रूप बदलत जाऊन, भकास, कुणाच्यातरी इच्छेने नको असलेलं काम करणाऱ्या, दोन तडफडणाऱ्या जीवांपर्यंत त्यांचा प्रवास होतो. हा चित्रपट कुठे संपतो, संपतो तेव्हा काय उत्तरं मिळतात, काय होतं, या कशाशीच काहीही देणं-घेणं आपल्यालाही राहत नाही इतकी बेचैनी यातून मिळते. समाधान जर कसलं मिळतच असेल, तर ते अॅब्सर्ड नाट्याचा एक जमून आलेला प्रयोग पहायला मिळाला याचंच, आणि एवढंच.
प्रतिक्रिया
जबर लिहीलयं!
परीक्षण आवडल.
लई भारी...
बघितला पाहिजे.
खूप छान ओळख. संधी मिळाली तर
काय सुरेख लिहिलंय...!!
छान लिहीलंय परीक्षण! जालावर
सुरेख परिक्षण. चित्रपट जालावर
छान लिहिलंय! हा चित्रपट तसा
अवांतर : या वरुन आठवले
छान
सर्वांना धन्यवाद. कदाचित
बघायला हवा चित्रपट.
अमॉरल म्हणजे नैतिक अनैतिक
सुरेख परिक्षण. बघायच्या
अरे वा! मस्तच!