सुलभाताई गेल्याचे नुकतेच समजले. मनाला अत्यंत धक्का बसला. त्यांचे व अरविंद देशपाडे यांचे, मराठी रंगभूमी समृद्ध करण्यांतील योगदान फार महत्वाचे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.
अतिशय जाणत्या रंगकर्मी आता आपल्यातून गेल्या आहेत. अरविंद देशपांडे व त्यांनी रंगायनमधून बाहेर पडून स्वतःची 'आविषकार' संस्था स्थापन केली होती, त्यातून 'शांतता..' पासून, 'दुर्गा झाली गौरी' सारख्या बालनाट्यांच्या अनेक आविष्कारांसकट, अगदी 'पाहिजे जातीचे' सारख्या अव्वल दर्जाच्या कलाकृती त्यांनी आम्हाला दिल्या, आमचे छोटेसे जग त्यांनी समृद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी 'शांतता' च्या निर्मीतीविषयीचा लेख त्यांनी एका दिवाळी अंकात लिहीला होता, तो नितांतसुंदर होता. विशेष म्हणजे त्यात त्यांनी, तेंडुलकरांच्या नाट्यसंहितेममधील अनेक प्रसंगांचे अरविंद देशपांडे ह्यांनी केलेले इंटर्प्रीटेशन व त्यातून त्यांनी केलेले सादरीकरण ह्यांविषयी सविस्तर लिहीले होते. (कुणाकडेही तो लेख असल्यास कृपया मला जरूर कळवावे).
१९७५-६ साली इस्रोतर्फे 'साईट', ह्या सॅटेलाईट टेलिव्हिजनच्या माध्यमातून शालेय कार्यक्रम भारतभर पोहोचवावयाच्या उपक्रमात मी तांत्रिकी क्षेत्रात भाग घेतला होता. असे कार्यम्रम बनविण्यासाठी आमचा, म्हणजे इस्रोचा, मुंबईत एक अगदी छोटासा टी. व्ही. स्टुडियो होता. तिथे निर्माण होणार्या कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी सुलभाताई अनेकदा येत असत. तेव्हा खरे तर 'आविष्कार' च्या कामांत त्या अतिशय व्यस्त असणार. तरीही, हे जे काही नवीन, व वेगळेच सुरू आहे, त्यात भाग घेण्याच्या ओढीने त्या तिथे येत असाव्यात. अत्यंत निगर्वी, शांत अशी त्यांची तेव्हाची प्रतिमा अजून माझ्या मनावर आहे.
त्या आता जिथे जातील, तिथेही त्यांचा असाच शांत आणि अनुभव टिपून घेणारा वावर सुरू राहो.
आपल्या स्वभावाप्रमाणेच त्यांनी शांतपणे, तृप्तपणे जगाचा निरोप घेतला.
सुलूमावशी - समस्त आविष्कार परिवाराची - विशेषतः 'चंद्रशाला'च्या चिल्ल्यापिल्ल्यांची ही स्फूर्तिदात्री.
मन एकदम २५-३० वर्षं १९८५-९०मध्ये मागे गेलं. आविष्कारच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात जयदेव हट्टंगडींच्या मार्गदर्शनाखाली नाट्य प्रशिक्षण घेतल्यामुळे आविष्कार परिवारामध्ये प्रवेश झाला होता. मंतरलेले, झपाटलेले दिवस होते ते. ८६च्या नोव्हेंबरमध्ये सुलूमावशी दिग्दर्शन करत असलेल्या एका नाटकासाठी मला विचारणा झाली होती, पण काही दिवसांपूर्वीच आविष्कारच्याच एका नाटकाच्या दौर्यासाठी सुटी घेतल्यामुळे पुन्हा सुटी मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती संधी हुकली. मात्र छबिलदासमध्ये माझ्या ग्रूपची नित्य ये-जा असल्यामुळे, तालमींना वगैरे त्यांच्याशी भेटी होतच असत.
पुढच्याच वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात एक जबरदस्त हादरा बसला - आविष्कारचे 'पपा' (अरविंद देशपांडे) ३ जानेवारी १९८७ला अचानक गेले. या धक्क्यातून लगेच सावरून, 'शो मस्ट गो ऑन' या नाट्यब्रीदाला जागून सुलूमावशींनी आपलं काम सुरूच ठेवलं. अरविंद देशपांडेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाट्यमहोत्सव करायचा, असं ठरलं. ते आजतागायत चालू आहे.
मध्यंतरी बराच काळ - १५-२० वर्षं मी नाट्यसृष्टीपासून दूर गेलो. मग २०१२मध्ये ओरिगामी प्रदर्शन बघायला त्या आल्या होत्या. मी त्यांना "सुलूमावशी" अशी हाक मारल्यावर, त्यांचा 'ट्रेडमार्क' असलेलं प्रसन्न हसू त्यांच्या चेहर्यावर पसरलं. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, स्वतः त्यांच्याबरोबर फिरून त्यांना संपूर्ण प्रदर्शन दाखवलं.
अत्यंत शांत, मृदू, मितभाषी आणि निगर्वी. नाटकाबरोबरच त्यांनी मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये, कामं केली असली, तरी नाटक हीच त्यांची खरी आंतरिक आवड. मुद्दाम अभिनय न करता सहज, नैसर्गिक वावर असे त्यांचा. एखाद्या नाट्यप्रवेशामध्ये / चित्रदृश्यामध्ये सहकलाकाराच्या संवादाला अतिशय सहजसुंदर, स्वाभाविक प्रतिसाद देत. त्यामुळे एखादा नवखा कलाकारही न बुजता अभिनय करायला शिकायचा. त्या खूप मोठ्या असल्या, तरी त्यांच्या आपुलकीच्या वागण्यामुळे 'आपल्या' वाटायच्या.
आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांचं छोटंसं आयुष्य समृद्ध करून जाणारी ही माणसं... शरीराने दूर निघून गेली, तरी मनात घर करून राहणारी....
भावपूर्ण श्रद्धांजली.
नोंद घेण्यासारखी कुणीही व्यक्ति गेल्यावर वर्तमानपत्रांतून आदरांजलीचे लेख येतात. त्यातील काही कोरडेठाक (उगाच संपादकांनी विनंति केल्यावर खरडलेले असे) तर काही थोडेफार उत्कट, प्रांजळ असतात.
सुलभाताईंच्या निधनानंतर आजच्या लोकरंग पुरवणीतील कमलाकर नाडकर्णींचा लेख ह्या दुसर्या सदरातील आहे. नाडकर्णींनी स्वतः सत्तर- ऐशीच्या दशकांत बहरलेली प्रायोगिक नाट्यचळवळ अतिशय जवळून पाहिलेली आहे, तसेच तत्कालिन व्यावसायिक नाट्यभूमीच्या बदलत्या दशाही. नाडकर्णी त्या काळात अतिशय सुंदर नाट्यपरिक्षणे लिहीत असत. माधव मनोहरांनी सुरू केलेली परंपरा, त्यांच्यानंतर चालवण्यात ते व पुष्पा भावे ह्यांचा महत्वाचा हातभार होता.
त्यामुळे त्यांनी वाहिलेली ही श्रद्धांजलि माहितीपूर्ण व अगदी मनापासून आलेली आहे.
प्रतिक्रिया
हो, मलाही आत्ताच कळले, फार
अगदी आत्ताच समजले. वाईट झाले.
श्रद्धांजली
वाईट बातमी
ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.
अतिशय दु:खद बातमी.
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर
सुलभाताई देशपांडे यांना
दु:खद बातमी
दु:खद बातमी
भावपूर्ण श्रध्दांजली!
अरेरे, खरंच वाईट बातमी
सुलभा देशपांडे यांना विनम्र श्रद्धांजली!
सुलूमावशी आणि आविष्कारचे दिवस
श्रद्धांजली
+१