आंबे - जनातले, मनातले.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
२०११ च्या मे महिन्यातले दिवस, बायको आंब्याच्या दुकानात बसली होती. समोरून एक ओळखीचे काका आले, ओळखीचे म्हणजे आम्ही त्यांना ओळखायचो, ते बहुधा आम्हाला ओळखत नसावेत. बरोबर त्यांचे दोन समवयस्क. आंबा कसा? म्हणून त्यांनी विचारले, बायकोने काय ते दर सांगितले. त्यांनी आंबा हातात घेतला,
"हा कर्नाटक आहे" - बायको आ वासून.
"काय हो कसा काय?"
"ही काय या आंब्याला चोच दिसतेय, रत्नागिरी हापूसला हे चोच नसते"
टाकूनिया बाबा गेला.. आम्ही मनातल्या मनात त्या काकांना सास्टांग नमस्कार घातला. आजही ते काका दिसले नकळत रस्ता बदलला जातो. काय करणार? त्यांचे ते दोन मित्र मात्र आमच्याकडून न चुकता आंबे घ्यायचे.
दुकानाचे पहिलेच वर्ष असल्यामुळे बरेच इरसाल लोक भेटले, एक भाऊ असेच, दुकानात आले, बराच वेळ सगळ्या बाजूने आंबे बघितले, आणि शेवटी महाग आहेत म्हणून परत गेले. थोड्या वेळाने परत आले, बायकोने "समजावून" पाठवले होते. नंतर कळले की त्यांची बायको म्हणजे आमचे १० वर्षांपासूनच्या एका गिर्हाईकाची बहीण. आता आमचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. पण प्रत्यक्ष फिल्डवर काम करायला लागल्यावर आंब्याबद्दलचे लोकांचे बरेच गैरसमज कळायला लागले.
एक ताई, आंबे खराब झाले म्हणून बदलायला घेऊन आलेल्या, ३० आंब्यांपैकी २ आंबे खराब निघाले होते. त्यांना म्हटले कधी नेले होते? म्हणाल्या झाले असतील ४ दिवस. आम्ही चार दिवसात हा आंबा कसा कुसला असा विचार करत रिप्लेसमेंट शोधायच्या तयारीत, तर बायको काहीतरी संशय आल्यामुळे तिच्या वहीत हिशोब बघत, आणि अचानक युरेका मोमेंट आला,
"अहो ताई तुम्ही आंबे नेउन १५ दिवस झाले" - इति बायको
"अहो असेल, पण आज काढले तर खराब झाले होते"
मी कोपरापासून हात जोडण्याच्या तयारीत, पण तेव्हढ्यात मागून पुढचा बाऊंसर पडला
"म्हणजे तुम्ही पंधरा दिवस आंबे त्या बॉक्समध्येच ठेवले होते?" - बायको
"हो". आता मात्र मी कोपरावरून ढोपरावर आलेला. अखेरीस दोन आंब्यांवर त्या ताईंची बोळवण करून आम्ही हुश्श.
अजून एक मावशी, तुमचे सगळ्यात स्वस्त असतील ते आंबे द्या, म्हणून खराब व्हायला आलेले आंबे १००रु डझन ने घेऊन जायच्या, आणि दुसर्या दिवशी त्यातले ६ खराब निघाले म्हणून ६ अजून न्यायच्या. इमानदारीने त्यांचा हा क्रम चालू होता. दुकानातला मुलगा पुढेपुढे तर त्या बाई दिसल्या की दिवसाप्रमाणे ते १२ किंवा ६ आंबे काढून ठेवायचा.
अर्थात हे झाले दुकानातले लोक. पुढे घरातून व्यवसाय सुरू केल्यावर तर आणखीनच गमतीशीर लोक भेटू लागले. त्यातील एक जमात म्हणजे "घरी पोचवता का" वाली जमात. हे महाशय राहणार दोन ढेंगांवर, बाकी सगळ्याला बेश फिरायला वेळ असतो, पण साहेबांना आंबे मात्र हवेत घरात आणून. त्यातला एक आंबा जरी खराब निघाला तरी घरी रिप्लेसमेंट पाहिजे. पण बाकी या लोकांनी शिकवले बरेच, आता सरळ मी ढिस्क्लेमरच छापून घेतला आहे, "आंबा नाशिवंत वस्तू आहे, १० टक्के खराब झाल्यास तुमची जबाबदारी, त्यापुढे आमची जबाबदारी" अश्या अर्थाचा.
त्यावरून आठवले, मध्ये साईट वरून कोणीतरी नवौद्योजकाने फोन केला, "आमची डिलिव्हरी, आमची वेबसाईट आणि ३०% कमिशन". ४ दिवस फोने करून पिडले. शेवटी मी म्हणले बाबा मान्य आहे, माझ्या २ अटी आहेत,
१. तू भारतभर आंबे पाठवणार, ते ट्रान्झिटमध्ये अडकले आणि खराब झाले तर जबाबदारी कोणाची,
२. आंबे बाहेरून चांगले आहेत की नाहीत हे कळत नाही, त्यामुळे तू दिल्लीला आंबे पाठवले, आणि त्यातले २०% खराब निघाले तर रिप्लेसमेंट पोचवण्याची जबाबदारी कोणाची
या प्रश्नांची उत्तरे दे, मग आपण कोंट्रेक्ट करू, आजतागायत तो परत आलेला नाही.
बाकी आंबे खायला घोड्यावरून येणार्यांची मला नेहमीच गंमत वाटते, रावसाहेब सकाळी उठतात, आणि म्हणतात आज रसाला आंबे पाहिजेत, की आम्हाला फोन, दुपारला खायला आंबे पाहिजेत. आता असले तर द्यायला आमचे काहीच जात नाही. पण नसले तर कुठून देणार? आम्ही काय आंबे पिकवायचे यंत्र ठेवले नाही, की घातला आंबा आत की आला पिकून. पण हे त्यांना कोण समजावणार? अक्षयतृतियेच्या वेळेस तर असे लोक हमखास भेटतात. मुहूर्ताला तरी आंबे द्या म्हणून.. (आम्ही स्वगत . इतके दिवस काय झोपा काढत होतास काय रे?) पण काय करणार.. देतो त्यांना खाऊचे आंबे वरती ४, मुहूर्ताला.
परवा एक माणूस आला, आंबे बघितले, अगदी छान आहेत वगैरे सांगून झाले, आणि मग, सुरू झाला मुख्य पार्ट - घासाघीस. आम्ही १५ बोक्स घेणारोत पासून सुरू करून शेवटी अगदी अहो मला त्या अमुक अमुक महाराजांना द्यायचे आहेत हो, जरा तरी कमी करा म्हणून भावनिक आवाहन करणार. आता आम्ही पण नास्तिक नव्हे, पण अमुक महाराजांना मला काही द्यायचे असेल, तर मी माल चांगला द्या म्हणून सांगेन. स्वस्तात घेऊन एखाद्याने सबस्टँडर्ड माल दिला तर जबाबदारी कोणाची? एखाद्याने दराची घासाघीस केली की त्याला कुठेतरी ते भोगायला लागतेच, या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस. अशी गिर्हाईके नेहमी लक्षात राहतात.पुढच्या वेळेस त्यांना १००रु धीच जास्ती सांगतो. त्याला पण घासाघीस केल्याचे समाधान आणि मला पण दर टिकवल्याचे.
पुढचे लोक असतात ते डाग दाखवणारे.. अरे जर आमच्या आंब्याला डाग नसते तर आम्ही एक्सपोर्ट केला नसता का? पण आता आम्ही पण उत्तरे द्यायला शिकलोय, "सर डाग आहेत कारण आम्ही जास्ती कीटकनाशके वापरत नाही". आता आम्ही कीटकनाशके जास्त वापरत नाही ही गोष्ट खरीच आहे. त्यामुळेच डाग पडतात हे पण खरेच आहे. पण त्याचा असा पुरावा म्हणून वापर करायचा हे मात्र आम्हाला गिर्हाईकांनी शिकवले.
अजून एक असतात ते म्हणजे "तो कर्नाटकचा आंबा कसा ओळखायचे हो?" वाले.. आता आम्हालाच जर कर्नाटक ओळखता येत नाही तर आम्ही त्यांना काय सांगणार दगड? पण आम्ही आपले काहीतरी सांगून वेळ मारून नेतो झाले. आता परवा टाईंम्स ऑफ इंडियावाल्याचा फोन आला.. त्याला ऑनलाईन आंबाविक्रीवर काहीतरी आर्टिकल छापायचे होते.. मला म्हणे कार्बाईडचा आंबा कसा ओळखायचा? आता मी काय सांगणार? आता या प्रश्नांना उत्तरे नाहीत त्याला मी तरी काय करणार? शेवटी सांगितले की कार्बाईडच्या आंब्यापासून सावध राहायचे असेल तर कच्चा आंब घरात घेऊन या.
असो - ऑनलाईनचे किस्से अजून एका वेगळ्या लेखात.
अवांतर - हा लेख म्हणजे माझी जाहिरात समजावी, आणि माझ्याकडे ओर्डरींचा पाऊस पाडावा ही नम्र विनंती :)
वेळ मिळाला तर क्रमशः
प्रतिक्रिया
खूप छान धागा. कुठे करायची
..
पुभाप्र ...
कार्बाइडचे आंबे समान रंगाचे
माझ्याकडचे देखील पिवळे आंबे
पुढच्या लेखात आंबे, त्याची
आनंदाभाऊ, तुमचे दुकान कुठे
दुकान नाही ताई, सिंहगड रोडवर
धन्यवाद, बघते साईट.
हो आणि एवढी जाहीरात केलीये
त्यासाठी माझ्या बायकोशी
तुमचे दुकान सिंहगड रोडला कुठे
आमचे घर कम दुकान
कृ हा प्रतिसाद उडवावा ही
असू द्या हो. तुमच्या या
आवडले आंबापुराण. दरवर्षीच्या