✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पांडुरंग/पौंड्रक,आणि विट्ठल??

ख
खालीमुंडी पाताळधुंडी यांनी
Mon, 05/02/2016 - 16:19  ·  लेख
लेख
जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला. लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय, http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय. >>> महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन संशोधकांनी श्रीविट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरेतर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्रीविट्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे, यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्रीविट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणून पुजतो आहोत. भजतो आहोत. खरेतर संशोधकांनी पंढरपूरच्या पांडुरंग विट्ठलाचे मूळ शोधायचे असेल तर पांडुरंग, पंढरपुर, पौन्ड्रिक क्षेत्र आणि पुंडरिक या शब्दांवर, त्यांच्या व्युत्पत्तींवर सर्वप्रथम विचार करायला हवा होता. श्रीविट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निदेर्श होत असला तरी, विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा कृष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी, ते त्याच्या मूळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत डॉ. माणिकराव धनपलवार व डॉ. रा.चिं. ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विट्ठलाचे आगमन झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे, हेही डॉ. ढेरंेनी सिद्ध केले आहे. स्थलपुराणात पंढरपूरचा निदेर्श पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव 'पांडुरग माहात्म्य' असे आहे, 'विट्ठल माहात्म्य' नव्हे, हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. पौंड्रिक क्षेत्र म्हणून पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपूर हे स्थलनाम यावरून मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. 'पांडुरंग' ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ती 'पौंड्रिक' या शब्दातच दडली आहे. पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ 'पौंड्र' कोण होते, या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद समाजाचे मूळ सापडते ते इसवी सन पूर्व आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्माण व महाभारतात. विश्वामित्राच्या १०० मुलांपैकी पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इ. मुलांनी दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ऐतरेय ब्राह्माणावरून दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद मानले गेले असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनीही दक्षिण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले होते. पंढरपूर हे पौंड्रपूरचे सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षिणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपूर अशी आहेत. बंगालमधील पौंड्रांनी पुंड्रपूर येथून राज्यकारभार चालवला होता, असे ह्यु-एन-त्संगने नांेदवून ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे अवशेषही आता सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षिण भारतात वसाहती केल्या हे यावरून सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पूवीर्चा, म्हणजे किमान इसवी सन पूर्व पाचव्या शतकापूवीर्चा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पौंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती, हे यावरून स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे, हे सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिक क्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे. श्रीविट्ठलाची विशेष उपाधी आहे, पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. 'पौंड्रक' या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे 'पांडुरंग' होय. 'पौंड्रक' विट्ठलाचेच पुढे 'पांडुरंग विट्ठल' असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता. याचा साधा सरळ अर्थ असा की पौंड्र समाजातील जे पशुपालक, धनगर, कुरुब होते त्या समाजातील विट्ठलनामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मूतीर् आहे. तो स्वत: विष्णुही नाही की कृष्णही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादवकाळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करताना त्याचे गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले, असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले हे वर लिहिलेच आहे.) मूळच्या अवैदिक देवतास्वरूप मानल्या गेलेल्या शुदवंशीयांचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तिमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मूळ अवैदिक स्वरूप त्यांना बदलता आले नाही, म्हणून आपण आज सत्यापर्यंत पोहोचू तरी शकतो. पौंड्र, औंड्रादि मंडळी शिवभक्त होती. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही, कारण येथील मूळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणूनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा संबोधला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते, तसेच पौंड्रिकेशाचे संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही 'विट्ठलेश्वर' नव्हते, याचा दुसरा अर्थ असा की तो शिव केवळ विट्ठल या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपूर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्रीविट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे. विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासून वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतून इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिदीर्त पंढरपूरच्या एका 'जयद्विठ्ठ' नामक ब्राह्माणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हणजे तोवर विट्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हणजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असून दैवतप्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातून आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्यांचा संबंध दिसत नाही, कारण तो पुरातन आहे. विट्ठलमूतीर् अनादि आहे, अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुराणता पाहता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणून स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या २४ अवतारांतही नाही वा विष्णु सहसनामांतही नाही, हेही लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही. पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या, तेथे मात्र विट्ठलाच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. यावरून विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.) थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपूर तथा आजचे पंढरपूर. या पौंड्रांचा, जे वर्णव्यवस्थेत पुराणांतरीही शुद मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून ११व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मूर्ती हे दुय्यम स्थान होते, हे आता लक्षात येईल. शके ११११च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपूरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले, असे नांेदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्मृतीत गेलेल्या महानायकाची पूजा तत्पूवीर्ही उघड्यावर होतच होती. त्याच्या मूतीर्साठी मंदिर बनवणारासुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मूर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमागृह.) थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे, हे यावरून सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता, हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या, त्यामुळे मूळ सत्यावर जळमट पडले होते. पण आता तरी नव्या दृष्टिकानातून त्याकडे पाहावे. (संजय सोनवणी हे 'विट्ठलाचा नवा शोध' या पुस्तकाचे लेखक आहेत.) माझी शंका--(मग मला असा प्रश्न पडला आहे,कि संतांनी त्याची कृष्ण म्हणून का भक्ती केली असेल? "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म" असे का म्हटले असेल? संत तर त्रिकालदर्शी असतात तर त्यांना ही गोष्ट का कळाली नसेल?)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
22845 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

अपसेट होऊ नका,हेल्दी डिस्कशन

खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 05/03/2016 - 10:20 नवीन
अपसेट होऊ नका,हेल्दी डिस्कशन होऊ दे,असे धागे बर्याच जणांना जिलब्याटाईप वाटू शकतात. धर्म आणि अध्यात्म ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत,अध्यात्म हे स्वतः अनुभवायची गोष्ट आहे,यामध्ये मनःशांती आणि अध्यात्मिक उत्कर्ष महत्वाचा असतो, पण धर्म ही एक वेगळीच गोष्ट आहे यामध्ये बुवा/बाबा,दोरेगंडे,चमत्कारिक कथा या गोष्टींचा भडिमार असतो. धर्माची चिकित्सा करणे काही पाप नाही,त्यामुळेच तर धर्म सुधारणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

धाग्याबद्दल प्रतिक्रिया

तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 13:41 नवीन
धाग्याबद्दल प्रतिक्रिया नव्हती माझी, विषयाबद्दल होती. हेल्दी डिस्कशन पाहिजेच. बाकी वर चर्चा धर्म, अध्यात्माबद्दल नसुन इतिहासाबद्दल आहे असे वाटले. इथे शंभर-दिडशेवर्ष जुने सत्यनारायणाला हजारो वर्ष जुने म्हणा की खुळ म्हणा, लोक करायचे थोडीच थांबणार आहेत. त्याअर्थाने बिनकामाची म्हटले. गैस नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

एका लोकदेवतेचं विठ्ठल या

सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 21:32 नवीन
एका लोकदेवतेचं विठ्ठल या "महादेवतेत" हळूहळू रुपांतर होत गेलं हा सिद्धांत जर खरा असेल तर त्यावरून भक्तीची ताकद लक्षात येते. ज्ञानदेव चरीत्रांमध्ये ज्ञानदेवाच्या वडीलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी पंढरीची वारी केल्याचे उल्लेख येतात. अर्थात हे चरीत्रकार याचा संदर्भ देत नाहीत. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना कृष्णनामाची दिक्षा दिली. आदिनाथ उमा बीज प्रकटिलें | मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती || तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली | पूर्ण कृपा केली गयनिनाथा || वैराग्ये तापला सप्रेमें निवाला | ठेवा जो लाधला शांतिसुख || निर्द्वंद नि:संग विचरता मही | सुखानंद ह्र्दयी स्थिर जाला || विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख | देऊनी सम्यक अनन्यता || निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण | कूळ हे पावन कृष्णनामें || नाथसंप्रदाय शैवसंप्रदाय. आदिनाथ शिव हा या संप्रदायाचा मुळ पुरुष. गोरक्षाने विभिन्न शैवपंथियांना एकत्र आणून नाथसंप्रदायाला ज्ञानमार्गात परावर्तीत केले. विविध कर्मकांडांना दूर सारुन कुंडलिनीचा अनुभव हे प्रमाण केले. गोरखबाणीत कुठेही अमुक एका देवतेची पुजा करा असे उल्लेख नाहीत. सारा भर सदाचरणावर आहे. त्यामुळे ज्ञानमार्गी शैवपंथिय गुरूने भक्तीमार्गी वैष्णवपंथीय देवतेची दिक्षा देणे हे परंपरेत न बसणारे होते. कदाचित गहिनीनाथांनी काळाची पावले ओळखली असावीत. हरिविण न दिसे जनवन आम्हा | नित्य हे पोर्णिमा सोळा कळी || चंद्रसूर्यरश्मी न देखों तारांगणें | अवघा हरी होणे हेंचि घेवों || न देखों हे पृथ्वी आकाश पोकळी | भरलासे गोपाळी दुमदुमीत || निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम | गयनी हें धाम गुरुगम्य || अद्वैतवादाचे सार म्हणता येईल असा हा निवृत्तीनाथांचा अभंग. दुसर्‍या एका अभंगात जनसामान्यांना उपदेश करताना निवृत्तीनाथ म्हणतात, एक देव आहे हा भाव पैं सोपा | द्वैतरुपें बापा पडसी नरकीं || द्वैत सांडी अद्वैत धरी | एक घरोघरीं हरी नांदे || सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वीं | तोचि अर्जुनासी दॄष्ट जाला || गयनि प्रसादें निवृत्ती बोधु | अवघाचि गोविंदु अवघा रुपीं || मात्र या अद्वैतींना चराचराला व्यापून उरलेल्या हरीला मुर्त स्वरुप देण्याची गरज भासली असावी. विठ्ठल ही देवता आधीपासूनच वैष्णव देवता मानली जात असावी. त्यामुळे अद्वैतींनी विठ्ठलभक्ती ही चराचराला व्यापून उरलेल्या हरीची भक्ती आहे हे स्विकारणे साहजिक होते. रुपाचें रुपस विठ्ठलनामवेष | पंढरीनिवास आत्माराम || पुंडलिकभाग्य फळलें संपूर्ण | दिननिशी कीर्तन विठ्ठल हरी || त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरें | कीर्तन निर्धारे तरणोपाय || पुण्य केलें चोख तारीले अशेख | जनी वनी एक रुप वसे || वेदादिकमति ज्या रुपा गुंतती | तो आणूनि श्रीपति उभा केला || निवृत्तीचा सखा विठ्ठलरुप देखा | निरालंब शिखा गगनोदरीं || (या अभंगातील काही शब्दांचे अर्थ लागत नाही.) विठ्ठलाचे महत्व कमी अधिक प्रमाणात निवृत्ती ज्ञानदेवांच्या आधीही असणार. मात्र आजचे विठ्ठलभक्तीचे जे भव्य दिव्य स्वरुप आहे त्याचे श्रेय नि:संशय गहिनी, निवृत्ती आणि ज्ञानदेव या तीन नाथांना जाते.
  • Log in or register to post comments

वा वा वा!

विजय पुरोहित
Tue, 05/03/2016 - 21:42 नवीन
वा वा वा! सगामाऊली!!! दंडवत घ्या... __/\__ तुमचा अभ्यास प्रचंड आहे हो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कुठले अर्थ लागत नाहित?

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 21:55 नवीन
कुठले अर्थ लागत नाहित?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पव्हे, अशेख (पापी?), निरालंब

सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 21:59 नवीन
पव्हे, अशेख (पापी?), निरालंब (निराधार? मुळ नसलेली?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पव्हे म्हणजे पाही असा अर्थ

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:07 नवीन
पव्हे म्हणजे पाही असा अर्थ वाटतोय. त्रैलोक्याचा त्वरेने उद्धार करणे हे पाही. अशेखचा अर्थ लागत नाही मात्र निरालंब शिखा म्हणजे स्वतंत्र अथवा एकूटवाणे (उठावलेले) शिखा (शिखर) जसे आकाशात एकूटवाणे शिखर उठावलेले असते त्याप्रमाणे निवृत्तीचा सखा (इतर देवांच्या मांदीयाळीत) विठ्ठलरूप पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद...

सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 22:11 नवीन
अभंगाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही म्हणत आहात ते अर्थ घेतले तर लागतोय त्या शब्दांचा अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

..

mugdhagode
Tue, 05/03/2016 - 22:53 नवीन
शेख म्हणजे शेष अशेख म्हणजे नि:शेष .. संपूर्ण. आ.न. शेखचिल्ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अशेख म्हणजे नि:शेष

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 11:22 नवीन
हा अर्थ बरोबर वाटतोय. काही करायचे शिल्लक न रहाणे (म्हणजेच संपूर्ण) याही अर्थाने काहीवेळेस वापरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

__/\__ वल्ली सर!!!

विजय पुरोहित
Tue, 05/03/2016 - 22:13 नवीन
__/\__ वल्ली सर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पव्हे

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 11:16 नवीन
पाणपोईला पव्हे असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मूर्ती लहान पण वाचन महान.

कंजूस
Tue, 05/03/2016 - 22:39 नवीन
मूर्ती लहान पण वाचन महान.
  • Log in or register to post comments

आज सकाळी

नाखु
Wed, 05/04/2016 - 09:45 नवीन
गोंदवलेकर महाराजांचे वचन विविधभारतीवर ऐकले ते असे:
"अध्यात्म हे शेत आहे तर प्रपंच हे कुंपण,कुप्णालाच खत-पाणी घात्ले तर ते शेतच खाऊन टाकेल"
चूक असल्यास दुरुस्ती करावी जाणकारांनी, बाकीच्यांनी वस्सकन अंगावर येऊ नये "हे असेच का म्हणून" विव्धभारतीवाला नाखु
  • Log in or register to post comments

२ मे चे प्रवचन

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 11:31 नवीन
शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे. २ मे चे प्रवचन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

परमार्थ शब्दात गोंदवलेकर

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 11:47 नवीन
परमार्थ शब्दात गोंदवलेकर महाराजांना काय अभिप्रेत आहे हे लिहू शकाल का? परमार्थ म्हणजे देवाधर्माचे करणे असा एक ढोबळ अर्थ मला माहीती आहे. परमार्थ म्हणजे स्वत:ची ओळख पटणे असाही एक अर्थ वाचला आहे. हे अर्थ बरोबर आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

प्रश्न खूपच अवघड आहे.

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 14:41 नवीन
मी तज्ञ नाही. माझा तेवढा अभ्यास अथवा अनुभवही नाही. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय इतकेच म्हणता येईल. त्यामुळे माझी धारणा काय आहे इतकेच मी सांगू शकेन. ते बरोबर आहे असे मला आजतरी वाटतेय. तसेच ते चूकीचे आहे असे इतरांना वाटू शकते हेही मला मान्य आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वानुसार मला जे काय शोधायचे आहे ते माझ्या मधेच आहे. हा शोध विचारांच्या सहाय्याने करून मग त्याचा अनुभव घ्यायचा असा हा मार्ग असल्याचे मला वाटते. यास्तव सर्व महत्व हे प्रथम मनाला द्यायला लागते. त्यामुळे स्वतःच्या मनाचा अभ्यास मला महत्वाचा वाटतो. इतकेच नव्हे तर अथ्यात्म म्हणजे मला मानसशास्त्रच वाटते. त्यामुळे आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार प्रथम पहावयाचा (मना पासून वेगळे होऊन) मग तो धरायचा (मनन चिंतन) मग तो (अहित कारक असेल तर) थोपवायचा किंवा थोपवूनही परत परत येत असेल तर तो वळवायचा. हा क्रम मला योग्य वाटतोय. ह्या सगळ्याला "विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला" असे म्हणतात. हे साधण्यासाठी जे काही केले जाते त्याला मी उपासना म्हणतो अन्यथा ती फक्त एक कवायत असते. आपली प्रगती होत आहे की नाही हे आपले आपण तपासू शकतो. प्रगती होत असल्याचा अनुभव येत असेल तर जग काय म्हणते याकडे आरामात दुर्लक्ष करता येते. मात्र प्रगती या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असल्याने प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. "कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप" ही माझी पाप पुण्याची व्याख्या असल्याने माझ्यात वाढलेली कृतज्ञता या एका फूटपट्टीवर मी माझी प्रगती मोजतो. ही कृतज्ञता मला नम्रता देते. अहंकारापासून वाचवते. रागापासून निववते. मोहापासून दूर करते असा माझा अनुभव आहे. मुख्य म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो जो वेळोवेळी उपयोगी पडतो. हे सर्व मी मला येणार्‍या अनुभवाच्या आधारे लिहित असल्याने माझ्याकडे पुरावा देण्यासाठी काहीही नाही. जरा वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, हिपोकॅम्पस मधील माहिती असो किंवा भावना केंद्रामधील धोक्याचे इशारे या सगळ्याला मी चित्त असे म्हणतो. चित्तात माहिती साठवली जात असताना त्यावर मी व माझे याचे संस्करण झाले की चित्तात अशुध्द माहिती साठवली जातेय असे समजून मी त्याला अशुध्द झालेले चित्त समजतो. याउलट ती माहिती साठवली जात असताना मी व माझे हे मावळून फक्त योग्य्/अयोग्य किंवा चूक्/बरोबर (किंवा सोप्या शब्दात जसे आहे तसे) यापध्दतीने माहिती साठवली जात असेल तर त्याला शुध्द चित्त असे मी म्हणतो. थोडक्यात चित्तशुध्दी हा सर्व उपासनेचा प्राण आहे. त्यासाठी आपल्या मनात येणारे विचारांना खूप महत्व आहे असे मला वाटते. असो. थोडक्यात विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला ही पहिली पायरी असून अजून मी हीच पायरी पक्की करतोय जेणे करून माझ्या चित्तात साठलेली माहिती शुध्द स्वरूपात राहील व आपोआपच बाहेरून येणार्‍या संवेदनांना प्रतीसाद म्हणून माझ्याकडून होणारे आचार विचार चांगले राहतील. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा मला. त्यानंतर पुढील पायरीवर जाणे जमल्यास..... म्हणजेच विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला ही कला न राहाता तो माझा स्वभाव झाल्यावर मग परमार्थ या विषयावर मला अधिक बोलता येईल. कोणताही अनुभव नसताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात या पध्दतीने चर्चा करण्यात खरच मला रस नाहीय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सुंदर प्रतिसाद... धन्यवाद !!

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 14:50 नवीन
हे बरचसं self awareness बद्दल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:-))

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 15:11 नवीन
तुम्ही याला जे नाव द्याल ते मला मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ओ काका, असं नाइ करायचं.

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 16:59 नवीन
ओ काका, असं नाइ करायचं. आध्यात्मिक चर्चेत फाऊल आहे हा मिपावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:-))

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 17:04 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

उत्तम विश्लेषण,

नीलमोहर
Wed, 05/04/2016 - 17:14 नवीन
भागवत सर, तुमचे प्रतिसाद नेहमीच सुंदर असतात, साध्या सरळ शब्दांत बरेच उपयुक्त तत्वज्ञान सांगून जाणारे. बाकी परमार्थ म्हणजे, एक तर परम अर्थ = सर्वोच्च, परम तत्व आणि दुसरे म्हणजे परोपकार, असे अर्थ होतात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अर्ध बरोबर वाटतय

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 21:28 नवीन
बाकी परमार्थ म्हणजे, परम अर्थ = सर्वोच्च, परम तत्व
हे बरोबर आहे. पण ते परम तत्व जाणल्यावर त्याची परिणीती परोपकारात होते. येथे परोपकार हा परिणामस्वरूप आहे. अशा माणसाचा स्वार्थ शिल्लकच राहिलेला नसल्याने तो जे काही करेल तो परोपकारच होतो. "जगाच्या कल्याणा संताच्या विभूती" किंवा "आता उरलो परोपकारापुरता" वगैरे ओव्यांचा तोच अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

स्वार्थ-परमार्थ अशी जोडी

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:16 नवीन
स्वार्थ-परमार्थ अशी जोडी लावल्याजाते त्यामुळे जरा गोंधळ होत असेल. 'परार्थ' असा काही शब्द आहे काय स्वार्थ च्या विरोधार्थी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

स्वार्थ शब्द उगाच बदनाम झालाय

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 02:45 नवीन
स्वार्थ शब्द उगाच बदनाम झालाय. स्व अर्थ म्हणजे स्वतः चा फायदा बघणं यात चूक ते काय? आणि स्वतः चा जास्तीत जास्त फायदा काय तर आपण पुन्हा दुःखी न होणं. कसं? ते पुढच्या भागात! देखते रहीये.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गोंधळ हा कलियुगाचा स्थायीभाव आहे :-))

शाम भागवत
गुरुवार, 05/05/2016 - 10:04 नवीन
स्वार्थ म्हणजे, "मी म्हणजे देह" ह्या भावावर आरूढ होऊन प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढण्याची/लावण्याची/जाणण्याची प्रकिया तर सोहं भावावर आरूढ होऊन सर्व जाणण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. आणि ही प्रक्रिया जे अमलात आणतात किंवा तशा प्रयत्नात असतात ते स्वार्थी अथवा पारमार्थिक. मला समजलेला अर्थ तरी असा आहे. पण व्यवहारात इतक्या उच्च दर्जाने हे शब्द वापरले जात नाहीत असे वाटते. "स्वतःचा फायदा", ह्या एकमेव निकषावर स्वार्थ अथवा निस्वार्थ हे शब्द वापरले जातात. परार्थ असा शब्द आहे की नाही मला माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आत्मभान

राही
Mon, 05/09/2016 - 13:31 नवीन
माझ्या दृष्टीने self awareness हाच कळीचा मुद्दा आहे. आत्मभान हा शब्दही मला आवडतो. भागवत यांचा प्रतिसाद अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

:))

शाम भागवत
Wed, 05/04/2016 - 15:10 नवीन
तुम्ही याला जे नाव द्याल ते मला मान्य आहे.
  • Log in or register to post comments

सोनवणी हे बहुजनांचे पु ना ओक

इस्पिक राजा
Wed, 05/04/2016 - 15:17 नवीन
सोनवणी हे बहुजनांचे पु ना ओक आहेत काय? काय ते लॉजिक, पंढरपुर -= पोंड्रपुर वगैरे. एकदम ओक स्टाइल. दंडवत घ्यावा
  • Log in or register to post comments

लोकांना पंढरपूर व

श्रीगुरुजी
Wed, 05/04/2016 - 15:37 नवीन
लोकांना पंढरपूर व विठ्ठलाबद्दल संशोधन करायला आवडतंय असं दिसतंय. अनेक वर्षांपूर्वी 'सकाळ'मध्ये एका बाईंनी एक मोठा लेख लिहून विठ्ठल हा शब्द 'बीत अल्ला' व विठ्ठली हा शब्द 'बीत इल्ली' या इराणी शब्दांवरून आल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार विठ्ठलाच्या मूर्तीचे इराणमधील एका देवाच्या मूर्तीशी प्रचंड साम्य आहे. हा देव व विठ्ठल हे नाव एका इराणी देवतेवरून आल्याचा त्यांचा दावा होता. विठ्ठल हा पशुपालकांचा देव आहे असा सोनवणींचा दावा आहे. मूळचे बुद्धमंदीर पाडून बुद्धाच्या मूर्तीच्या जागी विठ्ठलाची मूर्ती स्थापन केल्याचा डॉ. आंबेडकरांचा दावा होता कारण पुंडरिक म्हणजे कमळ व कमळाचा संबंध बुद्धाशी आहे. संशोधन करणार्‍यांना संशोधन करू देत आणि आपले निष्कर्ष मांडू देत. गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही.
  • Log in or register to post comments

गेली अनेक शतके अनेक संतांनी

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 20:24 नवीन
गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही. +111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 10:22 नवीन
संशोधन करणार्‍यांना संशोधन करू देत आणि आपले निष्कर्ष मांडू देत. गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही.
सहमत आहे. कारण ते भक्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

प्रा. कोसंबींनी तो धनगर

सनईचौघडा
Wed, 05/04/2016 - 16:19 नवीन
प्रा. कोसंबींनी तो धनगर लोकांचा देव आहे व पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे असा लोकसत्तेतील एक लेख मी वाचलेला आहे.
  • Log in or register to post comments

लेख थोडा हुकलेला आहे

पामर
Mon, 05/09/2016 - 11:53 नवीन
आपण विठ्ठलाच्या मुर्तीचा अभ्यास केला असता ही मुर्ती पुर्ण वैष्णव आहे. मुर्तीचे हात नुसते कमरेवर नाहीत तर त्या हातात शंख व कमळ आहेत. मकर कुंडले,उंच किरिट व छातीवर श्रीवत्स चिन्ह स्पष्टपणे ती विष्णुमुर्ती असल्याचे दाखवतात.विठ्ठल हे शैव रूपाचे वैष्णव उन्नयन आहे ह्यावर थोडा अजुन अभ्यास करावा लागेल. रा.चिं. ढेरे आपल्या 'लोकदेवतांच्या विश्वात' मत देतात की तिरुमल्लैचा बालाजी व सबरीमल्लैचा अयप्पा इथे सुद्धा वैष्णव लोकांनी शैवस्थलांवर अतिक्रमण करुन तिथे विष्णुस्थान तयार केली. इतिहासकार भांडारकर म्हणतात, विठु हे विष्णुच कानडी रुप आहे व ला/बा हा प्रत्यय आदर म्ह्णुन वापरतात.पण तेच नाही तर Richard Maxwell Eaton,Christian Lee Novetzke व G. A. Deleury हे सर्व पंढरपुर हे मुळ शैवस्थळाचे विष्णुस्थानात झालेल रुपांतर मान्य करतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा