✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रिझर्व बॅंकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांची Monetary Policy आणि त्यांच्याकडूनच्या अपेक्षा

क
क्लिंटन यांनी
Mon, 09/23/2013 - 23:32  ·  लेख
लेख
५ सप्टेंबरला रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांची नियुक्ती झाली. त्याबरोबरच आय.आय.टी/आय.आय.एम मधून सुवर्णपदक विजेते, एम.आय.टी मधून पी.एच.डी, IMF मधील अनुभव, University of Chicago मधील Booth School of Business मध्ये प्राध्यापक आणि ८-१० पुस्तके तसेच ७०-८० रिसर्च पेपर्सचे लेखक अशी भारदस्त शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या रघुराम राजनकडून सध्याच्या आर्थिक परिस्थितीत मार्ग काढण्यात महत्वाचे योगदान द्यायची जबाबदारी आली.आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मी फेसबुक लाईक्ससाठी नव्हे तर माझ्या अनुभवातून माझ्या मते योग्य निर्णय असेल तोच घेईन भले तो short term मध्ये कोणाला आवडो की न आवडो अशा प्रकारचे वक्तव्य करून आपण रिझर्व्ह बॅंकेचे एक स्वतंत्र गव्हर्नर असणार आहोत याची नांदी त्यांनी दिली. मागच्या शुक्रवारी (२० सप्टेंबरला) त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिली Monetary Policy जाहीर केली.या लेखाचा उद्देश या पॉलिसीचा आढावा घेणे आणि त्या अनुषंगाने बॅंकिंगशी संबंधित इतर महत्वाच्या गोष्टींचा परामर्श घेणे हा आहे. बॅंकांमध्ये तुमच्यामाझ्यासारखे वैयक्तिक खातेदार आणि कंपन्या त्यांच्या खात्यांमध्ये पैसे ठेवतात.बॅंकेत खातेदारांकडून एकूण जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवणे गरजेचे असते.याला ’Cash to Reserve Ratio' (CRR) म्हणतात.या CRR चा महागाई नियंत्रणात ठेवण्यात कसा महत्वाचा सहभाग असतो याविषयी अधिक इथे .सध्या CRR ४% आहे. तसेच खातेदारांकडून जमा झालेल्या एकूण रकमेपैकी काही रक्कम बॅंकांनी सक्तीने सरकारी bonds मध्ये गुंतविणे गरजेचे असते.याला Statutory Liquidity Ratio (SLR) म्हणतात. सध्या SLR २३% आहे.तेव्हा खातेदारांकडून जमा झालेल्या १०० रूपयांपैकी ४ रूपये CRR मध्ये तर २३ रूपये SLR मध्ये गेले.उरलेले जास्तीतजास्त ७३ रूपये बॅंका पुढे कर्जाऊ द्यायला वापरू शकतात.अर्थातच बॅंका सगळे ७३ रूपये कर्जाऊ द्यायला वापरत नाहीत तर त्या ७३ पैकी काही रक्कम बाजारात गुंतवितात. कोणत्याही दिवशी बॅंकेत खातेदार पैसे ठेवतात तसेच काढूनही घेतात.तसेच नवीन कर्ज दिले जाते त्याचप्रमाणे कर्जाची परतफेडही होते.तेव्हा कोणत्याही दिवशी बॅंकेत पैसे येतात त्याचप्रमाणे बाहेरही जातात.एखाद्या दिवशी जर बॅंकेतून बाहेर जाणारे पैसे आत येणाऱ्या पैशापेक्षा जास्त असतील तर अडचण व्हायला नको म्हणून बॅंका काही रक्कम स्वत:कडे ठेवतातच.त्यातूनही जर का बॅंकेतून बाहेर जाणारे पैसे आत येणाऱ्या पैशापेक्षा जास्त असतील तर बॅंका मधला फरक इतर बॅंकांकडून आणि रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे तात्पुरते कर्जाऊ घेऊन आपली गरज भागवितात. रिझर्व्ह बॅंकेकडून असे पैसे तात्पुरते कर्जाऊ घ्यायच्या facility ला Liquidity Adjustment Facility (LAF) म्हणतात. LAF अंतर्गत रिझर्व्ह बॅंक ज्या व्याजदराने बॅंकांना पैसे कर्जाऊ देते त्या दराला Repo Rate म्हणतात.अर्थातच बॅंकांना हे पैसे कर्जाऊ मिळवायला सरकारी bonds तारण म्हणून ठेवावे लागतात.सर्वात महत्वाचे म्हणजे हे bonds हे SLR अंतर्गत जे bonds घेतलेले असतात त्यापेक्षा वेगळे असावे लागतात. मे २०११ मध्ये माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी Marginal Standing Facility (MSF) ही नवी facility बॅंकांना उपलब्ध करून दिली.समजा LAF अंतर्गतही पैसे कमी पडत असतील तर MSF अंतर्गत सरकारी bonds तारण ठेऊन पैसे कर्जाऊ घेता येण्याची व्यवस्था केली.अर्थातच या MSF चा व्याजाचा दर Repo rate+1% इतका ठेवला.तसेच MSF साठी SLR अंतर्गत जे bonds बॅंकांनी घेतले होते ते तारण ठेवता येणार होते. ICICI बॅंकेची बॅलन्स शीट इथे बघता येईल.या बॅलन्स शीटवरून असे कळते की ३१ मार्च २०१३ रोजी बॅंकेकडील एकूण ठेवी २,९२,६१३ कोटी रूपये होत्या तर एकूण कर्जाऊ घेतलेले पैसे १,४५,३४१ कोटी रूपये होते. यावरून कळते की बॅंकेकडील काही ठेवी करंट अकाऊंटमध्ये,काही ठेवी सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये तर काही ठेवी fixed deposit मध्ये होत्या.यापैकी अर्थातच करंट अकाऊंटवर बॅंकेला ०% व्याज द्यावे लागते तर Savings Account वर Fixed Deposit पेक्षा कमी व्याज द्यावे लागते.बॅंकेच्या एकूण ठेवीपैकी जास्त ठेवी जर Current Account आणि Savings Account या स्वरूपात असतील तर बॅंकेला व्याजावर खर्च कमी होतो.बॅंकेकडील एकूण ठेवींपैकी किती % ठेवी Current Account आणि Savings Account मध्ये आहेत या रेशोला CASA Ratio म्हणतात. या बॅलन्स शीटवरून समजते की ICICI बॅंकेचा CASA Ratio सुमारे ४२% होता. Schedule ४ मध्ये बॅंकेने किती पैसे कर्जाऊ घेतले आहेत याची माहिती आहे.त्यावरून समजते की बॅंकेने ३१ मार्च २०१३ रोजी रिझर्व्ह बॅंकेकडून १५,६२५ कोटी रूपये कर्जाऊ घेतले होते.अर्थातच बॅलन्स शीट ही त्या दिवशीची परिस्थिती दाखविते.इतर दिवशी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडून कर्जाऊ घेतलेली रक्कम कमी किंवा जास्त असेल. सुब्बारावांनी जुलै २०१३ मध्ये जाहिर केलेले निर्णय गेल्या काही महिन्यात अमेरिका आणि युरोपात परिस्थिती काही प्रमाणावर सुधारू लागली.परिस्थिती वाईट असते तेव्हा अमेरिकेतील Financial Institutions आपली जास्त गुंतवणुक शेअरपेक्षा अधिक सुरक्षित असलेल्या अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये करतात. पण परिस्थिती सुधारल्यावर बॉंडमधील गुंतवणुक कमी करून शेअरमध्ये वळवली जाते.यातूनच बॉंडच्या किंमती कमी होतात आणि बॉंडवरील परतावा वाढतो.अमेरिकेतल्या Financial Institutions ना भारतातील bond मार्केटमध्ये गुंतवणुक करायची असेल तर अमेरिकेत जेवढा परतावा मिळतो त्यापेक्षा जास्त परतावा हवा असतो. नाहीतर अमेरिकेपेक्षा अधिक धोकादायक असलेल्या भारतीय bond मार्केटमध्ये या संस्था गुंतवणुक करणार नाहीत.पण अमेरिकेत bonds वरील परतावा वाढल्यामुळे भारतातील bonds वरील परतावा आणि अमेरिकेतील bonds वरील परतावा यातील फरक कमी झाला.अशा वेळी भारतातील bond मार्केटमधील गुंतवणुक या संस्था कमी करून अमेरिकेत वळवायचा धोका होता.तसे झाले असते तर भारतातून डॉलरचा ओघ बाहेर जाऊन रूपया आणखी कोसळला असता.तेव्हा यावर उपाय काय?कृत्रिम उपाय करून भारतातील बॉंडवरील परतावा वाढविणे म्हणजेच भारतातील बॉंडच्या किंमती कमी करणे!! हे कसे करावे? तर तत्कालीन गव्हर्नर सुब्बारावांनी जुलै २०१३ मध्ये काही निर्णय जाहिर केले.ते पुढीलप्रमाणे: १. CRR अंतर्गत बॅंकांना एकूण ठेवींच्या ४% रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवावी लागते हे आपण वर बघितले आहेच.ही सरासरी रक्कम तिमाहीतील एकूण सरासरी ठेवींच्या ४% इतकी ठेवणे गरजेचे असते.पण प्रत्येक दिवशी या गरजेच्या कमितकमी ७०% इतकी ठेवणे गरजेचे होते (पण तिमाहीत सरासरी maintain झाली पाहिजे). सुब्बारावांनी ही गरज ७०% वरून ९९% वर नेली. २. MSF अंतर्गत मे २०११ पासून दर Repo rate+१% होता तो Repo Rate+३% केला. या दोन निर्णयांमुळे बॅंकांकडील खेळता पैसा (liquidity) कमी झाली.पूर्वी असा जास्तीचा खेळता पैसा थोड्या कालावधीसाठी बॉंड मार्केटमध्ये गुंतवला जात असे.पण अशी liquidity कमी झाल्यामुळे या बॉंडची मागणी आणि म्हणून किंमत कमी झाली तर बॉंडवरील परतावा कृत्रिमरित्या वाढविला गेला. इथे दिलेल्या माहितीवरून कळते की सुब्बारावांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर १६ जुलै २०१३ रोजी भारतातील बॉंडवरील परतावा सुमारे ६.७% ने वाढला.तसेच नंतरही एकूण बॉंडवरील परताव्याचा आलेख चढता होता. रघुराम राजन यांची Monetary Policy रघुराम राजन यांनी २० सप्टेंबरला जाहिर केलेल्या monetary policy मध्ये Repo Rate मध्ये ०.२५% ने वाढ करून नवा Repo Rate आता ७.५% आहे. Repo Rate वाढला की बॅंकांचा कर्जावरील खर्च वाढतो आणि अर्थातच ज्या दराने बॅंका कर्जाऊ देतात तो व्याजाचा दरही वाढतो.राजन असा दर वाढवायची शक्यता लक्षात घेऊन स्टेट बॅंकेने आधीच व्याजाचे दर ०.१% ने वाढविले.तसे झाल्यास Aggregate demand कमी होऊन सध्या ६.१% वर असलेला महागाईचा दर कमी व्हावा या aim ने हा दर वाढविला आहे. तसेच सुब्बारावांनी १५ जुलै २०१३ ला घेतलेले काही निर्णय राजन यांनी अंशत: शिथील केले.म्हणजे दररोज CRR च्या ९९% ऐवजी ९५% रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवणे गरजेचे केले.त्याचबरोबर सुब्बारावांनी MSF चा दर Repo+३% केला होता तो Repo+२% केला.यातून असे दिसते (माझा तर्क) की सध्या डॉलरच्या दरामधील volatility कमी होणे अपेक्षित आहे त्यामुळे सुब्बारावांच्या tight liquidity ची गरज आता तितक्या प्रमाणावर राहिलेली नाही. रघुराम राजन यांनी भविष्यात काय करायला हवे याविषयी माझ्या अल्पमतीला जे समजते ते लिहावेसे वाटते.आज भारतातील एकूण बॅंकिंग सेक्टरपैकी सुमारे ७०% बिझनेस सरकारी बॅंका चालवतात.गेल्या २० वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये भारताची वाटचाल समाजवादी मिश्र अर्थव्यवस्थेपासून बऱ्यापैकी market economy पर्यंत होत आहे/झाली आहे. असे असताना बॅंकिंग सारख्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाच्या असलेल्या क्षेत्रात सरकारने अंग हळूहळू कमी करणे श्रेयस्कर ठरेल.जानेवारी २०१४ मध्ये काही नव्या बॅंकांना लायसेन्स दिली जायची शक्यता आहे.हा ट्रेंड चालू ठेऊन हळूहळू खाजगी बॅंकांना आणखी विस्तार करायला दिला पाहिजे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी बॅंका छुपे चार्जेस लावून ग्राहकांची लुबाडणुक करतात त्यावर कडक लक्ष ठेवायला हवे. दुसरे म्हणजे २३% SLR कमी करायला हवा.याचे कारण म्हणजे सरकारचा fiscal deficit फायनान्स करायचा एक मार्ग म्हणजे सरकारी bonds जारी करणे. खातेदारांनी खात्यात ठेवलेल्या प्रत्येक १०० रूपयांपैकी २३ रूपये हे SLR अंतर्गत सरकारी बॉंडमध्ये गुंतविले पाहिजेत ही बॅंकांवर सक्ती आहे.म्हणजे Fiscal Deficit वाढला तरी तो फायनान्स करायला बॅंका हा एक हक्काचा बकरा आहेच.सरकारी बॉंडमधून परतावा कमी असल्यामुळे आणि २३% इतकी घसघशीत रक्कम बॉंडमध्ये अडकल्यामुळे इतर कर्जदारांसाठीचे व्याजाचे दर वाढतात.म्हणजे सरकारने प्रवासी वाहतुकीसाठीच्या डिझेलवर आणि इतर अनेक गोष्टींवर सबसिडी द्यायची आणि त्यातून अर्थव्यवस्थेतील एकूणच व्याजाचे दर या कारणाने वाढणार.वाढत्या व्याजाच्या दराचे दुष्परिणाम होतातच. Food Security Bill मुळे यावर्षी तितका बोजा पडणार नसला तरी पुढच्या वर्षी त्याचे परिणाम जाणवतील.हा वाढीव बोजा नक्की किती याविषयी मतभेद आहेत पण आणखी बोजा पडणार इतके नक्की.त्यातून असे व्याजाचे दर वाढतील आणि अर्थव्यवस्थेचा वेग आणखी मंदावेल ही भिती आहेच.तेव्हा SLR या holy cow चा साईझ कमी झाला तर ते चांगले होईल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55718 वाचन

💬 प्रतिसाद (116)

प्रतिक्रिया

+१

अनुप ढेरे
Wed, 06/22/2016 - 15:53 नवीन
हेच बोल्तो. कैच्याकै फॉर्वर्ड आहे तो. लोक त्यावर विश्वास ठेवतात हे त्याहून मोठं दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यापेक्शा कैच्याकै फॉरवर्ड्स

टवाळ कार्टा
Wed, 06/22/2016 - 21:07 नवीन
यापेक्शा कैच्याकै फॉरवर्ड्स येत असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

रघुराम राजन यांना मुदतवाढ ने

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2016 - 15:31 नवीन
रघुराम राजन यांना मुदतवाढ ने देण्यामागे किंवा त्यांनी मुदतवाढ न घेण्यामागे काहीही कारणे असली तरी हा मुद्दा केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळला असे मला वाटते. त्यांचे काम उत्तम होते परंतु ते सरकारला नकोसे झाले होते व स्वामींनी त्यांच्याविरूद्ध गरळ ओकल्यामुळे त्यांना जावे लागले अशी सार्वत्रिक समजूत पसरलेली आहे. यापूर्वी याच सरकारने एफटीआयआयमधील टग्यांचे आंदोलन, जेएनयू मधील देशद्रोह्यांच्या घोषणा, रोहीत वेमुला इ. प्रकरणे अत्यंत संयमाने व प्रगल्भतेने हाताळली होती. सुरवातीला या प्रकरणात केंद्राचा दोष आहे असे चित्र निर्माण झाले होते. परंतु केंद्र सरकारने आततायीपणा न करता संयम दाखविल्यामुळे हळूहळू ते चित्र बदलत गेले व या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचीच काळी बाजू बाहेर आली. परंतु राजन प्रकरणात केंद्राची नाचक्की होत आहे.
  • Log in or register to post comments

गुरुजी

बोका-ए-आझम
Wed, 06/22/2016 - 17:54 नवीन
जे या प्रकरणात सरकारविरोधी बोलताहेत ते सरकारचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. म्हणजे राजन राहिले असते तरी ते सरकारविरोधातच बोलले असते. आणि जे सरकारच्या बाजूने बोलताहेत ते सरकारच्या किंवा भाजपच्या बाजूनेच बोलतात. त्यामुळे परिस्थिती जशी आहे तशीच आहे. उलट राजन यांच्या निर्णयांच्या ब-या-वाईट परिणामांची चर्चा माध्यमांमध्ये होतच नाहीये. सर्वजण हेच म्हणताहेत की कसं त्यांनी २००५ मध्ये २००८ च्या आर्थिक अरिष्टाबद्दल भाकित केलं होतं. ज्यांना ते हवे आहेत त्यांना ते नक्की का हवे आहेत तेच सांगता येत नाहीये. Business as usual. नाचक्की वगैरे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उगाच उहापोह

रमेश आठवले
Wed, 06/22/2016 - 20:35 नवीन
राजन पद सोडणार या बातमीवरून खूप गदारोळ होत आहे. मोदींचे आणि सरकारचे विरोधक या बातमीचे भांडवल करून तीचा उपयोग सरकारवर टीका करण्यासाठी करत आहेत. राजन यांना आणखी तीन वर्षांसाठी पदावर रहाण्याची इछा होती पण सरकारने त्यांना प्रोत्साहन दिले नाही असा सोयीस्कर गैरसमज त्यांनी त्यासाठी करून घेतला आहे. पण राजन यांनी स्वतः ते या पदावर आणखी तीन वर्षे राहण्यासाठी उत्सुक आहेत असे कुठेही दर्शविलेले नाही. त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या सारख्याच शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि दोन्ही मुले अमेरिकेतच वाढलेली आणि शिकलेली आहेत. भारतात सरकारशी सम्बन्ध चांगले असले तरीही तुलनेने नोकरीतील कमी पगार ,लाल फीत,मुंबईतले हवामान ,रस्त्यावरील रहदारी या गोष्टी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एव्हाना जाणवल्या असतील. म्हणून सर्वकाळ परदेशी रहात असलेल्या या कुटुंबाने परत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यावर एवढा खल आणि उहापोह करण्याचे प्रयोजन काय ?
  • Log in or register to post comments

मालक...

अर्धवटराव
Wed, 06/22/2016 - 22:50 नवीन
आर. बी. आय. खुर्ची ची पॉवर, आव्हानं, निर्णयांची परिणामकारकता प्रचंड असते. राजन साहेब सहज शेती करायला म्हणुन भारतात आले असते तर त्यांच्या परतिची हि कारणं एक वेळ गृहीत धरता आलि असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

अहो राव

रमेश आठवले
गुरुवार, 06/23/2016 - 21:15 नवीन
राजन यांनी आणखी तीन वर्ष पदावर रहाण्याची इछा व्यक्त केली होती पण सरकारने त्याला नकार दिला असे सिद्ध करणारा काही पुरावा असेल तर तो मांडा. कारण हे गृहीत धरूनच सरकार वर टीका चालली होती. तसे शाबीत झाल्यावर पुढील तीन वर्षात राजन कोणते पीक घेणार होते त्यावर आपण चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असा काहि पुरावा माझ्याकडे तरी नाहि

अर्धवटराव
गुरुवार, 06/23/2016 - 22:06 नवीन
पण राजन साहेबांचा कार्यकाळ कंटिन्यु करावा कि नाहि याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु असताना व राजनसाहेबांवर स्वामी वगैरे मंडळींची टिका होत असताना जेटली साहेबांनी 'हि प्रशासनीक बाब आहे व त्यावर योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल' असले उत्तर दिले...'राजन साहेबांचा कार्यकाळ वाढवण्याबद्द्ल सकारात्मक चर्चा सुरु आहे' वगैरे स्टेटमेण्ट कधि आले नाहि. जनरली संवेदनशील मुद्द्यांवर अशाच भाषेत हिंट दिली जाते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

RBI Governor ची मुदत

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/23/2016 - 22:32 नवीन
ही ५ वर्षांची असते. राजन हे त्या पदावर नियुक्त झालेले सर्वात तरुण governor होते. तरीही आता त्यांची भलावण करणाऱ्या पी.चिदंबरम यांनी त्यांना ३ वर्षांच्याच मुदतीवर आणलं. जर त्यांना तेव्हाच ५ वर्षांसाठी आणलं असतं तर सप्टेंबर २०१८ मध्ये म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या ७-८ महिने आधी राजन यांचा कार्यकाल संपला असता. पण चिदंबरम यांनी तसं केलं नाही आणि स्वतः एकेकाळी RBI Governor असलेल्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यात काही वावगं वाटलं नाही. त्यामुळे राजन यांना नीट न वागवल्याचा जो आरोप सरकारवर होतोय तो करणाऱ्या विरोधकांनी राजन यांना काही रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

गुरूमूर्तींच्या लेखाबद्दल धन्यवाद !

गामा पैलवान
गुरुवार, 06/23/2016 - 00:52 नवीन
बोक-ए-आझम, स्वामीनाथन गुरूमूर्तींच्या लेखाबद्दल धन्यवाद ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

शंभरावा प्रतिसाद

मिल्टन
गुरुवार, 06/23/2016 - 22:03 नवीन
२३ सप्टेंबर २०१३ रोजी सुरवात झाल्यानंतर शतक गाठायला या धाग्याने ३३ महिने घेतले. मिपावर असा प्रकार त्यामानाने फार बघायला मिळत नाही. असो. माझ्या माजी आय.डी वरून सुरू केलेल्या धाग्यावर माझ्या दुसर्‍या आय.डी वरून काही प्रतिसाद देऊन अर्थशास्त्रावरील चर्चांसाठीच्या या आय.डी वरून त्यावर शंभरावा प्रतिसाद द्यायचा मानही माझाच. या चर्चेत इतर काही मुद्दे आले आहेत. त्यांविषयी उद्या लिहितो. चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शतका बद्दल श्री.क्लिंटन आणी

जेपी
Fri, 06/24/2016 - 12:20 नवीन
शतका बद्दल श्री.क्लिंटन आणी श्री.ट्रुमन यांचा सत्कार मिल्टन कंपनीचा थर्मास देऊन करण्यात येत आहे.. -शुभेच्छुक- जेपी आणी तमाम 3 आयडी वाले मिपाकर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिल्टन

राजन हे स्वतःहूनच मुदतवाढ

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2016 - 23:20 नवीन
राजन हे स्वतःहूनच मुदतवाढ घेणार नाहीत. आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही असे त्यांना खात्रीशीर समजले असावे. त्यामाग नक्की काय कारणे होती हे अजूनतरी बाहेर आलेले नाही. त्यामुळे त्याविषयी गॉसिप करण्यात अर्थ नाही. परंतु त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षांना व माध्यमांना एक नवीन मुद्दा मिळाला आहे व केंद्र सरकारकडून त्या मुद्द्याचा प्रतिवाद कोणीही करत नाहीय्ये. केंद्र सरकारने असा बचावात्मक पवित्रा का घेतला आहे ते समजत नाही. एकंदरीत या प्रकारात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसतो. टीका सहन करावी लागली तरी हरकत नाही, परंतु टीकेला कोणतेही उत्तर न देता आम्ही मौन पाळणार असा सरकारचा पवित्रा दिसतो. त्यामुळे टीकेचा भडीमार अजूनच वाढत आहे. यातील दोन मुद्दे असे आहेत. १) राजन यांची कामगिरी उत्कृष्ट होती का? व ती तशी असल्यास त्यांच्या जाण्याने तोटा होईल का? माझ्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. २) राजन यांच्या जाण्यामागे नक्की कोणती कारणे आहेत? याविषयी सर्वांनीच मौन पाळले आहे. जे काही सुरू आहे ते सर्व गॉसिप आहे व त्यामुळे केंद्र सरकारवर दोष येत आहे. केंद्र सरकारने यावर पारदर्शकता दाखवून खुलासा करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रतिमाहानी होत राहील.
  • Log in or register to post comments

दीपक घैसासांच्या शब्दात राजन

श्रीगुरुजी
Sat, 06/25/2016 - 14:32 नवीन
दीपक घैसासांच्या शब्दात राजन प्रकरणाची एक वेगळी बाजू http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/rbi-governer-rajan-criticism/articleshow/52887655.cms
  • Log in or register to post comments

हा लेख बहुधा इंडिअन

अनुप ढेरे
Sat, 06/25/2016 - 15:14 नवीन
हा लेख बहुधा इंडिअन एक्सप्रेसमधल्या लेखाचा अनुवाद आहे. It takes two या नावाचा. मटावाल्यांनी कुठे म्हटलं पण नाहिये. डांबिस लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत आहे

गामा पैलवान
Sat, 06/25/2016 - 15:52 नवीन
अनुप ढेरे, मूळ स्रोत सांगितल्याबद्दल धन्यवाद. वरवर चाळायला घेतला तर मध्येच सोडून दिला. आधी मटात वाचलाय म्हणून ! इंएमधला लेख इथे आहे : http://indianexpress.com/article/opinion/columns/raghuram-rajan-rbi-rexit-nda-govt-arun-jaitley-narendra-modi-2865294/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा