✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांस्कृतिक महाराष्ट्र

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी
Fri, 07/01/2016 - 17:15  ·  लेख
लेख
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला. नंतर पेशवाई येऊन गेली आणि पेशवाई संपून ब्रिटीश साम्राज्य. महाराष्ट्रातच स्वातंत्र्यपूर्व कॉंग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक व म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांचा चळवळीत सहभाग होता. सेवाग्राम व महाराष्ट्र ही गांधींजीच्या चळवळीची प्रमुख केंद्रे बनली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत मराठी भाषिक स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आता महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 112,372,972 इतकी आहे. तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ: 307713 चौरस किमी आहे. छत्तीसगड, अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश यांना महाराष्ट्राच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रात संत परंपरा मोठी असून संत ज्ञानेश्वर हे संत परंपरेतील थोर संतश्रेष्ठ समजले जातात. 1188 साली लिहिला गेलेला मुकुंदराजांचा विवेकसिंधू हा मराठीतला पहिला पद्यग्रंथ तर 1278 मध्ये म्हाइंभटांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासह त्यांच्या शिष्यवर्गाचा विचार केला तर महाराष्ट्राने अनेक संतांना जन्म दिला आहे. ही संतपरंपरा पंढरपूर येथील विठोबा या लोकदैवताला भजताना निर्माण झाली म्हणून महाराष्ट्रात विठोबा या दैवताचे स्थान अनन्यसाधारण ठरते. या संत परंपरेतल्या सर्वच संतांनी ‍अभिजात काव्य निर्मिती केली आहे. (पंढरपूरसाठी आषाढी – कार्तिकी एकादशीला दरवर्षी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून भक्‍तांची पायी वारी निघते.) ही वारी परंपरा सुमारे आठशे वर्षांपासून टिकून आहे. या संतपरपरेंचा वारसा अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संत कवींना केवळ धार्मिक वा अध्यात्मिक महत्व नाही तर आजचे थोर साहित्यिकही स्वत:ला या संतपरंपरेचा पाईक समजतात हे उल्लेखनिय उदाहरण आहे. संतकवी, पंतकवी आणि आधुनिक साहित्य अशा तीन प्रकारात महाराष्ट्रातील साहित्यनिर्मितीकडे पाहिले जाते. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि आता भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांना मराठीतला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रात आज प्रंचड प्रमाणात मराठी लेखन होत असून त्यातून उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती उदयास येतांना दिसते. भारतात साजरे होणारे अनेक सण महाराष्ट्रांतही साजरे केले जात असले तरी फक्‍त महाराष्ट्रात साजरे केले जाणारेही काही सण आहेत. उदाहरणार्थ, अक्षय तृतीया, पोळा, गणपती उत्सव (गणेश चतुर्थी), अनंत चतुर्दशी, भाऊबीज, गुडी पाडवा, हळदी कुंकू, मकर संक्रांत, नाग पंचमी, हनुमान जयंती, राखी पौर्णिमा, मंगळागौर, गौराई, कानबाई, होळी, चंपाषष्ठी आदी सणांचा ठळक नामनिर्देश करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गड, किल्ले हे महाराष्ट्राचे पुरातत्वीय वैभव म्हणता येईल. यात शंभरेक गड व किल्ल्यांचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्‍त अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, कान्हेरी, कारला गुफा, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, मालशेघाट, अंबोली, चिखलदरा, पन्हाळा, तोरणमाळ ही हिलस्टेशन; पंढरपूर, नाशिक, शिर्डी, नांदेड, ओंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, गणपतीपुळे, भीमाशंकर, हरिहरेश्वर, शेगाव ही धार्मिक स्थळे आहेत. पुण्याचा शनिवार वाडा, लोणार सरोवर, रंकाळा तलाव, अनेक धबधबे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संग्रहालये, धार्मिक क्षेत्रे, अष्टविनायक गणपती मंदिरे, देवीची साडेतीन पीठे, ज्योतिर्लिंगाची स्थाने, खंडोबाची स्थाने, थंड हवेची ठिकाणे, गरम पाण्याचे झरे असलेली स्थाने, नद्यांच्या काठांवरील महत्वपूर्ण गावे यांचा पर्यटनात समावेश होईल. गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या नद्या आहेत. त्या सह्याद्रीत उगम पावतात. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, गिरणा, भीमा- चंद्रभागा, नर्मदा, तापी या नद्याही महाराष्ट्रातून वाहतात आणि त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. कोकणपट्टीला समांतर असलेली सह्याद्री पर्वतश्रेणी थेट केरळ पर्यंत गेलेली दिसते. महाबळेश्वर सारखे विस्तृत पठारी प्रदेश असलेल्या सह्याद्रीत कळसूबाई (1646 मीटर) सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वताचे पठारी प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत. या पर्वतांतून तापी, नर्मदा नद्या उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेल्या पठारी भागात काळी माती आहे. तिला मृदाही म्हणतात. या मातीत भारी काळी आणि मध्यम काळी असे दोन भाग पडतात. 65 टक्के लोक शेती, कामगार आणि शेतीसंबधीच्या व्यवहारावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात कोळसा, मँगनीज, बॉक्साईट, लोह, चूनखडी, डोलोमाईट, सिलीमनाईट, सिलिका सॅड, फ्लोराईट आदी प्रकारचे खनिजांचे साठे आढळतात. पूर्व भागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील जंगले घनदाट आहेत. त्यांत सागवान लागडाचा समावेश होतो. पश्चिमेला सह्याद्रीच्या काही भागातही दाट जंगले आहेत. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्रांची नोंद 63842 वर्ग किमी असून जंगलांची टक्केवारी 21 टक्के आहे. छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले, आगरकर, आण्णासाहेब कर्वे, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, यशवंतराव चव्हाण आदी कर्तृत्ववान महान लोक महाराष्ट्रातून घडलेत. महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस. राज्यशासनाची अधिकृत भाषा आणि प्रमाणभाषा म्हणून प्रामुख्याने मराठी ओळखली जात असली तरी मराठीच्या अनेक स्थानिक घटकबोली आढळतात. अशा घटकबोलींची संख्या जवळपास पासष्ट इतकी आहे. त्यात आदिवासी आणि भटक्या विमुक्‍तांच्या भाषांचाही समावेश आहे. अहिराणी, आगरी, कोहळी, खानदेशी लेवा, चंदगडी, झाडी, वैदर्भी, तावडी, पोवारी, मालवणी, वर्‍हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातल्या लोकभाषा असून कातकरी, कोकणा, कोरकू, कोलामी, गोंडी, गोंडी-थाट्या, गोंडी माडिया, ठाकरी, ठाकूर क, ठाकूर म, ढोरकोळी, निमाडी, निहाली, परधानी, पावरी, भिल्ली/भिलोरी/देहवाली, मथवाडी, मल्हारकोळी, मावची, मांगेली, राठ्या (बारेला), वारली, हलबी या आदिवासी बोलीभाषा आहेत. या व्यतिरिक्‍त कुंची कोरवा, कैकाडी, कोल्हाटी, गोरमाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडीया, छप्परबंद, डोंबारी, नंदीवाले, पारधी, पारूशी- नाथपंथी डौरी, पारूशी-मांग, पारूशी-मांग गारूडी, बेलदार, वडारी, वैदू या भटक्या विमुक्‍तांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. ब्राम्ही, देवनागरी, मोडी, महानुभावाच्या सांकेतिक लिपी आणि गोंडी लिपी अशा पाच लिपी राज्यात प्रचलित आहेत. महाराष्ट्रात अनेक आदिवासी आणि भटक्या विमुक्‍त जनजाती आढळतात. भील, गोंड, माडीया, कातकरी, कोळी, ओरान, वारली हे इतर आदिवासींपेक्षा संखेने जास्त आदिवासी रहिवासी आहेत. या नंतर कोकणा, मावची भील, गावीत, पावरा, राठवा, धनगर, वंजारा, गोंधळी, आंध, छत्तीसगडी, कोलामी, कोरकू, मावची. भील, तडवी भील, वसावे भील, कवार/ कानवार, गोंड/ राजगोंड, गोंडडोरला, गोंडझारे, गोंडमुरिया, गोंडथाटीया, परधान, कोकणा, कोलम, गामित आदी आदिवासी वास्तव्य करून राहतात; तर पारधी, राजपूत भामटा, वडारी, नंदीबैलवाले, बहुरूपी, गारूडी, पाथरवट, पंचाळ, जोशी, कैकाडी, बंजारा, थोटी, कातकरी/काथोडी, कोरकी, नाहल आदी भटके विमुक्‍त आदिवासी आढळतात. मराठी भाषेसह अनेक घटक बोलींतून प्रचंड प्रमाणात लोकसाहित्य विखुरलेले आहे. मराठी लोकसंस्कृतीच्या काही घटकांगांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल: व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस यावा म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाटी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळ काढणे, घरभरणी करणे, लग्नाच्या पध्दती आदी विधी. भोवाडा, खंडोबा आढीजागरण, लळित, लोकनाट्य, तमाशा, भील आणि कोकणा यांचा डोंगर्‍या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माऊली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी विधी- नाट्य. कानबाई– रानबाई बसवणे, महालक्ष्मी बसवणे, भालदेव बसवणे, गौराई बसवणे, चिरा बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), लोकदेवांची पालखी काढणे, वीर काढणे, म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली, आदी लोकदेव- देवता. आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल, आदी खेळ. बारातल्या शिव्या, झोक्यावरची गाणी, भलरी गीते, कापणीची गीते, मोटेवरची गाणी, जात्यावरची गाणी, कापणी गीते, खंडोबाची गाणी, झोक्यावरची गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबध्द रडणे, लोकगीतातला तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाणातील संज्ञा, उखाणे, आन्हे, म्हणी, गप-गफाडा, लोककथा, आख्यायिका, भारूडे, लळित, ओव्या, लोकगीते आदी लोकसाहित्य, विविध प्रकारचे ग्रामीण खाद्य पदार्थ, सटीचा टाक विधी, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी रूढी-रिती. खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी, किंगरी आदी वाद्य. फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, भिलावू नाच आदींसह सांस्कृतिक गीतांत लावणी, पोवाडे आढळतात. या व्यतिरिक्‍त अनेक लोकगीते त्या त्या परिवेशात दिसून येतात. विविध लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकवाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दिसून येतात. तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (13 व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात. मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या लोकजीवनात मुख्य पाच विभाग पडतात. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असे हे प्रमुख विभाग दिसून येतात. त्या त्या विभागातल्या सांस्कृतिक जडणघडणीत थोडाफार फरक पडतो. शेती, व्यवसाय, भाषा, राहणीमान, वेशभुषा, वास्तु- घर, खाद्यपदार्थ, विधी आदीं लोकजीवनात त्या त्या भौगोलिक क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात बदल दिसून येतात. (या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात ‘सांस्कृतिक भारत’ या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 23 व 24-6-2016 ला दोन भागात प्रसिध्द झालेला हा लेख.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/ संदर्भ सूची: 1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार, प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, 2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती. 3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे 4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे. 5. अहिराणीच्या निमित्ताने: भाषा- डॉ. सुधीर रा. देवरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
7904 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

हाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230

प्रचेतस
Fri, 07/01/2016 - 18:01 नवीन
हाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात.
महाराष्ट्राची स्थापना केल्याचा दाखला कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

+१...

असंका
Sat, 07/02/2016 - 09:22 नवीन
+१... उत्तराची अत्यंत उत्सुकतेने वाट पहात आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काही साशंकता आणि काही माहिती हवी

माहितगार
Fri, 07/01/2016 - 20:35 नवीन
हा लेख धावता आढावा आहे का, पुढील भागातून कदाचित सविस्तर माहिती असेल तर त्यांची प्रतिक्षा करु. सातवाहनांचे महाराष्ट्रासाठी योगदान मान्यकरूनही 'महाराष्ट्राची स्थापना केली' तसेच किल्ल्यांच्या बांधणी आणि कुशल सामरीक उपयोगातील शिवाजी महाराजांचे योगदानाचे महत्व मान्य करुनही किल्ल्यांची महाराष्ट्रातील उभारणीचा इतिहास बर्‍यापैकी प्राचीन असावा. मी समिक्षक नाही पण कोण जाणे महाराष्ट्रात आज प्रंचड प्रमाणात मराठी लेखन होत असून त्यातून उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती उदयास येतांना दिसते. या वाक्यातील विशेषणांबद्दल साशंकता वाटली. एखात नमुद खालील उल्लेखांची व्यक्तीशः मला माहिती नाही अधिक परिचय वाचण्यास आवडेल. १) सुखगाडी (सुखदेवता) २) भोवाडा ३) भालदेव बसवणे ४) चिरा बसवणे ५) बारातल्या शिव्या ६) भलरी गीते ७) गप-गफाडा ८) दुख टाकायला आणणे, ९) दारावर जाणे पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखात नमुद असे वाचावे.

माहितगार
Fri, 07/01/2016 - 20:36 नवीन
लेखात नमुद असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

डॉक किल्ल्यांचा त्रोटक केला

महासंग्राम
Sat, 07/02/2016 - 11:01 नवीन
डॉक किल्ल्यांचा त्रोटक केला आहे, त्याबद्दल अजून विस्ताराने लिहाल अपेक्षा. बाकी उत्तमच. पुलेशु
  • Log in or register to post comments

शिवाजी महाराजांनी किल्ले खूप

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 11:04 नवीन
शिवाजी महाराजांनी किल्ले खूप कमी उभारले. बरेसचे किल्ले हे प्राचीन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

किल्ल्यांची प्राचिनता लक्षात

माहितगार
Sat, 07/02/2016 - 11:11 नवीन
किल्ल्यांची प्राचिनता लक्षात घेता, सुरक्षा आणि संघर्षा पलिकडे जाऊनही मानवी संस्कृतीत किल्ल्यांचे काही योगदान राहीले असावे, इतिहास हा डॉकचा मुख्य विषय नाही तेव्हा इतिहास गौण राहील्यास हरकत नै पण डॉकनी सांस्कृतीक अंगानेही किल्ल्यांबद्दल माहिती दिल्यास छान वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इतिहास गौण राहिल्यासहई हरकत

प्रचेतस
Sat, 07/02/2016 - 12:00 नवीन
इतिहास गौण राहिल्यासहई हरकत नाही पण चुकीची माहिती पसरायला नको इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सहमत आहे

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:03 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही ओ शेठ मी प्राचीन

महासंग्राम
Sat, 07/02/2016 - 14:04 नवीन
नाही ओ शेठ मी प्राचीन किल्ल्यांच्या अनुषंगानेच ते म्हणालो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शिवाजी महाराजानी फक्त सात नवीन किल्ले बान्धले.

दुर्गविहारी
Sat, 07/02/2016 - 20:38 नवीन
शिवाजी महाराजानी फक्त सात नवीन किल्ले बान्धले. राजगड, कान्सा उर्फ पद्मदुर्ग, खान्देरी, सिन्दुदुर्ग, प्रतापगड, साजरा आणि गोजरा. बाकीचे जुने बेवसाउ किल्ले नव्याने दुरुस्त करुन स्वराज्याच्या कामी आणले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ब्लॉगची जाहिरात की लिखाण ?

हेमन्त वाघे
Sat, 07/02/2016 - 11:41 नवीन
डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर देतील असे वाटते का? यांचे लिखाऊ पाहिले तर हे लिहून जातात आणि कोणत्याही प्रतिक्रियांना उत्तर यांना द्यावेशे वाटत नाही यांचा ब्लॉग http://sudhirdeore29.blogspot.in/ म्हणजे तर ऐक वेगळाच प्रकार आहे . या ब्लॉग मध्ये कोणत्याही लिखाणावर प्रतिक्रिया दिसत नाहीत .. का बरे ? कारण डॉक्टर त्या नाहीश्या करतात . माझा कालचाच अनुभव आहे ..;) त्यामुळे स्वतः सुखाय म्हणून निबंध लिहीणार्या आणि वाचकांची मुळीच पर्वा ना करणाऱ्या या लेखकाला किती महत्व द्याचे ते आपणच ठरवायचे आहि .
  • Log in or register to post comments

माफ kara

हेमन्त वाघे
Sat, 07/02/2016 - 12:05 नवीन
कारण डॉक्टर त्या नाहीश्या करतात . माझा कालचाच अनुभव आहे ..;) या वाक्याबद्दल मला डॉ. सुधीर रा. देवरे ची माफी मागायची आहे - कारण माझी काळ लिहिलेले टिप्पणी दिसत आहे , ती मे दुसऱ्या लेखावर दिली होती तरीही यांच्या ब्लॉग वर फक्त माझ्याच टिप्पण्या दिसतात , असे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

हेमंत वाघेजी, धन्यवाद. इथे

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 18:05 नवीन
हेमंत वाघेजी, धन्यवाद. इथे टिप्पणी साठी वाचकांना अडचणी येतात. ऑप्शन मागितले जाते. आणि टिप्पणी लिहूनही ती येथे दिसत नाही. शिक्षण उपाय योजनेवर मी ब्लॉग लिहीत आहे. प्रतिसाद द्या तुमच्या दोन्ही टिप्पण्या मी डॉ. सुधीर राजार... - Sat, 02/07/2016 - 17:33 तुमच्या दोन्ही टिप्पण्या मी आता माझ्या ब्लॉग साईटवर वाचल्यात आणि प्रतिक्रिया दिल्या. पण तिथे प्रतिक्रिया येत नाहीत. वर लिहिलेली प्रतिक्रियाही तिथे आलेली नाही. मी चार वेळा प्रयत्न केला. शेवटी एकदा प्रयत्न करून ते कॉपी करून ठेवले. तीच कॉपी वर दिली आहे. गैरसमज नसावा. तुमची टिप्पणी नाहीशी केली नाही. एकतर त्या दो्न्ही आपल्याला वाचायला मिळतील आणि नसतील तर त्या तिथे आपोआप नाहीशा होत असाव्यात. पण मी दो्न्ही प्रतिक्रिया वाचल्या आणि तिथे उत्तरे पण दिलीत. मी वाचकांशी बोलत असतो. वेळ देत असतो. मी आंतरजालावर रोज फक्‍त अर्धा तास असतो. बाकी वेळ नाही. त्यात इमेल करणे आणि इमेल वाचणे यात वेळ जातो. माझा भ्रमणध्वनी: 7588618857. आपण जे काही बोललात तो आपला पूर्णपणे गैरसमज आहे. र्फोनवर बोलाल तेव्हा जास्त बोलू आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

ब्लॉगचा मंच स्वतः सुखाय असा

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:09 नवीन
ब्लॉगचा मंच स्वतः सुखाय असा मर्यादीत असू शकतो, तर मिपा सारख्या चर्चात्मक मंचावर लेखकाने चर्चेत सहभागी होणे उत्तमच, पण ऑदरवाइज सुद्धा चर्चा हा मिपा मंचाचा आत्मा आहे त्यामुळे लेखक उत्तर देत नाही म्हणून त्याच्या लेखनाची चिकीत्सा होऊ नये असेही नसावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

लेखक उत्तर देत नाही म्हणून

आदूबाळ
Sat, 07/02/2016 - 12:27 नवीन
लेखक उत्तर देत नाही म्हणून त्याच्या लेखनाची चिकीत्सा होऊ नये असेही नसावे. असो.
असहमत. उत्तर न देणाऱ्या लेखकांना अनुल्लेखाने मारावे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

पण म्हणून साशंकता व्यक्त

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:38 नवीन
पण म्हणून साशंकता व्यक्त केल्या जाण्याचे राहू नये असे वाटते -कारण साशंकता व्यक्त न केल्यास अनभिज्ञ वाचकांना जे सांगितले आहे तेच बरोबर वाटण्याची शक्यता शिल्लक राहते म्हणून प्रचेतसांनी लगोलग प्रतिसाद दिला त्याचे महत्व राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आणि प्रत्येक वेळी मिपावर

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:40 नवीन
आणि प्रत्येक वेळी मिपावर लेखकाचे आधी लेखन प्रसिद्ध झाले आहे की नाही त्याने उत्तरे दिली आहेत की नाही हे प्रत्येक प्रतिसादकाला अभ्यासणे होऊ शकेल असेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

खालील गोष्टी मला माहित नाहीत

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:44 नवीन
खालील गोष्टी मला माहित नाहीत हे हा लेख मिपावर आल्यामुळेच लक्षात आले. लेखकाने उत्तर दिले नाही तरी ज्यांना माहित आहे असे जाणकार त्याची माहिती देऊ शकतात हाच तर खुल्या विचारमंचाचा फायदा आहे. अर्थात लेखकांनी स्वत: चर्चेत मनमोकळेपणाने सहभागी झालेले चांगलेच १) सुखगाडी (सुखदेवता) २) भोवाडा ३) भालदेव बसवणे ४) चिरा बसवणे ५) बारातल्या शिव्या ६) भलरी गीते ७) गप-गफाडा ८) दुख टाकायला आणणे, ९) दारावर जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

'अहिराणी लोकसंस्कृती' या

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 18:00 नवीन
'अहिराणी लोकसंस्कृती' या माझ्या पुस्तकात या सर्व संज्ञांवर लिखाण आहे. कृपया उपलब्ध झाल्यास वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अहिराणीच्या निमित्ताने: भाषा

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 18:13 नवीन
अहिराणीच्या निमित्ताने: भाषा या पुस्तकातही काही वाचायला मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. सुधीर राजाराम देवरे

लेखक उत्तर देत नाही म्हणून

आदूबाळ
Sat, 07/02/2016 - 12:27 नवीन
लेखक उत्तर देत नाही म्हणून त्याच्या लेखनाची चिकीत्सा होऊ नये असेही नसावे. असो.
असहमत. उत्तर न देणाऱ्या लेखकांना अनुल्लेखाने मारावे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

थोडीशी दुरुस्ती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/02/2016 - 12:51 नवीन
चर्चा हा मिपा मंचाचा आत्मा आहे त्यामुळे लेखक उत्तर देत नाही म्हणून "लेखकाच्या वृत्तीबद्दल" चिकीत्सा होऊ नये असेही वाटते. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

;)

माहितगार
Sat, 07/02/2016 - 12:54 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेलही

नाखु
Sat, 07/02/2016 - 17:20 नवीन
पण मिपाचा वापर यष्टी ष्ट्यांडाच्या जाहीरात फलकासारखा करू नै. लावली जाहीरात गेले निघून ,

घेणं ना देणं आणि जाहीरात लाऊन जाणं.

बिरुटेसर तुमच्या भावना/अपेक्षा उदात्त आणि निर्भेळ आहेत पन त्याचा गैर्फायदा घेतला जाऊ नये अशीच ईच्छा !!! आधी़क ऊणे क्षमा.. मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हेमंत वाघेजी, धन्यवाद. इथे

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 17:29 नवीन
हेमंत वाघेजी, धन्यवाद. इथे टिप्पणी साठी वाचकांना अडचणी येतात. ऑप्शन मागितले जाते. आणि टिप्पणी लिहूनही ती येथे दिसत नाही. शिक्षण उपाय योजनेवर मी ब्लॉग लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

आपल्याला जो काही अनुभव आला

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 18:11 नवीन
आपल्याला जो काही अनुभव आला त्या मागे काही तांत्रिक कारण असावे का? लेखकाने ते अजून वाचले असावे की नाही याची खातरजमा न करता आरोप करणे चुकीचे आहे. कृपया असाही विचार करावा कोणाबद्दल गैरसमज करण्याआधी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

तुमच्या दोन्ही टिप्पण्या मी

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 17:33 नवीन
तुमच्या दोन्ही टिप्पण्या मी आता माझ्या ब्लॉग साईटवर वाचल्यात आणि प्रतिक्रिया दिल्या. पण तिथे प्रतिक्रिया येत नाहीत. वर लिहिलेली प्रतिक्रियाही तिथे आलेली नाही. मी चार वेळा प्रयत्न केला. शेवटी एकदा प्रयत्न करून ते कॉपी करून ठेवले. तीच कॉपी वर दिली आहे. गैरसमज नसावा. तुमची टिप्पणी नाहीशी केली नाही. एकतर त्या दो्न्ही आपल्याला वाचायला मिळतील आणि नसतील तर त्या तिथे आपोआप नाहीशा होत असाव्यात. पण मी दो्न्ही प्रतिक्रिया वाचल्या आणि तिथे उत्तरे पण दिलीत.
  • Log in or register to post comments

बाकी सर्व वाचकांनी उपस्थित

डॉ. सुधीर राजा…
Sat, 07/02/2016 - 17:34 नवीन
बाकी सर्व वाचकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मी जरूर लिहिल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शिवाजी महाराजानी

दुर्गविहारी
Sat, 07/02/2016 - 20:35 नवीन
शिवाजी महाराजानी फक्त सात नवीन किल्ले बान्धले. राजगड, कान्सा उर्फ पद्मदुर्ग, खान्देरी, सिन्दुदुर्ग, प्रतापगड, साजरा आणि गोजरा. बाकीचे जुने बेवसाउ किल्ले नव्याने दुरुस्त करुन स्वराज्याच्या कामी आणले.
  • Log in or register to post comments

नमस्कार.

डॉ. सुधीर राजा…
Sun, 07/03/2016 - 17:12 नवीन
नमस्कार. मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर‍ मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल. 2. मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्‍या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्‍या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे. 3. ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा विषय स्वतंत्र पुस्तकाचा आहे. म्हणून या ब्लॉग मध्ये फक्‍त धावता आढावा घेतला आहे असंच म्हणावं लागेल. - डॉ. सुधीर रा. देवरे
  • Log in or register to post comments

@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/03/2016 - 21:09 नवीन
@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल.››› खाली लिंक देता ना, ब्लॉगची.. दरवेळी .. ! म्हणूनच म्हणता येईल/येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. सुधीर राजाराम देवरे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा