सहप्रवासी
लेखनविषय (Tags)
ट्रेनच्या स्लीपर कोचमधून कुठेही जायचं झालं की माझा उत्साह जागा होतो. मला असा प्रवास आवडतो. नवीन अनोळखी माणसं आपल्यासोबत एक दिवस आणि अर्धी रात्र किंवा अर्धा दिवस आणि अख्खी रात्र काढतात. अर्थात् दिवस किती आणि रात्र किती हे आपण कुठून कुठे चाललोय त्यावर अवलंबून असतं म्हणा.
तर या प्रवासात आपल्याला नवे चेहरे दिसतात. काही चांगले काही सामान्य काही वाईट काही अतिवाईट. आपल्या आजुबाजूच्या लोकांशी सामानाची ढकलाढकल, सीटची अदलाबदल, या ना त्या निमित्ताने गप्पागोष्टी सुरू होतात आणि सूर जुळलेच तर चांगली मैत्रीही होते.
सांगायचं निमित्त हे की मी माझ्या दोघा मित्रांसोबत त्यांपैकी एकाच्या गावाला अशाच एका स्लीपर कोचमधून निघालो होतो. नशीब चांगलं म्हणून आम्हाला एका कंपार्टमेंटमध्येच आमच्या तिघांच्याही सीट्स मिळाल्या होत्या. मी एका रकसॅकेत सगळं सामान भरलं होतं. गाववाल्या मित्रानं तीन बॅगा आणलेल्या होत्या. तिसरा बिनगाववाला मित्र आयत्या वेळेपर्यंत हो-नाही हो-नाही करत शेवटी भरपूर खायचं सामान घेऊन आणि आतल्या चड्ड्या आणि टाॅवेल-ब्रश विसरून आला होता. आम्ही आमची नावं यादीवर तपासली. कुतुहल म्हणून सहप्रवाशांची नावं तपासायची मला खोड आहे. नावावरून (आणि पुढे दिलेल्या वयावरून) त्यांची प्रतिमा मनातल्या मनात तयार करायचीही सवय आहे. आमच्या नावासोबत मला एका स्त्रीचं नाव ओझरतं दिसलं होतं. नाव तसं आधुनिक वाटत असल्यानं ही तरूणी असावी आणि आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्या वयाची असावी अशी मी मनोमन आशा बाळगली होती. आत बसल्यावर आमच्या सीटजवळच एका जाड्या बाईसोबत एक काळीकुट्ट बाई अगम्य भाषेत गप्पा झाडत बसलेली दिसली. तिचा वर्ण, रूप आणि भाषा या तिघांशीही मला काही घेणंदेणं नव्हतं. दोनच गोष्टी खुपत होत्या. एकतर त्या बाईचा गेंगाणा आणि वैताग आणणारा आवाज, दुसरं म्हणजे मी जिचं नाव वाचलं ती कदाचित हीच ती असावी अशी भिती.
मी माझ्या बिनगाववाल्या मित्राला माझी व्यथा सांगितली. तो तात्काळ उठला आणि यादी वाचायला गेला. पाचदहा मिनिटं मी या गेंगाण्या बाईची बडबड ऐकत बसलो होतो. तो चेह-यावर विजयी हास्य घेऊन परतला.
'एकवीस.'
चला म्हणजे अजून आशा होती तर. कारण ही गेंगाणी तशी तरूण असली तरी एकवीस वर्षांची नक्कीच नव्हती. पण तरी हिची बडबड दिवसभर सहन करणं माझ्यासाठी अवघड होतं. मी हेडफोन्सही आणले नव्हते. गावची मजा लुटायची तर अनप्लग्ड होऊनच, असं ठरवून आलो होतो. आता पसतावणार होतो.
ट्रेन सुरू झाली, आणि गेंगाणी दचकून उठली. जाड्या बाईला हात करून पळत पळत दरवाज्याकडे गेली. मग परत आली, स्वतःची पर्स उचलली आणि पुन्हा दाराकडे धावली. दाराबाहेर पडली. पडली म्हणजे उतरली. पडली नाही हे तिचं नशीब. तिनं खिडकीतून टाटा केलं. मीही मनातून टाटा केलं. चला! शुभशकुन झाला. पिडा टळली. आता एकविशीतल्या तरुणीची प्रतीक्षा होती. गाववाल्या मित्रालाही आम्ही याची कल्पना दिली. मग झालं असं की तिघांचेही चेहरे प्रफुल्लित झाले होते आणि तिघंही एकमेकांना न्याहाळत होते.
'तू घे.' गाववाला.
'नको तू ठेव.' बिनगाववाला.
'चांगली असेल तर माझी.' मी. मी उगाच नाटकं करत नाही.
'हा बघ हावरट बघ.'
योगायोगानं तिघंही तेव्हा एकटे होतो. तिघांनाही दुकटं व्हायची घाई लागली होती. आम्ही आतुरतेने तिच्या येण्याची वाट पाहात होतो.
'कुठे चढणारे?'
'ते नाही पाहिलं.'
'कसला चोम्या आहेस!'
'बघू ना कुठतरी चढेलच ना!'
आणखी दोन सीट्स रिकाम्या होत्या.
'बाकी दोघं कोण आहेत?'
'एक बाई आहे. म्हातारी आहे. दुसरा कोणीतरी माणूस आहे.
'बाई सुद्धा माणूसच असते.'
'गप रे. पुरुष आहे, खुश?'
'ही चांगली असेल तर पटव तू.' गाववाला मला अतिशय साळसूदपणे सांगत होता.
'भावा पण तिला तू आवडलास तर?' आता मीही उगाच.
'अरे नाही यार तू छावा आहेस तूच पटवशील तिला बघ.'
'नाही रे मी माती खातो मुलींच्या बाबतीत.'
'मी सुद्धा.'
आम्ही बिनगाववाल्याकडे पाहिलं. तो आशेने आमच्याकडून 'तूच पटव मग' या डायलाॅगची अपेक्षा लावून बसला होता. पण आम्हा दोघांनाही माहिती होतं की तोच जास्त माती खाणारा माणूस होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, हसलो, आणि
'हा आहे ना आपला सुलतान!!'
'सुलतान काय!?' तो लाजत म्हणाला.
'भाई जनानखाने आहेत ना तुझे म्हणून म्हटलं.'
'चल रे!! इथे एक पटवताना पंचाईत. जनानखाने कुठून काढू!'
'अरे असं कसं... आहेत ना एकसो एक...'
मग आम्ही त्याच्याच्याने न पटलेल्या मुलींची यादी वाचायला सुरुवात केली. बिचारा हिरमुसला पण आमच्यासोबत हसत राहिला. त्याच्या आईचा जरावेळानं फोन आला. तो फोनवर बोलत असताना आम्ही दोघं त्याचे हितचिंतक झालो.
'बिचारा एकटा असला की माती खातो. आज आपल्या गायडन्सखाली जमून गेलं तर जमून जाऊदे बिचा-याचं. तुला आणि मला काय, मिळेल कधीही.'
'हो रे. आपणच मदत करायला हवी त्याला. एकट्याच्याने नाही पटायची कोणी त्याला.'
'भाई आपण असं बोलतोय, एक दिवस आणेल एखादी भारीतली पटवून मग आपण तोंडात बोटं घालून बसू.'
'ती आणेल तेव्हा आणेल. ही येत्येय तिला तर बघू आधी.'
'हं.'
इथे त्याचं फोनवर संभाषण सुरू होतं. ते हळू आवाजात सुरू होतं तोवर ठीक होतं पण अचानक तो वैतागला आणि मोठ्याने बोलायला लागला.
'अगं आई अंडरवेअर ही काय कुरिअर करायची गोष्ट आहे का? गावाला मिळत नाही का अंडरवेअर त्याशिवाय जगतात का गावचे लोक? ... हो आहेत पैसे. हो... टाॅवेल... टाॅवेल घेईन मी नवा. नाहीतर वापरेन या दोघांचा. (आम्ही एकमेकांकडे चमकून पाहिलं. आणि मान हलवत त्याला मधलं बोट दाखवलं). अगं नाही मिळाली तर उलटी करून घालेन यार. आणि एखाददिवशी न घालताच फिरेन. काय त्यात एवढं! हां. नाही नको पाठवूस गं. हां. चल, बाय! हो... हो... बाय!'
गाववाल्या मित्राशी माझी या दरम्यान दोन तीनदा नजरानजर झाली होती. हा माणूस मदत करण्याच्या पलिकडचा आहे हे आम्ही न बोलता मान्य केलेलं होतं. आता आमच्या दोघांतच काय ती स्पर्धा होती. ती मुलगी जास्तंच चांगली निघाली तर गाववाला स्वतःहून माघार घेणार हे मला ठाऊक होतं. खरं तर मीही माघार घ्यायला हवी, पण आम्ही अतिआशावादी आहोत.
असो. तर ठाणे स्टेशन आलं. आम्ही येणा-या जाणा-यांकडे लक्ष ठेवून होतो. एक ललना चढली, तिच्यासोबत आणखी एक पुरुषही चढला. बहुधा सोडायला आला असावा. माझ्या आशा उंचावल्या. मुलगी दिसायला बरी होती. गव्हाळ कांती, हेअरबँडने बांधलेले लांबसडक काळे केस. एक बट फिकट तपकिरी रंगवलेली. नट्टापट्टा फारसा नव्हता. किंवा दिसत नव्हता. चेहरा हनुवटीपाशी निमुळता होता. डोळे तसे लहानच होते. नाक छान होतं. कान पाहिले नाहीत. इतक्या तपशीलात शिरायचं नसतं. चेहरा पटकन चांगला की वाईट ते पाहून घेऊन मोर्चा लगेच दक्षिणेला वळवायचा असतो. सैल टाॅप आणि त्यावर काळ्या आणि राखाडी रंगाचे आडवे चट्टे. खाली काळी विजार. त्याखाली हिरव्या रंगाचे लेडीज बूट. उंचीला फारशी नसली तरी पार ठेंगणीही नव्हती. चालून गेली असती. पण गंमत अशी झाली होती की चालून गेली सुद्धा... आमच्या कंपार्टमेंटला ओलांडून, त्या तिथे... पलिकडे. तिचा सखा तिचा सहप्रवासी निघाला. आम्ही ओठ दाबून एकमेकांकडे बघून एकमेकांना मूक दिलासा दिला. 'येईल येईल' - आम्ही म्हटलं.
एक मोठं कुंटुंब चढलं. माणसं रांगेने पुढे पुढे जात होती. खात्यापित्या घरची दिसत होती. जरा जास्तच खात पित असावीत. त्यांच्या रांगेत एक म्हैसही होती. ती आमच्या कंपार्टमेंटपाशी थबकली. आपली बॅग खाली टाकून तिला एका लाथेसरशी सीटखाली तिनं ढकलून दिली. आम्ही जरासे दचकलोच कारण ही बया आम्हाला त्या पुढे सरकणा-या खानदानाचा भाग वाटली होती. ती त्या खानदानाची कोणी नव्हतीच, पण एकवीस वर्षीय तरी होती की नाही असं आम्हाला वाटायला लागलं.
'ए तो कावळा कसला मोठा आहे बघ.' बिनगाववाला आता खिडकीबाहेर बघत होता.
'काॅर्मोरंट आहे रे. मुंबईला दिसत नाहीत का कच-यासारखे.'
'हो ना. इथे तरी काहीतरी वेगळं दिसणं अपेक्षित होतं.'
'गावाला चल याहून चांगले पक्षी दिसतील.'
'नक्की?' हा माझा प्रश्न द्व्यर्थी होता.
'नाही तसे पक्षी नाही. तशा पक्ष्यांच्या दुष्काळ आहे तिथे.'
मी गपचूप पुस्तक काढून वाचत बसलो. गावाहून परतताना मी प्रवाशांची यादी पाहायच्या फंदातच पडलो नाही.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर
प्रतिक्रिया
तुम्हां तिघांचा फोटो टाकता का
काही खॆर नाय पेंढारकरांची,
छे! इतका काय खास नाहीये धागा,
lol
हा हा.
'अगं आई अंडरवेअर ही काय कुरिअर करायची गोष्ट आहे का?बेक्कार ! खरा तर एखादी ललना असती पण सोबत तर अश्या बोलण्याने मिळालीच ती.. :)हलका फुलका !!
आता आमच्या दोघांतच काय ती
गाव अभी बसा नही और लुटेरे आ
बाब्बौ!