✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाचवी खोली

आ
आदिजोशी यांनी
Tue, 03/29/2011 - 09:53  ·  लेख
लेख
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही. जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे. दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या. मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात. ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही. अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे. इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत. अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी. अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही. चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच. ----------------------------------------------------------------------------X----------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
17161 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

हाहाहा !!

शाहरुख
Tue, 03/29/2011 - 20:55 नवीन
हाहाहा !!
  • Log in or register to post comments

आमच्याकडे पाचव्या खोलीत दिवा

मेघवेडा
Tue, 03/29/2011 - 20:55 नवीन
आमच्याकडे पाचव्या खोलीत दिवा नाही नि कुणी कधी दिवे लावण्याचा प्रयत्नही केल्याचे स्मरत नाही. मग रात्रीच्या वारीला मेणबत्त्या, रॉकेलचे दिवे न्यावे लागत. पुढे मोबाईल आल्यावर ते दिवे कालौघात मागे पडतात का काय अशी शंका येऊ लागली. पण पटवर्धनांच्या बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!) इतरांनीही त्यापासून धडा घेतला नि पुन्हा पाचव्या खोलीत मेणाचे थर नि रॉकेलच्या दिव्यांची काजळी दिसू लागली! झकास लेख रे अ‍ॅडीभौ! खुसखुशीत म्हणणार होतो पण उगाच रसभंग व्हायचा! ;)
  • Log in or register to post comments

बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी

गवि
Wed, 03/30/2011 - 09:51 नवीन
बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!) :) :) :) जबरा. मेणाचे थर.. अगदी अगदी.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

>>>@@पटवर्धनांच्या बंड्याचा

नन्दादीप
गुरुवार, 03/31/2011 - 11:40 नवीन
>>>@@पटवर्धनांच्या बंड्याचा मोबाईल पाताळमार्गी गेल्यापासून (त्यावर "संडासात बसून काय इतका बघत होता मोबाईलवर कोण जाणे.." हे त्याच्या मातोश्रींचे उद्गार अख्ख्या चाळीत खसखस पिकवून गेले!) >> खपलो.......मेलो... जबरा जोक.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मस्त रे अ‍ॅड्या

आनंदयात्री
Tue, 03/29/2011 - 21:13 नवीन
मस्त रे अ‍ॅड्या. लेख भारी जमलाय. बाकी आम्ही या खोलीला पाकिस्तान म्हणतो, अगदीच पाकड्यांवर दया आली तर एकांतवास म्हणतो !! एकांत + वास = एकांतवास - (शब्दांच्या फोडी पाडणारा) आं.द्या. वाळिंबे
  • Log in or register to post comments

भाई काकांची आठवण झाली हा लेख

निनाद मुक्काम …
Tue, 03/29/2011 - 21:48 नवीन
भाई काकांची आठवण झाली हा लेख वाचून ,मनाला हळवे करणारे लेखन लहानपणी सुट्टीत बटाट्याच्या चाळीत यायचो तेव्हा ह्या ५ व्या खोलीत अनेक होतकरू चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांना लाजवतील अशी अप्रतिम चित्रांची अदाकारी काढत. .( भावनांचा मुक्त अविष्कार ह्या चित्रातून होत असल्याने ती चित्र जिवंत वाटत. लहानपणी येथे दिव्य अनुभूती घेऊन बाहेर आल्यावर माझ्या त्रासलेल्या चेहरा पाहून आजोबा संतापाने म्हणत '' ह्यासाठी तुझा बाप गोऱ्या संडासाच्या मोहाने हक्काची जागा सोडून गेला . त्यावेळी त्या उद्गारच्या मागे त्यांची कळकळ तेव्हा जाणवायची नाही . पुढे ह्या बटाट्याच्या चाळीत आम्ही आगमन केले तेव्हा घरात गोरा संडास आला. .आणी ५व्या खोलीशी संबंध आला नाही . आता ची चाळीतील तरुण पिढी तर सकाळी ऑफिसात जाऊन वातानुकूलीत खोलीत मुक्कामाला असते .असे कानावर आले . दंगलीच्या काळात या खोल्यांचा वापर ट्यूब लाईट व इतर सामुग्री साठवण्यासाठी झाला होता . तस्मात १९४७ नंतर ह्या खोल्यांनी परत असा राडेबाज ,रोमांचक अनुभव घेतला होता . काही वर्षांपूर्वी ''ही चाळ झोपडपट्टी म्हणून कागदोपत्री दाखवा नी ह्या खोल्या आम्ही चकचकीत नव्या बांधून देतो '' असे कुठल्याशा सरकारी योजने अंतर्गत आमिष दाखवले गेले . ह्या खोल्यांनी असा गैरमार्गाने होणारा मेक ओवर बाणेदारपणे नाकारला . आता पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत . तेव्हा ह्या खोल्या बहूदा त्यांचे शेवटच्या घटका मोजत आहेत .असे वाटते . माजी बटाट्याच्या चाळीचा रहिवाशी मुक्काम पोस्ट...
  • Log in or register to post comments

अ‍ॅड्या एक नंबर लेख. :) -

पिंगू
Tue, 03/29/2011 - 21:47 नवीन
अ‍ॅड्या एक नंबर लेख. :) :) - (पाचव्या खोलीतील अनुभवी) पिंगू
  • Log in or register to post comments

बॉस, काय बोलायचे आता.....

आत्मशून्य
Wed, 03/30/2011 - 05:22 नवीन
..._/\_...
  • Log in or register to post comments

लेखनाची "शैली" जबरदस्त !!!!

बबलु
Wed, 03/30/2011 - 10:13 नवीन
लेखनाची "शैली" जबरदस्त !!!! :) :) हसून हसून मेलो. खतरनाक, अशक्य, पोटफाडू. ;) (बादवे... "बंड्याची शाळा" लिहिणारे तुम्हीच काय ?)
  • Log in or register to post comments

होय साहेब, मीच तो.

आदिजोशी
Wed, 03/30/2011 - 10:18 नवीन
होय साहेब, मीच तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

गुगल असे सांगतय की "बंड्याची

शाम भागवत
Tue, 06/07/2016 - 12:00 नवीन
गुगल असे सांगतय की "बंड्याची शाळा" www.misalpav.com/node/7802 इथे आहे. पण इथे जाता येत नाहीय्ये. "access denied" असा संदेश येतोय. पण इथे जाता येतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

सर्वांचे मनापासून आभार _/\_

आदिजोशी
Wed, 03/30/2011 - 10:16 नवीन
सर्वांचे मनापासून आभार _/\_
  • Log in or register to post comments

आभार मानतोयस? अ‍ॅडी लग्नानंतर

रेवती
Wed, 03/30/2011 - 20:37 नवीन
आभार मानतोयस? अ‍ॅडी लग्नानंतर बराच मवाळ झालाय्......आधी मावळा होता.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मस्त ...

छोटा डॉन
Wed, 03/30/2011 - 10:17 नवीन
पाचव्या खोलीची लेख झकास रे अ‍ॅड्या. ह्यानिमित्ताने पाचव्या खोलीतल्या 'चित्रकले'ची राहुन राहुन आठवण येते. खजुराहोंच्या शिल्पानंतर मानवी शरिराचे जर एवढे रोखठोक चित्रण कुठे आठळत असेल तर ते ह्या पाचव्या खोलीतच. पाचव्या खोलीचे चाळीच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अजुन एक महत्व म्हणजे इथे आढळणारी गॉसिप्स. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण लै चालु आहे, कोण कुणाला घेतो, कुणाचे काय कशासारखे आहे वगैरे वगैरे बातम्या आणि गॉसिप्सवर इथे अगदी साधकबाधक चर्चा केलेली व त्याची भिंतीवर नोंद करुन ठेवलेली आढळते. असो, मस्तच लेख ! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

@पाचव्या खोलीचे चाळीच्या

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 10:40 नवीन
@पाचव्या खोलीचे चाळीच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अजुन एक महत्व म्हणजे इथे आढळणारी गॉसिप्स. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण लै चालु आहे, कोण कुणाला घेतो, कुणाचे काय कशासारखे आहे वगैरे वगैरे बातम्या आणि गॉसिप्सवर इथे अगदी साधकबाधक चर्चा केलेली व त्याची भिंतीवर नोंद करुन ठेवलेली आढळते. अगदी अगदी त्यातून होणारे राडे किंवा शिमग्याला किंवा इतर वेळी जुने स्कोर सेटल करण्यासाठी दिल्या जाणारया हाळी सगळेच जबरा ह्या सगळ्याचे उगमस्थान हे ह्या खोल्यांमधील ललित लेखन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

जबरा रे अ‍ॅड्या

टुकुल
Wed, 03/30/2011 - 12:05 नवीन
तुझसम तुच रे :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

अगागा!

नंदन
Wed, 03/30/2011 - 12:10 नवीन
कं लिवलंय, कं लिवलंय! (एक नंबर! म्हणणार होतो, पण उगाच पीजे नकोत :)) मेव्या आणि पुपेंचे प्रतिसादही खतरनाक!
  • Log in or register to post comments

भन्नाट लेख बुवा...

स्मिता_१३
Wed, 03/30/2011 - 20:20 नवीन
भन्नाट लेख बुवा...
  • Log in or register to post comments

फर्मास अ‍ॅडीभौ. बर्‍याच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/31/2011 - 13:26 नवीन
फर्मास अ‍ॅडीभौ. बर्‍याच दिवसांनी खळखळुन हास्याचा अनुभव घेता आला :)
  • Log in or register to post comments

ख ळ ख ळु न?

स्पंदना
गुरुवार, 03/31/2011 - 15:13 नवीन
ख ळ ख ळु न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

प्राजक्ता पवार
गुरुवार, 03/31/2011 - 13:30 नवीन
मस्त लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments

हे हे हे हे खतरनाक लिहिलय

विनायक बेलापुरे
गुरुवार, 03/31/2011 - 16:05 नवीन
हे हे हे हे खतरनाक लिहिलय
  • Log in or register to post comments

लेख

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/31/2011 - 20:11 नवीन
लेख नॉस्टाल्जिक बनवणारा आहे. शैली अत्यंत खुसखुशीत आहे. या निमित्ताने सुचलेला एक विचार. गरीबी आणि श्रीमंती या अर्थातच अत्यंत सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत हे निराळे सांगायला नको. मुकेश अंबाणीसारखे लोक सोडले तर बाकीचे कुणापेक्षा तरी गरीब नि कुणापेक्षातरी श्रीमंत असतातच. तर , श्रीमंती आणि गरीबी यांच्यातली सीमारेषाच ठरवायची वेळ आली तर बहुदा "आपल्या मालकीची तिसरी/चौथी/पाचवी खोली असणे किंवा नसणे" अशी ठरवता येईल असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments

लंबर एक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2011 - 20:30 नवीन
लेखनाची शैली एकदम झकास आहे. चाळीतल्या पाचव्या खोलीची झकास ओळख. अजून येऊ दे......! काही प्रतिसादही भन्नाट आहे. मडक्यावरच्या चापटया....हहपुवा झाली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

--/\-- अफलातून

मराठे
Fri, 04/01/2011 - 00:36 नवीन
--/\-- अफलातून लेखन... कधीकाळी गिरगावातल्या चाळीत १०-१२ बिर्‍हाडांत मिळून असलेल्या पाचव्या खोलीत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले

चित्रा
Fri, 04/01/2011 - 00:49 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

मुद्दामहून धागा वर काढतोय. आहेच तसा तो.

शाम भागवत
Mon, 06/06/2016 - 20:31 नवीन
जगातल्या सर्वात बोरिंग जागांपैकी एक जागा म्हणजे बैंक! तेथून एकदम पाचव्या खोलीत येईन असे वाटले पण नव्हते. सूड यांच्या कृपेने आज हे वाचायला मिळाले. मस्तच लिहलय. काही प्रतिसाद तर फारच भन्नाट. आता मला ही फॉक्कन शब्दामुळे हाच लेख आठवेल. :))
  • Log in or register to post comments

लेखन शैलीने पु.लंची आठवण!

प्रियाजी
Mon, 06/06/2016 - 22:39 नवीन
हे अनुभव फक्त मुंबईतील चाळीचेच नव्हेत तर पुण्यभूमीतील वाड्यातही नळ, पाणी, कंदील मेण्बत्त्यांसकट हेच सर्व अनुभवलेले आहे. आता त्या आठवणीही नकोश्या वाट्तात. मात्र लेखन शैली पु.लंची आठवण करून देते याच्याशी सहमत. हा लेख वाचताना त्या आठवणी जाग्या होउन डोळ्यात पाणी तरळले.
  • Log in or register to post comments

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या

अत्रे
Tue, 06/07/2016 - 08:23 नवीन
अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली.
हा हा हा! भारी लेख.
  • Log in or register to post comments

खत्तरनाक लेख!!

हकु
Tue, 06/07/2016 - 10:02 नवीन
खत्तरनाक लेख!!
अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत.
हे तर ज्यामच भारी ! मजा आली लेख वाचून. खरंच पुलंची बटाट्याची चाळ आठवली.
  • Log in or register to post comments

खतरनाक लेख वर काढल्याबद्दल

बाळ सप्रे
Tue, 06/07/2016 - 10:34 नवीन
खतरनाक लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद ! असा लेख पाचव्या खोलीत चिंतन करतानाच सुचला असावा :-) बाकी अशाच एका पाचव्या खोलीची लहानपणी खूप भिती वाटायची.. खास करून आत कायम रहिवासी असणार्‍या पालीची.. आणि पाणी न्यायला बादली असे पण त्यात तांब्या नसे त्यामुळे धुवायची पंचाइत.. त्यामुळे लहान मुलांची बाहेर एका भिंतीवर वेगळी पंगत बसायची..
  • Log in or register to post comments

त्यामुळे लहान मुलांची बाहेर

स्पा
Fri, 06/10/2016 - 10:13 नवीन
त्यामुळे लहान मुलांची बाहेर एका भिंतीवर वेगळी पंगत बसायची..
अगागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

कसलं भारी लिवलय राव.... मज्जा

गौतमी
Tue, 06/07/2016 - 10:57 नवीन
कसलं भारी लिवलय राव.... मज्जा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

लई भारी लिहिलंय !

हृषिकेश पांडकर
Tue, 06/07/2016 - 12:22 नवीन
लई भारी लिहिलंय !
  • Log in or register to post comments

भन्नाट लेख !!

चिनार
Tue, 06/07/2016 - 13:02 नवीन
भन्नाट लेख !!
  • Log in or register to post comments

जमलाय लेख.

अभिजीत अवलिया
गुरुवार, 06/09/2016 - 10:37 नवीन
जमलाय लेख.
  • Log in or register to post comments

लय भारी

अनाहूत
Fri, 06/10/2016 - 08:27 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

ह मो मराठे

कापूसकोन्ड्या
Fri, 06/10/2016 - 10:10 नवीन
ह मों च्या एअका एका लिखिणात (संदर्भ आठवत नाही) "नागड्याने अंघोळ" असा एक चैनीचा विषय होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा