✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दन दन दनाट झिंगाट सैराट..

स
सस्नेह यांनी
Tue, 05/17/2016 - 14:35  ·  लेख
लेख
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा. पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव. तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी  पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे. उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे. आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न ! हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! ! ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्‍याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे. नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अ‍ॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे. एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला. आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते. अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत. मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात. तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे. एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
माध्यमवेध
मत

प्रतिक्रिया द्या
42126 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

मिपावर इतकी परीक्षणं वाचल्यावर...

चांदणे संदीप
Tue, 05/17/2016 - 14:41 नवीन
आता चित्रपटात बघण्यासारखे काय राहिले नाही असेच वाटायला लागलेय! ;) रच्याकने, हा कितवा लेख आहे सैराटवर? :) Sandy
  • Log in or register to post comments

सैराटने मे महिना सुसह्य केला आपला

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 14:56 नवीन
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

येस्स....

चांदणे संदीप
Tue, 05/17/2016 - 15:06 नवीन
नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

बेष्ट!

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 15:10 नवीन
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कवळ्या पानात ह्या

पियुशा
Wed, 05/18/2016 - 10:55 नवीन
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

आपली निरीक्षणे पटली

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 14:53 नवीन
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...
  • Log in or register to post comments

'झिंगाट' मलापण तितकंसं भावलं

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 15:02 नवीन
'झिंगाट' मलापण तितकंसं भावलं नाही. पण तरुणाईच्या आवडीनुसार ते यथोचितच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आवडलं

रंगासेठ
Tue, 05/17/2016 - 15:06 नवीन
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.
  • Log in or register to post comments

मस्त आणि नेहमीसारखेच मनापासुन लिहिलय...त्यामुळे आवडले

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/17/2016 - 15:07 नवीन
सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

होय की पैजारबुवा! :)

चांदणे संदीप
Tue, 05/17/2016 - 15:12 नवीन
सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

"काय मग? सैराट पाहिला की नाही?"

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 15:14 नवीन
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पारंपारिक असं काही आता राहिलं नाही.

मराठी कथालेखक
Tue, 05/17/2016 - 15:21 नवीन
वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत.

डोमकावळा
Wed, 05/18/2016 - 11:24 नवीन
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

'दे धक्का' आणि 'नटसम्राट'

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 11:29 नवीन
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा

पण 'बिनधास्त' हा काही

डोमकावळा
गुरुवार, 05/19/2016 - 12:48 नवीन
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

छ्हान परिक्षण.. आवडले!

संजय पाटिल
Tue, 05/17/2016 - 15:38 नवीन
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..
  • Log in or register to post comments

जरा वेगळे परीक्षण आवडले.

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 15:55 नवीन
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments

हो,

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 15:58 नवीन
हीपण एक विसंगती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अर्थात

नाखु
Tue, 05/17/2016 - 16:13 नवीन
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनयच करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सहमत.. मुल आधी आईकडे जाईल.

पिलीयन रायडर
Tue, 05/17/2016 - 16:23 नवीन
सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माफ करा, पण आता पर्यंत

शब्दबम्बाळ
Tue, 05/17/2016 - 19:23 नवीन
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हो ना. स्पॉयलर अलर्ट द्या की

स्रुजा
Tue, 05/17/2016 - 21:49 नवीन
हो ना. स्पॉयलर अलर्ट द्या की राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

क्षमस्व. चर्चेच्या ओघात शेवट

सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 10:27 नवीन
क्षमस्व. चर्चेच्या ओघात शेवट लिहीला गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ते बाळ आई वडिलांना मिठी न मारण्याचे चान्सेस आहेतच

अर्धवटराव
Wed, 05/18/2016 - 01:40 नवीन
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

+१

पथिक
Mon, 05/23/2016 - 13:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 16:19 नवीन
मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

१३ वे परीक्षण? सगळेच सैराट

सप्तरंगी
Tue, 05/17/2016 - 16:38 नवीन
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म पण एक अगेन्स्टवाला आहे.

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 16:43 नवीन
म पण एक अगेन्स्टवाला आहे. पण परिक्षण छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

नै नै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 16:44 नवीन
बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

हाहाहा. आपल्या औ'बाद लाच

सप्तरंगी
Tue, 05/17/2016 - 16:51 नवीन
हाहाहा. आपल्या औ'बाद लाच घेऊयात मग चहा:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ

नाखु
Tue, 05/17/2016 - 17:02 नवीन
आम्ही कुठले क्लबातले की बाहेरचे चा प्यायला आलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

तुम्ही फकस्त पिटातले.

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 17:04 नवीन
तुम्ही फकस्त पिटातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखु तर मी पण, पण विरोधात

सप्तरंगी
Tue, 05/17/2016 - 17:12 नवीन
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अरे लिवायचं बिन्दास.

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 17:18 नवीन
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

बिनधास्त मांडा तुमचं मत

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 17:20 नवीन
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

तसे काही नाही हो , त्या movie

सप्तरंगी
Tue, 05/17/2016 - 17:59 नवीन
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

लिहा तुम्ही !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 18:05 नवीन
जे वाटतं ते लिहा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

ए आर आवडत नाही????

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 18:00 नवीन
ए आर आवडत नाही???? काहीही हा सूर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

ए आर रहमान नाही आवडत मला.

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 19:23 नवीन
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

डझनात देखण

मारवा
Tue, 05/17/2016 - 17:05 नवीन
डझनात देखण परीक्षण ! औक्षण करतो (असच म्हणतात का ?)
  • Log in or register to post comments

मस्त! खरा परश्यापण लईच क्युट

रातराणी
Tue, 05/17/2016 - 18:29 नवीन
मस्त! खरा परश्यापण लईच क्युट है राव. :)
  • Log in or register to post comments

परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा

रेवती
Tue, 05/17/2016 - 18:50 नवीन
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.
  • Log in or register to post comments

पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने)

समीरसूर
Tue, 05/17/2016 - 19:27 नवीन
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अजून एक परीक्षण...आवड्या.

खटपट्या
Tue, 05/17/2016 - 21:46 नवीन
अजून एक परीक्षण...आवड्या.
  • Log in or register to post comments

छान परिक्षण!

पुणेकर भामटा
Tue, 05/17/2016 - 22:29 नवीन
चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।
  • Log in or register to post comments

त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 22:39 नवीन
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुणेकर भामटा

आणि कलर सोडा ओ, रौनक बघा की

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 22:41 नवीन
आणि कलर सोडा ओ, रौनक बघा की चेहऱ्यावरची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अन् अ‍ॅटिट्यूड बगा की

तुषार काळभोर
Wed, 05/18/2016 - 10:36 नवीन
"मंग्या, सोड त्याला!" म्हणल्यावर काय टाप हाय मंग्याची परत परश्याला हात लावायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुणेकर भामटा यांचा वर्णद्वेष

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 22:54 नवीन
पुणेकर भामटा यांचा वर्णद्वेष मूलक प्रतिसाद दिल्याबद्दल निषेध करावा तितका कमी आहे. कायच्या काय प्रतिसाद देतात लोक...
  • Log in or register to post comments

पुणेकर भामटा यांचा वर्णद्वेष

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 22:54 नवीन
पुणेकर भामटा यांचा वर्णद्वेष मूलक प्रतिसाद दिल्याबद्दल निषेध करावा तितका कमी आहे. कायच्या काय प्रतिसाद देतात लोक...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा