✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

प
पैसा यांनी
गुरुवार, 06/02/2016 - 23:20  ·  लेख
लेख
1 रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये. चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे. शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्‍यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात. नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्‍याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्‍याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्‍या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील. एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्‍या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्‍या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते. शेवट चिनू सातार्‍याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्‍याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात. सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला. चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही. अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12189 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

सबंध चित्रपटात एक उदासवाणे

सतिश गावडे
गुरुवार, 06/02/2016 - 23:40 नवीन
सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे.
यामुळे कथा सशक्त असूनही चित्रपट अंगावर येतो. :(
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहिला नाही पण परिचय

प्रचेतस
गुरुवार, 06/02/2016 - 23:50 नवीन
चित्रपट पाहिला नाही पण परिचय आवडला.
  • Log in or register to post comments

मराठी ना सिनेमा... सिविल वॉर

वपाडाव
Fri, 06/03/2016 - 10:00 नवीन
मराठी ना सिनेमा... सिविल वॉर रांगेत लागुन पाह्यला नाही का? ते मार्वल उचक्या लागुन लागुन मरुन जाइल एके दिवशी तुमच्यामुळे...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) =))

किसन शिंदे
Fri, 06/03/2016 - 15:39 नवीन
=)) =)) ते शेवटी तुमचं अजून एक पेटंट वाक्य राहीलं वपाडाव सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

कुठलं हो?

प्रचेतस
Fri, 06/03/2016 - 16:53 नवीन
कुठलं हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सच्चं भणं गोदावरी का कायसं?

सूड
Fri, 06/03/2016 - 17:47 नवीन
सच्चं भणं गोदावरी का कायसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अरे काय, कुठल्याही मराठी

प्रचेतस
Fri, 06/03/2016 - 18:10 नवीन
अरे काय, कुठल्याही मराठी पिक्चरला मी कधीही वाईट म्हणलेलं नसताना मला फुकट बदनाम केलंत. हा चित्रपट अवश्य पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छ्या आम्ही

नाखु
Sat, 06/04/2016 - 08:42 नवीन
म्हटलं म्हणून मन मारून बघू नका उगा मला, वप्या,किस्नाला पाप लागेल. हा अता दुसरं कुणी आग्रहानी घेऊन जात असेल तर नक्की जा अजिबात अडविणार नाही. खुलासा संपला. मराठीच्या पण पिटातला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) =))

यशोधरा
Sat, 06/04/2016 - 08:55 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान परीक्षण

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/02/2016 - 23:59 नवीन
चित्रपट visually खूपच सुंदर आहे. त्यामुळे कथा थोडीशी दबली जाते. अर्थात हे माझं मत. दिग्दर्शक फ्रेमच्या प्रेमात पडल्यासारखे अनेक प्रसंग आहेत. विशेषतः समुद्राचे. अर्थात तिथला समुद्र हा प्रेमात पडण्यासारखाच आहे.
  • Log in or register to post comments

दिग्दर्शक फ्रेमच्या प्रेमात

विजुभाऊ
Fri, 06/03/2016 - 03:13 नवीन
दिग्दर्शक फ्रेमच्या प्रेमात पडल्यासारखे अनेक प्रसंग आहेत
. सहमत. मूळचा कॅमेरामन जेंव्हा दिग्दर्शक होतो तेंव्हा हे अनुभव येतातच. पण काही म्हणा. तो मुले तळ्यात पोहायला उड्या टाकतात त्या एका शॉट साठी चित्रपट दहा वेळा पहावा. फोटोग्राफीचा वस्तू पाठ आहे तो सीन म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नितांत सुंदर चित्रपट आहे!

जव्हेरगंज
Fri, 06/03/2016 - 00:02 नवीन
जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. येऊ द्यात की तिथल्या निसर्गरम्य आठवणी! (म्हणजे लिखाणाच्या स्वरूपात )
  • Log in or register to post comments

येऊ द्यात,

प्रदीप
Fri, 06/03/2016 - 21:13 नवीन
पण कदाचित नकोच. आपल्या स्वतःच्या हळव्या, वैयक्तिक आठवणी स्वत:पाशीच रहाव्यात असे वाटणे साहजिक आहे. लेख आवडला, त्यातील चित्रपटाच्या थीमचे इंटर्प्रीटेशन सुंदर लिहीले आहेत, प्रसंगांच्या कडाही छान उलगडून दाखवल्या आहेत. चित्रीकरणाविषयी मी थोडा साशंक आहे, पण ते असूंदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

चित्रिकरणाबद्दल जरूर लिहा

पैसा
Fri, 06/03/2016 - 22:15 नवीन
खरे तर तुमची खरडफळ्यावरची चर्चा वाचून हा सिनेमा मी अगदी लक्षात ठेवून पाहिला. मोठ्या स्क्रीनवर बघणार्‍यांना नक्कीच जास्त चांगला दृश्यानुभव आला असणार. मी पाहिला तो टीव्हीवर. मला त्यातले बरेचसे चित्रिकरण पात्रांच्या आणि प्रसंगाच्या मूडनुसार वाटले. एकूण मूड उदास असल्याने बरेचसे चित्रीकरण काळोखे वाटते. कोकणातली जुनी घरे अशीच काळोखी असतात आणि पाऊस भरून येतो किंवा कोसळत असतो तेव्हाही प्रकाश कमीच असतो. त्यांनी बहुधा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात चित्रिकरण केले असावे. आणखीही काहीजणांचा आक्षेप आहे की दिग्दर्शक हाच छायाचित्रकार असल्याने फ्रेम्सच्या प्रेमात दिसतो. त्यामुळे संवादांपेक्षा दृश्यांवर जास्त भर वाटतो. याबद्दलही तुमची एकूण मते वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

चित्रीकरण

प्रदीप
Fri, 06/03/2016 - 22:46 नवीन
खरे तर काळोखातील दृश्ये चांगली चित्रीत केली आहेत. पण मला वाटते, बाहेरील (आऊटडोअर) चित्रीकरणांत काँट्रास्ट बराच कमी आहे. ती बहुतेक सगळी दृश्ये मलातरी अगदी फ्लॅट वाटली. कदाचित तुम्ही म्हणता तसा उदास मूड आणण्यासाठी ते तसे केले हेतुतः केले असावे, अशीही शक्यता आहेच."आणि पाऊस भरून येतो किंवा कोसळत असतो तेव्हाही प्रकाश कमीच असतो. त्यांनी बहुधा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात चित्रिकरण केले असावे". हे कारण बरोबर असावे असे वाटते. पण टी. व्हीवर लो काँट्रास्ट्ची चित्रे चांगली वाटत नाहीत*. मोठ्या पडद्यावर कदाचित ते इतके खटकणार नाही. दुसरे म्हणजे सबंध चित्रीकरणात कुठेही क्लोजअप्स नाहीत हे मला खटकले. दोन पात्रांत, जसे आई व मुलगा-- ह्यांच्यातील प्रसंगांत तसे ते असते तर ते अधिक परिमाणकारक झाले असते. क्लोजप्स असावयासच पाहिजेत असा अट्टाहास कशाला, असा (रास्त) प्रश्न मला केला गेला. क्लोजप्सनी चेहर्‍यावरचे भाव, त्यात होणारे सूक्षम बदल हे झटकन व अतिशय परिणामकारक दाखवता येतात. म्हणून काही विशीष्ट प्रसंगी ते असावेत, त्यामुळे प्रसंगाची तीव्रता अधोरेखित होते. (आपल्या पारंपारीक सिनेमात गुरू दत्तने क्लोजप्स, तसेच लो- अँगल शॉट्स अतिशय परिणामकारक रीत्या वापरले आहेत). (* तांत्रिक दृष्ट्या टेलिव्हिजनमध्ये मूळ चित्रातील काँट्रास्ट हुबेहुब दर्शवण्याची क्षमता, फिल्म्स्पेक्षा कमी आहे, व आपल्या डोळ्यांना दिसते त्यापेक्षा बर्‍याच पटींनी ती कमी आहे. म्हणून तर, UHDTV अथवा ज्याला सरसकट 4KTV असे संबोधले जाते, त्यातील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे काँट्रास्ट (डायनॅमिक रेंज) वाढवणे, ह्याला HDR असे संबोधले जाते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छायचित्रणाच्या संदर्भात

सतिश गावडे
Fri, 06/03/2016 - 22:54 नवीन
छायचित्रणाच्या संदर्भात काँट्रास्ट चा नेमका अर्थ समजावून सांगू शकाल का? आम्हाला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला "टेलिव्हिजन इंजिनीयरींग" असा विषय होता. त्यातही काँट्रास्टचा उल्लेख बरेच वेळा यायचा. तेव्हाही नेमका अर्थ कळला नव्हता. मात्र मी माझ्या सोयीसाठी त्याचा "काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे एकमेकाशी असणारे गुणोत्तर" असा अर्थ काढला होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

उत्तर

प्रदीप
Sat, 06/04/2016 - 17:11 नवीन
हे तांत्रिकी असल्याने इथे मराठीतून मला लिहीता येणार नाही. तेव्हा इंग्लिशमधून तुमच्या खरडवहीत उतर देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

क्लोज अप्स नव्हते खरे

पैसा
Fri, 06/03/2016 - 23:02 नवीन
क्लोज अप्स नव्हते खरे. तेही काही कारणाने मुद्दाम केले असेल तर दिग्दर्शकाचे म्हणणे काय हे कुठेतरी आले असेल. दिग्दर्शक स्वतःच छायाचित्रकार असल्याने त्याच्या हातून तांत्रिक चुका होतील असे वाटत नाही. आज कुठेतरी वाचले की मसानचे चित्रीकरण त्यानेच केले आहे. लो काँट्रास्टबद्दल तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर किती फरक पडतो बघावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

'चूक' नव्हे

प्रदीप
Sat, 06/04/2016 - 17:48 नवीन
क्लोज अप्स नव्हते ही काही 'चूक' आहे असे मी म्हणत नाही. तसे म्हणणारा मी कोण, खरे तर? आपले टेकिंग कसे असावे ह्याविषयी अर्थात प्रत्येक सजग दिग्दर्शकाच्या काही कल्पना असणारच. तेव्हा त्यांनी क्लोज अप्स का वापरले नाहीत,ह्याची अनेक कारणे असू शकतात-- तसे त्यांना जरूरीचे वाटले नाही, येथपासून काही तांत्रिकी अडचणी (उदा. लेन्स उपलब्ध असणे) पर्यंत काहीही. मी केवळ माझे मत मांडले, इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसे नाही

पैसा
Sat, 06/04/2016 - 17:54 नवीन
दिग्दर्शक स्वतः छायाचित्रकार असल्याने क्लोज अप्स जास्त प्रभावी ठरतात याची त्याला कल्पना असेलच. त्यामुळे दुसर्‍या काही कारणाने त्याने वापरले नसतील. पैसे खूप कमी होते असे त्याने एकीकडे म्हटले होते. तेव्हा लेन्स नसेल हे अगदी शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

हा सिनेमा कृष्णधवल असता, तर

यशोधरा
Sat, 06/04/2016 - 07:44 नवीन
हा सिनेमा कृष्णधवल असता, तर अधिक प्रत्ययकारी झाला असता का? आणि तसा असता तर क्लोजअप्सचा अभाव जरा कमी जाणवला असता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

ह्याविषयी

प्रदीप
Sat, 06/04/2016 - 17:43 नवीन
आपली केवळ मते असू शकतात. अर्थातच ह्यात बरोबर अथवा चूक असे काही नाही. हा सिनेमा कृष्णधवल असता तर कदाचित तो (माझ्या मते) अधिक प्रत्ययकारी झाला असता. रंगांनी डिस्ट्रॅक्शन होते का? बहुधा तसे असेलही. अर्थात कृष्ण्धवल नुसते असून उपयोग नाही, दिग्दर्शक, सिनेमाटोग्राफर, व इतर संबंधित तंत्रज्ञ तो कसा हाताळताहेत त्यावर बरेच काही अवलंबून असेल. ह्यात लायटिंग, शॉट्सचे टेकिंग, तसेच सेट्सवरील सामानाचे रंग व पोत, कॉस्च्युम्स इत्यादी अनेक बाबी आल्या. अवांतरः ह्या कृष्णधवलवरून आठवले, गौतम राजाध्यक्षंचा एक लेख वाचनात आला होता. त्यात ते व अमिताभ बच्चन एकदा पोर्ट्रेट्स फोटोग्राफीवरून काही चर्चा करीत होते. तेव्हा कृष्णधवल पोर्ट्रट्सचा विषय निघाला. राजाध्यक्षांनी त्यांची काही कृष्णधवल पोर्ट्रट्स दाखवली. हे अ‍ॅप्रिसिएशन सुरू असतांना अचानक तिथे सौ. बच्चन आल्या व त्यांनी नाक मुरडून त्यांना कृष्णधवल फोटोग्राफी अथवा सिनेमाटोग्राफी अजिबात आवडत नसल्याचे जाहीर केले. त्यावर, अमिताभने सुस्कारा सोडत बायकोकडे केवळ एक कटाक्ष टाकला, असे राजाध्यक्षांनी नमूद केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कृष्णधवल ची जादू

पैसा
Sat, 06/04/2016 - 17:51 नवीन
कृष्णधवल चित्रपट खरेच अगदी जादुई वाटतात. कृष्णधवल सिनेमातली वहिदा रेहमान किंवा मधुबाला या रंगीत सिनेमापेक्षा खूपच जास्त जादुई वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

कृष्णधवल असता तर कदाचित तो

यशोधरा
Sat, 06/04/2016 - 18:15 नवीन
कृष्णधवल असता तर कदाचित तो (माझ्या मते) अधिक प्रत्ययकारी झाला असता
मलाही तसेच वाटले होते सिनेमा पाहताना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

चित्रपट परिचय आवडला.

रेवती
Fri, 06/03/2016 - 00:11 नवीन
चित्रपट परिचय आवडला.
  • Log in or register to post comments

खूप छान लीहीले आहे.

खटपट्या
Fri, 06/03/2016 - 00:55 नवीन
खूप छान लीहीले आहे. तुम्ही उगाच संपाद्कपदाच्या जबाबदारीत पडून न रहाता ललीत लेखन करत रहावे असे वाटते..
  • Log in or register to post comments

वाह पै ताई. फेबु वर तुझी

स्रुजा
Fri, 06/03/2016 - 01:07 नवीन
वाह पै ताई. फेबु वर तुझी पोस्ट वाचुन च किल्ल्या बद्द्ल उत्सुकता होती. त्या पोस्ट मध्ये भर घालुन तू धागा केल्यावर अजुन च वाढली आहे. सुरेख परिक्षण !
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रपटाचे सुंदर परीक्षण

निओ
Fri, 06/03/2016 - 01:18 नवीन
सुंदर चित्रपटाचे सुंदर परीक्षण खूप छान लिहील आहे. मुळात चित्रपटात संवाद कमी आहेत. दिग्दर्शकाचा पात्रांच्या भावना टिपण्यावर भर आहे. indoor असो कि out door प्रत्येक frame काटेकोरपणे निवडली आहे.
  • Log in or register to post comments

फार सुरेख लिहिलंय. आता खूप

पद्मावति
Fri, 06/03/2016 - 01:30 नवीन
फार सुरेख लिहिलंय. आता खूप पहावासा वाटतोय हा चित्रपट. पाहणार नक्कीच.
  • Log in or register to post comments

किल्ला नितांतसुंदर चित्रपट

चावटमेला
Fri, 06/03/2016 - 02:33 नवीन
किल्ला नितांतसुंदर चित्रपट आहे.
चित्रपट कथा १९८५-९० च्या दरम्यान घडत असावी असे वाटते
मला १९९४-९५ चा काळ वाटला कारण एका प्रसंगात बंड्या च्या तोंडी चंद्रकांता मालिकेचे शीर्षकगीत ऐकू येते
  • Log in or register to post comments

बरोबर आहे

पैसा
Fri, 06/03/2016 - 09:51 नवीन
बरोबर आहे. आणखी काही ठिकाणी बंड्याच्या तोंडी "यक्कु" हा संवाद आहे. मला एग्झॅक्ट वर्ष पिनपॉइंट करता आले नव्हते. आता लेखात बदल करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

काळ

प्रदीप
Fri, 06/03/2016 - 21:18 नवीन
कुठलाही असेना का? तो तपशिल झाला. तो थोडाफारच काय अगदी एखादे शतक जरी इथेतिथे झाला, तरी त्यामुळे चित्रपटाच्या गाभ्यास काहीच धक्का पोहोचत नाही. स्थलकालाबाधित जी टिकून रहाते, ती चांगली कलाकृति असते, त्या कॅटेगरीमधे ह्या चित्रपटाचा समावेश व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चित्रपट

आतिवास
Fri, 06/03/2016 - 06:11 नवीन
परिचय आणि त्या निमित्ताने सांगितलेल्या (काही) गोष्टी आवडल्या.
  • Log in or register to post comments

वाह पैसाताई!

चांदणे संदीप
Fri, 06/03/2016 - 06:56 नवीन
बऱ्याच दिवसांनी लिहिलंत... पण एकदम सुरेख! किल्ला चित्रपट नाही पाहिला पण तुम्ही कथा सुंदररित्या उलगडून समोर ठेवलीत! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण

नाखु
Fri, 06/03/2016 - 08:31 नवीन
कन्येला आणि मुलाला सिनेमा आल्या आल्या दाखविला होता. लेकीलाही आवडला. पाऊस अंगावर येणे म्हणजे काय त्याच्या अनुभुतीसाठी मोठ्या पडद्यावर बघणे अनिवार्य. शहरातल्या किल्ल्यातला नाखु
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

जेपी
Fri, 06/03/2016 - 08:54 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रपट परिचय !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/03/2016 - 09:40 नवीन
सुंदर चित्रपट परिचय ! या ना त्या कारणाने बघायचा राहिला हा चित्रपट. काही तरी करून बघायला हवा.
  • Log in or register to post comments

चित्रपट परीक्षण आवडले.....

मुक्त विहारि
Fri, 06/03/2016 - 09:45 नवीन
सिनेमा बघीनच असे नाही....
  • Log in or register to post comments

छान परीक्षण!

समीरसूर
Fri, 06/03/2016 - 09:58 नवीन
छान परीक्षण! 'किल्ला' मी टीव्हीवर पाहिला. सिनेमाटोग्राफी उत्कृष्टच आहे. सुरुवातीचा पाऊण तास खूप संथ आहे चित्रपट. पण मग नंतर अमृताची एका आरोपामुळे होणारी बदली, त्या मुलाचं मित्रांवर चिडणं वगैरे भाग जरा उत्कंठावर्धक वाटतो. मोस्टली लोकांना फारसा पसंत पडला नाही 'किल्ला'. मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांना चित्रपटातून नेमकं काय म्हणायचं आहे आणि जे म्हणायचं आहे ते इतकं एनक्रिप्ट करून का सांगीतलं आहे हेच कळलं नाही. अभिनय सगळ्यांचा छानच आहे. कोकणातली घरं, समुद्र खूप सुंदर दाखवलं आहे. प्राथमिक टारगेट प्रेक्षक जर मुलं असतील तर त्यांना कसा आवडणार इतका संथ आणि गहन चित्रपट? थोडा सोचना चाहिये था....अर्थात दिग्दर्शकाच्या व्हिजनला आपण चेलेंज नाही करू शकत.
  • Log in or register to post comments

मुलांसाठी नाहीये

पैसा
Fri, 06/03/2016 - 10:17 नवीन
चित्रपट मुलांसाठी नाहीये. सतत विस्थापित होणार्‍या, एकट्या पडणार्‍या जिवांचा प्रवास दाखवायचा असावा असं वाटलं. त्यासाठी लहान मुलगा नायक असल्याने त्याला न कळणार्‍या अनेक गोष्टींमुळे ते अधिकच कठीण होते. चित्रपट तसा संथ वाटेलच. कारण चित्रपटात तसे फारसे काही घडत नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्याची आई आणि मुलाची धडपड केंद्रस्थानी दिसते. चित्रपटाचा जास्त भर संवादांपेक्षा दृश्यांवर आहे असे मला वाटले. त्यामुळे ज्यांनी चित्रपटाशी मिळतेजुळते अनुभव घेतले आहेत त्यांना चित्रपट अधिक भावेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

तुम्ही म्हणता तसे शक्य आहे.

समीरसूर
Fri, 06/03/2016 - 10:48 नवीन
तुम्ही म्हणता तसे शक्य आहे. 'किल्ला' मला अगदी आवडला असं जरी मी म्हणणार नाही तरी उत्सुकतेने पाहिला आणि त्या मुलाची आणि त्याच्या आईची व्यावहारिक जगात शिरून सराईतासारखे जीवन जगण्याची ओढ, या प्रयत्नांच्या आड येणारा मनस्वीपणा, स्वकेंद्रितपणा, भीड, आणि त्यामुळे त्यांची होणारी घुसमट या भावना नीटपणे पोहोचल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कथा

नमकिन
Mon, 06/06/2016 - 08:19 नवीन
चित्रपट थेटरात पाहिला होता. पुरस्कार प्राप्त कलाकृती आहे म्हणून ऊत्साहाने व उत्सुकतेने गेलो होतो. जो कालावधी ९२-९४चा वाटतोय तेव्हाचे आम्ही आम्हाला दिसलो. परवा TV वर पाहताना आईचा अभिप्राय हाच होता की लहान मुलांसाठी कुठेय हा सिनेमा, तेव्हा त्या लहान मुलाचे भावविश्व, भावनात्मक स्थिति, मित्र व नाते अनुभव, नवीन जागा, माणसे, परिसर तसेच परिस्थितियांना सामोरे जातानाचे भाव बघायचे, चित्रण पहायचे. असो,निरीक्षण छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:( णॉस्टॅल्जिक :(

वपाडाव
Fri, 06/03/2016 - 09:59 नवीन
मी खुप भारावलो होतो सिनेमा पाहताना. इतक्या लहान वयात माझ्यावर कधी ही वेळ नाही आली. पण जब से होश संभाला है, १२ गांव का पाणी पी रहे है. पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी. मित्र, मैत्री, शहर अन आठवणी पावसात वाहुन नदीला अन तिथुन समुद्राला मिळत जातात. कदाचित म्हणुनच ते पाणी (आसवांच्या प्रमाणामुळे) खारे होत असावे. जीवनाच्या क्षणाक्षणावर प्रेम करत आलो आहे. असो. निरोप घेतो. स्क्रीन दिसत नाहीये नीट. पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी... पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी...!! :(
  • Log in or register to post comments

अब रुलायेगा क्या "स्कॉलरशीप"?

सतिश गावडे
Fri, 06/03/2016 - 10:23 नवीन
अब रुलायेगा क्या "स्कॉलरशीप"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

शिष्यवृत्ती

नमकिन
Sun, 06/05/2016 - 20:34 नवीन
म्हणजे? "काय शिष्यवृत्ती!" केसातुन बोटे फिरवुन गुणी बाळ आहें ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मस्तच ! प्रतिक्रियाही अत्यंत

जयंत कुलकर्णी
Fri, 06/03/2016 - 10:07 नवीन
मस्तच ! प्रतिक्रियाही अत्यंत बोलक्या आहेत...
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे, सेम अशाच

स्पा
Fri, 06/03/2016 - 10:13 नवीन
मस्त लिहिले आहे, सेम अशाच भावना दाटून आल्यात , एक एक फ्रेम म्हणजे पेंटींग आहे सिनेमातली, जियो
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय !

ए ए वाघमारे
Fri, 06/03/2016 - 10:17 नवीन
छान लिहिलंय ! तुम्ही टीव्हीवर जाहिरातीसकट सिनेमा बघितला. धन्य आहे तुमची ! असो, आता तुमच्या धाग्यात आमची घुसखोरी उर्फ आमची जाहिरात: किल्लाबद्दल माझा लेख इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Fri, 06/03/2016 - 10:25 नवीन
तुमचा हाच लेख सकाळी मायबोलीवर वाचला. तिथे कोणीतरी 'किल्ला' बद्दल लिहिले असेल तर शोधू म्हणून हा लेख पोस्ट करण्यापूर्वी सकाळीच शोध घेतला, तेव्हा सापडला. आता तिथे पुन्हा लिहीत नाही. तुम्ही छान लिहिले आहे. चित्रपटाचा सर्वांगीण विचार तुम्ही केला आहे. त्यामुळे तुमचे परीक्षण आवडले. यावर तिथल्या प्रतिक्रिया वाचूनही बरे वाटले, की मला हा चित्रपट बराच कळला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

धन्यवाद!

ए ए वाघमारे
Fri, 06/03/2016 - 10:44 नवीन
तो लेख काहींना रूचला नाही.जास्त टीकात्मक वाटला.मुळात एखाद्या कलाकृतीबद्दल काही लिहावसं वाटणं हीच तिच्या गुणवत्तेची पहिली खूण असते असं माझं मत आहे.असो. मी त्यावेळी कदाचित मिपावर जास्त अ‍ॅक्टीव्ह नसेल त्यामुळे तो लेख इथे टाकायचा राहिला.आणि आता इतक्या उशीरा टाकण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा