सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली.
खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती.
सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती.
उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते.
सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!
कुणालाही वेड लागावे असेच तिचे अस्तित्व होते.
ही मुग्ध अनामिका जत्रेत येते न येते, तोच साऱ्या तरुणांची नजर तिच्यावर खिळली.
जो तो तिच्याभोवती रेंगाळू लागला.
तिचे किणकिणणारे बोल आपल्याला ऐकायला मिळावेत म्हणून प्रत्येक तरुणाचे प्राण कानात जमा झाले.
तिच्या करकमलांचा कोमल स्पर्श व्हावा म्हणून प्रत्येक तरुण धडपडत होता.
तिने आपल्याकडे एखादा तरी कटाक्ष टाकावा, म्हणून प्रत्येकाचा जीव कसा तगमगत होता!
..... आणि प्रत्येकाला तिचे एक तरी चुंबन घ्यावेसे वाटत होते! त्यानंतर मरण आले, तरी ते पत्करायची तयारी होती.प्रत्येकाची रित पतंगासारखी होती.
आता, प्रत्येक तरुणमनाला तसे वाटणे साहजिकच होते, कारण ती बोलूनचालून सुंदरी होती!
आपल्यासाठी कोण कोण कसे कसे उसासत आहे, याची पूर्ण जाणिव त्या चतुरेला होती.
मग, त्यांच्यापैकी काही जणांबरोबर ती उंच उंच पाळण्यात बसली.
काही जणांबरोबर मुग्धपणे नाचली. काही जणांबरोबर थोडेसे खाल्ले.
काहींनी तिच्यासाठी उंची पोशाख घेतले. काहींनी तिच्यासाठी किंमती दागिने खरेदी केले.
... या सगळ्यात, काही तरुणांनी अनावर होऊन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ---- तेव्हा मात्र तिला एकदम धक्का बसला. ती दचकली, रागाने लालेलाल झाली. रागाच्या भरात एकाच्या कानशिलात भडकावली.
तिला एकदम कसेसेच वाटले. सारे तिथल्या तिथे टाकून ती आपल्या गावच्या दिशेने पळत सुटली.
सूर्यास्ताच्या कातरवेळी दमून गेलेल्या त्या रमणीच्या मनात विचार आला, ‘छे! वैताग आला या सगळ्यांचा! माझ्यासारख्या सुंदरीस कसे वागवावे, हे यापैकी एक्कालाही कळू नये? या पुरुषजातीला साधे शिष्टाचारही माहित असू नयेत! हे सगळे माझ्या सहनशक्तीपलीकडचे आहे!’
वर्ष उलटून गेले.
त्या वर्षभरात ती जत्रा, ते तरुण, आणि स्वतःचे सौंदर्य यांचा विचार करण्यातच ती सुंदरी गढून गेलेली असायची.
यावर्षी परत जत्रा भरली.
ती परत जत्रेस आली -----
तेच निर्झराप्रमाणे हसू, तीच गालांवरची लाली, सूर्यास्ताची तीच हुरहूर सोनेरी केसांत , तेच प्रसन्न मुखमंडल, तेच हसरे ओठ, तेच वेडावून टाकणारे तिचे अस्तित्व!
पण तिला पाहताच आता प्रत्येक तरुण पाठ फिरवू लागला. जो तो तिला टाळू लागला.
दिवसभर ती एकटीच फिरली. तिच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. भरल्या जत्रेत ती सैरभैर होऊन हिंडत होती.
संध्याकाळ झाली. सूर्यास्ताच्या कातरवेळी तिला आणखी एकाकी वाटू लागले. घराकडे परतताना ती मनात चरफडत म्हणत होती, , ‘छे! वैताग आला या सगळ्यांचा! माझ्यासारख्या सुंदरीस कसे वागवावे, हे यापैकी एक्कालाही कळू नये? या पुरुषजातीला साधे शिष्टाचारही माहित असू नयेत! हे सगळे माझ्या सहनशक्ती पलीकडचे आहे!’
खलील जिब्रानच्या ‘At the Fair’ या रूपक कथेचा भावानुवाद.
Book traversal links for सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
नाजो अंदाज से कहते है की जीना
हा हा,,, मस्तं!
..
:)
सुरेख....
:)
ख्खिक्क!