✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमचे सार्वजनिक व्यावसायिक अनुभव !

च
चिनार यांनी
Tue, 05/17/2016 - 17:39  ·  लेख
लेख
स्थळ : राहते घर वेळ: शनिवार, सकाळचे दहा वाजलेले प्रसंग : घरातल्या बाथरूममधले गीझर २ दिवसांपासून खराब झालेले आहे. त्यामुळे घरातले वातावरण जरा 'तापलेले' आहे. दोन दिवस काय केले हा प्रश्न इथे गैरलागू ठरतो कारण फाईव्ह डे वीकच्या संस्कृतीत घरगुती कामांचे स्टेटस हे फक्त शनिवारी अपडेट होते. तेसुद्धा सकाळी ९ ते १ किंवा संध्याकाळी ६ ते ९ ह्याच वेळात ! (दुपारी १ ते ५, मी चितळ्यांची परंपरा पाळून ढाराढूर झोपतो. ह्यावेळी जगाने मला त्रास देऊ नये ,मी जगाला देणार नाही एवढी माफक अपेक्षा!). शनिवारच्या या वेळापत्रकात जर एखादे काम झाले नाही तर ते पुढच्या शनिवारी ढकलले जाते. शनिवार आणि सोमवारच्यामध्ये एक रविवार नामक क्षण सुद्धा येतो पण तो क्षीण घालवण्यात निघून जातो. असो. तर एकंदरीत शनिवार सकाळ युद्धपातळीवर सुरु होते. सकाळपासून बावीस वेळा फोन केल्यावर आमचा इलेकट्रिशियनने तेविसाव्या खेपेला फोन उचलला. गीझर बंद आहे हे ऐकल्यावर त्याने ,'साब लाईट गयी होगी , या फिर बिना पानी का चलाया होगा आपने' असा सल्ला दिला. म्हणजे वीज नसल्यावर गीझर चालू होत नाही हा शोध मला अजून लागलेलाच नाही असा निष्कर्ष काढून तो मोकळा झाला. किंवा पाणी गरम करण्यासाठी आधी पाणी असावं लागतं हे सुद्धा कळू नये इतपत माझ्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असं त्याच प्रामाणिक मत असावं .मुळात गीझर आपोआप बिघडला काय किंवा मी त्याच्यात कोळसा टाकून त्याला बिघडवलं काय ह्याने त्याला काहीही फरक पडत नाही. शिवाय इतक्या वेळाने फोन उचलल्यामुळे मी आधीच वैतागालेलो, मी सरळ त्याला विचारलं, कितने बजे आओगे? त्यावर ठरलेलं उत्तर आलं, आज तो मुश्कील हैं साब, दुकान पे कोई नही हैं. ह्या 'आज कोणीच नाहीये' वाक्यांच मला नेहमीच कुतूहल वाटते. म्हणजे काल फोन केला असता तर कोणी सापडलं असतं का ? किंवा उद्या केल्यास सापडेल का ? अर्थात मी फोन केल्यावर त्याने धावत यावं अशी अपेक्षा नाही. पण उत्तर जरा तरी सकारात्मक असावं. शेवटी मी परत विचारलं, भाई साहब आज नही पर कल तो आ सकते हो ना? त्यावर त्याचं आध्यात्मिक उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. तो म्हणाला, साहब कल का क्या भरोसा? मैं तो सिर्फ आज का सोचता हु !! आप भी इतनी फिकर मत करो, हो सकता हैं कल आपका गीझर अपने आप ठीक हो जाये ! अचानक मला निर्मल बाबांशी बोलतोय की काय असा भास झाला. अखेरीस अत्यंत व्याकूळतेने मी त्याला विचारले, भाई साहब इतना बता दो, कल कितने बजे आप फोन उठा सकते हैं? पण माझा प्रश्न मोबाईल टॉवरपर्यंन्त पोहोचण्याच्या आधीच निर्मल बाबांनी फोन ठेवला होता ! येनकेनप्रकारे मी दुसऱ्या इलेकट्रिशियनचा नंबर मिळवला. फोनवर प्रस्तावना सांगून झाल्यावर कधी येतो विचारले. त्यावर तो, तुरंत आता हु म्हणाला. संध्याकाळपर्यन्त तो 'तुरंत' उगवला नाही. साडेसात वाजता उगवल्यावर ,'साहब मैं जल्दबाजी(!) में टूलकीट ले आना भूल गया' म्हणाला. 'अरे मग आत्ता काय गिझरचा रंग बघायला आला का ?' मी चिडून म्हणालो. नंतर त्याला कुठेतरी जायचे होते म्हणून निघून गेला. (मला एक कळत नाही,हे लोकं कायम घाईत का असतात? आणि घाईत असूनही प्रत्येक कामाला,'साहब कमसे कम आठ दिन लगेंगे' असं का होतं?) तिसऱ्या इलेकट्रिशियनला फोन करणारच होतो तेव्हढ्यात कोणीतरी सल्ला दिला की एकदा कंपनीच्या कस्टमर केयरला फोन करून बघ. कस्टमर केयर!!!!! तुम्हाला सांगतो, भीक नको पण कुत्रं आवर यात कालानुरूप जर बदल करायचा असेल तर कस्टमर केयरला उद्देशून,'मदत नको पण प्रश्न आवर' असा करावा लागेल. एकतर ह्यांचे फोन सतत बिझी किंवा होल्डवर ठेवलेले. त्यात चुकून जर फोन लागलाच तर एक दाबा....दोन दाबा...तीन दाबा...अन्यथा गळा दाबा ! एकदा काही कारणाने बँकेतलं अकाउंट बॅलन्स जाणून घेण्याकरिता मी अठ्ठेचाळीस आकडे दाबले होते. (एवढं करून आमचं बँक बॅलन्स तीन आकडी होतं हा भाग वेगळा!) त्यानंतरसुद्धा,'अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये' हे असतेच. दुसरा भाग म्हणजे ह्यांच्या कस्टमर केयर एक्झीकेटीव्हशी बोलणे. शाळेतल्या तोंडी परीक्षेचा सराव इथे फार उपयोगी पडतो. "नमश्कार सर ('स्कार' नव्हे 'श्कार'). क्या मै आपका पुरा नाम जान सकता हु ?" "xxxxxx" "क्या मै आपकी डेट ऑफ बर्थ जान सकता हु?" "xxxxxx" "अच्छा. बताइये सर आपकी समस्या क्या हैं?" "आपके कंपनीका गीझर काम नही कर रहा हैं दो दिनो से. क्या आप किसीको भेज सकते हैं?" "जरूर सर. क्या आप गीझर का मॉडेल नंबर बता सकते हैं?" "xxxxxx" "आपने ये गीझर कब खरीदा था आप बता सकते हैं?" "ठीक से याद नही. ३-४ साल हो गये. उससे क्या फरक पडता है अब तो रीपेयर करना ही पडेगा" "कोई बात नही. क्या आप उसका बिल नंबर बता सकते है?" ("अग रताळे ,मला विकत कधी घेतले ते आठवत नाही तर बिल नंबर कुठून आठवणार? बरं समजा आठवलंचं तर स्वातंत्र्यपूर्व काळात घेतलेला गीझर म्हणून फुकटात रिपेयर करून देणार का?) "मेरे पास गीझर का बिल नही है" "कोई बात नही सर. क्या आप ये बता सकते है के आपने कौनसे शॉप से गीझर खरीदा था?" बस....आता माझा संयम सुटला !! " जी हा मॅडम बिलकुल बता सकता हु. वो अपने बोहोरी आळी के चौथे गली में मारुती मंदीर है ना, बस उसके बगल में हमारे संतोष भाऊ का दुकान है. वहा से खरीदा था" " सर ये कौनसी शॉप है? ये हमारी लिस्ट में नही है" "ये कैसे हो सकता है मॅडम? बहोत पुरानी और बडी दुकान है" "ठीक है. कोई बात नही सर.आपकी कम्प्लेण्ट रजिस्टर कर दी है. आपका पता बता दिजीये. हमारा इलेकट्रिशियन आ जायेगा" "मॅडम ये सवाल आप पहले पुछ लेती तो कितना अच्छा होता.पता लिख लीजिये" "कोई बात नही सर. अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये !!!!" तीन दिवसांनी त्यांच्या इलेकट्रिशियनचा फोन आला. त्याला मुलखाची घाई असल्यामुळे ऑफिसमधून हाफ डे घेऊन मी त्याला अटेंड करायला घरी आलो. त्याने गीझर काढून बघितला. आतली कोईल खराब झाल्याचे कारण देऊन म्हणाला, "ये कोईल मार्केट में नही मिलेगी. आप कस्टमर केयर को फोन करके कोईल मांग लीजिये. जैसे ही कोईल आजायेगी मै आकर लगा दुंगा" च्यामारी परत कस्टमर केयर !! हिम्मत करून परत त्यांना फोन केला. सगळी चौकशी करून झाल्यावर त्या मुलीने मंजुळ आवाजात सांगितले. "सर ये मॉडेल अब कंपनीने बंद कर दिया है. इसकी कोईल नही मिलेगी. आपको नया गीझर बुक करना हो तो बताइये. अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये!!!! " आताशा घरातला गीझर बिघडत नाही. कारण वीज किंवा पाणी नसताना गीझर चालवू नये हे मला कळलेले आहे!!! --चिनार http://chinarsjoshi.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
7226 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

हा हा मस्त...

मराठी कथालेखक
Tue, 05/17/2016 - 17:52 नवीन
हा हा मस्त... तुम्हाला त्रास झाला खरा.. पण आमचं मनोरंजन झालं भविष्यात तुम्हाला असाच त्रास होत राहावा आणि आम्हाला तुमचे खुसखुशीत लेख वाचायाला मिळावे या करिता शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला. सरळ चालू कंपनीचा

मार्मिक गोडसे
Tue, 05/17/2016 - 17:53 नवीन
लेख आवडला. सरळ चालू कंपनीचा गिझर घ्यायचा. स्वस्त व गॅरेंटीची झंझट नाही, स्पेअर पार्ट मिळतातच, नाही मिळाले तरी जुगाड करून बसवतात.
  • Log in or register to post comments

छान !

विटेकर
Tue, 05/17/2016 - 17:54 नवीन
अजून विस्तार करता आला असता ! क्ल्पना छान्च आहे ! मी पैला हे साम्गायचे राहिले
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

चिनार
Tue, 05/17/2016 - 17:58 नवीन
धन्यवाद ! भाग २ लिहिण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

छान मनोगत ( तुमची गोष्ट खरी

कंजूस
Tue, 05/17/2016 - 18:07 नवीन
छान मनोगत ( तुमची गोष्ट खरी घडलेली आहे मनोगत नाही हे माहितीय हो.मला मनोगत डॅाट कॅामवर शोभेल असा लेख म्ह। णायचं होतं .) पुढचा प्रश्न ( बहुतेक नाखुश पयला ) दहा मिपाकर विचारतील की इतकं चांगलं लेखन मिपावर होत्तच नाही असं म्हायचं आहे का? इतके दिवस मिपावर काय तुम्ही **** **** ***? प्रश्न दुसरा : तुमचा पुण्यातला कोणता भाग? आमनच्कडे नखही अस्सं होत.गिझर बदलण्यापेक्षा पेठच का नाही बदलत?
  • Log in or register to post comments

मस्त खुसखुशीत लिहिलाय

अजया
Tue, 05/17/2016 - 18:47 नवीन
मस्त खुसखुशीत लिहिलाय त्रासदायक अनुभव!
  • Log in or register to post comments

हा हा खुसखुशीत!

रातराणी
Tue, 05/17/2016 - 19:02 नवीन
हा हा खुसखुशीत!
  • Log in or register to post comments

रोचक लेखन, मला ग्राहकांच्या

माहितगार
Tue, 05/17/2016 - 19:16 नवीन
रोचक लेखन, मला ग्राहकांच्या संयमाच खरच कौतूक वाटत.
  • Log in or register to post comments

मजा आहे, आमच्या वीज वाल्याला

विवेकपटाईत
Tue, 05/17/2016 - 19:52 नवीन
मजा आहे, आमच्या वीज वाल्याला फोन केल्यावर त्याची लहर लागेल तंव्हा येईल. रात्री १० सुद्धा उगवतो. चालायचे.
  • Log in or register to post comments

मजा आहे, आमच्या वीज वाल्याला

विवेकपटाईत
Tue, 05/17/2016 - 19:52 नवीन
मजा आहे, आमच्या वीज वाल्याला फोन केल्यावर त्याची लहर लागेल तंव्हा येईल. रात्री १० सुद्धा उगवतो. चालायचे.
  • Log in or register to post comments

मजा आहे, आमच्या वीज वाल्याला

विवेकपटाईत
Tue, 05/17/2016 - 19:52 नवीन
मजा आहे, आमच्या वीज वाल्याला फोन केल्यावर त्याची लहर लागेल तंव्हा येईल. रात्री १० सुद्धा उगवतो. चालायचे.
  • Log in or register to post comments

मजा आहे, आमच्या वीज वाल्याला

विवेकपटाईत
Tue, 05/17/2016 - 19:52 नवीन
मजा आहे, आमच्या वीज वाल्याला फोन केल्यावर त्याची लहर लागेल तंव्हा येईल. रात्री १० सुद्धा उगवतो. चालायचे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

चिनार
Tue, 05/17/2016 - 22:27 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लय भारी लिहिलंय!

एस
Tue, 05/17/2016 - 22:52 नवीन
लय भारी लिहिलंय!
  • Log in or register to post comments

छान लिहिलय पण हे असेच अनुभव

रेवती
Wed, 05/18/2016 - 00:39 नवीन
छान लिहिलय पण हे असेच अनुभव येतात.
  • Log in or register to post comments

वैताग असतो साला हा

अर्धवटराव
Wed, 05/18/2016 - 01:53 नवीन
उपकरण दुरुस्ती, प्लंबींग, सुतारकामे इ. ची गरज सतत असते. तरिही हे सगळं मार्केट प्रोफेशनली टार्गेट करायला अजुन कुठलीच सर्वीस कंपनी पुढे कशी आली नाहि याचं आश्चर्य वाटतं. रिक्षा चालकांच्या मुजोरीला कंटाळुन पब्लीक उबेर वगैरे टेक्सीला जास्त पैसे देऊन सेवा पदरात पाडुन घेतात. मग अशा हौसहोल्ड सर्वीसला देखील जास्त पैसे देऊन वेळेत काम उरकायला पब्लीक तयार असेलच ना.
  • Log in or register to post comments

आहेत आहेत. दिल्लीच्या भागात

अस्वस्थामा
Wed, 05/18/2016 - 16:42 नवीन
आहेत आहेत. दिल्लीच्या भागात एक स्टार्टप आहे, बँगलोरमध्येपण एक आहे म्हणून ऐकलेय (कंफर्म नै माहीत). इतर भागात अजून तितकेसे मोठे काही दिसत नाही यासंदर्भात हे मात्र खरंय (कदाचित लोकल कामगारांची साथ हा एक मोठा मुद्दा असावा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

(कदाचित लोकल कामगारांची साथ

चिनार
गुरुवार, 05/19/2016 - 10:28 नवीन
(कदाचित लोकल कामगारांची साथ हा एक मोठा मुद्दा असावा)
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

सुपर

निल्या१
Wed, 05/18/2016 - 03:36 नवीन
सुपर बहुतेक दोन एक वर्षांनी मी मिपावर प्रतिक्रिया देण्यासाठी आलो. मस्त लिहिलंय. मस्त हसलो. पुलेशु.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

चिनार
Fri, 05/20/2016 - 13:46 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती मी

कंजूस
Wed, 05/18/2016 - 05:47 नवीन
इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती मी स्वत:च करतो बरीच वर्षे परंतू आता असा काळ आला आहे की मोडलेला भाग काढून दुकानात विचारायला गेलो की " ओ अंकल ये कभी का जमानेका है यह? नया ले लो ,पार्ट नही मिलेगा." विशेष म्हणजे आमच्याकडे हार्डवेर इले० ची शंभर दीडशे दुकाने आहेत.मोबाइलचा जमाना आल्यापासून लँडलाइन इंन्स्ट्रुमेंट दुरुस्ती करणारे परागंदा झालेत.नवीन फोनही बीटलचे मिळतात ते टिकत नाहीत.
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/18/2016 - 07:00 नवीन
=)) =)) =)) बारा बलुतेदार असेच असतात... हे गुण त्यांच्या जनुकांमध्ये हार्डवायर्ड केलेले असतात ;)
  • Log in or register to post comments

समीक्षाण

नाखु
Wed, 05/18/2016 - 09:21 नवीन
जबरा लेख आणि अस्सल अनुभव्,अनुभव हाच गुरु... दस्तुरखुद्द. ===== ह्या चिनार्यालाच कसे अशे विषय सुचतात कोण जाणे, मी इतके विचार प्रवर्तक धागे टाकतो पाच प्रतिसाद मिळायची मारामार. जे मिळतात तेही का लिहिलं आणि अजुन (लिहित) आहेसच का? अश्येच छ्या वैताग नुसता. निमीत्त शोध्णार ===== "अरे चिनार्या थंड घे म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करायची सवय लावून घे, आमच्या यांना तर थंड चहाचीही सवय लावलीय मी, बाकी बोहरी आळीत जाणार असशील तर सांग रे बाबा !" मिपासार्वकालीन माई. ==== परदेशी गिझरमुळे देशी बंबांची बोंबाबोंब झाली असावी असे मला वाटते. सर्वांनी पुन्हा देशीकडे माफ करा स्वदेशीकडे वळावे असे मी माझ्या आगामी पुस्त्कात ठासून सांगीतले आहे. नेमस्त पाठकर ***************************************
  • Log in or register to post comments

धन्यवाद नाखू काका !

चिनार
Wed, 05/18/2016 - 09:48 नवीन
धन्यवाद नाखू काका ! आपल्यासारखे दिलखुलास प्रतिसादक आहेत मिपावर म्हणूनच असे विषय सुचतात ! ता.क. : बोहोरी आळीत लवकरच एखादी चक्कर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

=))

पैसा
Wed, 05/18/2016 - 11:54 नवीन
=)) =)) =)) मे महिन्यात गीझर कशाला पायजे तुम्हाला! =)) =))
  • Log in or register to post comments

ही ही !

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 12:28 नवीन
खुसखुशीत लेख ! रच्याकने तुम्ही गॅस गीझर का वापरत नाही ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

चिनार
Wed, 05/18/2016 - 12:42 नवीन
धन्यवाद ! गॅस सिलिण्डर पुरवठा करणाऱ्या कंपन्या हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लिवा, लिवा, जरूर लिवा.

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 12:45 नवीन
लिवा, लिवा, जरूर लिवा. बाकी, IVRS बद्दल प्रचंड सहमत ! मला तर धडकीच भरते टोल-फ्री नंबरवर कॉल करायचा म्हणजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

IVRS ने प्रचंड सुखद धक्का

टवाळ कार्टा
Fri, 05/20/2016 - 13:57 नवीन
IVRS ने प्रचंड सुखद धक्का दिलाय...प्रत्येक वेळी २ मि. मध्ये बुकिंग होते आणि दुसर्या दिवशी गॅस येतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही परिस्थिती फक्त मुंबईत आहे

चिनार
Fri, 05/20/2016 - 14:07 नवीन
ही परिस्थिती फक्त मुंबईत आहे टका भौ.. पुण्यात ३-४ दिवस..बाकी सगळीकडे आनंदी आनंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांची सर्विस खूप सुधारली

मराठी कथालेखक
Wed, 05/18/2016 - 12:47 नवीन
त्यांची सर्विस खूप सुधारली आहे. काल सकाळी भारत गॅस अ‍ॅपवरुन बूक केला, दोन-तीन तासात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

सर्व्हिस आधीपेक्षा सुधारली

चिनार
Wed, 05/18/2016 - 12:50 नवीन
सर्व्हिस आधीपेक्षा सुधारली आहे हे मान्य.पण ती मोठ्या शहरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

LOL! मस्त लिहिलेय!

यशोधरा
गुरुवार, 05/19/2016 - 13:35 नवीन
LOL! मस्त लिहिलेय!
  • Log in or register to post comments

हाहाहा

पाटीलभाऊ
गुरुवार, 05/19/2016 - 13:45 नवीन
फार मस्त लेख...मनापासून हसलो..शेवटी दुसर्यांच्या त्रासातच आपला आनंद हो :P
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

चिनार
गुरुवार, 05/19/2016 - 13:57 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा