सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
पाहिले आये नाद बिंदू से
पीछे जमया पानी ।
सगळ्यां ढगांत पाणी पुरेपूर भरलेलं आहे. ही गोष्टही असंच सुचवते की आपल्या सर्वांच्या देहरूपी घटांत एकच परमेश्वर वास्तव्य करतो.
सब घट पूरण पूर रह्या है।
अलख पुरुष निर्बानी हो जी।
त्या पुरुषाला अलख पुरुष म्हटलंय. अलक्ष्य वरुन अलख हा शब्द आला आहे. अलक्ष्य म्हणजे न दिसणारा. सर्वामध्ये परमेश्वर कसा आहे? तर ढगांत असूनही पाणी दिसत नाही तसा!
सबंध काव्यात हेच पावसाचे, पाण्याचे, ढगांच्या आवाजाचे रूपक वापरून कबीर त्यातून साधनेच्या पायऱ्या दाखवून देतात.
आता ते पावसाच्या थेंबांशी जणू बोलतात की तू तिथून आलास, कुठे जायचं त्याचा पत्ता जणू लिहून घेऊन आलास.आणि तूच अनेकांची तहान भागवलीस.
वहां से आया पत्ता लिखाया ।
तृष्णा तोउने बुझायी ।।
पण मग तू नदीत राहणे सोडून खारट समुद्राकडे निघालास. म्हणजे एकाअर्थी स्वतःच उलट फसलास. यातलं रूपक ध्यानात घेण्यासारखं आहे. पाण्याचा थेंब म्हणजेच सर्व जीवांत असणारे आत्मतत्व असे आधीच्या कडव्यात आले आहेच. हा आत्मा कोणत्या रूपात जन्म घेणार हे सर्व आधीच ठरलेले असते. मनुष्य रूपात असताना, जेव्हा स्वतःचा उद्धार करून घेणे शक्य आहे तेव्हा मात्र तू विषयसुखात गुरफटलास आणि जन्ममृत्यूच्या फासात स्वतःला अडकवलेस.
अमृत छोडसो विषय को धावे ।
उलटी फाँस फसानी रे ।।
पुढच्या कडव्यात एक वेगळेच रूपक समोर येते.
कबीर म्हणतात, हा जो पाऊस पड़तोय तो म्हणजे जणू गगनमंडलात गाय दुहली जाते आहे. पावसाचे पाणी जणू तिचे दूध आहे. आणि जे संत आहेत त्यांनी त्या दुधाचे दही करुन ते घुसळले. आणि त्यातून येणारे लोणी खाल्ले. उरलेलं ताक सगळं जग वापरतंय.
गगन मंडलू में गो बियानी।
भोई पे दही जमाया।
माखण माखण संतो ने खाया ।
छाज जगत बापरानी हो जी ।।
दुधाचे दही होणे, त्याचे ताक होणे आणि अदृश्य असलेले लोणी वर येणे ही सामान्य प्रक्रिया आहे. पण एका अर्थी ही दुधाची उन्नती आहे. संतही या पावसाकडे फक्त पाणी या अर्थी न बघता त्यात दडलेला अर्थ जाणतात. पहिल्या कडव्यात आलेली उपमा (बिंदूच्या आधी नाद, इत्यादी साधनेतल्या पायऱ्या जाणून असतात) म्हणून जणू काही ते लोणी खातात आणि लोणी काढून टाकल्यावर उरणारे ताक इतर लोक वापरतात.
याचा थोड़ा वेगळा अर्थही निघू शकतो.
साधनामार्गात नाद, बिंदू, कला (सिद्धी) हे अनेक टप्पे असतात पण अंतिम टप्पा स्वतःला (किंवा परमतत्वाला) जाणून घेणे हाच. संतांना तो साधतो तर इतर लोक या आधीच्या टप्प्यांच्या अनुभवात अडकून पडतात.
एखाद्या काव्याचा अर्थ लावणे आणि आपण लावलेला अर्थच बरोबर असे म्हणणे दोन्ही अवघडच.
काव्य उतरत असताना कवीची भावावस्थाच अशी असते की कदाचित् कवीसुद्धा पूर्णपणे एखादी ओळ समजावून सांगू शकायचा नाही. असेच काहीसे पुढच्या कडव्याच्याबाबतीत माझे झाले आहे.कदाचित् कबीर खूप वेगळं काही सांगत असतील.
साकार-निराकार हा भेद समजणे अवघडच. पण सद्गुरु सगळं सोपं करतात. धरा नाहीच असे पाहिले तर केवळ एक गोलाकार मंडल दिसेल. सरोवराशिवाय, म्हणजे सरोवराच्या आकाराशिवायही पाणी हे पाणीच उरते. सरोवरामुळे त्याला आकार मिळतो. आणि ज्याला आपण सरोवर म्हणतो त्याला सरोवर म्हटले नाही तर ते नुसते पाणीच !
म्हणजे आपण निराकाराला नुसता आकार नाही तर नावही कल्पिले आहे. पण निराकार असे नामात किंवा आकारांत अडकणारे नाही असेच गुरु सांगतात आणि अज्ञानाचा अंध:कार दूर होऊन ज्ञानाचा उजेड होतो.
बिन धरती एक मंडल दीसे ।
बिन सरुवर ज्यू पानी रे ।
गगन मंडलु में हो उजियारा।
बोल गुरुमुख बानी रे ।।
हे एकदा झालं की सकल चराचरात साठलेलं चित्स्वरूप मीच आहे याचा साक्षात्कार होतो. सो$हं सो$हं असा जणू बाजा वाजू लागतो.
ओहं सो$हं बाजा बाजे,
त्रिपुटी धाम सुहानी रे।
इथे ओहं हे यमकात्मक वाटतं. किंवा फार तर त्याला 'ॐ' चा अपभ्रंश म्हणता येईल. अर्थाच्या दृष्टीने मात्र, 'सो$हमात्मा' 'मी आत्मा आहे', 'सकल जीवांच्या हृदयात 'मी' म्हणून जी स्फूर्ती होते, तोच मी आत्मा' अशी स्पष्ट, निःसंशय जाणीव होते. हे ज्ञान म्हणजे स्वतः सकलविश्वाशी एकरूप असल्याची जाणीव देणारे असल्याने त्यातून होणारा आनंद बाजा वाजावा तसा जणू व्यक्त होतो. साधक शांत होतो. भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र कार्यान्वित होते. नाक आणि दोन भुवया यांच्यामधला भाग म्हणून त्रिपुटी असे म्हटले आहे. सुहानी हे बहुतेक त्या बाजाच्या ध्वनीशी संलग्न असावं. त्या सो$हंरूपी बाजामुळे आज्ञाचक्र सुखावलं असा काहीसा अर्थ असावा.
इडा पिंगला सुखमन नारी ।
सुन्नध्वजा फहरानी रे ।
इडा-पिंगला नाड्या सम होऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होते असे वर्णन आहे. सो$हं च्या साक्षात्काराचा हा परिणाम.
शून्यध्वजा ! किती विलक्षण शब्द आहे! निर्गुण जाणलं म्हणजे काय झालं? हे सांगणं अवघड आहे. शून्यध्वज फडकल्यासारखंच हे ! शब्दात बांधताच न येण्यासारखं.
कबीर म्हणतात माझ्या बंधूनो, ही जी आगमवाणी आहे ती ऐका! आगम म्हणजे योगमार्गाशी संबंधित शास्त्र-पुराणे इत्यादी. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र किंवा तंत्र. आगमात योगमार्ग, ध्यानाच्या पद्धती आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.
पाऊस पडणे, त्यापूर्वीचा ढगांचा आवाज या रूपकातून कबीर जे सांगतात ते म्हणजे ही आगमवाणीच !
कहे कबीरा सुनो भाई साधो
ज्या यी अगम की बानी रे ।
दिन भर रे जो नजर भर देखे ।
अजर अमर वो निशानी हो जी ।
जो कुणी याकडे लक्षपूर्वक बघेल त्याला एक अजरामर अनुभवच मिळेल.म्हणजेच साधकाने सातत्य, डोळसपणा सोडता कामा नये असेच कबीर सुचवत असावेत.
इतकं सगळं लिहूनही अपूर्णत्व आहेच.
हीच अनुभवापुढे लेखनाची मर्यादा !
-चैतन्य दीक्षित
वाचने
6438
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर रे मनमेघ भाऊ...
गगन में आवाज हो रही
In reply to सुंदर रे मनमेघ भाऊ... by विजय पुरोहित
इथे अजून एक भजन देण्याचा मोह
In reply to गगन में आवाज हो रही by विजय पुरोहित
अवांतरः हे श्री गजानन महाराज
In reply to इथे अजून एक भजन देण्याचा मोह by विजय पुरोहित
धन्यवाद
In reply to अवांतरः हे श्री गजानन महाराज by विजय पुरोहित
सुंदर लेख!
कलापिनीजी
In reply to सुंदर लेख! by बोका-ए-आझम
छान!!!
सुर्रेख!
हेही चांगलंय.. पण काही ठिकाणी
राघवा
In reply to हेही चांगलंय.. पण काही ठिकाणी by राघव
भारी..
अतिशय सुरेख चैतन्यराव. आवडले.
सुंदरच.
धन्यवाद
छान
चांगला परिचय
भजन खूप मार्गदर्शक आणि विवेचन
सुंदर लेखमाला
सुंदर लिहिलंय
खुपच छान :)
कबीर लाडका
अतिशय सुंदर!!
पुनश्च धन्यवाद
उत्तम
या भजनाच्या अर्थाबाबत किरकोळ
अवश्य
In reply to या भजनाच्या अर्थाबाबत किरकोळ by Anand More