✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाचवी खोली

आ
आदिजोशी यांनी
Tue, 03/29/2011 - 09:53  ·  लेख
लेख
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही. जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे. दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या. मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात. ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही. अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे. इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत. अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी. अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही. चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच. ----------------------------------------------------------------------------X----------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
17161 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

एक नंबरी ललित रे.... पुलंची

स्पा
Tue, 03/29/2011 - 10:02 नवीन
एक नंबरी ललित रे.... पुलंची आठवण झाली
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

हरिप्रिया_
Tue, 03/29/2011 - 10:04 नवीन
:) मस्त लेख...
  • Log in or register to post comments

आदि'जी... मस्त लेख!

मृगनयनी
Tue, 03/29/2011 - 10:25 नवीन
आदि'जी... मस्त लेख! बटाट्याच्या चाळी'ची आठवण झाली! :) पुलेशु! :) _______ मुम्बई'तल्या या अ‍ॅडजस्टमेन्टमध्ये तावून सुलाखून निघालेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो!! ;) (जसा... पुण्यात वाहने चालविणारा माणूस जगात कुठेही कशीही कोणतीही वाहने चालवू शकतो! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिप्रिया_

जसा... पुण्यात वाहने

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/29/2011 - 11:15 नवीन
जसा... पुण्यात वाहने चालविणारा माणूस जगात कुठेही कशीही कोणतीही वाहने चालवू शकतो! हे पुणेकर लोक ना कुठेही प्रौढी मिरवायची संधी मिळाली ना तरी सोडीत नाहीत. चला आता १००+ नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+1

टारझन
Tue, 03/29/2011 - 11:56 नवीन
ज्या दिवशी चाळीत पाणी येत नाही , त्या दिवशी "ढिगावर ढिग " ठरलेले असतात , त्याची आठवण झाली . अवांतर : मालकांची खरडवही ला सुद्धा पाचवे खाते म्हणावे काय ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

वा आदीजोशी भाई!! तुमच देण

स्पंदना
Tue, 03/29/2011 - 10:05 नवीन
वा आदीजोशी भाई!! तुमच देण अगदी मुकाटपणे स्विकारणार्‍या त्या खोलीच देण अगदी झकास देउन टाकल भाउ. तुमच्या शैली बद्दल मी काही बोलण म्हणजे जरा अगोचर पणा होइल. इथे सर्वांना तुम्ही आवडताच. मला ही तुमच लेखन आवडत इतकच या निमित्ताने. पु. ले. शु. मला अक्षररंग फॅसिलिटी डॉन रावांनी दिल्याच्या अविर्भावात मी खालील अवांतर लिहित आहे. तेंव्हा ते फिक्या रंगात वाचावे. (अवांतर- पहिला प्रतिसाद देताना उगाचच धडधडत नाही?)
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Tue, 03/29/2011 - 10:07 नवीन
हा हा हा! मजा आली वाचायला! मस्त लिहता! येऊ दे आणखीन लिखाण!! :)
  • Log in or register to post comments

पण हा लेखन प्रपंच सुंदरच

श्रीराम गावडे
Tue, 03/29/2011 - 10:10 नवीन
पण हा लेखन प्रपंच सुंदरच आहे. चाळीतल्या संडासातला अतिमंदप्रकाशित बल्ब कि ज्यामुळे जेमतेम आपण कुठे बसतोय तेवढच कळत.
  • Log in or register to post comments

आदिजोशी, अजुन एक छान लिखाणं

५० फक्त
Tue, 03/29/2011 - 10:12 नवीन
आदिजोशी, अजुन एक छान लिखाणं तुमचं. आता एवढंच म्हणतो, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
  • Log in or register to post comments

अल्टिमेट..

गवि
Tue, 03/29/2011 - 10:18 नवीन
अल्टिमेट.. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. अगदी अगदी.. चाळीतले लहानपणचे दिवस खाडकन आठवले. झकास लिहीत आहात. पुलंची झलक दिसली. फार फार आवडलं.
  • Log in or register to post comments

भई वाह! तुमच्या या लिखाणाने

प्रास
Tue, 03/29/2011 - 10:35 नवीन
भई वाह! तुमच्या या लिखाणाने त्या पाचव्या खोलीचे पांग फेडले हे निश्चितच!
आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त.
१००% सहमत.
  • Log in or register to post comments

वा! झकास लेख! लेखन विषयाकडे

नगरीनिरंजन
Tue, 03/29/2011 - 10:53 नवीन
वा! झकास लेख! लेखन विषयाकडे पाहून खुसखुशीत वा कुरकुरीत असे म्हणत नाही पण लेख वाचताना सकाळी सकाळी पोट साफ झाल्यावर वाटते त्यापेक्षा जास्त मजा वाटली. चाळीत राहायची वेळ न आलेल्या माझ्यासारख्या माणसालाही तुमची व्यथा समजली आणि त्या पाचव्या खोलीचेही यथार्थ चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आता रोज सकाळी इतर अनेक गोष्टींबरोबर स्वच्छ, हवेशीर आणि स्वतंत्र अशा संडासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत जाईन.
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_

मृत्युन्जय
Tue, 03/29/2011 - 10:54 नवीन
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ सादर प्रणाम. साष्टांगाची स्मायली असल्यास ती डकवली आहे असे समजा.
  • Log in or register to post comments

झकास रे अ‍ॅड्या !!

सुहास..
Tue, 03/29/2011 - 10:58 नवीन
झकास रे अ‍ॅड्या !!
  • Log in or register to post comments

लहानपणी एकदा गिरगावात आलो

नन्दादीप
Tue, 03/29/2011 - 11:09 नवीन
लहानपणी एकदा गिरगावात आलो होतो. त्यावेळची आठवण झाली. आयुष्यातला पहिला प्राणायाम ईथेच शिकलो. आणि आपल्या सारखच बाकीच्यांना पण पोट आणि काय काय ते असत ते जरा उशिर झाल्यावर खाल्लेल्या शिव्यांवरुन समजल. आता ईथेच आहे, आणि आम्ही "पाचव्या खोलीला" "चिंतन गृह" असे म्हणतो. मस्त मनन,चिंतन करता येत...(जर तुमच चिंतन गृह तेवढ साफ, आरम्दायक असेल तर.)
  • Log in or register to post comments

लहानपणी एकदा गिरगावात आलो

नन्दादीप
Tue, 03/29/2011 - 11:10 नवीन
लहानपणी एकदा गिरगावात आलो होतो. त्यावेळची आठवण झाली. आयुष्यातला पहिला प्राणायाम ईथेच शिकलो. आणि आपल्या सारखच बाकीच्यांना पण पोट आणि काय काय ते असत ते जरा उशिर झाल्यावर खाल्लेल्या शिव्यांवरुन समजल. आता ईथेच आहे, आणि आम्ही "पाचव्या खोलीला" "चिंतन गृह" असे म्हणतो. मस्त मनन,चिंतन करता येत...(जर तुमच चिंतन गृह तेवढ साफ, आरम्दायक असेल तर.)
  • Log in or register to post comments

वाह!!

चावटमेला
Tue, 03/29/2011 - 11:16 नवीन
अगदी अप्रतिम उभी केली आहे पाचवी खोली. आम्ही ह्या पाचव्या खोलीला लहानपणी पाकिस्तान म्हणायचो, अजूनही म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

मस्तं लिखाण.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/29/2011 - 11:23 नवीन
कधी कधी तर आतून कोण बाहेर आला आहे यावर लाईनतला पुढचा मनुष्य नंबर घेणार का पास देणार हे ठरत असे. मग आतून बाहेर आलेल्या माणसाच्या समोरच पुढच्याने पास दिला तर आतून आलेला माणूस त्यास उपरोधाने म्हणत असे "बरोबर तुला त्याचा वास आवडतो ना. " मग पास देणाराही त्याच उपरोधाने उत्तर देत असे "अरे हो. तो गावभराचे उकीरडे खाऊन येत नाही आणि तो रोज संडासला जातो. " लाईनतीत उभे असलेल्यांची मात्र अवस्था केविलवाणी होत असे. एकतर आधीच प्रेशर अडवून धरलेले आणि त्यात असे भयाण विनोद. जोरात हसले चायला इथेच प्रोग्रॅम व्हायचा. पोट धरून हसणे सारखाच बोट लावून हसणे हा वाक्प्रचारची क्वचित वापरल्या जायचा. असो या प्रकाराची बरेच दिवसानी आठवण झाली तुमच्या लेखामुळे.
  • Log in or register to post comments

अय्याई ग्ग्ग्ग्ग.....काय

नन्दादीप
Tue, 03/29/2011 - 11:36 नवीन
अय्याई ग्ग्ग्ग्ग.....काय भयानक प्रतिसाद आहे वो. खपलो हसून हसून......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

गतप्राण !! -(पास देणारा)

टारझन
Tue, 03/29/2011 - 12:03 नवीन
गतप्राण !! -(पास देणारा) पासी मेक्यानिक्स कोचिंग क्लास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

फुटले

सविता
Tue, 03/29/2011 - 13:43 नवीन
फुटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ह ह पु वा. भन्नाट प्रतिसाद

आवशीचो घोव्
Wed, 03/30/2011 - 00:29 नवीन
ह ह पु वा. भन्नाट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$

मृगनयनी
Wed, 03/30/2011 - 12:21 नवीन
ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ठ्ठो$$$ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ पु.प्या.... पाय कुठेत तुझे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हाहाहाहा…… वाईट! अगदी वाईट!

हकु
Tue, 06/07/2016 - 10:08 नवीन
हाहाहाहा…… वाईट! अगदी वाईट!
पोट धरून हसणे सारखाच बोट लावून हसणे हा वाक्प्रचारची क्वचित वापरल्या जायचा.
हा तर कळस झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

कळस नाही ओ, त्यालाच 'सरळ' करा

रमेश भिडे
Tue, 06/07/2016 - 11:04 नवीन
कळस नाही ओ, त्यालाच 'सरळ' करा.... तांब्या कामाला येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

ऎड्य़ा

दिपक
Tue, 03/29/2011 - 11:34 नवीन
वाक्यन्‌ वाक्य आवडले.. तुफान लेख! चाळीत १५-२० वर्षे काढली आहेत त्यामुळे लेख आपला वाटला. आम्ही बादली बरोबर ६० चा बल्ब पण घेऊन जायचो. ;-) आतल्या भिंतीवर लिहिलेल्या सुविचाराबद्दल काही लिहिले नाहिस ते?
पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते.
=)) =))
  • Log in or register to post comments

मस्तच रे अ‍ॅड्या.

अभिज्ञ
Tue, 03/29/2011 - 11:51 नवीन
एकदम खुसखुशीत लेख. पाचवी खोली अन मुख्य म्हणजे आपली "शैली" आवडली. :) (बारा वर्षे चाळीत राहीलेला)अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रमोद्_पुणे
Tue, 03/29/2011 - 11:52 नवीन
छान लिवलय रे..
  • Log in or register to post comments

हा आठवण ताजी झाली....

विनीत संखे
Tue, 03/29/2011 - 11:55 नवीन
खरंच आम्हीही चाळीत रहायचो तेव्हा दोन कुटुंबासाठी एक सार्वजनिक संडास होतं. पावसाळ्यात तुंबायचं आणि झुरळं निघायची... अशा संडासाविषयी लिहायला माझ्यात अजिबात धमक नाही.... ;-)
  • Log in or register to post comments

फक्त २? आमच्या चाळीत १०

आवशीचो घोव्
Wed, 03/30/2011 - 00:31 नवीन
फक्त २? आमच्या चाळीत १० कुटुंबांसाठी १ होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

१ नम्बर भारी लिहिलय

मुलूखावेगळी
Tue, 03/29/2011 - 12:03 नवीन
१ नम्बर भारी लिहिलय
  • Log in or register to post comments

अव्वल... अवांतर : पण ६x६

वपाडाव
Tue, 03/29/2011 - 12:03 नवीन
अव्वल... अवांतर : पण ६x६ म्हंजे जरा जास्तच मोठी नाही का हो झाली ५वी खोली....
  • Log in or register to post comments

आहो तो त्यांच्या स्वप्नातला

टारझन
Tue, 03/29/2011 - 12:17 नवीन
आहो तो त्यांच्या स्वप्नातला संडास आहे . चुका काय काढता .. भावना महत्वाच्या :) बाकी संडासात जर डास असतील तर एक वेगळीच मजा येते . जाणकारांनी प्रकाश टाकावा :) -एक्स्पोजड्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

संडासात जर डास असतील तर

रामदास
Wed, 03/30/2011 - 10:38 नवीन
मडक्यावर चापट्या मारायचे आवाज - तो दरवाजाखालून येणारा विडीचा धूर -माचीस खाली पडल्याचा आवाज -ती पटकन उचलण्यासाठीची धावपळ -तो स्मोकर्स कफ --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ती पटकन उचलण्यासाठीची धावपळ

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 11:34 नवीन
ती पटकन उचलण्यासाठीची धावपळ
इतक्याश्या जागेत धावणार कुकडे आणी पळणार कुकडे ? या सर्व गोष्टी बसुनच कराव्या लागत असतील ना !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लय 'मोकळं मोकळं' वाटलं

प्यारे१
Tue, 03/29/2011 - 12:23 नवीन
लय 'मोकळं मोकळं' वाटलं वाचून....
  • Log in or register to post comments

छान लेख

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/29/2011 - 12:27 नवीन
आमच्याकं होल वावर इज अवर नंतर हळु हळू पाचवी खोली उत्क्रांत होत गेली. त्यामुळे डुक्करांचा व आमचा सहवास फार जवळचा.
  • Log in or register to post comments

पाचवीच का????????

सुधीर१३७
Tue, 03/29/2011 - 12:39 नवीन
.................अन्य खोल्यांविषयी देखील लिहा............. :wink: ...पुलेशु....
  • Log in or register to post comments

पाचव्या खोलीतल्या

प.पु.
Tue, 03/29/2011 - 12:54 नवीन
पाचव्या खोलीतल्या "भित्तीचित्रे आणि भित्ती-साहित्य" या विषयावर पण काहीतरी येऊद्या की.................
  • Log in or register to post comments

=)) काय तो लेख आणि काय ते

गणपा
Tue, 03/29/2011 - 14:03 नवीन
=)) काय तो लेख आणि काय ते एकसे एक जुन्या आठवणी जागे केलेले प्रतिसाद. =)) =)) =)) =)) =)) तुफ्फ्फ्फ्फ्फ्फान रे अ‍ॅड्या. थेट लोकांच्या नाळेला हात खालणारं लेखन असत रे तुझं. आमची इमारतही चाळवजा असली तरी सुदैवाने पाचवी खोली घरातच होती. पण तुम्हणतोस त्या पाचव्या खोलीचा अनुभव दादरला/ठाण्याला आईच्या आत्येकडे घेतला आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त

जातीवंत भटका
Tue, 03/29/2011 - 14:28 नवीन
छान लिहीले आहे. शैली आवडली.
  • Log in or register to post comments

लेख झकास

RUPALI POYEKAR
Tue, 03/29/2011 - 15:08 नवीन
लेख एकदम झकास
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिले आहे ..

गणेशा
Tue, 03/29/2011 - 15:28 नवीन
अप्रतिम लिहिले आहे ..
  • Log in or register to post comments

एकदम

इरसाल
Tue, 03/29/2011 - 15:56 नवीन
एकदम छान....................मस्त लिहीलेय.........................
  • Log in or register to post comments

होता नाही एहसास-ए-खुशबू जब वो

आवशीचो घोव्
Wed, 03/30/2011 - 00:35 नवीन
होता नाही एहसास-ए-खुशबू जब वो गुजरता है पाससे मुद्द्तो आती ही खुशबू उसके जाने के बाद. @इरसाल वा वा. अतिशय योग्य धाग्यावर शायरी आली आहे. माश्या आल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

पाचवी खोली चांगली लिहिली

रेवती
Tue, 03/29/2011 - 16:18 नवीन
पाचवी खोली चांगली लिहिली आहेस. वाचताना वाईट वाटत राहिले.
  • Log in or register to post comments

छान - आपण पु ल आहात

रणजित चितळे
Tue, 03/29/2011 - 16:40 नवीन
))))))))))))))अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी. हसुन हसून पुरेवाट झाली. पुलंची आठवण आली आपले ललित वाचून आजचा दिवस धन्य झाला.
  • Log in or register to post comments

अ‍ॅडी भौ!!! यू रॉक!!

प्राजु
Tue, 03/29/2011 - 20:39 नवीन
अ‍ॅडी भौ!!! यू रॉक!!
  • Log in or register to post comments

झक्कास!

पैसा
Tue, 03/29/2011 - 20:45 नवीन
खरंच पु. लं.ची आठवण करून दिलीस!
  • Log in or register to post comments

अँडी खपले वारले

प्रीत-मोहर
Tue, 03/29/2011 - 20:46 नवीन
अँडी खपले वारले मेले......त्यावर धन्य पुप्या दोघांनाही __/\__
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा