✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुदत ठेवींचे पतमानांकन

प
पुणे मुंग्रापं यांनी
गुरुवार, 06/16/2016 - 09:20  ·  लेख
लेख
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल. TDRगुंतवणुकीचे कितीही प्रकार असले, आणि शेअर बाजार व म्युच्युअल फंड यांचा बराच बोलबाला असला, तरी सर्वसामान्य गुंतवणूकदार मुदत ठेवींनाच सर्वाधिक प्राधान्य देतात. ठरावीक कालवधीसाठी ठराविक परतावा, गुंतवलेल्या रकमेत कोणतेही चढउतार नाहीत आणि डोक्याला फारशी कटकटही नाही. या मुदत ठेवींमध्येही अनेक प्रकार आहेत, जसे की, बँकांमधील ठेवी, बिगर बँकिंग कंपन्यांमधील ठेवी, खासगी कंपन्यांमधील ठेवी, पोस्टातील ठेवी, इत्यादी. पोस्टातील तसेच सर्वसाधारणपणे बँकांमधील ठेवी व सुरक्षित समजल्या जातात, शिवाय बँकांमधील रु. १ लाखपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचेही संरक्षण असते. परंतु बिगर बँकिंग तसेच खासगी कंपन्यांच्या मुदत ठेवींना असे किंवा इतर कोणतेही संरक्षण नसते, त्यामुळे अशा ठिकाणी मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना ठेवीदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. खासगी अथवा बिगर बँकिंग कंपन्यांमध्ये ठेव ठेवताना ती कंपनी चांगली नामांकित आहे का, तिचे व्यादर अव्वाच्या सव्वा नाहीत ना, ती कंपनी ठेवीदारांनी ठेव ठेवावी म्हणून कोणते प्रलोभन दाखवते का, अथवा काही ‘गिफ्ट’ देऊ करते का, इत्यादी गोष्टींचा विचार व्हावा. त्याचबरोबर त्या कंपनीचे पतमानांकन (Credit Rating) काय आहे, तेही आवर्जून पाहावे. त्यासाठी पतमानांकन म्हणजे नेमके काय ते पाहुया- ज्या कंपनीने जनतेकडून ठेवी गोळा केल्या आहेत, ती कंपनी या ठेवींची रक्कम तसेच त्यावर देण्यात येणारे व्याज ठेवीदारांना वेळेवर देऊ शकेल का, कंपनीचा ताळेबंद, सध्याची आर्थिक परिस्थिती, कंपनीपुढील आव्हाने, भविष्यातील अपेक्षित कामगिरी, इत्यादींचा अभ्यासाद्वारे व विविध मापदंडाद्वारे (Parameters) जो निकष काढण्यात येतो, त्याला पतमानांकन असे म्हणतात. असे मानांकन देणा-या कंपन्यांना ‘Credit Rating Agencies’ असे म्हणतात व त्या ‘सेबी’कडे नोंदणीकृत असतात. ‘सेबी’ ने अशा एकूण सात कंपन्यांना परवानगी दिली असून त्यापैकी विशेषत्वेकरून क्रिसिल, इक्रा व केअर या तीन कंपन्या मुदत ठेवींसाठीही कंपन्यांचे मानांकन ठरवतात. ज्या कंपनीमध्ये आपल्याला मुदत ठेव ठेवायची आहे. तिला वेगवेगळ्या पतमानांकन कंपन्यांनी कोणता दर्जा दिला आहे त्याचा तुलनात्मक अभ्या करून मगच अशा ठिकाणी पैसे गुंतवावेत. आता पतमानांकन कोणकोणत्या प्रकारचे असते व त्याचा अर्थ काय ते उदाहरणादाखल ‘क्रिसिल’ या कंपनीच्या म्हणण्यानुसार समजावून घेऊ या.
Rating
वरील तक्ता पाहिल्यानंतर जर आपण कंपन्यांच्या मुदत ठेवींचे अर्ज तपासले, तर एक गोष्ट लक्षात येईल की, ज्या कंपन्यांना चांगले मानांकन मिळते त्या कंपन्या मुदत ठेवींवर तुलनात्मकदृष्टया कमी व्याज देतात, तर ज्यांचे मानांकन फारसे चांगले नाही, त्या जास्ती व्याज देतात. कंपन्यांनी ठेवीच्या अर्जावर हे मानांकन व त्याचा अर्थ देणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत, वा ज्या व्याज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा कंपन्यांची माहिती मध्यंतरी वर्तमानपत्रात आली होती. त्यापैकी काही कंपन्यांचे मुदत ठेव अर्ज मी पाहिले होते तेव्हा असे लक्षात आले की, त्यांनी स्वत:चे मानांकन अर्जावर छापलेच नव्हते, आणि तरीही लोकांनी त्यात पैसे गुंतवले! मात्र मानांकन पाहून पैसे गुंतवले की झाले, असे नाही. तर ज्या कंपनीमध्ये आपण ठेव ठेवली आहे, तिचे मानांकन दर सहा महिन्यांनी तपासावे आणि आपल्याला काही शंका आल्यास ठेव मुदतीपूर्वीच काढून घ्यावी. यासंबंधीची माहिती कंपनीने न दिल्यास ज्या कंपनीने (क्रिसिल /इक्रा/ केअर, इत्यादी) हे मानांकन दिले आहे त्यांच्याकडे विचारणा करावी. या कंपन्यांच्या संकेतस्थळावरसुद्धा ही माहिती मिळू शकते. किंबहुना ही माहिती ठेव ठेवण्याच्या आधीसुद्धा घ्या. तुम्ही शेअरबाजारात गुंतवणूक करणारे असा वा नसा, ठेवी गोळा करणा-या कंपन्यांच्या शेअरचा बाजारभावही अवश्य पाहावा. ज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा उल्लेख वर केला आहे, त्या कंपन्यांच्या शेअरचा भाव तोळामासा होता. याशिवाय नेहमीचे तत्त्व म्हणजे कंपन्यांच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास ती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करा. आपल्या गुंतवणुकीचा फेरआढावा घ्या आणि जागरूक गुंतवणूकदार राहा. - अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित. सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
2451 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

छान

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/16/2016 - 13:15 नवीन
छान
  • Log in or register to post comments

क्रिसिलचे सर्वोच्च पत मानांकन

सुबोध खरे
गुरुवार, 06/16/2016 - 20:06 नवीन
क्रिसिलचे सर्वोच्च पत मानांकन हे गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यास असफल ठरले आहे हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. उदा सी आर भन्साली यांच्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यापूर्वी त्यांच्या संस्थांना CARE चे AAA असे सर्वोच्च मानांकन होते. पहा. http://www.indianmirror.com/indian-industries/indian-scams/bhansaliscam.html "Safety is inversely proportional to greed, Higher the greed, higher the risk." http://indiatoday.intoday.in/story/c.r.-bhansali-scandal-exposes-ineffectiveness-of-regulators-risk-small-investors-face/1/275985.html आपला पैसा हा आपल्या सोन्याच्या दागिन्यासारखा जपावा आणि लुंग्यासुंग्याच्या हाती देऊ नये.
  • Log in or register to post comments

एग्जॅक्टली!

आदूबाळ
गुरुवार, 06/16/2016 - 20:45 नवीन
एग्जॅक्टली! आणि अशा वेळेला क्रिसिलच्या सेवेत त्रुटी आहे / क्रिसिलने ग्राहकांची दिशाभूल केली आहे असं का म्हणू नये? यासाठी ग्राहक पंचायत काय करत आहे? बाकी प्रश्न अभय दातार धाग्यावर आल्यावर विचारेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ह्या क्रिसीलसारख्या

अभ्या..
गुरुवार, 06/16/2016 - 20:11 नवीन
ह्या क्रिसीलसारख्या कंपन्यांचा खर्च कसा चालतो? (प्रगोदादा हानतय मला ;) )
  • Log in or register to post comments

फसवणूक टाळण्यासाठी खालील

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/16/2016 - 20:58 नवीन
फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी करा - १) बँका, पोस्ट किंवा इतर सरकारी संस्थांचा जो व्याजदर आहे, त्या पेक्षा खाजगी कंपन्या, पतपेढ्या, खाजगी अर्थसंस्था खूप जास्त व्याज देत असतील तर तिथे फसवणूक आहे हे लक्षात घ्या. साधारणपणे सरकारी व्याजदरापेक्षा खाजगी कंपन्या २०% हून अधिक व्याजदर देत असतील तर नक्कीच फसवणूक आहे. २) अगदी छोट्या म्हणजे कमी शाखा असलेल्या, नव्याने स्थापन झालेल्या अशा खाजगी संस्थांमध्ये, सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. अशा संस्था बुडण्याची दाट शक्यता असते. ३) कोणत्याही संस्थेत पैसे गुंतविण्यापूर्वी गुगल किंवा इतर माध्यमातून त्या संस्थेची विश्वासार्हता तपासा. संस्थेचा पूर्वोतिहास बघा. आपल्या ओळखीच्या विश्वसनीय गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेऊन नंतरच गुंतवणूक करा. ४) कोणत्याही संस्थेत एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवू नका. गुंतवणूक वेगवेगळ्या ४-५ संस्थांमध्ये करा. त्यामुळे संपूर्ण रक्कम एकदम बुडण्याचा धोका कमी होतो. ५) गुंतवणुकीसाठी अनेक संस्था अनेक प्रलोभने दाखवितात. गुंतवणुक केल्यास काहीतरी बक्षीस देणे, एखाद्या पर्यटनस्थळाच्या सहलीला पाठविण्याचे आश्वासन देणे इ. प्रलोभने असतील तर गुंतवणूक करू नका. ६) सर्व व्यवहार चेकने व अधिकृत पोचपावती घेऊन अधिकृत माणसातर्फेच करा. ७) निवृत्त/वयस्कर व्यक्तींनी शक्यतो सरकारी संस्थांमध्येच गुंतवणुक करावी. ८) गुंतवणुक फक्त मुदत ठेवींमध्येच न करता मुदत ठेवी, शुद्ध सोने, रोखे अशा विविध पर्यायांमध्ये करा. जमिनीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. ९) ज्या संस्थेत गुंतवणुक केली आहे त्यांचे रेकॉर्ड सतत तपासत रहा. संस्था डबघाईला येण्याची चिन्हे दिसत असतील तर थोडेसे नुकसान सोसून गुंतवणुक काढून घ्या. १०) गुंतवणुकीची मुदत संपूर्ण संपल्यानंतर एकदम व्याज व मुद्दल घेण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. त्याऐवजी दरवर्षी/दर सहा महिन्यांनी/दर तिमाहीला जमा झालेले व्याज घ्या. भविष्यात कंपनी बुडाली तर मुद्दलाबरोबरच जमा झालेले व्याज देखील जाईल. जर ठराविक कालावधीनंतर व्याज घेतले तर निदान थोडी रक्क्म तरी वाचेल.
  • Log in or register to post comments

अजून १

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/16/2016 - 21:02 नवीन
अजून १ ११) विमा व गुंतवणुक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक बँका गुंतवणुक व विमा यांचे एकत्रीकरण असलेल्या योजना आणतात. अशा योजना टाळाव्यात. विमा हे फक्त संरक्षक कवच आहे, गुंतवणुक नाही हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments

सहकारी बँकांमध्ये पैसे

अनुप ढेरे
गुरुवार, 06/16/2016 - 21:21 नवीन
सहकारी बँकांमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा जास्तं सुरक्षित मार्ग ते पैसे कसिनोमध्ये लावणं हा आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या अर्धवट ज्ञानावर आधारीत

असंका
Fri, 06/17/2016 - 13:09 नवीन
माझ्या अर्धवट ज्ञानावर आधारीत माहिती अशी आहे की कसिनो मध्ये पत्त्यांवर आधारीत जुगार चालतो. जुगारामध्ये लावलेले पैसे परत न मिळायची पन्नास टक्के शक्यता गृहित आहे. जर चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा... सहकारी बँकेत पैसे परत न मिळायची पन्नास टक्क्यांहून सुद्धा जास्त शक्यता आहे असं आपण सुचवत आहात. कृपया आपल्या वरील विधानाला काय आधार आहे ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा