Skip to main content

दन दन दनाट झिंगाट सैराट..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 17/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा. पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव. तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी  पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे. उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे. आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न ! हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! ! ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्‍याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे. नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अ‍ॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे. एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला. आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते. अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत. मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात. तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे. एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 42443
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा थिएटरमधे असलेला सिनेमा आणि सेन्सॉर कॉपी मध्ये बराच फरक आहे ,सेन्सॉर कॉपी मधे काही सीन्स कमी आहेत , त्यामुळे सेन्सॉर कॉपी पहाताना पिक्चर तितका प्रभावी वाटत नाही

In reply to by _मनश्री_

मी सेन्सर कॉपी वाला नाही पाहिला. (सेन्सर कॉपी वर तसा वॉटर मार्क आहे, मी पाहिलेल्य आवृत्तिवर असा मार्क नव्हता). बाकि चित्रपट कुठेही पाहिला तरी विशेष फरक पडत नाही , फक्त स्पेशल इफेक्ट्स , दॉल्बी साउंड ई प्रभावी पणे पोहोचत नाहि. मात्र पटकथा, संवाद, अभिनय ई च्या रसग्रहणात काही फरक पडत नाही.

In reply to by _मनश्री_

महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना एक घागर पाणी सामान्य जनतेला द्यायचं सोडून चार चार (अंकी ४) वेळा चित्रपट बघणारे लोक याच महाराष्ट्रात आहेत हे बघून....

In reply to by _मनश्री_

ऐन दुष्काळात हा सिनेमा , सैराट- झिंगाट , येड लागले करत , लोकांच्या खिशातून ५०एक कोटी काढण्यात यशस्वी झाला. हे connection आहे.

गाण्यामधले विषेशता 'याड लागल' व 'सैराट झाल' यातील वाद्यमेळ खटकतो, स्पष्टपणे पाशात्य आ॓र्केस्ट्रॉ जाणवतो. मात्र एक चान्गले झाले, मराठी गाणी डाउन मार्केट आहेत, ती चालावीत म्ह्णुन त्यात हिन्दि शब्द घुसडले पाहिजेत हा भ्रम दुर होइल.

मला सैराट चांगला वाटला नाही,उगाचच ओवरहाईप निर्माण केली असे वाटले. गाणी बरी आहेत,अभिनय,दिग्दर्शन बर्यापैकि आहे. कुठे कट्यार,बालगंधर्वसारखे सिनेमे आणि कुठे हा सैराट

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

कट्यार आणि बालगंधर्व संगितप्रधान चित्रपट आहेत,सैराट हा सामजिक चित्रपट आहे.ज्याला सामाजिक चित्रपट आवडत नाही त्याला सैराट पचायचा नाही. सैराटमय टफी

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझ्यामते सैराट हि निव्वळ मनोरंजक प्रेमकथा आहे. घरातून मुलीच्या प्रेमाला विरोध होतो म्हणून तो कौटुंबिक म्हणता येईल. बाकी कुणी सैराट आवडला नाही असं म्हंटल म्हणजे 'तुम्हाला सामाजिक चित्रपट आवडत नाहीत' 'सैराट पचला नाही' वगैरे म्हणणे कितपत योग्य आहे ? एखादा चित्रपट आवडलाच पाहिजे असा आग्रह का ? मला 'डॉ प्रकाश बाबा आमटे' हा चित्रपट चांगला वाटला होता, पण सैराट आवडला नाही तरीही तुम्ही हेच म्हणाल का ?

In reply to by मराठी कथालेखक

शेवट बघण्यासाठी लोक गर्दी करतील असं अजिबात वाटत नाही त्यामुळे हा शेवटची दोन मिनिटं सोडून अजिबात समॅजिक चित्रपट वाटत नाही. आपापल्या शालांत परीक्षा ते पदवी कालावधी पर्यंत केलेल्या (काही लोक त्या आधी पासून सुरुवात करतात) किंवा न केलेल्यासुद्धा अनेक प्रकरणांचं एक छान प्रतिबिंब या चित्रपटात दिसतं. तसेच मित्र, तशाच कमेंट्स, तसंच पुढचा मागचा विचार न करता 'थेट भेट' घेणं, कधी कधी तसंच मार खाणं वगैरे देखील. ते आयुष्य पुन्हा जागवायला लोक पुन्हा पुन्हा (चार वेळा किंवा जास्त ;) )जातात.

In reply to by मराठी कथालेखक

मुळात 'आंतरजातीय विवाहाला विरोध असणे' आणि 'जातीभेद (उच्च-नीच भेद) मानण' या गोष्टी काही अंशी वेगळ्या आहेत. पण यांची अनेकदा गल्लत /सरमिसळ होते. आंतरजातीय विवाह करणारी (स्वतःचा वा अपत्याचा) जातीभेद मानतच नाही किंवा आपल्या अपत्याच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणारी व्यक्ती जातीभेद मानणारीच आहे असे सरसकट समज करुन घेता येणार नाही.

जंत बरे झाले का ?