अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करु।।
मज करा का उपचारू । अधिक तापभारू ।
सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।।
तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू । देखियेला।।
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा ।
तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।।
रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां? असा विचार करता कान्ह्याच्या कस्तुरी टिळ्याचा असावा का? असा भास झाला आणि मी मनात म्हटलं, बहुतेक बाहेर आनंदकंद गोपाळु आला!
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळू ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
मन एकाच वेळी आनंद आणि भीती यांनी व्यापलं!
तरीही मनाला लागलेली कान्ह्याला पाहण्याची आस वरचढ ठरली...कुणी बघत तर नाही ना? याचा अंदाज घेत बाहेर आले. पण बाहेर आले तर कान्हा नव्हताच तिथे ! असं ठकवलं त्यानं मला. काय करावे हे न सुचून मी काही क्षण तशीच काष्ठवत् उभी होते बाहेर.
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करू ।।
कान्हा असंच करतो. दर्शनाची आस लावतो आणि दिसत नाही! हा विरहाचा ताप आता सहन होत नाही.
मनातल्या मनात मी तुम्हा सगळ्या सख्यांनाच म्हटलं, काही तरी उपाय करा या माझ्या विरहवेदनेवर. तो सारंगधर आता मला भेटवा, त्याशिवाय जिवाला चैन नाही पडणार!
एवढ्यात...डोळ्यांसमोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण !!
काय वर्णू त्याचं रूप. बुद्धी, शब्द सगळे थिटेच त्याच्यापुढे. तो श्यामल, सुंदर, आपल्या लावण्याने कुणाचेही मन हरुन घेणारा मनोहर असा पीतांबर नसलेला गोपाळ मला दिसला.
गोपाळ हे नावही सार्थ करीत माझ्या इंद्रियांवरचा ताबाही त्याने माझ्या हाती ठेवला नाही.
मी डोळे भरून त्याला पाहत असताना आनंदातिशयाने डोळे भरून आले. (डोळे भरणे या शब्दावर काय छान श्लेष साधला गेलाय)
डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध ! आणि पुन्हा तो खट्याळ वनमाळी निसटला !
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
आता मात्र मीच मनाला समजावले की कान्हा आहे इथेच, दिसेल पुन्हा. कान्हा संध्याकाळी भेटला होता तेव्हा बोलता बोलता बोलून गेला की "मी सगळीकडेच आहे, अगदी तुझ्यातही!"
ते आठवलं आणि मनाची पक्की धारणा झाली की हे तो हेतुपुरस्सर बोलला होता. मला बोध व्हावा म्हणूनच. मग मात्र मी स्वतःला समर्पित केलं त्या कृष्णतत्त्वात. मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती. त्या आल्हादानं डोळे आपोआप मिटले! मी कान्ह्याशी अनेआन म्हणजे अनन्य झाले होते.
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
आता माझे प्राणच माझे नाहीत तर काया-वाचा आणि मनाला कान्ह्याशिवाय अन्य काही सुचेल का?
मी काया-वाचा-मनाने कृष्णमयी झाले !
माउली म्हणतात की त्या गोपिकेसारखीच माझी अवस्था आहे. माझ्या काया-वाचा-मनाला आता रखुमादेवीवर विठ्ठलाशिवाय काही दिसत नाही!
माझ्या काया-वाचा-मनाच्या सबाह्य अभ्यांतरी केवळ सुखराशी विठ्ठल आहे!
गोपिकांचे जीवन किती साधे, पण त्यांचा कृष्णप्रति असलेला भक्तिभाव मात्र अत्युच्च ! म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषालाही त्यांनी भक्तिमार्ग दाखवला! कसलासा सुगंध येणे ही सामान्य जीवनातली तशी कधीही घडू शकणारी आणि त्यामुळेच सामान्य अशी घटना! पण ही गोपिका त्या सुगंधालाही कृष्णाशी जोडते. तसंच पाहायला गेलं तर ही संपूर्ण रचना त्या गोपिकेच्या धारणेतून तिच्या मनाने मांडलेला कल्पनांचा, भासांचा एक गोफ आहे असं म्हणता येईल. काया-वाचा आणि मन या सगळ्यांना आलंबन एकच श्रीकृष्ण! काय अवस्था असेल ती ! पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सगळे कृष्णमय !
सुगंध आला तर कृष्णच आला असावा अशी धारणा, डोळे भरून मला दिसतो कोण? तर पीतांबरधर सावळा कृष्णच ! पंचप्राणच त्या कृष्णाने शोषून घेतलेत, माझं काही उरलंच नाही माझ्याकडे !!
किती अनन्यता!! काय कमालीची भावावस्था!!
ही रचना दोन समर्थ गायिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. दोन्ही रचना त्या त्या जागी अतुलनीयच आहेत.त्यातल्या किशोरीताईंच्या संगीतरचनेबद्दल थोडेसे....
'सारंगधरु भेटवा' असं म्हणणारी गोपिका किशोरीताईंनी सारंग रागातून आपल्या समोर आणली आहे.
पहिल्यांदा किशोरीताईंच्या आवाजात ही रचना ऐकताना मला असं वाटलं की "किशोरीताई किती ठासून भरल्या आहेत यात, किती प्रखर अभिव्यक्ती आहे. पण जसजसा ही रचना ऐकत गेलो, तसतसे त्यातले अनेक पदर उलगडत गेले. पहिली गोष्ट जाणवली ती ही की किशोरीताई स्वरांना शरण गेल्यात, स्वरांशी अनन्य आहेत. सर्वसामान्यपणे एखादे सुगम गीत, अभंग गाताना त्यात 'भाव' आणून स्वर-शब्द उच्चारले जातात. पण किशोरीताईंची रचना, म्हणजे त्यातले सांगीतिक कॉम्पोझिशन, इतकं प्रभावी आहे की वेगळे भाव ओतावे लागतच नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ रचना संपूर्ण घेतली गेली आहे.
बोधुनी ठेले मन | तव जाले अनेआन - इथे अनेआन आणि आन- हे पाठभेद मानता येतील. (लताबाईंच्या रचनेत 'आन' एवढाच शब्द वापरलाय).
रचनेच्या सुरुवातीचा आलाप म्हणजे जणू ताईंनी एक 'कॅनव्हास' तयार केलाय, पुढच्या चित्रकलेसाठीचा.
(लताबाईंच्या रचनेतही सुरुवातीचा आलाप तसेच काम करतो स्मित )
या रचनेतली 'झुळकला' या शब्दाचीच कलाकुसर इतकी लोभस आहे की फक्त तेवढंच ऐकत रहावंसं वाटतं. अगदी खरोखरीच परिमळू झुळकल्याचा आभास होतो. 'गोपाळू आला गे माये' यातले 'आला गे माये' या तीन शब्दांना दिलेले झोके आणि स्वरांच्या मींड.. आहाहा !
'ठकचि मी ठेले, काय करु' यातल्या 'काय करू' चे स्वरच त्या गोपिकेची अगतिकता डोळ्यांसमोर उभी करतात. 'काय करू' म्हणून झाल्यावर थोडा विराम आहे तालाला... हीसुद्धा त्या अगतिकतेचीच सूचना !
तो सावळा सुंदरू | कासे पीतांबरू.. यात पीतांबरू या शब्दातला 'पी' छान दीर्घ उच्चारलाय आणि अगदी सहज स्मित
'भरलिया दृष्टी जव डोळा न्याहाळी | तव कोठे गेला वनमाळी गे माये | यातला 'कोठे' हा शब्द.. त्याचे स्वर जणू एक पोकळी दाखवतात. 'वनमाळी गे माये' इथे छंददृष्ट्या एक शब्द कमी पडतो खरं तर आणि म्हणून 'वनमाळी' हा शब्द लांबवला गेलाय जरासा...आणि त्यानेच मजा आणली आहे.
बोधुनी ठेले मन.. सोकोनि घेतले प्राण माझे गे माये.... यानंतरही तालाला किंचित विराम आहे. यातून सांगीतिक दृष्ट्या एक समतोल साधला जातोय असं वाटतं.
तेणे काया मने वाचा- यात काया, मने, वाचा यांचे स्वर एकामागून एक चढते आहेत. अस्तित्वाच्या कायिक, मानसिक आणि वाचिक अशा पायर्या चढत जाव्या तसे.
खरं तर माउलींच्या शब्द-रचनेबद्दल लिहिल्यावर अजून काही लिहूच नये असे वाटत होते, पण मला आवडलेल्या जागाही सांगायचा मोह आवरला नाही म्हणून जरा पाल्हाळ लावलं. गेले काही दिवस हे गाणं खूपदा ऐकलंय, दर वेळी अजून काही तरी नवीन सापडतं. ऐकताना अगदी एखादाच क्षण का होई ना... त्या गोपिकेच्या भावविश्वाचा अनुभव येतो. संगीत हा ईश्वराशी जोडलं जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे असं म्हणतात, त्याची प्रचीती येते.
~ चैतन्य दीक्षित.
वाचने
4915
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं.
सुरेख !
अंग उरते न अंग, जाते अत्तर होऊन... !!!!
In reply to सुरेख ! by मितान
संत ज्ञानेश्वर-पं हृदयनाथ मंगेशकर-लता मंगेशकर
+१
In reply to संत ज्ञानेश्वर-पं हृदयनाथ मंगेशकर-लता मंगेशकर by तुषार काळभोर
___/\___
__/\__
थोडं आणखी लिहावंसं वाटलं.
____/\____
मृद्गंध
In reply to ____/\____ by पिशी अबोली
खूप सुंदर रसग्रहण … यातला "ळ
मनातलं
In reply to खूप सुंदर रसग्रहण … यातला "ळ by Anand More
अगदी अगदी
In reply to खूप सुंदर रसग्रहण … यातला "ळ by Anand More
सुरेख...
धन्यवाद
लताची सुरुवातीची अशक्य मिंड
अप्रतिम सुंदर
धन्यवाद
काय सुंदर लिहिलं आहे !डोळे
सुरेख लिहीलंय. प्रणाम.
सुरेख रसग्रहण...
पराभूत मानसीकतेच्या अज्ञानाची कहाणी
प्रतिसाद अस्थानी आणि अत्यंत
In reply to पराभूत मानसीकतेच्या अज्ञानाची कहाणी by अर्धवटराव
प्रतिसाद अस्थानी आणि अत्यंत अकारण असा आहे.
In reply to प्रतिसाद अस्थानी आणि अत्यंत by वैभव जाधव
संस्थळाची लायकी
In reply to पराभूत मानसीकतेच्या अज्ञानाची कहाणी by अर्धवटराव
संस्थळाची लायकी
In reply to पराभूत मानसीकतेच्या अज्ञानाची कहाणी by अर्धवटराव
सुंदर अप्रतीम रसग्रहण.
सुरेख!