खड्डा कोंबडी! (बेगर्स चिकन व्हेरिएशन)

आनंदी गोपाळ's picture
आनंदी गोपाळ in पाककृती
7 Jun 2016 - 10:53 am

चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्‍याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला. अन नंतर तयार झालेल्या कोंबडीच्या दरवळाने तिकडून जाणारा सम्राट स्वतः आकर्षित झाला, अन त्याने त्या अद्भूत चवीवर खुष होऊन कोंबडी शिजवायची ही पद्धत म्हणे शाही डिश म्हणून जाहीर केली.

कोंबडी स्टफ करून, लोटस लीफ मधे गुंडाळून, मग चिखलाचा थर देऊन निखार्‍यात भाजणे ही बेसिक कृती. चिखलाऐवजी कणकेचा थरही वापरतात, किंवा मी वापरली तशी चायना मेड अ‍ॅल्युमिनियम फॉईल. क्विंग डायनॅस्टीच्या काळी अ‍ॅल्युमिनियम फॉइल नव्हती, म्हणून. नैतर हीच ऑथेंटिक रॉयल पद्धत डिक्लेअर झाली असती, असे आमचे मत.

अख्खी कोंबडी स्टफ केली तर भाजायला भरपूर वेळ लागतो. वर्जिनल रेस्पीत ६ तास लिवलेत. मी पिसेस करून घेतल्याने सव्वा तासात प्रकरण आवरलं.

तर मंडळी, पाकृ :

लागणारे साहित्यः

रिकामा वेळ : थोडा
मित्रमंडळी जमवून खाण्या-खिलवण्याची हौस : भरपूऽर
विस्तव बनवण्यासाठी लाकडे किंवा लाकडी कोळसा. मोकळी जागा किंवा गच्ची

२ कॉकरेल कोंबड्या, भाजीसाठी करतो तितक्या साईजचे तुकडे करून. (सुमारे सव्वा-दीड किलो)
नेहेमीचे मॅरिनेशन : आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, तिखट, लिंबू.
हिरवी चटणी : मिरची, कोथिंबीर, पुदिना, जिरं, मीठ, मिरे.
बच्चू कंपनीसाठी कमी तिखटाचं म्हणून ४-६ लेग/विंग पीसेस सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, अन थोडं टोमॅटो केचप व व्हिनेगर लावून वेगळे ठेवले.

केळीची पानं
अ‍ॅल्युमिनियम फॉईल, व हॉटेलातून पार्सल आणताना अ‍ॅल्युमिनियमचे कंटेनर्स मिळतात, तसे कंटेनर्स.

तयारी:

सकाळी बागेतला एक रिकामा कोपरा पाहून तिथे एक खड्डा खणून त्यात जुना फुटका माठ गाडून घेतला. बाजूने विटा रचून छान रिंगण करून मातीने लिंपून घेतले.
तयारी

दुपारीच कोंबडी आणून स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवली.

संध्याकाळी त्या खड्ड्यावर लाकडे पेटवून पूर्ण खड्डा भरून रसरशीत निखारा तयार करून घेतला..

०२
०३

यातला बहुतेक सगळा निखारा काढून एका लोखंडी पाटीत ठेवला.

केळीची ३-४ पानं निखार्‍यावर थोडी भाजून घेतली. पानं भाजली, की मऊ पडतात व पुरचुंडी नीट बांधता येते. नाहीतर पान फाटून सगळे चिकन खाली पडेल.

मॅरिनेट केलेल्या चिकनमधे सणसणीत हिरवी चटणी मिक्स करून, ते केळीच्या पानात ठेवून, त्याची अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधे पुरचंडी तयार केली. त्याला दोन अ‍ॅल्युमिनियम कंटेनर्समधे ठेवून पुन्हा एक फॉईल रॅप दिला.
मुलांसाठीच्या कमी तिखटाची वेगळी छोटी पॅकिंग अशीच केली.

पोटल्या बांधतानाचे फोटो काढायला विसरलो.

०४

दोन्ही पोटल्या निखार्‍यात ठेवून वर बाकीचा निखारा भरला. वरून तीच लोखंडी पाटी झाकली.

०५

मोबाईलात सव्वा तासाचा रिमाईंडर लावून इतर कार्यक्रम सुरू केले. अधून मधून निखार्‍याला व्हॅक्युमक्लिनरच्या ब्लोअरने हवा मारत होतो. बेल वाजल्यावर :

निखारे बाजूला काढून पोटल्या बाहेर काढल्या.
पोटल्या उघडल्यावर :


कोणत्याही प्रकारचे प्लेटिंग फिटिंग करायला वेळ न देता कोंबड्या गुल झाल्या. त्यामुळे ते फोटो नाहीत.

अधिक टिपा:

१. फिक्या चिकनसोबत एका नॉनस्टिक फ्राइंग पॅनमधे थोडा टोमॅटो केचप, थोडा सोया सॉस, थोडा शेजवान सॉस प्लस अर्धा चमचा गूळ थोडे शिजवून चटपटीत सॉस तयार केला, वरून टाकायला व डिपिंग म्हणून.

२. हिरव्या चटणीऐवजी रेग्युलर चिकनसाठी करतो तशी मसाला करी, पाणी टाकायच्या आधीच्या स्टेपपर्यंत करून, चिकनवर ओतून, मग चिकन रॅप करून निखार्‍यात टाकले तर पोळी-भाताशी खाता येईलसे तयार करता येईल.
हिरव्या चटणीत खोबरेही घालता येईल.

३. सोबत, वा नुसत्याच भाज्या / बटाटे / मासे इ. देखिल घालता येतील, पण कुकिंग टाईम बदलतील, त्याचे जजमेंट असू द्यावे.

४. ही हरियाली खड्डा कोंबडी बेसिकली स्टार्टर म्हणून केली होती. लोकांनी अक्षरश: ग्लासेस वगैरे विसरून टेबलाभोवती उभ्या-उभ्याच फन्ना उडवला.

५. मोकळी जागा नसेल, पण टेरेस वगैरे असेल, तर मातीच्या मोठ्या कुंडीत निखारा पेटवण्याचा उपद्व्याप करता येईल. अगदीच काही नाही तर ओटीजीमधेही भाजता येईल. पण मग ती राखेची अन लाकडाच्या धुराची चव त्यात झिरपणार नाही.

निखारे पेटवणे हा उद्योग सोडला, तर अ‍ॅक्चुअल रेस्पी टोटली विनाकटकट अन बिगिनर लेव्हलची आहे. शिवाय नो ऑईल!! नंतर जेवणाला मटन बिर्याणी होती, पण त्याच्या रेस्प्या इथे ऑल्रेडी असतीलच..

कोंबडी बाहेर काढल्यानंतर निखारे सुरक्षितरित्या विझवायला विसरू नका.

तेंव्हा लोकहो, नक्की करून पहा, अन आम्हाला फोटू दाखवा.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

7 Jun 2016 - 10:57 am | आनंदी गोपाळ

कोंबडी बाहेर काढल्यानंतर निखारे सुरक्षितरित्या विझवायला विसरू नका.

मा. संपादक, हा इशारा कृपया वर अ‍ॅड करता आला तर बरे होईल. धन्यवाद!

राजा मनाचा's picture

7 Jun 2016 - 1:07 pm | राजा मनाचा

असली भरल्या पोटी सुद्धा भूकेचा डोम्ब उसळवनारी डिश समोर आल्यावर पायाखाली काय जळ्तेय ते कोण पहातो?

मंदार दिलीप जोशी's picture

7 Jun 2016 - 4:21 pm | मंदार दिलीप जोशी

संपादनाला बूच लागल का? लोल

दिपक.कुवेत's picture

7 Jun 2016 - 11:12 am | दिपक.कुवेत

पाकृ अप्रतिम तर आहेच पण सांगायची पद्धत खास आवडली. ह्या वेळी पाकृ मधे किचन बाहेरील फोटो पाहून विशेष आनंद झाला आहे.

गोपाळराव, तुम्ही तर चिकन/किचन डायनेस्टीचे किंग आहात कि.
मस्त आयटम एकदम. ते गंपाचे बम चिकन आणि हे. लाजवाब क्रिएटिव्ह आणि मेहनतीची पाकृ.

सुनील's picture

7 Jun 2016 - 11:26 am | सुनील

मस्त पाकृ. हपिसातून फोटो दिसत नाहीयेत.

मोकळी जागा किंवा टेरेस नसेल तर बाजारात बार्बेक्यू (एलेक्ट्रिक वा कोळशावे) मिळतात ते वापरता येतील.

चिकन स्किनसहित होते की स्किनरहीत?

आनंदी गोपाळ's picture

7 Jun 2016 - 1:49 pm | आनंदी गोपाळ

डीमार्ट वगैरेमधे मिळतात तसले बार्बेक्यु कामाचे नाहीत. कोंबडी चारी बाजूंनी विस्तवात ठेवायची आहे. नुसती विस्तवावर भाजायची नाहिये. फोटू दिसले की पहा :)

चिकन स्किन काढून, तुकडे केलेले.

एस's picture

7 Jun 2016 - 11:29 am | एस

खल्लास पाकृ. दिलिप प्रभावळकरांनी अशाच स्वरूपाची एक जंगल पाकृ एका अंकात लिहिल्याचं आठवलं. नक्की करून बघणार.

नंदन's picture

7 Jun 2016 - 11:30 am | नंदन

पाकृ. कधीतरी हा प्रयोग करून पहायचा आहे!

अत्रन्गि पाउस's picture

7 Jun 2016 - 11:52 am | अत्रन्गि पाउस

ह्या कृतीची ...मध्ये कुठेतरी विचारलं पण होतं ...
वां गोपाळराव ...धन्यवाद

सौंदाळा's picture

7 Jun 2016 - 11:57 am | सौंदाळा

दणकेबाज एकदम
_/\_

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2016 - 2:00 pm | टवाळ कार्टा

खतरा....कट्टा करुया का तुम्च्या घरी ;)

अमेरिकन त्रिशंकू's picture

7 Jun 2016 - 4:15 pm | अमेरिकन त्रिशंकू

Qing चा उच्चार चिंग असा आहे.

आनंदी गोपाळ's picture

7 Jun 2016 - 6:16 pm | आनंदी गोपाळ

तरीच काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. चिंग झाल्यामुळे असेल कदाचित.

मोहनराव's picture

7 Jun 2016 - 4:54 pm | मोहनराव

तोंपासु.

सत्याचे प्रयोग's picture

7 Jun 2016 - 6:29 pm | सत्याचे प्रयोग

एकुणात 'आनंदी' प्रकार आहे तर हा

पैसा's picture

7 Jun 2016 - 6:35 pm | पैसा

लै भारी!

गणपा's picture

7 Jun 2016 - 7:17 pm | गणपा

काल मोबाईल वरुन दिलेला प्रतिसाद उमटलेला दिसत नाही. :P

वाह ! गोपाळराव पाकृ तर भन्नाट आहेच पण फोटोही सुंदर.
लवकरच करुन पहावी म्हणतो.
अनेक दिवसांनी मिपावर आल्याचे सर्थक झाले. :)

आनंदी गोपाळ's picture

7 Jun 2016 - 9:56 pm | आनंदी गोपाळ

_/\_
भरून पावलो!

चक्क मिपा बल्लवाचार्य गणपाभौंची पावलं लागली या रेस्पीला.

मागल्या डोसा आम्लेटावर बल्लवपितामह पेठकर काकांनी पायधूळ झाडलेली तेव्हाही असाच खुश झालो होतो. (पण स्वतःच्या धाग्याला जास्त प्रतिसाद लिहू नयेत या मिपा संकेताचा आदर करून तिथे लिवलं नव्हतं, इथं लिहितोय.)

एकंदरित स्वयंपाक जमायला लागलाय मला. :D

आनंदी गोपाळ's picture

7 Jun 2016 - 10:01 pm | आनंदी गोपाळ

हिरवी चटणीवालं ओव्हनातलं चिकन गणपाभौंनी आधीच लिहून ठेवलंय बरं का मिपावर! मी माझ्या परिने ते 'खड्ड्यात घातलं' इतकंच ;)

सुबोध खरे's picture

8 Jun 2016 - 11:18 am | सुबोध खरे

गोपाळराव
कट्ट्या ला केंव्हा बोलावताय?
लई म्हणजे लैच पाणी सुटलाय तोंडाला.

आनंदी गोपाळ's picture

8 Jun 2016 - 1:05 pm | आनंदी गोपाळ

की लगेच बोलावतो. सोबत तीर्थप्रसादाची सोयही करून ठेवतो.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 1:34 pm | टवाळ कार्टा

हायला...सिलेक्टिव्ह कट्टा का? मी वर हेच्च विचारलेले ;)

आनंदी गोपाळ's picture

8 Jun 2016 - 3:22 pm | आनंदी गोपाळ

स्वारी टाकाभौ,
तुम्हाला टाळून नै करणार

विजुभाऊ's picture

7 Jun 2016 - 9:54 pm | विजुभाऊ

गणपा भौ.....
वाचनमात्र पणा सोडा आता लौकर

मस्तच. तोंडाला पाणी सुटलं. :)

त्रिवेणी's picture

7 Jun 2016 - 10:16 pm | त्रिवेणी

मस्त दिसतेय पाककृती.
पण आंगण नहि आणि त्यात बाल्कनित मागे एकदा निखर्यातली बट्टी करताना झालेला राडा बघून घरात परवानगी मिळणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2016 - 5:24 am | डॉ सुहास म्हात्रे

कृती आणि फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे ! चव जबरदस्त असणार यात शंकाच नाही !

स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प पाकु आहे ही :)

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 10:58 am | अद्द्या

आनंद हि आनंद ,
खड्डा भर के आनंद

मस्तच :)

नीलमोहर's picture

8 Jun 2016 - 11:10 am | नीलमोहर

कोंबडी खायला आवडत नाही मात्र पाकृ आणि कल्पना प्रचंड आवडली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2016 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

_/\_ कसली पाककृती जब्रा. चखन्याला भारी ! जियो.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

रुस्तम's picture

8 Jun 2016 - 2:28 pm | रुस्तम

मस्त दिसतेय पाककृती. कृती सांगायची पद्धत पण मस्त ....

स न वि वि's picture

8 Jun 2016 - 3:11 pm | स न वि वि

अहो हि तर आमच्या अलिबाग ची पोपटी … फरक फक्त इतकाच कि लकडा ऐवजी पेंडा आणि नारळाच्या सुक्या सालांचा वापर करायचा. आणि केळीच्या पानात कोंबडी बांधायची … खल्लास चव. कोंबडी सोबत अंडी, वांगी, बटाटे , रताळे पण टाकतो पण सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वालाच्या शेंगा …

नाखु's picture

29 Jun 2016 - 9:10 am | नाखु

कोंबडी-तंगडी शिवाय फक्त भाज्यांची कशी करायची त्याची पा कृ देऊ शकाल काय? इथल्यांचा आक्षेप नसेल तर सव्तंत्र धाग्यात नाहीतर व्यनीत दिली तरी चालेल. (प्रचित्रे असल्यास उत्तम)

प्रचित्रे= प्रत्येक पायरीची छायाचित्रे.

आनंदी गोपाळ भाऊ पद्धत आणि निरुपण दोन्ही मस्त.

आंगणवाला नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jun 2016 - 9:16 am | कैलासवासी सोन्याबापु

नाखु काका मशरूम खाता काय तुम्ही? ह्या पद्धतीच्या पाककृतीने जर सेम मसाला लावून मशरूम भाजली फॉईल मध्ये तर कल्ला होईलसे वाटते, मशरूम स्वतःच स्पंजसारखे असतात त्यामुळे मसाला ते उत्तम शोषून घेतील ह्यात शंका वाटत नाही, बाकी किती वेळ भाजायचे किती विस्तव असय द्यावे हे तांत्रिक विशेषज्ञ आनंदी गोपाळ सर सांगू देत!!

मश्रुम सोबत बटाटे, रताळी, बीट आणि भेंडी वगैरे भाज्याही अ‍ॅडवा.

>>>बाकी किती वेळ भाजायचे किती विस्तव असय द्यावे हे तांत्रिक विशेषज्ञ आनंदी गोपाळ सर सांगू देत!!

+१११

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jun 2016 - 9:20 am | कैलासवासी सोन्याबापु

बीट नको हो! लैच गोडमिट्ट मचूळ मामला होऊन बसेल!

बर्र र्‍हावद्या. कधी येताय बोला. :)

नाखु's picture

29 Jun 2016 - 9:24 am | नाखु

मशरूम आणि सोयाबीन ठोकळे वापरायला येतील हे लक्ष्यातच आले नव्हते. अता याबाबतची कुणी निगुतीने मजल दरमजल्वाली पा कृ दिली तर (खड्डा खणायला घेतो).

पुरण्यासाठी माफ करा पुराव्यासाठी स्थानीक मिपाकरांना आमंत्रीत करता येईल.(तेव्हढाच मिपा स्थानीक कट्टा हा का ना का)

ता.क. सोन्या बाप्पू पुणे वारी कधी आता तर दोस्त आलेत मिपावर.

मित्रायनी नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jun 2016 - 9:31 am | कैलासवासी सोन्याबापु

@नाखु काका, आलो की कळवतोच पहिल्यांदी!

@मोदक भाऊ, रंग जमेगा नाखु काका के साथ, आम्हाला ग्लासमित्र कोण असेल पण ह्या कट्टयात?

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:34 pm | टवाळ कार्टा

मी चालेल का ग्लासमित्र म्हणून ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 8:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

शुभस्य शिकरण!!

टवाळ कार्टा's picture

5 Jul 2016 - 8:58 pm | टवाळ कार्टा

कधी येताय मग

पाककृती आणि लेखन दोन्हीही छान.

केळीच्या पानाऐवजी हळदीची पानं वापरून करायला हरकत नसावी.
हळदीचा फ्लेवर चिकन बरोबर जबरी लागतो

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jun 2016 - 6:29 am | कैलासवासी सोन्याबापु

च्यायला सकाळी 5 वाजता ही पाककृती वाचायची दुर्बुद्धी सुचली राव मला!! आता भोगा! डॉक्टर इलाज सांगा श्वास भारीभारी झालाय, डोळ्यासमोर फक्त चिकन फिरते आहे ! एखाद्या चिकनची लाकडे त्वरीत पसरदारी पोचवायची इच्छा होते आहे! =))

एक नंबर पाकृ.. आणि एकदम सोपी वाटत आहे.

भारी..!!!!!

लालगरूड's picture

29 Jun 2016 - 9:36 am | लालगरूड

રાડા ..... હૉટેલ ટાका તુમ્હી

वावावावा काय ती पुर्वतयारी, मेहनत, फोटो अन तयार झालेलं पकवान्न.
बसायला हवं तुमच्यासोबत एकदा.

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 9:42 am | मुक्त विहारि

दिल चिकन-चिकन हो गया.

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2016 - 9:33 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा.. खड्डा निखारे वगिअरे फोटो बघूनच चाट पडलो.. इथे म्यागी करून खायचा आळस .. ग्रेट आहात.. एवढ्या मेहनतीनंतर केलेला पदार्थ नक्कीच अशक्य चवदार लागत असणार !