Skip to main content

मन झिम्माड झिम्माड

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 14/05/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची. मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी. आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्‍याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा. पण पावसकाळात मात्र हा हिरवा शालू नेसून नव्या नवरीसारखा सजून जातो. मागच्या वर्षीच्या दुष्काळाचा फटका ह्या भागाला देखील बसला, पाऊस इथेही असा झालाच नाही तरीही एखादी का होईना चुकार सर इथे कोसळून जायचीच. अशा एका ऐन पावसाळ्यातल्या एका पेटत्या दुपारीच आम्ही चिंचवडाहून येथे यायला निघालो. वडगावच्या पुढेच टाकवे बुद्रुकला जायचा फाटा आहे त्या रस्त्याने निघायचं. येथंवर येईतो आभाळात मळभ दाटलं होतं. उन्ह सावलीचा खेळ चालूच होता. टाकवेच्या पुढेच एका धबधब्याचं दर्शन झालो. लहानसाच तरीही वेगवान प्रवाह होता. मनसोक्त भिजलो. a दिसायला जरी लहान असला हा तरी हा एका उंच डोंगरावरुन तीन पायर्‍यांत खाली उतरतो a भाताची रोपं तरारुन अधिक पावसाची वाट पाहात होती. a a मधूनच डोंगरात एखादं कातळकोरीव बौद्धकालीन लेणं दिसत होतं. हे जे लेणं आहे ते टाकवे बुद्रुकच्या थोडं पुढं एका डोंगरात. बहुधा डॉक्युमेन्टेड नसावं. a रदोन्ही बाजूला मस्त हिरवाई आणि मधूनच जाणारा रस्ता a नंतर येतं ते कांब्रे गाव. इथले धबधबा खरोखरचं ग्रॅण्ड म्हणावे असे . इतक्या कमी पावसातही ते प्रचंड उंचीवरुन तुफ्फान कोसळत होते . ह्यांच्याखाली उभं राहणं सर्वथा अशक्य. a ह्याच कांब्र्याच्या डोंगरात लेणी आहेत. कातळपटीच्या इथे जी भलीमोठी आडवी भेग दिसतेय तीच ही लेणी. जाणं अत्यंत कठीण. a a a आपल्याच साईप्रकाश बेलसरेनं मावळातली बरीचशी अनवट आणि दुर्गम लेणी सर केलीत त्यात हीसुद्धा एक अवश्य वाचाच साईची ही भटकंती कांब्र्याच्या पुढे धुव्वाधार पाऊस सुरु झाला. चिंब चिंब झालो. ठोकळवाडीच्या काठावर उतरलो a निर्झर खळाळत होते a a मधूनच एकूटवाणं राऊळ दिसत होतं. a ठोकळवाडीला वळसा मारला की खांडी येतं. ह्याच्या पुढे सह्याद्रीची रांग आणि टाटाच्या भिवपुरी प्रकल्पाला जाणारा रस्ता. हा भागही खूप सुंदर आणि हिरवा. हे ठिकाण अगदी घाटमाथ्यावर असलं तरिही येथे प्रचंड खोल असे तुटलेले, भिववणारे कडे नाहीत. सौम्य असाच उतार आहे. a a a भिवपुरीचा घाट निम्मा उतरुन परत फिरलो. पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरु झाला. मन झिम्माड झिम्माड होऊन गेलं. a

वाचने 19093
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

ती दोन्ही झाडे अगदी जुळी असल्यागत दिसताहेत. फोटो अर्थातच आवडले. आता लवकरच पाऊस पडावा अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना. बाकी कुठेही जा, ती लेणी किंवा एखादा वीरगळ तू शोधून काढणारच.

In reply to by किसन शिंदे

ती दोन्ही झाडे अगदी जुळी असल्यागत दिसताहेत.
प्रतिसाद वाचुन पुन्हा फोटो पाहीले.अगदी तंतोतंत एकसारखी दिसताहेत ती झाडे. मान गये किसनराव आपकी नजर को!

In reply to by कानडाऊ योगेशु

झांडं म्हणजे, त्यात एक बाबा, एक आई, आणि बाबाचं बोट धरुन चाललेलं पिलु हे दिसलं का तुम्हाला. :) दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही या गावविश्वाची "त्या" भावविश्वासी गल्लत करत आहात.

In reply to by सतिश गावडे

चुकलं. :) वल्लीचा धागा आहे म्हणुन अवांतर प्रतिसाद लिहून प्रतिसाद संख्या वाढवायची नै हे आपलं ठरलंय ना ? लेखन करणारा लेखक किती नवे प्रतिसाद बघायला येतो, आणि अवांतर गप्पा पाहुन नाराज होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by किसन शिंदे

असल्या अनवट आय्डीयांचे (आयडीचे नाही) जनक आहेत याबाबत फक्त वहीम होता आता खात्री झाली. मूळ अवांतर .वल्लींची भटकंती गड-लेण्याशिवायही असते (आणि तीही हिरवीगार) हे पाहून मस्त वाटले. भावी वल्लीणबैंना कुठं फिरायला जायच असा प्रश्न कधीच पडणार नाही याची तजवीज करणार्या वल्लींना हिर्व्याकंच धाग्याबद्दल दोनशे मार्क. वरती आलेला भावविश्वचा उल्लेख पाहून त्याचे वाचाक सुदूर पोहोचलेले आहेत यामुळे त्यांनी अता (अस्सल) भाव विष्व लिहिण्यास घ्यावे ही मिपा वाचक चळवळ संघाकडून मागणी.

In reply to by यशोधरा

बहुतेकदा प्रेमात पडणारी/ पडलेली व्यक्ती काव्यात्मक पद्धतीने जास्त विचार करते/ लिहीते/ बोलते. तसंच काहीसं असणार बहुदा.

In reply to by प्रचेतस

मोनालिसाचे हास्य :) त्यात अनेक गुढ अर्थ आहेत म्हणे.

In reply to by यशोधरा

भाषाही काव्यात्मक वापरलीये. सहमत. लेख आवडला वल्लीसेठ. फोटोही छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

फोटो खूप छान!

भव्य हिमालय तुमचा आमचा..केवळ माझा सह्य कडा याची आठवण करून देणारे फोटो. सह्याद्री एकाच वेळी अफाट, बेफाट, बेलाग असतो, आणि त्याचवेळी तो निरागस, सुंदर, अवखळही असतो!!

हिरवागार वृतांत आवडला, लवकरच पाउस सुरु होइल अशी अपेक्षा आहे. पैजारबुवा,

आम्ही मावळा . आंदर मावळातलाच पण १९६९ नंतर तिकडे वळलोच नाही. आता घर कसं असेल की ढिगारा काय पत्ता नाही. आता एकदा चक्कर मारली पाहिजे. असं हा फोटो प्रपंच पाहून वाटायला लागलेय ! मस्त हिरवाई !

वा वा वा. वल्ली हुशार आणि होतकरु आहे.

अहाहा... क्या बात... जियो...

छान चित्रे. asdf अशा छोट्या ओढ्यांना दगडांचा बांध घालून अडवणे हा माझा गुरांकडचा आवडता उद्योग असायचा. :)

In reply to by सतिश गावडे

अता बांध फोडायचे दिवस आहेत तुमचे सर !

In reply to by चौकटराजा

चौकार हाणलात चौराकाका

In reply to by किसन शिंदे

=))

In reply to by प्रचेतस

ते बांधे(सुद) बंदीस्तीत व्यग्र आहेत. जल्युक्त शिवार नाखु

In reply to by चौकटराजा

चौराकाकांनी एकदम स्टेडियमबाहेर भिरकावून दिलाय चेंडू! :) -रंगबंध

In reply to by चौकटराजा

=))

भारी.बाकी ते विहार नेहमी भिक्कूलोक पावसाळ्यात वस्तीसाठी वापरत आणि सहज जाता येईल अशा ठिकाणी असतात मग कांब्रेचे एवढ्या अवघड जागी का? नवनाथपंथीय गुहा वगैरेत राहात असलेतरी स्वत: गुहा खोदत नसावेत.

In reply to by कंजूस

हे विहार म्हणजे अर्धवट सोडून दिलेली लेणी आहेत. बहुधा खड़क योग्य नसावा किंवा निधी संपला असावा. पूर्वीची वाटही दरड कोसळल्याने बंद झाली असावी. अगदी अजिंठ्यातही २६ क्रमांकाच्या लेणीच्या वर अवघड जागी अर्धवट बांधून सोडून दिलेली चैत्यगृहाची कमान दिसते. नाथपंथीयांनी गुहा खोदल्या नाहित हे खरंच. बौद्ध धर्म मृतप्राय झाल्यावर काही बेवसाऊ लेण्यात नाथपंथीय गेले. पाटेश्वर येथील गुहा मात्र नाथपंथीयांनी खोदल्या असाव्यात असा माझा तर्क आहे.

प्रकाशचित्रं आणि वर्णन दोन्ही आवडलं.

अप्रतिम लेखन बे. फोटो तर अतिशय जबराट, शिवाय भाषा थेट गोनीदांची आठवण करून देणारी. "एकुटवाणे राऊळ" वगैरे एकदम सहीसही तिथलेच. अशा गोष्टींचे वर्णन करताना सर्वांत चपखल तीच भाषा वाटते यात काही सौंशयच नाही.

धाग्याच्या मथळ्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यंत काव्यमय हिरवा कंच धागा ! प्रचि अप्रतिम ! आत्तापर्यंत दोन वेळा पावसाळ्याच्या आसपास या ठिकाणची सफर केलीय त्याची उजळणी झाली. पावसाळी धुडगुस पर्यटकांचे इकडे लक्ष गेले नसल्याने हे ठिकाण अजुन तरी व्हर्जिन आहे. सलाम प्रचेतसच्या शब्दांना अन कॅमेरानेत्राला !

In reply to by चौथा कोनाडा

पावसाळी धुडगुस पर्यटकांचे
धुडगूसन चालू झालाय ! परांजपे स्कीमने प्लॉटींग करून विकायला काढलय ! वडेश्वर ला रीसॉर्ट सुरू झाले आहेत. अजुन २-३ वर्षेच फक्त !

फोटो आणि लेख - दोन्ही सुरेख, डोळे निववणारे!

तापलेल्या धरित्रीवर पावसाची पहिली सर पडल्यावर धरणीमातेला कसं वाटत असेल, तसा मनावर थंडगार शिडकावा झाल्यासारखं वाटलं. मनात मृद्गंध दरवळायला लागला. मन झिम्माड झालं. जियो, वल्ली, फोटो आणि वर्णन अतिशय सुंदर. सर्वांचे प्रतिसादही आवडले. चौराकाकांच्या चौकाराला उभं राहून, दोन्ही हात वर करून टाळ्यांचा कडकडाट. अवांतर - बहुतेकदा प्रेमात पडणारी/ पडलेली व्यक्ती काव्यात्मक पद्धतीने जास्त विचार करते/ लिहीते/ बोलते. तसंच काहीसं असणार बहुदा... किसनद्येवांना काहीतरी शिकरेट...?

सहन होईना आता हे फोटो बघून... कधी एकदा येतोय परत असं झालंय...!! :(

सुंदर फोटो, अप्रतिम लेखन ! वल्ली नजर असली की कडेकपारीत लपलेली लेणी आणि वीरगळ स्वतःहून समोर येऊन उभे राहत असणार ! ;)

वल्लीसेट.. लय भारी.. मस्तच.. (पण मनातल्या मनात: अत्यंत जळजळ झालीय. ह्या मरण उकाड्यात असे हिरवे सह्याद्रीचे फोटो टाकून... जाऊदे.. कुफेहेपा :) :) ) रच्याकने... हा आंदर मावळचा भाग सगळाच भटकंतीचा राहीलाय. कधी होणार देव जाणे.

झिम्माड वैगरे शब्द आणि वल्लीचा धागा, वाचण्यात काही गल्लत तर झाली नाही ना म्हणून दोनदोनदा वाचलं. छान आहे धागा, फोटो बघून गारगार वाटलं.

सुंदर! ते एकुटवाणं राऊळ नितांत आवडलंय.

खूप छान लेख आणि फोटो सुद्धा. तो ब्लॉग देखील खूप मस्त आहे.

मस्त फोटो आणि वर्णन हे फोटो पाहून खालील वेगवेगळ्या जॉनरची मराठी आणि हिंदी गाणी ओठावर येतात. १. घन घन माला नभि दाटल्या कोसळती धारा २.ओ सजना बरखा बहार आयी रस की फुहार लायी अखियों मे प्यार लायी ओ सजना

फोटो आणि लेख मस्तच

हा छान आहे धागा... इतक्या अभ्यासू माणसाची कसं लोक टिंगल करतात कोण जाणे