✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यशस्वी माघार

आ
आतिवास यांनी
Sat, 05/07/2016 - 19:55  ·  लेख
लेख
1
. खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते. वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? कारण बहुसंख्य लोकांच्या भावना अशा कृतींशी जोडल्या गेलेल्या असतात. ’त्या कृती निरर्थक आहेत’ असे म्हटले तर संवाद सुरू होण्यापूर्वीच थांबतो, अशा अनुभवातून पोळले गेल्यानंतर मी ही तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. यातून कदाचित ’व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे. आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते. पण सार्वजनिक जीवनात देवदेवतांच्या, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ही विभागणी पटत नसली तरीही मी मान्य केली आहे. एका अर्थी समाजाने 'माघार कशी घ्यायची असते’ याबाबत माझे केलेले दीर्घकाळचे हे शिक्षणच आहे म्हणा ना! समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो. जीवनाच्या सर्वांगाला व्यापून असणा-या धार्मिकतेला स्पर्श न करता काम करणे अवघड; आणि तिला छेद देऊन काम करणेही तितकेच अवघड! काही अनुभव मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक छोटे गाव. आमचा एक प्रकल्प तेथे चालू होता. परसबाग लागवड हा त्यातील एक उप-कार्यक्रम. घराच्या अंगणात, परसात सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला लावायचा असा हा अगदी साधा आणि छोटा कार्यक्रम. स्त्रियांमधले कुपोषण कमी करण्यासाठी परसबाग उपयोगी पडते असा आजवरचा अनुभव. पण परसबागेचा उपक्रम तेथे काही केल्या नीट चालत नव्हता. फक्त पावसाळ्यात चार महिने परसबाग असायची आणि नंतर ती नाहीशी व्हायची. स्त्रियांच्या एका समूहाबरोबर याच विषयावर बोलायला मी आले होते. ’पावसाळ्यानंतर पाणी नसते आणि म्हणून परसबाग मरते. पिण्याच्या पाण्यासाठीच मग वणवण असते, झाडांना कोण पाणी घालणार?’ असे स्त्रियांचे मत पडले. परसबागेला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही असे मी त्यांना समजावून सांगत होते. आम्ही बसलो होतो त्या पडवीतून मला समोर एक अर्ध्या भिंतीची मोरी दिसली. 'या मोरीतल्या आंघोळीच्या पाण्यावरही भाज्या वाढतील’ असे मी म्हटल्यावर बैठकीत क्षणभर सन्नाटा पसरला. एक तरूण स्त्री तिचे हसू काबूत राखू शकली नाही, ती खुदकन हसली. अनेकींच्या चेहर-यावर स्मित झळकले. “दीदी हमको बच्चा कम करनेका तरीका बता रही है", असे एकीने मोठयाने म्हटल्यावर त्या सगळ्याजणी खिदळायला लागल्या. माझ्या बोलण्यामुळे नेमका काय विनोद झाला हे मला समजले नव्हते. त्यांच्या शेरेबाजीचा संदर्भ मला कळत नव्हता. “मी काही चुकीचे बोलले का?” या माझ्या प्रश्नावर हसण्याची आणखी एक जोरदार लाट आली. एका प्रौढ स्त्रीने मग मला ओढत एका कोप-यात नेले आणि ती मला रागावून म्हणाली, “औरतोंकी माहवारी के नहाने के पानीपर उगी सब्जिया हमारे मर्द खायेंगे, तो उनकी मर्दानगी कम नही होगी क्या? तुम शहरके लोग कुछ समझते नही हो, और आते हो हमे पढाने के लिये! यहा तुम्हारा यह कार्यक्रम नही होगा, अभी दुसरा कुछ बताना है तो बताओ, नही तो मीटिंग खत्म करके मेरे घर चाय पीने चलो". प्रजननात्मक आरोग्यावर काम केल्याशिवाय परसबाग यशस्वी होणार नाही हा त्या स्त्रियांनी मला शिकवलेला एक धडा! विकास कार्यक्रमाचा जीवनविषयक दृष्टिकोनाशी - त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार – संलग्न असलेला हा पैलू तोवर माझ्या कधी ध्यानातच आला नव्हता. जे करायचे ते संदर्भ लक्षात घेऊन, लोकांच्या विचारांना सामावून घेऊन करायला शिकणे भागच असते अशा वेळी. कधी कधी मनात असलेले सगळे करायला जमत नाही, याचाही स्वीकार करावा लागतो. खूप वर्षांपूर्वी अरूणाचल प्रदेशात गेले होते. गावात गेले की एखादे घर गाठायचे आणि बैठक मारायची. हळूहळू इतर माणसे जमा होत. पुरूष येत तशा स्त्रियाही येत, मुले मुली तर अगणित जमा होत. माझी भाषा त्यांना कळत नसे आणि त्यांची मला. सहकारी कार्यकर्ता दुभाषाचे काम करे, त्यामुळे संवादाची गती आपोआप कमी राही. मला शांतपणे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळत असे. अगदी मजेदार दिवस होते ते. पहिल्या बैठकीत माझ्यासमोर एका पेल्यात पेय आले. माझ्या खाण्यापिण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जेथे जाईन तेथले पदार्थ खाऊन बघायचे, त्याबद्दल जरा माहिती घ्यायची अशी माझी साधारण पद्धत. त्यानुसार मी त्या समोर आलेल्या पेयाचे नाव विचारले. त्यावर ’अपांग’ असे उत्तर आले, ज्यातून मला काहीच अर्थबोध झाला नाही. मी ते पेय घेणार तेवढयात माझ्या सहका-याचा चेहरा मला दिसला आणि मी पेला खाली ठेवला. 'कडू काढा वगैरे आहे की काय?’ असे मी त्याला गंमतीने विचारले. तो भयंकर गंभीरपणे मला म्हणाला, “दारू आहे ती". आता नेमके काय करावे हे मला सुचेना. त्या आदिवासींनाही काही सुचेना. जमलेल्या सगळ्यांचे डोळे एका वृद्ध माणसाकडे वळले. वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी 'अपांग कशी करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर एका युवकाने मला उत्साहाने दहा मिनिटे माहिती दिली. मी मग त्यांना शांतपणे म्हटले, “अपांग घ्यायला आवडली असती मला, पण आज ती मी नाही घेतली तर चालेल का तुम्हाला?” तो वृद्ध गृहस्थ त्याच्या भरदार आवाजात म्हणाला, “ ती दारू आहे म्हणून तू ती घेणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. पण तुला एक घोट तरी घ्यावाच लागेल. आलेल्या पाहुण्याला अपांग नाही पाजली तर आमचे पूर्वज कोपतील आणि आमच्या गावावर संकटे कोसळतील.” मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. पण त्याने अखेर निर्वाणीचा इशारा दिला, “ तुला जसा तुझा धर्म आहे, तशी आम्हालाही आमची परंपरा आहे. आमच्या गावात तुला आमची परंपरा पाळावी लागेल. ही परंपरा न पाळण्याने तुझे काही नुकसान नाही होणार, पण आमचे होईल. यासाठीच तू आमच्याकडे आलीस का?” दुस-या बाजूने मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह. अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले. काही राखायचं तर काही गमवावं लागतं --- हा मला मिळालेला आणखी एक धडा. भारतीय रेल्वेची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे गाडयांची नावे. पुष्पक, ज्ञानगंगा, झेलम, इंद्रायणी, राप्ती सागर ….अशा नावांच्या गाडयांतून प्रवास करताना जणू तो इतिहास आणि भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. जम्मू ते कन्याकुमारी या गाडीचेही 'हिमसागर एक्स्प्रेस’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. कार्यकर्त्यांच्या एका समूहात या गाडीला ’विवेकानंद एक्स्प्रेस’ असे नाव देण्याबाबत, तसा विनंतीअर्ज रेल्वेकडे पाठवण्याबाबत अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू होती. मी ’हिमसागर’ हे नाव कसे अधिक चांगले आहे, व्यक्तीचे नाव गाडयांना न देण्याची रेल्वेची भूमिका कशी योग्य आहे, विवेकांनंदाचे मोठेपण असल्या भौतिक गोष्टींवरून ठरत नाही ….असे अनेक मुद्दे मांडले. पण मला आठवते तसे त्याही चर्चेची सांगता 'हिला विवेकानंदबद्दल काही आदर नाही’ अशीच झाली होती. तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही, पण ते तसे आहे खरे! काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले. कर्नाटकमध्ये बचत गटाची बैठक एका देवळात ठेवली म्हणून गटाची अध्यक्षच बैठकीला येऊ शकली नाही - कारण त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती. राजस्थानमधील एका छोटया गावातील प्रशिक्षणात 'मुलगा व्हावा’ म्हणून उपवास करणारी सहा महिन्यांची गर्भवती, सातपुडयच्या अक्राणी परिसरात अश्वत्थामा दिसल्याचे सांगणारा आदिवासी म्हातारा, बाळाला लस टोचली तर देवतेचा कोप होईल म्हणून घरात लपून राहणारे आदिवासी....असे कितीतरी प्रसंग आठवतात. या सगळ्यातून वाट काढत चालायचे तर दमछाकही होते. सकारात्मक बाजू पण देवदेवतांवरील लोकांच्या श्रद्धेबाबत केवळ एवढेच लिहिणे एकांगी होईल. कोणाला पटो अथवा ना पटो, पण या सगळ्याला एक सकारात्मक बाजू आहे. भले ती विचारांनी स्वीकारलेली जीवनशैली असेल किंवा नसेल, पण याच श्रद्धेतून समाजात काही चांगले बदलही होताना दिसतात. उदाहरणार्थ, शहरांत दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळताना दिसते आहे. पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान! अशा परिस्थितीत एखादा आदिवासी पाडा जेंव्हा "आमच्या गावात दारू अजिबात नाही बरं ताई, आम्ही माळकरी आहोत" असे अभिमानाने सांगतो, तेंव्हा दूरच्या त्या विठोबाला 'अशीच कृपा राहू दे बाबा यांच्यावर’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटते.. घर सोडून दहा मैलांच्या पलिकडे न गेलेल्या स्त्रियांच्या समुहात जेंव्हा कोणीतरी ’त्रिंबकपर्यंत’ किंवा ’प्रयागपर्यंत’ जाऊन आल्याचे कौतुकाने सांगते तेंव्हा कुंभमेळ्याचा सामाजिक पैलूही समोर येतो. पूर्वजांची पूजा करणारे, त्यांच्या अधिभौतिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक नकळत समाजाचा इतिहास जपत असतात. देवाच्या आवारातली झाडे तोडायची नाहीत, अशा पारंपरिक नियमातून मोजक्याच ठिकाणी का होईना ’देवराई’ आत्ताआत्तापर्यंत जगली आहे. विशेषतः हिंदू धर्मातले बरेच सण निसर्गाची जाणीव करून देणारे आहेत. - त्यामुळे झाडे, डोंगर, नद्या, पशु, पक्षी.. … अशा निसर्गातल्या अन्य घटकांशी माणसांचे नाते जुळलेले आहे. प्रवासात वाटेत दिसणा-या नदीत पैसे टाकण्याची लोकांची लगबग मजेदार वाटली तरी एखाद्याच्या मनात ते करताना सर्वस्व अर्पण करण्याची भावना असू शकते हेही लक्षात घ्यावे लागते. समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते. देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते! (अन्यत्र पूर्वप्रकाशित)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
35712 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

समतोल व सखोल लेख. याचे

एस
Sat, 05/07/2016 - 20:06 नवीन
समतोल व सखोल लेख. याचे एखाद्या एकोळी प्रतिसादाने मूल्यमापन होणे अशक्य आहे. ही केवळ वाचल्याची पोच व पुन्हा कितव्यांदातरी तुमच्या कार्याला सलाम!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आतिवास
Sun, 05/08/2016 - 17:44 नवीन
खरं तर माझ्यापेक्षा कैक पटींनी जास्त काम करणारे लोक माहिती आहेत. पण ते लिहित नाहीत. मी आपली त्यातल्या त्यात दोन्ही जगांत वावरण्याचा लाभ घेते इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आतिवास ताई...

चांदणे संदीप
Sat, 05/07/2016 - 20:34 नवीन
तुमचा लेख पाहिला आणि लगेच अधाशासारखा वाचून काढला! आवडला आहेच आणि काही बाबतीत एवढंच म्हणेन, "सेम पिंच!" :) Sandy
  • Log in or register to post comments

तृप्ती देसाई यांना हा लेख वाचायला दिला पाहिजे. -गा.पै.

गामा पैलवान
Sat, 05/07/2016 - 21:16 नवीन
‌
  • Log in or register to post comments

असहमत

आतिवास
Sat, 05/07/2016 - 21:34 नवीन
लेखावरून काढलेल्या या निष्कर्षाशी असहमत. या लेखाचा असा(ही) अर्थ लावला जाऊ शकतो हे ध्यानात आलं नव्हतं. तृप्ती देसाई जे काम करताहेत तेही कुणीतरी करण्याची गरज असतेच. त्याशिवाय सामाजिक सुधारणा होत नाहीत. मला सुधारणांचा आग्रह धरता येत नाही, म्हणून दुस-या कुणी तो धरत असेत तर ते चूक आहे असं मी मानत नाही. मी शक्यतो अशा कामांना आणि कार्यकर्त्यांना समर्थनच देते. समाजात वेगवेगळ्या पद्धतींनी काम करण्याची गरज असते - ते मार्ग वरवर पाहता विरोधी वाटतात - पण तसं नसतं. परिस्थितीनुसार काही वेळा माघार घेण्यात शहाणपण असतं तर काही वेळा बदल व्हावेत म्हणून आग्रह धरण्यात शहाणपण असतं. विषयांतराच्या भयाने इथं थांबते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तृप्ती देसाईंचे काम काय?

गामा पैलवान
Sun, 05/08/2016 - 11:15 नवीन
अतिवासताई, तृप्ती देसाईंचे नेमके काम काय? या बाई तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. त्या बनेल राजकारणी आहेत. शिंगणापुरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा देणे कोणत्या प्रबोधनाच्या कार्यात बसते? आज या बाईने डोंबिवलीच्या देवळात जाऊन काय थेरं केली? अनुचित कपडे घालून देवळात जायचा अट्टाहास का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

काय आनगापै,

आनंदी गोपाळ
Sun, 05/08/2016 - 20:48 नवीन
बरं चाल्लंय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असे जमिनीवरचे अस्सल लिखाण खूप

तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 21:35 नवीन
असे जमिनीवरचे अस्सल लिखाण खूप आवडते. सॅन्डीभौसारखेच म्हणतो, "सेम पिंच"
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Sat, 05/07/2016 - 21:57 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

मुक्तचिंतन

राही
Sat, 05/07/2016 - 22:29 नवीन
मुक्त चिंतन आवडले. समझोते करता करता आणि दमाने घेता घेता आपलीच पुरती दमछाक होते आहे की काय असे वाटत राहाते कधी कधी. शॉर्ट कट दिसतोय, पण त्या वरून चालण्याचा धोका पत्करवत नाही आणि खूप वळसे वळणे असलेला मार्ग स्वीकारावा लागतो. विचारांनी विचारांशी लढायचे, कृतीने कृतीशी नाही, थेट संघर्ष टाळायचा हे कठिण जाते. स्वतःशी प्रतारणा केल्यासारखे वाटते. विचारांप्रमाणे कृती घडू देण्यातली तात्पुरती कार्यहानीसुद्धा दिसत असते. पण ही तात्पुरती हानी आहे, अंतिम विजय आपलाच आहे या विचाराने बळ येते.
  • Log in or register to post comments

सहज कुतूहल म्हणून मनात आलेला

वैभव जाधव
Sun, 05/08/2016 - 01:02 नवीन
सहज कुतूहल म्हणून मनात आलेला विचार.... समाजाच्या बहुसंख्य वर्गाच्या पुढचे विचार असलेले काही वैचारिक मतप्रवाह असलेले लोक या बहुसंख्य सोडा पण काही ठराविक घटकासाठी 'नेमकं' काय करतो? राहीताई किंवा आतिवास मॅडम कोण आहेत किंवा काय करतात हे ठाऊक नाही पण त्या बोलतात तेव्हा त्याला काही अधिष्ठान असणार असं गृहीत आहे जेणेकरून बहुसंख्य लोकापेक्षा वेगळं काही करतो म्हणू बोलतो असं म्हणणं शक्य असतं? इथं विशेषत: राहिताईंकडून उत्तर अपेक्षित आहे. कारण आतिवास कडून विविध देश, किंवा घटना मार्फत काहीतरी सुरु असल्याचे लेख आलेत. बाकी अधिक्षेपा बद्दल (तसा वाटल्यास) anticipated क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

छान

अर्धवटराव
Sun, 05/08/2016 - 11:28 नवीन
एक त्रस्त अनिंसी संमंध मिपावर वावरत असतो. त्याच्या अगदी काँट्रास्ट अनुभव आला हा लेख वाचुन. कोण, काय, कोणत्या मार्गाने, किती परिणामकारक काम करतो हे अलहिदा. पण अशी प्रेरणा असणारे लोक मनाला फार सुखावतात.
  • Log in or register to post comments

लेख

तिमा
Sun, 05/08/2016 - 11:48 नवीन
लेख आवडला, जरी सगळीच मते पटली नाही तरी.
  • Log in or register to post comments

अत्यंत प्रामाणिक लेख! आवडला!

रातराणी
Sun, 05/08/2016 - 12:18 नवीन
अत्यंत प्रामाणिक लेख! आवडला!
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

बोका-ए-आझम
Sun, 05/08/2016 - 12:50 नवीन
आतिवास यांचे लेख अंतर्मुख करतातच. ताई, ती अफगाणिस्तानवरची मालिका अर्धवटच राहिली की!
  • Log in or register to post comments

अफगाणिस्तान लेखमालिकेवर काम

आतिवास
Sun, 05/08/2016 - 17:48 नवीन
अफगाणिस्तान लेखमालिकेवर काम चालू आहे. अजून थोडी वाट पाहावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अतिशय समतोल लेख. सुरेख

पद्मावति
Sun, 05/08/2016 - 17:21 नवीन
अतिशय समतोल लेख. सुरेख लेखनशैली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आतिवास
Sun, 05/08/2016 - 17:54 नवीन
एस, संदीपभाऊ, गा.पै., यशोधरा, तजो, राही, वैभव जाधव (तुमचे नाव माझ्यासाठी नवे असले तरी प्रतिसादाची शैली ओळखीची वाटते आहे.), अर्धवटराव, तिमा, रातराणी, बोका-ए-आझम आणि पद्मावति.
  • Log in or register to post comments

उत्तर अपेक्षित होतं. असो!

वैभव जाधव
Sun, 05/08/2016 - 19:18 नवीन
उत्तर अपेक्षित होतं. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

लेख आवडला..

जेपी
Sun, 05/08/2016 - 18:10 नवीन
लेख आवडला.. काही प्रमाणात पटला ही..
  • Log in or register to post comments

सुंदर लेख अतिवासताई. आवडला.

अभ्या..
Sun, 05/08/2016 - 18:18 नवीन
सुंदर लेख अतिवासताई. आवडला.
पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान!
हा विचार आपण बाहेरुन गावाकडे पाहताना करतो. जरा गावाच्या आतून विचार केला तर जसजसे गाव विस्तारत जाते दारुची दुकाने गावाबाहेर होत जातात. मध्यवस्तीत, बाजारपेठेत अजूनही दारुचे दुकान नसतेच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आतिवास
Mon, 05/09/2016 - 09:47 नवीन
नेहमीच्या दृश्याकडं वेगळ्या नजरेतून पाहायला हवं - असं लक्षात येतंय. पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करून पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मध्यवस्तीत, बाजारपेठेत अजूनही दारुचे दुकान नसतेच.

मुक्त विहारि
Tue, 05/10/2016 - 13:06 नवीन
आमच्याकडे जरा वेगळे आहे. स्टेशनच्या बाहेर पडलो की लगेच दारूची दुकाने असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

प्रामाणिक लेख

मंजूताई
Sun, 05/08/2016 - 18:23 नवीन
आवडला!आतिवास यांचे लेख अंतर्मुख करतातच. ताई, ती अफगाणिस्तानवरची मालिका अर्धवटच राहिली की!<<<+१
  • Log in or register to post comments

अनुभव कथन व कारणमीमांसा

कानडाऊ योगेशु
Sun, 05/08/2016 - 18:29 नवीन
अनुभव कथन व कारणमीमांसा दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. पटलाही.

अजया
Sun, 05/08/2016 - 18:37 नवीन
लेख आवडला. पटलाही.
  • Log in or register to post comments

अनुभवात्मक लेख आवडला.....

मुक्त विहारि
Sun, 05/08/2016 - 19:24 नवीन
लेख आवडला....
  • Log in or register to post comments

ध्येय आणि स्वतःचा निश्चयात्मक अनुभव यात गोंधळ उडाला आहे

विवेक ठाकूर
Sun, 05/08/2016 - 20:29 नवीन
ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते! उदा. अपांग पिऊन न तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात न आदिवासांची अंधश्रद्धा दूर झाली . इथल्या अज्ञानी (म्हणजे अहंकाराचा उलगडा न झालेल्या सदस्यांना) हे झेपणार नाही आणि ते पुन्हा (नेहेमी प्रमाणे) सैराटतील पण तुमचा हा लेख म्हणजे अहंकाराचं उत्तम उदाहरण आहे. फक्त यशस्वी माघार हे शब्द वापरून स्वतःकडे कमीपणा घेतल्यासारखं केलंय इतकंच. अशा मानसिकतेनं व्यक्ती लोकप्रिय होईल पण आत दुभंग आणि बाहेर काहीतरी भलतं ध्येय गाठण्याची धडपड असा प्रकार होईल . आता सोल्यूशन पटलं तर बघा. जे आत तेच बाहेर ठेवा. मी अपंगा पिणार नाही. किती वेळात देवाचा कोप होतो ते सांगा ? तोपर्यंत मी इथे थांबते ! कारण देवाचा कोप होत नाही हे तुम्हाला माहिती आहे . याचा दुहेरी फायदा आहे . एक, आदिवासींची अंधश्रद्धा दूर होईल आणि दोन, तुम्हाला असले लेख टाकावे लागणार नाहीत. म्हणजे यशस्वी माघार वगैरे मनाची समजूत घालून कुठून सहानुभूती मिळवायची गरज पडणार नाही . शिवाय कार्यकर्ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत तो आणखी एक फायदा . आता हीच गत तुमच्या स्त्री नहाणीच्या उदाहरणाची आहे हे (तुमच्या तरी) सहज लक्षात येईल .
  • Log in or register to post comments

तुम्ही खरंच महान आहात. _/\_

तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 20:34 नवीन
तुम्ही खरंच महान आहात. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

एकसुरी मनाचा हा सुद्धा प्रॉब्लेम असतो

अर्धवटराव
Mon, 05/09/2016 - 00:28 नवीन
त्याच्या ठिकाणी कॉमनसेन्सला थारा नाहि. चालायचच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

एकसुरी मन एकवेळ्ल परवडेल हो.

अप्पा जोगळेकर
Tue, 05/10/2016 - 13:31 नवीन
एकसुरी मन एकवेळ्ल परवडेल हो. नार्सिसिस्ट मनाचे काय करणार ? आता थोड्याच वेळत इथे 'मी,मी,मी,माझी मदनिका,माझे परफेक्शन, ओशो, जीवन जगण्याची कला' वगैरे निरर्थक प्रतिसाद चालू होतील. मनोविकार दुसरं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

प्रतिसादातून विषय सोडून व्यक्तिगत होण्याच्या मानसिकतेला

विवेक ठाकूर
Tue, 05/10/2016 - 13:40 नवीन
मनोविकार म्हणतात. जर मुद्देसूद लिहीता येत नसेल तर उद्विग्न होण्यापेक्षा शांत राहाणे बरे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

थोडं 'स्त्रीदेह, निसर्गाचा

मराठी कथालेखक
Tue, 05/10/2016 - 13:41 नवीन
थोडं 'स्त्रीदेह, निसर्गाचा हेतू' ई आलं की धागा पेटेलच, नहाणीच्या मुद्द्यामुळे थोडा स्कोप आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

स्त्रीयांच्या नहाणीचा विषय लेखिकेलाच हँडल करता आला नाही

विवेक ठाकूर
Tue, 05/10/2016 - 13:50 नवीन
त्यामुळे तो संपलायं इतकं तरी केवळ लेख वाचून लक्षात यायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

(No subject)

मोदक
Tue, 05/10/2016 - 13:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

क ह र !

वैभव जाधव
Tue, 05/10/2016 - 14:03 नवीन
क ह र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हे काका कोण ? लादेन सारखे

अप्पा जोगळेकर
Tue, 05/10/2016 - 14:16 नवीन
हे काका कोण ? लादेन सारखे दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हे काका कोण ? लादेन सारखे

मदनबाण
Wed, 05/11/2016 - 08:13 नवीन
हे काका कोण ? लादेन सारखे दिसतात. हॅ.हॅ.हॅ... किती निरागस प्रश्न ! :P लेख छानच. अफगाणिस्तानच्या पुढील भागाची वाट पहावी का ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अपांग पिऊन न तुम्ही स्वतःशी

बाळ सप्रे
Sun, 05/08/2016 - 20:47 नवीन
अपांग पिऊन न तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात न आदिवासांची अंधश्रद्धा दूर झाली
हे खरं पण परत कधीतरी दुसर्‍या पद्धतीने समजवण्याचा मार्ग कायमचा बंद झाला नाही हा यशस्वी माघारीचा फायदा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

असं होत नाही .......

विवेक ठाकूर
Mon, 05/09/2016 - 00:03 नवीन
जर दुसऱ्याचाच विचार करायचा तर मग माघार घेतली असं वाटतंच नाही. आणि अशी सहानुभूती मिळवण्यासाठी लेख पण लिहावा लागत नाही. घेतली घोटभर अपांग विषय तिथेच संपला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

साहेब,

अप्पा जोगळेकर
Tue, 05/10/2016 - 13:19 नवीन
साहेब, तुम्ही अध्यात्माच्या गफ्फा हाणताय तोवर ठीक आहे. आता ग्राउंड लेव्हलला काम केलेल्या कार्यकर्त्यांवर कशाला तुमच्या अज्ञानाचा चिखल उडवताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

इथे अध्यात्म कुठून आलं ?

विवेक ठाकूर
Tue, 05/10/2016 - 13:42 नवीन
चर्चाविषय नीट समजावून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

व्वा..

चिगो
Tue, 05/10/2016 - 14:29 नवीन
चांगला मार्ग आहे.. पण त्यांचं काय ध्येय आहे, हे लक्षात घेतलं का? अंधश्रद्धा (इथे हा शब्द योग्य नाही खरेतर, कारण कि ज्या गोष्टीमुळे दुसर्‍याला नुकसान होत नाही तिला मी श्रद्धा मानतो. जेव्हा तुमच्या श्रद्धेमुळे तुम्ही कुणालातरी नुकसान पोहचवता, ती अंधश्रद्धा. असो.) अंधश्रद्धा निर्मुलन हा हेतु नसून, समजा, कुठल्या तरी सरकारी किंवा कल्याणकारी योजनेचा प्रचार/प्रसार करणे आणि त्यात लोकांचा सहभाग वाढवणे, हा हेतू असेल तर त्यांनी केलेली कृतीच योग्य आहे.. अनुभव आणि विचार शेअर केल्याबद्दल धन्यवाद, आतिवासताई.. लेख आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तेच तर म्हणतोयं !

विवेक ठाकूर
Tue, 05/10/2016 - 14:55 नवीन
जर आदिवासींच्या भल्यासाठी त्या काही काम करतायंत तर मग घोट भर अपांग घेतल्यानी तत्वच्युत झाल्यासारखं वाटायचं कारणच नाही. किंवा मग माझ्या घरात देव नाही, मी वास्तुशांत केली नाही इतकी लांबण लावून उदघाटनाला देवाची आरती केली सांगायचंही प्रयोजन नाही. त्यांना कामासाठी तडजोडी कराव्या लागतात तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्याला यशस्वी माघार वगैरे म्हणत नाहीत हे नक्की. तो त्यांचा वैचारिक गोंधळ आहे, माघार नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

तुम्ही अगदी योग्य बोलत आहात.

तर्राट जोकर
Tue, 05/10/2016 - 15:14 नवीन
तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. अगदी अगदी. संपूर्ण समर्थन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कळतंय का बघा..

चिगो
Tue, 05/10/2016 - 15:46 नवीन
मला समजा, आदिवासींनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावं, म्हणून काम करायचंय. त्या दृष्टीने मी एका पाड्यात आलो. आता त्या पाड्यात पाहुण्याच्या स्वागताला दारु द्यावी वा 'तामुल' द्यावं, अशी प्रथा आहे. आता मी जर दारुचा घोट किंवा तामुलचा तुकडा घेतला नाही, तर मी त्यांना दुखावतो, आणि ते माझं ऐकणार नाहीत किंवा लाजेकाजेनं ऐकलं तर प्रतिसाद देणार नाहीत. ( कार्यकर्त्याला हे परवडत नाही) मी दारु पित नाही, पण मला ठाऊक आहे की एवढ्याश्या दारु पिण्याने मी बेवडा होणार नाही, आणि मुख्य म्हणजे एवढ्या दूर तंगडतोड करुन आल्यावर माझ्या घोटभर दारु घेण्यापेक्षा 'लार्जर गुड अ‍ॅन्ड लार्जर गोल' जस्त महत्त्वाचा आहे, तर मी माझ्या तत्वांना घातलेली मुरड ही 'यशस्वी माघार'च आहे, कारण कि माझ्या माघार घेण्याने मी यशाकडे पाऊल टाकतोय. त्यांनी नहाणीच्या बाबतीत जे म्हटलंय, त्याचा टायटलशी(च) संबंध जोडून वाचल्याने तुम्ही त्या मुद्द्यावर जाताय. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, कि त्यात त्यांना एक नवा धडा मिळाला. हे बरेचदा होतं. लोकांसोबत आणि खासकरुन आदिवासी लोकांसोबत काम करणार्‍या कुठल्याही व्यक्तीला ठाऊक असतं की त्यांना कुठलीही नवीन गोष्ट करायला लावणे हे महाकठीण काम आहे. त्यामुळे मी आतिवासताईंनी जे सांगितलंय त्यातला योग्य तो मथितार्थ घेतोय. जे स्पष्ट आहे, त्याला आपल्या मनाने नवीन लेबलं लावून त्यावर कुंथत बसायला मला वेळ नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कळतंय का बघा..

अर्धवटराव
Wed, 05/11/2016 - 01:17 नवीन
नोप्स :प आता बोंबला एक संवेदनशील व्यक्ती आपल्या परिने प्रामाणीकपणे समाजकार्य करते, व त्यातले भले-बुरे अनुभव मिपा वर शेअर करते. आता यात अ‍ॅक्चुअल प्रांजळपणा दिसायला हवा. पण सहानुभुती मागणे, मानसीकता हुकणे वगैरे सुरु झालं तर काय कप्पाळ दिसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

+१ लेख आवडला.

शलभ
Wed, 05/11/2016 - 02:01 नवीन
+१ लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

@ चिगो,

विवेक ठाकूर
Wed, 05/11/2016 - 11:11 नवीन
माझ्या घोटभर दारु घेण्यापेक्षा 'लार्जर गुड अ‍ॅन्ड लार्जर गोल' जस्त महत्त्वाचा आहे, तुमचं उदाहरण काल्पनिक असलं तरी त्याबद्दल वादच नाही. त्यांनी निवडलेल्या कामामुळे, नोकरी (किंवा एनजीओ काय असेल ते) टिकवण्यासाठी अशा तडजोडी करायला लागत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याला यशस्वी माघार वगैरे म्हणता येत नाही. आणि त्या जर केवळ अदिवासींच्या हितासाठी केल्या असतील तर मग त्यात यशस्वी माघार वाटण्याचं कारणच नाही. इतक्या महान धेयापुढे एक घोट अपांगनं काय फरक पडतो? थोडक्यात, मी देव मानत नाही पण उदघाटनाला मनोभावे आरती करते. मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह असतांना मी दारु घेतली. (आणि इथे लेख टाकला). मी (इतकी तत्वनिष्ठ तरी) `यशस्वी माघार' घेतली. हे म्हणजे आपण केलेल्या कृत्याबद्दल मनात असलेला गोंधळासाठी, स्वसमर्थनार्थ धागा काढून इतरांचा सपोर्ट मिळवणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

असोच..

चिगो
Wed, 05/11/2016 - 12:53 नवीन
आपली मते, ह्या विषयावरची, चुकीची वाटत असली तरी आदर आहेच.. पुढेमागे लोकांमध्ये आणि लोकांसाठी त्यांना महत्त्वाच्या वाटत नसलेल्या पण त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर काम करायचा चान्स आपल्याला आला तर आतिवासताईंची माघार 'यशस्वी' का होती, हे आपल्याला कळेल अशी अपेक्षा करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा