खुरटी झुडपं
एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो.
त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा. अन झाडपाल्याची समृद्ध जमीन.
मी चालत गेलो अनवाणी त्या पवित्र भूमीवरुन. तुडवल्या रानवाटा अन बेमालूम सुखाचा हिशोब मांडला. या धवल धुक्यातून जाता जाता तृप्तीच्या स्मशानात जाण्याची आस लागून राहिली.
त्या सुपीक पठारावर शेवटी एक झोपडं दिसलंच. एवढ्या उन्हाचं तिष्ठत बसलेलं. गावकुसाच्या बाहेर. दूरवर. एकलंच. गर्द झाडीत भिताडाच्या भेगाभेगात जिव्हाळा घेऊन लपलेलं.
"ओंजळभर पाणी दे गं माय " म्हणत पडवीत बसलो. झोळी बाजूला ठेवली अन अगदीच थकून गेलो.
आतून एक तलम वस्त्रातली स्त्री बाहेर आली. थंडगार पाण्याची बाटली हातात ठेवून जराशीच हसली. अन "आज लवकर आलास?" म्हणत आत निघून गेली.
फ्रिजमधले ते थंडगार पाणी जरा जास्तच थंड होते. घोटभर पिऊन बाटली टेबलावर ठेवली. शूज काढून टिव्ही ऑन केला. बाथरुमध्ये जाऊन शॉवर घेतला. मग प्रसन्न मनाने गॅलरीत जाऊन दूरवर पसरत गेलेल्या झोपडपट्ट्या बघत सिगारेट पेटवली.
"आज भाजीला काय करु रे? भरीत करू तुझं आवडतं? की पनीर मसाला? की आपलं नेहमीचंच, पावभाजी?" तिनं आतून विचारलं.
"चालेल काहीही !" एव्हाना मी उड्डाणपुलावरच्या वाहनांची लखलखती येजा निरखत होतो.
कंटाळा आल्यावर आत आलो. सोफ्यावर बसून रिमोटच्या बटनांशी खेळत बसलो. एकही चॅनल बघण्यासारखा वाटत नव्हता. मग उठून लॅपटॉप उघडला अन प्रोजेक्ट वर्क करत बसलो.
तिनं जेवायला हाक दिली. आज तिनं दुधखीर केली होती. तुप टाकून. अन सोबतीला भरलं वांगं. तिची बडबड चालूच होती. सिरीयलच्याच गप्पा त्या. नेहमीच्याच. त्या ऐकत सुग्रास जेवलो.
पाटपीट करत पुन्हा गॅलरीत गेलो अन परत येऊन बेडवर पुस्तक चाळत पडलो. सिंकमध्ये भांडी टाकून तीही आली.
"आज पाऊस पडणार बहुतेक" लाईट ऑफ करत बेडवर पडली.
"हु" करत मी पुस्तक बाजूला ठेऊन दिले.
डोळ्यावर झापड आली.
पाऊस?
साला पाऊसही कधीकधी बुचकळ्यात टाकतो. रात्रीचा येतो अन काळाखोत मिसळून जातो. सुट्या सुट्या पारंब्यात जीव ओलाचिंब होतो.
काळ्याभोर अंधाराला हुलकावणी देत त्यादिवशी पाऊस आलाच. जगदंबेच्या पायऱ्या विसळून गावशिवारात गेला. आडोश्याच्या पाखरांना भिजवत जरा वेळ विसावला. चिखलझडीतून वाट काढत मग छपरावर येऊन कोसळला.
मग भिताडावरुन ओघळत राहिला. रातभर.
"सोबराबायचं खळं कसलं झिंबाट झालयं वो " झापडं उघडून बाहेर डोकावत ती म्हणाली. अन उघड्यावरच्या पाऊसधारा बघत मी आतल्या आत गारठून गेलो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारी, डोळ्यातले भाव जसे
पुस्तकाच मनावर घ्या. सुंदर
ए SSSSSSSS क मिनीट......
काही कळेल काय?
मस्त!
अफाट!!!
वाचता वाचता मध्येच आईंग झालं.
क्लास लिहिलंय.
काहीच कळालं नाही :(
क्लासच लिहिलंय!!!
बापरे!
समजलं आणि समजलं नाही पण..
तुम्हाला जे समजलं ते सांगा
बेमालुम
धमाल लिहिलंय !!
कधी कधी वाटतं जसा अकबराच्या
जव्हेर भौ
पुण्यात अन कट्ट्याला कब्बी नै.
कुठलीतरी इन्शुरन्सची जाहीरात
जव्हेरभौ काय जबरदस्त लिहीलय
कथेला split personality
तुमची भाषा वाचायला खूप वेगळी,
काहीच नाही कळलं हो जव्हेरभावु
लोल, माझे पण असेच झालमझ, काही
काही न समजणारी पेंटिंग करोडोत
कसले भन्नाट ट्विस्ट आहेत राव.
मकले तुम्ही क्युबची बरोबरी
असं बघा की तुम्हाला कथा कळली
मला समजलं का?
छान..
अजीबात कळलं नाही.