✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अगम्य

म
मृत्युन्जय यांनी
Sat, 04/09/2011 - 11:39  ·  लेख
लेख
काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो. ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो. तब्बल १६ वर्षांनंतर गोखले रोडही एकाएकी नविन वाटत होता. अगदी शाळेजवळ पोचलो तरीही जुन्या ओळखीच्या खुणा सापडेनात. चकाचक रस्ते (हा आनंद बेडेकर कॉलेजकडे जाताना गळुन पडला ही गोष्ट वेगळी), जरा वाइच सरकुन घ्या पावणं असे म्हणुन दाटीवाटीने एकमेकांत घुसलेली दुकाने, बैठ्या इमारतींच्या जागी उभ्या राहिलेल्या उंच इमारती. काहीच तसे नव्हते जसे मला आठवत होते. माझ्या आठवणीत मल्हार टॉकीजचा चौक मोठा होता पण एवढी रहदारी नव्हती तेव्हा. पॉटहोल्स चुकवत चुकवत रस्ता शोधायला लागायचा, तो आता चकाचक झाला होता. चौकाच्या कडेला एके ठिकाणी ४-५ झाडे होती ती आता बहुधा कुठल्यातरी होळीच्या कामी आली होती. त्यांच्या आडोश्याने असलेल्या सावलीच्या जागी उन्हाच्या काहिलीत आता ४-२ वहाने उभी दिसत होती. इमारती उंच झालेल्या होत्या आणि आठवणीतल्या खुणा खुज्या भासत होत्या. सगळं सगळं बदललं होतं. हे माझ्या आठवणीतले ठाणे नव्हतेच. रखरखीत, शुष्क, अनोळखी शहरात आल्यासारखे वाटले पटकन. शाळेची बिल्डींग दिसली मात्र कसं बरं वाटलं. १५-१६ वर्षानंतर सुद्धा शाळेची इमारत ती तशीच होती. ३ मजली. समोर छानसं पटांगण. कसं एकदम थंड हवेची झुळुक अंगावरुन फिरल्यासारखे झाले. असेही मीटिंगच्या वेळेच्या आधीच पोचलो होतो. त्यामुळे सहकार्‍यांना आलोच २ मिनिटात म्हणुन सटकलो. थेट शाळेत गेलो. छोटे मोठे बदल लगेच डोळ्यात भरले. सायकल स्टँड आता मोठे भासत होते आणि मैदान छोटे. ते वर्गांकडे जाण्याचे रस्ते मात्र तसेच होते. कोणाचे लक्ष नाही बघुन पटकन वरती शिरलो. ८ वीच्या माझ्या वर्गात शिरलो. तो वर्ग डोळे भरुन बघुन घेतला. तसाच उठुन ९-१० च्या वर्गात गेलो. एकेकाळी मोठा भासणारा वर्ग का कोणास ठावूक छोटा वाचत होता. याच वर्गात ७० मुले बसायची हे खरे वाटेना. हळुच माझ्या बाकापाशी जाउन आलो. बाकावरच्या खुणा आता पुसल्या गेल्या होत्या. बाकांवर ---- बदाम ---- नव्हते असे नाही पण नावे वेगळी होती. मॉम्या (हे वर्गातल्या एका फेमस जोडीच्या आद्याक्षरांचा संक्षिप्त रुप होते) लिहिलेली बाके पण सापडली नाहीत. भिंता आता खरवडलेल्या होत्या. वर्गातल्या जोड्या तिथे कधीकाळी कोरलेल्या होत्या ते आता फक्त आठवणीतच होते. बाकावर बसण्याचा मोह मला अनावर झाला. पटकन बंद केलेल्या खिडक्या उघडुन मी बाकावर बसलो. तोच बाक. तिच जागा. खिडकीतुन बाहेर दिसणारे दृष्य मात्र आता बदलले होते. शाळेच्या मागच्या विस्तीर्ण पटांगणावर आता क्रीडासंकुल बांधले होते. आमच्या वेळेस असल्या चैनी नव्हत्या. २ मिनिटे बसलो आणि मग मात्र उठलो. तो बाक आता नक्कीच १० वी अ च्या मुलींनी पटकवलेला असणार. आमच्या बॅचमध्ये फक्त ती बाजू आणि ती खिडकी मुलांच्या वाट्याला कशी आली होती देव जाणे. एरवी खिडकी पटकवण्यात मुलीच जास्त हुषार असायच्या. त्यामुळे मुलींच्या बाकावर भलताच अनोळखी माणूस बघुन गैरसमज नको व्हायला ;) खाली उतरुन थेट मागच्या पटांगणात गेलो. प्रचंड विस्तीर्ण पटांगणाचा अर्धा भाग आता क्रीडासंकुलाने व्यापलेला होता. मला उगाच गलबलुन आले त्या मोठ्या पटांगणाच्या आणि त्याच्या एका बाजुने असलेल्या चिंचेच्या झाडाच्या आणि विहीरीच्या आठवणीने. एकदा एका शिपायाने त्या चिंचेच्या झाडावर दगड मारुन चिंचा पाडताना बघितले होते आणि खवचटपणे "काय रे कितवा महिना चालु आहे?" असे चारचौघात विचारुन इज्जत घालवली होती. ते आठवुन हसु सुद्धा आले (त्यावेळेस मात्र मी त्याच्याकडे फुरफुरणार्‍या बैलासारखे बघितले असणार). परत फिरलो. आजुबाजुला कोणीच दिसेना. परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शुकशुकाट होता. जुन्या आठवणी जागवणारे कोणीच उरले नव्हते. उगाच ५ मिनिटे थांबुन शाळेतला एखादा जुना मित्र एखादी वर्गभगिनी दिसतेय का ते बघत राहिलो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोण शाळेत येणार होते म्हणा? मला उगाच घुटमळताना पाहुन वॉचमनने शेवटी काय पाहिजे म्हणुन विचारले. मी उगाच मागच्या क्रीडासंकुलाची चौकशी केली. मी शाळेत असताना ते नव्हते म्हणुन पुस्तीही जोडली. बोलता बोलता त्यानेच सांगितले की सुट्ट्या लागल्या आहेत म्हणुन. निघता निघता तो म्हणाला मुख्याध्यापिका बाई आहेत पाहिजे असेल तर भेटुन घ्या, आत्ता निवांत असतील. जाउ की नाही हा विचार करत करतच त्यांच्या केबिनपाशी पोचलो. आतमध्ये बर्वे बाई होत्या. आम्हाला संस्कृत शिकवायच्या. मला कधीच नाही आवडल्या. उगाच एकदा त्यांनी मला मारले होते. मित्राची चुगली केली नाही म्हणुन. मी शेंगा खाल्या नाही , टरफले उचलणार नाही आणि कोणी खाल्या ते सांगणार पण नाही हे तोंड वर करुन सांगणार्‍या टिळकांचे यांना कौतुक. आम्ही मात्र आगाऊ (टिळकांचा तो बाणेदारपणा आमची ती अतिहुषारी). पण हे त्यावेळेस बोलण्याची हिंमत नव्हती. आज १५ वर्षांनंतर मात्र मला बघुन त्यांच्या चेहेर्‍यावर कुठलेही आखडु भाव दिसले नाही. त्यांनी मला ओळखले नाही हे तसे स्वाभाविकच होते म्हणा. मी कधीही हुषार विद्यार्थी नव्हतो. मवालीही नव्हतो. क्रीडा, वक्तृत्व, कला, संगीत, विज्ञान यांपैकी कशातही कधी चमकलो नव्हतो. माझ्या शालेय आयुष्यातला सर्वोच्च फेम मोमेंट म्हणजे सलग दोन परीक्षांत (म्हणजे चाचणी आणि सहामाही) ९ वी अ मध्ये गणितात नापास झालेला पहिला विद्यार्थी म्हणुन स्टाफ रुम मध्ये शिक्षकांमध्ये झालेली चर्चा . त्यामुळे बाईंनी मला ओळखले नाही यात काहीही आश्चर्य वाटले नाही. उगाच जोशी, बापट, भावे असली काहीतरी आडनावे फेकुन त्यांनी मला ओळखण्याचा केलेला क्षीण प्रयत्न थांबवण्यासाठी मीच त्यांना माझे नाव आणि बॅच सांगितली. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. तुम्ही मुले खुप चांगली होता रे. ही आत्ताची बॅच म्हणजे ना.... असे म्हणुन बाईंनी नवीन पिढीच्या मुजोरपणाची चार पाच प्रातिनिधीक उदाहरणे पण दिली. ८ वी पर्यंत सरसकट सगळ्यांना पुढे ढकलण्याच्या निर्णयावर आम्ही दोघांनीही निषेध नोंदवुन झाला. गाडी हळुहळु सगळ्या जुन्या शिक्षकांकडे वळली. अगोटी रिटायर झाले. राजे मॅडम पण गेल्या. ऑफ पिरीयडला सुरेख गोष्टी सांगणार्‍या आंबेकर बाईसुद्धा महिन्यापुर्वीच निवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तुझ्या पिढीचा मी एकमेव पुरावा उरले आहे बघ म्हणाल्या. का कोणास ठावूक जाताजाता मला बाईंना नमस्कार करावासा वाटला. पुढच्यावेळेस येशील तेव्हा जोडीने ये म्हणाल्या. फाटकाबाहेर पडल्यावर आता किती वर्षांनी शाळा दिसणार हा प्रश्न मनात भरुन राहिला होता. खरे म्हणजे मी काही कुठल्या गोष्टींमुळे नॉस्टेल्जिक होणारा नाही. गेले ते दिन गेले म्हणुन फारशी कधी खळखळही करत नाही. पण त्या ३० मिनिटाच्या शाळाभेटीने उण्यापुर्‍या ३० वर्षांच्या आयुष्यात मला खुप प्रौढ झाल्यासारखे वाटले. काहीतरी खुप महत्वाचे खुप आनंदी दिवस, क्षण हातातुन निसटुन गेल्याची भावना झाली. आईशप्पथ सांगतो, बर्वे बाईंना बघुन कधी आनंद होइल असे वाटले नव्हते. पण काल त्यांना भेटुन खुप आनंद झाला. माझ्या आणि शाळेतल्या आठवणींमधला शाळेत असणारा तो एकमेव जिवंत दुवा होता. पुढच्या वेळेस शाळेत जाइन तेव्हा कदाचित निवृत्त मुख्याध्यापकांच्या यादीत अजुन एक नाव जोडले गेलेले असेल. आणि खरे सांगतो त्यावेळेस मला खरेच खुप वाईट वाटेल. न आवडणार्‍या बाईंपासुन निवृत्तच होउ नयेत असे वाटणार्‍या मुख्याध्यापिका हे असे स्थित्यंतर का झाले हे काही मला उगमलेले नाही बघा. तुमच्या आयुष्यात कधी असे झालय का हो?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6528 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

खुप खुप मस्त लिहिलय... मी

हरिप्रिया_
Sat, 04/09/2011 - 11:51 नवीन
खुप खुप मस्त लिहिलय... मी माझ्या शाळेतच जाऊन आले तुमच्यामुळे,मनाने... :)
  • Log in or register to post comments

आईशप्पथ सांगतो, बर्वे बाईंना

विनायक बेलापुरे
Sat, 04/09/2011 - 11:55 नवीन
आईशप्पथ सांगतो, बर्वे बाईंना बघुन कधी आनंद होइल असे वाटले नव्हते. पण काल त्यांना भेटुन खुप आनंद झाला. माझ्या आणि शाळेतल्या आठवणींमधला शाळेत असणारा तो एकमेव जिवंत दुवा होता.
:) नॉस्टाल्जियाच ...... मस्तच
  • Log in or register to post comments

हम्म...मी सुद्धा भारत सोडताना

शिल्पा ब
Sat, 04/09/2011 - 12:21 नवीन
हम्म...मी सुद्धा भारत सोडताना गिरगावातल्या शाळेला भेट देऊन आले...फारसं काही बदललं नव्हतं तरी सगळंच बदलल्यासारख वाटलं. बाकी लेख छान.
  • Log in or register to post comments

आ हा हा.. खल्लास रे

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/09/2011 - 15:01 नवीन
आ हा हा.. खल्लास रे मृत्युंजया. आठवणींच्या सरी मस्त भिजवुन गेल्या :)
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Sun, 04/10/2011 - 02:57 नवीन
असंच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्त लिहिलय. मलाही पुण्यात

रेवती
Sat, 04/09/2011 - 17:19 नवीन
मस्त लिहिलय. मलाही पुण्यात गेल्यावर असंच वाटतं. सगळं बदलल्यासारखं........तरीही शाळेत जायचा योग एकदाच आला होता. तेही शाळेच्या हापिसात. जुन्या बाई तर कोणत्याही दिसल्या नाहीत पण एक दोन नवीन शिक्षिका दिसल्या. अंगभर दागिने, चमकार साड्या, हातभर बांगड्या अश्या वेषभुषेत. असलं काही शाळेत गॅदरींगशिवाय घालून आलं म्हणजे बाई रागवायच्या.......अभ्यासातलं लक्ष उडेल म्हणून. नववीत असताना मी दोन दिवस बांगड्या घालून गेले आणि मुख्य म्हणजे तासाला लक्ष नव्हतं म्हणून बाईंनी स्प्ष्टपणे तसं सांगितलं होतं. तेवढच काय ते मी माझ्या शालेय जीवनात रागावून घेतल्याने फार अपमान वाटला होता.;) आता या नव्या शिक्षिका पाहून फारसा आनंद झाला नाही.
  • Log in or register to post comments

आता या नव्या शिक्षिका पाहून

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/09/2011 - 17:31 नवीन
आता या नव्या शिक्षिका पाहून फारसा आनंद झाला नाही.
सध्याच्या पिढीचे मत अगदी विरुद्ध असु शकेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छान लिहिलं आहे, मी मध्यंतरी

५० फक्त
Sat, 04/09/2011 - 18:12 नवीन
छान लिहिलं आहे, मी मध्यंतरी सासरी गेल्यावर बायको मला व पोराला तिच्या शाळेत घेउन गेली होती आणि त्यांनी इ. ८वीत नाच केला होता तसा करुन दाखवला. एका गोष्टीचा उलगडा झाला तिथल्या स्टेजवरच्या फरश्या का तुट्ल्या आहेत. बाकी, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
  • Log in or register to post comments

मृत्युंजयांचा.....

प्रास
Sat, 04/09/2011 - 18:29 नवीन
आठवणींच्या हिंदोळ्यांवर एक तास....... छान, मजा आली वाचताना..... शाळेसमोरच्याच घरात राहणारा (त्यामुळे झालेले बदल तात्काळ टिपल्याने अशा अनुभवांपासून वंचित) -
  • Log in or register to post comments

मस्त रे!

फारएन्ड
Sat, 04/09/2011 - 23:51 नवीन
आवडले एकदम. बर्‍याच वर्षांत शाळेत, कॉलेजात गेलो नाही. जायला पाहिजे एकदा.
  • Log in or register to post comments

मस्त रे मृत्युंजया. शाळेचा

गणपा
Sun, 04/10/2011 - 02:57 नवीन
मस्त रे मृत्युंजया. शाळेचा विषय निघाला की नॉस्टॅल्जिक व्हायलाच होतं. :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय... शिवाय आपली

मराठे
Sun, 04/10/2011 - 06:35 नवीन
मस्त लिहिलंय... शिवाय आपली शाळा एकच त्यामुळे जास्त आवडलं!
  • Log in or register to post comments

केवळ आणि केवळ अप्रतिम....

स्पा
Sun, 04/10/2011 - 09:09 नवीन
केवळ आणि केवळ अप्रतिम....
  • Log in or register to post comments

मस्त

प्रमोद्_पुणे
Sun, 04/10/2011 - 12:07 नवीन
छान लिहिलय..
  • Log in or register to post comments

छानच लिहिलं आहे रे!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/10/2011 - 12:33 नवीन
छानच लिहिलं आहे रे! नॉस्टल्जिया म्हणजे सुखावणारी हुरहुर. जखमेवरची खपली पडताना कसे तिथे दाबले खाजवले की थोडेसे दुखते पण छान वाटते, तसेच अगदी. अभावितपणे माझ्या अनुभवांशी तुलना करायला लागलो. आता माझी शाळाच काय, माझे गावही इतके बदलले आहे की मला ते आता कोणत्याही अँगलने आपले वाटत नाही. शाळेचा चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे. काही शिक्षक / शिक्षिका आहेत. पण काहीच. बहुतेक नाहीतच. दहावी नंतर पंचवीस वर्षांनी भेटलो ( http://www.misalpav.com/node/5800 ), ते पण शाळेत नाहीच. दुसरीकडेच. असो.
  • Log in or register to post comments

हा धागा १५ प्रतिसाद पाहिल

मृत्युन्जय
Mon, 04/11/2011 - 09:52 नवीन
हा धागा १५ प्रतिसाद पाहिल असे वाटले नव्हते. मनातल्या भावना जश्या होत्या तश्या उतरवल्या होत्या. शाळा म्हटले की सगळेचजण नॉस्टेल्जिक होतात बहुधा.
  • Log in or register to post comments

अगदी माझ्या मनातल्याच

मदनबाण
Mon, 04/11/2011 - 10:10 नवीन
अगदी माझ्या मनातल्याच भावना... काही दिवसांपूर्वीच मी माझ्या शाळेत एक चक्कर टाकुन आलो होतो.ज्या वर्गात मी बसायचो तो पाहुन जो आनंद झाली की तो शब्दात मांडताच येणार नाही. (मो.ह.विद्यालय ठाणे)
  • Log in or register to post comments

अशा लेखांमुळेच मिपा मनापासून

उगा काहितरीच
Sun, 07/12/2015 - 21:52 नवीन
अशा लेखांमुळेच मिपा मनापासून आवडते .
  • Log in or register to post comments

हेच म्हणायचे आहे.

पद्मावति
Sun, 07/12/2015 - 22:05 नवीन
हेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

खूप मनापासून लिहीलं आहे हे.

प्यारे१
Mon, 07/13/2015 - 00:48 नवीन
खूप मनापासून लिहीलं आहे हे. मखमली, मोरपिशी, तरल.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बहुगुणी
Mon, 07/13/2015 - 07:30 नवीन
२०११ मधला हा धागा तेंव्हा सुटला होता नजरेतून, चांगला लेख वरती आणल्याबद्दल 'उगा काहीतरीच' यांचे आभार!
  • Log in or register to post comments

छान लेख आहे.

Rahul D
Mon, 05/02/2016 - 01:18 नवीन
छान लेख आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. लेख वरती

मृत्युन्जय
Mon, 05/02/2016 - 13:16 नवीन
धन्यवाद. लेख वरती काढल्याबद्दलही आणि प्रतिसादाबद्द्दलही. या निमित्ताने सर्वच वाचक प्रतिसादकांचे आभार. या शेवटच्या भेटीनंतर परत शाळेत जाण्याचा योग आलेला नाही. एकदा ठाण्याला भेट दिली पाहिजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D

हा धागा निसटला होता

एस
Mon, 05/02/2016 - 13:30 नवीन
हा धागा निसटला होता वाचण्यातून. मोरपिशी लिहिलेय.
  • Log in or register to post comments

वर्गभगिनी काय ? असू दे असू दे

मराठी कथालेखक
Mon, 05/02/2016 - 15:31 नवीन
वर्गभगिनी काय ? असू दे असू दे :)
  • Log in or register to post comments

सुंदर लेख... अगदी नॉस्टॅल्जिक

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 15:35 नवीन
सुंदर लेख... अगदी नॉस्टॅल्जिक केलं.
  • Log in or register to post comments

आवडला.

सस्नेह
Mon, 05/02/2016 - 15:44 नवीन
हळवे क्षण टिपणारा भावुक लेख !
  • Log in or register to post comments

उत्तम स्मरणरंजन

वाचक
Mon, 05/02/2016 - 16:12 नवीन
सरस्वती सेकंडरी स्कूल - कधीची बॅच म्हणे तुमची?
  • Log in or register to post comments

भारी लिहिलेत हो मृत्युंजय

अभिजीत अवलिया
Fri, 05/06/2016 - 07:15 नवीन
भारी लिहिलेत हो मृत्युंजय साहेब. मला देखील स्वताच्या शाळेची आठवण आली.
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिले आहेस मृ.

यशोधरा
Fri, 05/06/2016 - 07:57 नवीन
मस्तच लिहिले आहेस मृ.
  • Log in or register to post comments

खंग्री लिखाण

नाखु
Fri, 05/06/2016 - 08:59 नवीन
वर्षापुर्वीच शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या रौप्यमहोत्वसानिमित्त टिळक स्मारक मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली. बर्याच वर्गमित्रांना (मोजक्याच मैत्रींणींना-उगा खोटं खोटं लोकाग्रहास्तव वर्गभगिनी असं आता तरी म्हणू नये)भेट झाली. वर्गशिक्षीका/मास्तर यांना जरा जुन्या आठवणींचा/ठेवलेल्या नावांचा संदर्भ दिल्यावर काहीशी ओळख पटली (आणि मधली ३३ वर्षे गळून पडली) गोपाळ हाय्स्कूल माजी विद्यार्थी नाखु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा